आपण
जखमेवरती मीठ दुज्याच्या चोळत बसतो आपण
पुन्हा पुन्हा ही एकच संधी शोधत बसतो आपण
ज्याचे त्याचे भविष्य ज्याच्या त्याच्या हाती असते
तरीही ज्योतिष्याच्या नादी लागत बसतो आपण
सर्वज्ञानी स्वतःस समजून आपण बोलत जातो
खुळ्यापरी अकलेचे तारे तोडत बसतो आपण
जिकडे तिकडे माणूस म्हणुनी मिरवत असलो तरी
माणूसकीवर खुनी हल्ले चढवत बसतो आपण
किती चोरटे , किती लफंगे , किती बुवा अन बाबा !
फसूनसुध्दा त्यांच्या नादी लागत बसतो आपण
स्वतः स्वतःच्या निर्मळतेची जाहिरात करतो अन
क्षुद्र मनाची दूषित छिद्रे झाकत बसतो आपण कंपू करूनी नको नको त्या चर्चा करतो सा-या
नसेल त्याच्या पाठीमागे बोलत बसतो आपण
=====================================
..............