खूप खूप कालावधीनंतर या पानावर लिहितो आहे. पूर्वी खूप सुंदर प्रतिसाद आपण दिलेला आहेच. आता तारीखवार लिहिले आहे. आपण आवर्जून प्रतिक्रिया द्यालच !
५ मार्च २०२१ :
प्रयास कार्यकारिणीची पहिली सभा
स्थळ: रत्नागिरी विश्रामगृह
वेळ : दुपारी ४ ते ५. (उपस्थित)
.................
०५.०३.२०२१
रत्नागिरी विश्रामगृहात ०३.४४ ला पहिला मी आलो. सभा सूरू होण्याआधी.
०४.१२ ला सौ.चा घरून फोन. आबाची आई गेली. दापोलीला. तिला रात्री आणणार. मिटींग कंटिन्यू केली. संध्याकाळी घरी आलो. रात्री साडेनऊ वाजता आबाकडे गेलो. सर्व आलेले होते पण आबांची एक मुलगी पुण्याहून निघाली होती. ती रात्री दोन वाजता आली. सगळे होऊन तीन वा. घरी आलो. आंघोळ करून चहा घेतली. खालच्या अंगणातली लाईट काढायला पुढे आलो तर समोरच्या बंगल्यात लाईटी लागलेल्या ! तितक्यात, क्रांती बंगल्याच्या कंपाऊंडकडे बोंबटत आली. तिच्या सासऱ्याला वांत्या होत होत्या, घाम फुटला होता, तळमळत होता. लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला आणि आम्ही तिघेही बंगल्यात गेलो. थोड्या वेळाने मेघाच्या घरी जाऊन तिला घेऊन आलो. मग क्रांतीचा नवरा आला. त्याने बंटी व विकीला बोलावून आणले. शेवटी पाच वा. पेशंटला सिव्हील हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करायला विकी त्याच्या कारमधून घेऊन गेला आणि आम्ही घरी आलो. तोपर्यंत उजाडत आले होते.
...................
०९.११.२०२०
गेले २ - ३ दिवस राकेश तसा झालाय.
शेवटच्या गझलकाराच्या गझला , परिचय , फोटो म. नानिवडेकरांकडे आजच पाठवल्या.
सायं. ०६.३७ ला सुनील आडीवरेकरचा सावंतवाडीहून फोन आला. भाऊ सुधीर व दोन मित्र असे चौघेजण उद्या रत्नागिरीत व आमच्याकडेही येणार आहेत.
अरविंद ग्रील बसवायला आज येणार होता. आला नाही. फोन करून उद्या यायला सांगितले.
........
१०.११.२०२०
स. ०९.३० वा. सुनीलला फोन केला तर त्याच्या आईची तब्येत बिघडल्याने सुधीर येत नाही व सुनील आत्ताच मित्रांसह निघाल्याचे कळले.
संध्या. ०४.३० वा. अरविंद व पब्यादादा चंदरकर ग्रीलचे साहित्य घेऊन आले व अंगणात ग्रील तयार करू लागले.
.....तोच सुनीलची गाडी आली. सावंत , कंग्राळकर हे सावंतवाडीचे व मागाहून आलेले टाकळे मिऱ्याचेच असे चौघेजण आले. एल एम एल बिझीनेस. नो इंटरेस्ट.
११.११.२०२०
काल रात्री एक गझल सुचली. पण मधल्या एका शेराची दुसरी ओळ स्फुरली पण दुसरी समर्पक ओळ येईना. अखेर आज सकाळी ती ओळ सुचली.
काल सतीश टोपकर आमच्याकडे येणार होता तो आला नव्हता. खालच्या अंगणात ठेवलेल्या वाळूच्या २८ पिशव्यांपैकी ०२ कमी झाल्याचे लक्षात आल्याने सतीशला त्याच्या माणसांकरवी त्या आमच्या अंगणात ठेवायला सांगितले होते. आता हे नोंदीत असतानाच सतीश त्या पिशव्या हलवतोय. सकाळचे १०.२० झाले आहेत. तेव्हढ्यात उदू आलाय. दिवस पुढे सुरू झाला आहे.
