how are you ?
Please stay at home, stay safe.
Keep your family safe too !
Here are some updates of this blog for you.
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
how are you ?
Please stay at home, stay safe.
Keep your family safe too !
Here are some updates of this blog for you.
मी सुंदर स्वप्नांचे
मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो
वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो
आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते
माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो
होईल मनाजोगे... होईल कधी काळी...
मी आत असा माझ्या मज समजावत असतो
गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्
मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो
हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला
हटकून असा त्याला मीही टाळत असतो
संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन
एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो
ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे
मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो
हा बंद तुझा आता बाजार जगा झाला
घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
टीप : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
आज तिचा ७४ वा वर्धापन दिन.
त्यानिमित्त एस्.टी. शी संबंधित
सर्वांचेच अभिनंदन !
आमच्या जाकीमिऱ्या गावात पहिली
एस्. टी. बस सन १९६९ मध्ये आली.
अगदी बालपणी. तेव्हा ती निळ्या,
हिरव्या आणि पांढऱ्या रंगात
होती. पुढे त्यात पिवळा रंग मिसळला.
कधीतरी लाल रंगही आला. त्यांने
बरीच वर्षे राज्य केलं. त्याचा मनावर
एक पगडा बसलेला आहे. अगदी " ये
लाल रंग कब मुझे छोडेगा " या जुन्या
हिंदी गाण्याची आठवण यावी इतका.
लाल डब्बा म्हणूनच एस. टी. फेमस झाली.
मग खाजगी गाड्यांच्या स्पर्धेमुळे एस. टी.ही चकचकीत झाली. रंगीतसंगीत झाली. आधुनिक झाली.
काही झाले तरी एक गोष्ट मात्र कायम राहिली. दिवस रात्र थकण्याची पर्वा न करता अखंड प्रवास आणि आपुलकी !एस. टी. ची प्रवाश्यांबद्दलची आपुलकी ! हजारो किलोमीटर, हजारो माणसे...!
पहिली बस धावली ती बेडफोर्ड कंपनीची ३० आसनक्षमतेची होती.
शिवाजीनगर कार्पोरेट जवळ बसचा
शेवटचा थांबा होता. खाजगी
वाहतूकीच्या व्यवसायावर
परिणाम होईल या भीतीने हल्ला होईल
म्हणून माळीवाडा वेशीपासून
पुण्यापर्यंत ही बस पोलीस बंदोबस्तात
नेण्यात आल्याची माहिती मिळते.
याप्रकारे, सुरुवातीपासूनच खाजगी
वाहतूक, कच्चे रस्ते, अपुरी
साधनसामग्री आणि इतर अनेक
घटकांचे अडथळे पार करणारी आपली
एस. टी. आजही अथक धावते आहे.
अगदी रेल्वे आली तरी एस. टी.
माणसे आणि बोज्यांची ने आण
करतेच आहे.
डबघाईला आली आली असं म्हणता
म्हणता पुन्हा पुन्हा उभारी धरते आहे.
ऊर्जितावस्थेला येते आहे. संघर्ष सतत
चालूच असणारी ही महाराष्ट्राची
माऊली आहे. तिच्या प्रत्येक
कर्मचाऱ्यावर आणि प्रवाशावर विश्वास
ठेवून , बहुजन हिताय बहुजन सुखाय
या ब्रीदपूर्ततेसाठी ती सतत धावत
आहे.
चांगले वाईट सगळीकडेच असते.
कच्चे दुवे सगळीकडेच असतात. एस्.
टी. मध्येही आहेत, पण म्हणून ती काही वावगी ठरत नाही. ७४ वर्षे करोडो प्रवाशांची अखंड सेवा करणारी एस. टी. म्हणूनच आपल्याला आपली वाटते.
महाराष्ट्रात पहिली एस्. टी.
अहमदनगर - पुणे मार्गावर ज्यांनी
नेली ते चालक श्री. लक्ष्मण केवटे व
वाहक श्री. किसन राऊत यांच्यासह
आजपर्यंतचे सर्व चालक व
वाहक म्हणूनच आम्हांला आपले
वाटतात. इतकेच नव्हे तर एस्. टी. ला सतत तंदुरूस्त व उत्साही ठेवणारे
महाराष्ट्रातले आजपर्यंतचे सर्व
मेकॅनिक्स, कार्यशाळा, भांडार ,
कार्यालय यातील सर्व श्रेणीतील सर्व
अधिकारी व कर्मचारी आपले वाटतात.
यांच्याच जिवावर एस्. टी. अहोरात्र
धावते आहे. एस्. टी. ह्या
जीवनरेखेची निर्मिती करणारे
महाराष्ट्रातले सर्व संबंधित आम्हांला
आमचे सगेसोयरे वाटतात.
महाराष्ट्राच्या ज्या मंत्र्यांनी , प्रशासकीय
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एस्.
टी.साठी मनापासून योगदान दिले आहे
तेही सर्व आपलेच वाटतात . हा केवळ
लाल डबा नाही, केवळ पत्रा नाही,
एस् . टी. ही सजीव धावती
गोष्ट आहे. प्रवाशांप्रती तिचा
समर्पित सेवाभाव अत्युच्च श्रेणीचा
आहे. जी आपुलकी एस् . टी . ने
चौऱ्याहत्तर वर्षे जपली आहे ती
यापुढेही ती जपत राहील यात
तीळमात्र शंका नाही. प्रवाशीही
एस्. टी. त्यांना जी आपुलकी
देत आली आहे तशीच आपुलकी
एस्.टी.ला देतील आणि महाराष्ट्राच्या
ह्या वाहतूक जीवनरेखेशी सातत्याने
ॠणानुबंध वाढवतील, जपतील, अशी
खात्री बाळगतो आणि आपल्या
एस्.टी.ला मानाचा मुजरा
करून इथेच थांबतो !
#मानाचा_मुजरा
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची वेबसाईट
https://msrtc.maharashtra.gov.in/
Maharashtra State Transport Corporation.