दुपारी जेवणाच्या वेळी समोर लक्ष गेले. तीन तरूण बंगल्याच्या रहाटाजवळ दिसले. कदाचित भैय्या भाभी सोडून गेल्याने रिकामा झालेल्या बंगल्यात काॅलेजकुमार रहायला येणार असतील किंवा ती मालकाची मुलेही असतील, असा विचार करून मी किचनकडे वळलो.
संध्याकाळी केस कापायला गावातला मुलगा आला. मी केस कापून घेतले. उद्या सौ. ते रंगवणार आहे. केस कापले जातांना कडीपत्ता न्यायला विकास आला. त्याला
विचारले तर बंगल्यात नवीन कोण रहायला येणार हे त्यालाही माहिती नाही म्हणाला.
संध्याकाळी पुढच्या दारी पायरीवर मोबाईल बघत बसलो होतो तर क्रांती आली. ती स्वत:च म्हणाली की ती बंगल्यात रहायला येतेय. म्हणजे लवकरच आमच्या शेजारी क्रांतीपर्व सुरू होणार...
........
१२.११.२०२०
आज वसुबारस.
सकाळी स्वप्नं पडले. मी व नार्वेकर एका काॅलेज हाॅस्टेलमध्ये आहोत. आणखी तीन चार जणही आहेत. ते फिरायला जाणार आहेत. तत्पूर्वी नार्वेकर मला संगणकावर महाकोष दाखवण्यासाठी संगणक सुरु करीत असतात. मी पासवर्ड नीट बघून ठेवला पाहिजे, हे बाहेर गेले की पंचाईत नको, असा विचार करतो. प्रोग्रामच्या टचमध्ये राहिले पाहिजे, असे मी बोललो तर तेही म्हणाले की , नाही तर विसरायला होतं. तेवढ्यात दोन काॅलेजकुमारी काही तरी विचारतात. मी त्यांना तुम्हाला तिकडे रुम दिली आहे असे समोर बोट दाखवून सांगतो. इथेच स्वप्नं संपते.
आज सकाळी सौ.ने माझे केस काळे केले.
आज मुलाने मला नवीन शर्ट आणला आणि हिच्यासाठी दोन साड्या आणल्या. तीनही सुंदर आहेत. मुलाने स्वत:ला मात्र सांगूनही काहीच घेतले नाही. त्याचा मूड नाही हे मला कळते आहे. पण मी काही करू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. आयुष्यात कधी नाही तेवढा मी हताश झालो आहे. काळाच्या मनात काय आहे ते कळत नाही. आज मी तुम्हांला काही सांगू शकत नाही.
आज क्रांती बंगल्यात येईल असे वाटले होते पण अजून तरी कुठे जाग नाही.
दुपार झाली. अरविंद अजून तरी आलेला नाही. संध्याकाळी तरी येतोय का ते बघू.
अरविंद आला नाहीच. पण संध्याकाळी पाच वाजता समोरच्या बंगल्यात झाडलोट सुरू झाली. सतरा तारीखच्या आत रहायला येणार असं क्रांती माझ्या सौ.ला म्हणाली .
.................
१३.११.२०२०
सकाळी ०७.३० वा. अरविंदला फोन केला. तो थोड्या वेळाने येतो म्हणाला. तासाभरात जोशी , चौगुले व अरविंद पण आला. आज दिवसभरात दुसरे ग्रील तयार होऊन दोघांनाही रंग पण काढून झाला. साडेपाच वाजता ते तिघेही निघून गेले. उद्या दिवाळी आहे. परवा येतो म्हणाले.
संत्याने दोन्ही घरात आकाश कंदील लावून दिले.
स्वाती वहिनीने घरातली सगळी लादी पुसून काढली व ती गेली. सौ.ने व मी पणत्या लावल्या. दोन्ही घरातील आकाश कंदील पेटवले. दरवर्षीप्रमाणे आम्ही लायटींगही केली आहे. पण खरं सांगू, आमच्या मनालाच उजेड हरवलाय. आताही रात्री साडेनऊ वाजता मुलगा गाडी घेऊन बाहेर गेला. बाहेर जातोय हे सांगितले पण आता रात्रीचा कुठे जातोयस विचारले तर जाऊन येतो म्हणाला आणि निघून गेला. मुलाचं हे विक्षिप्त वागणं आम्हां दोघांनाही अनाकलनीय झालंय. तो वीस मिनिटात परत आल्याने आमच्या जिवात जीव आला.
१४.११.२०२०
काही विशेष नाही.
१५.११.२०२०
आज दिवाळी. लक्ष्मीपूजनही.
पहाटे स्वप्नं पडले. मी एका घरात पहिल्या मजल्यावर खिडकी जवळ खुर्चीत बसलेला. समोर कोणी तरी आहे. मी खिडकीतून बाहेर बघतो तर रिक्क्षाजवळ उभा असलेला रिक्षा ड्रायव्हर अगदी ओळखीचा असल्यासारखा मला हात दाखवून हसतो. दुसऱ्याच क्षणी तो अनोळखी असल्याचे लक्षात येऊन मलाच विचित्र वाटते. मी खुर्चीतून खाली बसतो. पण तरीही तो मला दिसत असतो व त्यालाही मी दिसत असतो. तो पुढे येऊ लागतो. मी मान आणखी खाली घालतो. तो पुढे येऊन सांगतो की साॅरी हा, मला माझ्या ओळखीचेच वाटलात... म्हणून मी हात केला. त्यालाही आता ओशाळवाणे वाटत असल्याचे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. इथे स्वप्नं संपले.
१६.११.२०२०
बंदूचे व त्याच्या वहिनीचे जोरदार भांडण झाले. सौ.चे आजारपण, मुलांचा गंभीर होणारा प्रश्र्न या पार्श्र्वभूमीवर एकूणच सगळे कठीण बनले आहे.
२७.११.२०२० ला तुळशी विवाहादिवशी अशोक व गार्गी आली.
२९.११.२०२० ला अशोकच्या कारने वेंगुर्ल्याला गेलो.१.१२.२०२० ला सकाळी सावंतवाडीला गेलो.
वीस दिवस तिकडेच होतो. मुलांचे वर्क फ्राॅम होम सावंतवाडीतूनच चालू होते. सौ.च्या पायदुखीमुळे तिथल्या एका डाॅक्टरने तिच्या पायातून रक्तही काढले. नासके रक्त आहे म्हणाला.
मध्येच एक दिवस वेंगुर्ल्यात खवणे बीचला पेडणेकर व हडकर फॅमिली बरोबर जाऊन आलो. तिथेही मुलाचा व सौ.चा खटका उडालाच.
वीस दिवसांनी घरी आलो.
२१.१२.२०२० पासून मुलाचे वर्क फ्राॅम होम नवीन बांधलेल्या वरच्या माळ्यावर सुरू झाले.
२१.१२.२०२० ला बावादादा आला.
२५.१२.२०२० ख्रिसमस
मंगलला ११.४५ ला झोप लागल्यानंतर मुलगा खूप डिप्रेस्ड झाल्याचे लक्षात आल्याने , काल रात्री १२ ते १.३० पर्यंत त्याच्याशी बोललो. त्याला समजावून माळ्यावरुन खाली आलो आणि दोन वाजता सौ. अंगावर रॅशेस उठल्याने अंग खाजवत जागी झाली. सुदैवाने मुलाचे काम लवकर संपले होते. मग आम्ही चार वाजेपर्यंत सौ. वर उपचार करीत राहिलो. नंतर थकून झोपलो तो ७.३० ला बावादादाने बेल मारली तेव्हा जागे झालो. असा आमचा हॅपी ख्रिसमस झाला.
.......
०२.०१.२०२१
मुलगा ३१.१२.२०२० रोजी रात्री मुंबईला गेला. आई आजारी असूनही थांबला नाही. त्याचा चेहरा बघून थांबवणेही जमले नाही. ०४ तारीखला सकाळी येतो म्हणालाय.
भाची , तिचे मिस्टर, त्यांचा मामेभाऊ , दुसरी भाची तिची मुलगी गौरांगी असे कुडाळातून आले. जेवले आणि गेले पण. एवढ्या ला़बून येऊन थांबले नाहीत.
संस्थेची पॅन अॅप्लीकेशनची रिसिप्ट आज ११ वा. मिळाली. बॅंकेत फोन केला. बॅंकेचे साहेब म्हणाले , चार वा. या. गेलो. दिली. संस्था रजिस्ट्रेशनला एक वर्ष लागले ! आता बॅंक अकाऊंट कधी ओपन होणार त्याची वाट बघायची. जागतिक महासत्तेच्या स्वप्नांचा वेगच जास्त आहे.
संध्याकाळी ०६ वा. पुण्याहून कांतीचा फोन आला. गेले काही दिवस आजारी असलेली विलासची छोटी गेली. अतिशय दुर्दैवी घटना.
घरात सौ.ची पायदुखी वाढलीय. तेलाने माॅलीश करून इस्त्रीने शेकतोय. काय करावे तेच कळत नाहीय.
...................
१०.०१.२०२१
आज सकाळी दादाची तब्ब्येत बिघडली. परकार हाॅस्पीटलला नेलं. बरा झाला. दादाची काळजी वाटते.
दुपार चांगली गेली. संध्याकाळ सुंदर होती.
पण रात्री साडे दहाला आम्हां तिघांचे घरगुती नाट्य सुरू झाले. ते दोन वाजेपर्यंत चालले. अडीचच्यानंतर कधीतरी झोप लागली असेल.
.................
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री असे द्रष्टे कवी सुरेश भट साहेब लिहून गेले. अशा ओळी कालातीत असतात. अमर असतात. अक्षय असतात. भटांनी केवळ विजा घेऊन येणाऱ्या पिढीलाच ओळखले होते असे नव्हे, तर आणखीही काही जणांची कुंडली त्यांना ज्ञात होती. म्हणूनच वाकुल्या दाखवी निकाल मला असेही ते लिहून गेले होते. उच्च पातळीवर काय होऊ शकते , हे सर्वसामान्य माणसाला कळतही नाही आणि कळू दिले जातही नाही.
शिखंडी आडून येतो बाण एखादा
लबाडीने प्राण घेतो बाण एखादा
यंत्रणांना शिखंडी समजून त्यांच्याद्वारे अशी गत केली जाते. खास खोज्यांनी तशी व्यवस्था केलेली असते. भटांनी यावर कायम स्वरूपी मार्मिक भाष्य केले आहे. तुझ्या महालामधील खोजे तुझ्याहुनी बेगुमान होते हेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. हे खोजे वेळकाढूपणा करणार. समिती जन्माला घालणार, भिजत घोंगडे ठेवणार आणि त्यांना सोईच्या वेळेला ते वरही काढणार . म्हणून भटसाहेबांनी त्यांना बेगुमान म्हटलेलं आहे. आपण काय म्हणायचे ते ठरवा आणि म्हणा पण !
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१४.०१.२०२१
...............
२४.०१.२०२१ रविवार एका फाॅर्मसाठी निलेश पाटील ने माळनाक्यावर आहार रेस्टाॅरंटमध्ये बोलावले. दादा व मी सह्या करून आलो.
२६.०१.२०२१ सुट्टी
२७.०१.२०२१ निलेश पाटील ना अॅक्सिस बॅंकेत जाऊन बावादादासह भेटलो. आवश्यक त्या अंतिम दुरूस्त्या करून दिलेल्या.निलेश पाटील म्हणाले, आता फक्त एक फाॅर्म ६०चं एक अॅप्रूव्हल राहिले आहे. एक आठवड्यात ते मिळेल. मग अकाऊंट ओपन होईल. तेव्हा तिथे शेजारचा हर्षद हेमंत सावंत (अॅक्सिस बॅंक कर्मचारी ) आला. त्यालाही ही गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बघतो. एका बॅंकेत खाते उघडायला महिना लागतो ही डिजीटल युगाची शोकांतिका आहे.
२८.०१.२०२१ सकाळी बावादादा मुंबईला रवाना. सौ. व मी बावनदीला डाॅ. बनेंकडे आजपासून जायला सुरुवात केली.
........
०७.०२.२०२१
आज बावनदीला जाण्याचा शेवटचा दिवस. घराजवळच रिक्षा भेटली. रिक्शावाला ओळखीचा निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याने रिक्शा थांबवली. सरपंचपदी निवड जवळजवळ निश्र्चित झालेल्या उमेदवाराचे त्याने अभिनंदन केले. मग आम्हीही केले. पुढे रहाटाघरातून पांगरीमार्गे देवरूख बसने नेहमीप्रमाणे बावनदीला गेलो. अडीच वाजता घरी आलो तर मुलगा शहरात निघालेला. नीटसं जेवलाही नव्हता. नीट बोललाही नाही. मी लवकर ये म्हटलं. तो हा म्हणाला. त्याचा मूड कालपासूनच ठीक नव्हता. काळजी वाटत होतीच. साडेपाच वाजले तरी तो आला नाही. म्हणून फोन करीत असतांनाच एक बाई पाटीलवाडीत सुनील पाटीलने आत्महत्या केल्याचं सांगत आली. आमच्या काळजात धस्स झालं. मुलाला फोन करीतच होतो, पण रिंग होऊनही तो उचलत नव्हता. आमचं टेंशन वाढतच होतं. आम्ही फोन करीतच होतो. शेवटी साडेसहाला त्याने फोन उचलला. घरी येतोय म्हणाला. आम्ही पुन्हा पुन्हा फोन करीत राहिलो. तो येतो म्हणत राहिला. शेवटी तो रात्री आठ वाजता आला तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला. रात्री आमच्याजवळ झोपवला. आता उद्या काय होईल या विचारात झोप नीट लागलीच नाही.
............
१०.०२.२०२१
पहाटे पाच वाजता मला स्वप्नं पडलं. पुढच्या अंगणात दक्षिण दिशेला दादा उभा असतो. त्याच्या डाव्या हाताला माझा मुलगा बहुतेक खाली बसलेला आहे. ते दोघे काही तरी शोधतायत. मी उत्तरेकडे उभा राहून काय शोधतायत ते विचारतो. दादा सांगतो की ते आमचा जुना खुणेचा दगड शोधतायत. माझ्या हातातल्या काठीने मी वायव्य आग्नेय अशी खूण करून तो दगड या पट्ट्यात कुठे तरी जमिनीत गाडला गेला आहे, असे सांगतो. इथे स्वप्नं संपलं. खरं तर तो दगड दादाच्याच अंगणात आमच्या शेवटच्या पायरीपासून दीडेएक फुटांवर पूर्वापार होता. दादाने जुने घर पाडून नवे घर बांधले तेव्हा तो उभा दगड अंगणात घातलेल्या नवीन लादीखाली गेला. तो आम्हां तिघांनाही माहीत होता. मग दादा तो आताच का शोधत होता आणि मी छेद द्यावा तशी काठीने माझ्याच अंगणात रेषा आखून का दाखवतो ? काही तरी तिरकस घडणार या विचाराने मी दिवसभर अस्वस्थ होतो. तो छेद मनातून जात नव्हता. गेले काही दिवस मुलगाही विचित्र वागत होता. नीटसं जेवतही नव्हता. कुठलेच उत्तर सरळ आणि सहजतेने देत नव्हता. संध्याकाळी घाईघाईने शहरात गेला. परत आला तो चिडलेलाच होता. रात्री तो जेवलाच नाही. भूक नाही म्हणाला. आम्ही दोघंही टेंशनवरच होतो. काय झालंय तेही सांगेना. रात्री अकरा वाजले तरी तो जेवायला तयार होईना. आमचा जीव राहिना. अखेर मी जिन्याने वर जाऊन पुन्हा विचारले तर तो भडकलाच. मला एकट्याला राहुद्या म्हणाला. मी निराश होऊन खाली आलो. साडेअकरा वाजता त्याला वरती गारठा असल्याने खाली ये म्हणून हिने त्याला सांगितले. खूप मिनतवारीनंतर तो दणदणत खाली आला. शेजारी झोपला. पण रडू लागला. ही समजवायला गेली तर त्याने हिला झिडकारलंच. मी पण आमच्या दोघांच्या आजारपणांना आणि मुलांच्या ह्या विचित्र वागण्याला कंटाळलो होतो. मी माझ्या दुर्दैवाबद्दल काही तरी बोललो. त्यावर हिने मला दुजोरा दिला. त्यामुळे भडकून मुलगा हिला काही तरी बोलला झाले, मायलेकांचे भांडणं सुरू झाले. ही हायपर झाली. त्या उद्रेकामुळे हिच्या अंगाला खाज सुटली. हिचे दुखणे पुन्हा सुरू झाले. श्र्वास कोंडून ही तडफडू लागली. तसा तो माझ्या मदतीला आला.
..............
१३.०२.२०२१ रात्रीच्या बसने मुलगा पुण्याला गेला. मित्राचे लग्नं आहे.
...............
१९.०२.२०२१ मित्राचे लग्न काल झाले. काल रात्री पुण्याहून निघून मुलगा आज सकाळी घरी आला.
........... ( क्रमशः )