बाल्याची अटक टलली !
आमी सातवीत व्हतो तवाची गोष्ट. आमच्या वर्गात तीन तीनदा नापास झालीली दांडगी पोरं व्हती. त्यातला बाल्या माझा मैतर झालीला व्हता. त्या दिवशी बगा , शाला सुरू झाली. वर्गबी भरला. आमी समदे सावरूनबी बसलो. पन गुरूजींचा पत्ताच नव्हता. असं कधी झालीलं नव्हतं . गुरूजी एकदम वक्तशीर मानूस. त्यातच कधी नव्हं ता बाल्या जरा टेंशनमधी दिसत व्हता. मी बाल्याला इचारनार एवढयात गुरूजीच आत आलं. पण त्यांच्यासंगं हेडगुर्जी पण आलं. हेड गुरुजीं जाम चिडलीलं दिसत होतं. आमास्नी काय समजंना. आमी समदे उभे राहिलीलं. तेवढ्यात, हेडगुर्जी म्हनालं, " बाळ्या सोडून सगळे बसा. " उभा राहिलील्या बाल्याकडं बघून हेडगुर्जी गरजलं. " बाळया काल संध्याकाळी गुरुजींना काय बोललास ? पन बाल्या काय बोलंना. तसं हेडगुर्जीच बोललं. काय रे गाढवा, काय बोललास तू गुरूजींना ? तुला कोणाला काय बोलायचं ते कळतं का ? ते कुठल्या पदावर, तू कुठल्या पातळीवर ! पदाचा मानबीन कळतो की नाही तुला ? " बाल्या कायबी बोलंना हयं बघून हेडगुर्जींनी बाल्याच्या एक मुस्काटात ठेवून दिली ! आमी समदे गपगार झालीलं. पन बाल्या आपला उभाच. थोडासा गाल चोलया लागलीला इतकंच . हेडगुर्जी पुन्हा गराजले. " निगरगट्टा, तुला अक्कल आहे का काही ? याच्यापुढे जर मोठ्या माणसाला असलं काही बोललास तर याद राख. पोलीसातच देतो तुला ! अटक झाली म्हणजे समजेल तुला ! " असं म्हनून मोठं गुर्जी त्यांच्या खोलीत गेलं. इतक्यातच एकदम पोलीस गाडीचा सायरन वाजला. तं बाल्यानं सुंबाल्या केला. त्याला वाटलं पोलीस शालेकडंच येतायत. तं बाल्या धावत जो निंघाला ता एकदमच लेडीज मुतारीत जाऊन लपला ! मैदानात पोरी लगोरी खेलत व्हत्या. त्यांनी ध. रा. जवलकर बाईना सांगलं. त्यांनी बाल्याला हाका मारल्या. तसा बाल्या बोलला मी येतो बाहयर, पन मला जवल धरा. मला पोलीसांची जाम भीती वाटते बाईनु. इकडं काही पोरींना घाई झालीली व्हती. त्या बाईंना करंगळ्या झालाय लागलील्या. भयंकर अटीतटीचा प्रसंग व्हता तो. बाईंचा इलाज चालंना, बाल्या बाहयर निघंना. शेवटी बाल्याची अट बाईंनी मान्य केली तसा बाल्या बाहयर आला आनि जवळकर बाईंना त्यानं घट्ट मिठीच मारली. समदया पोरी किंचालल्या आणि हेड गुरुजींचं लक्ष खिडकीतनं बाहयर गेलं. त्यांना बाल्याची भीती दिसलीच नाही. दिसलं तं भलतंच ! झालं, गुरुजींनी फोन फिरवला. पोलीस गाडी गावातच व्हती. दुसऱ्या मिनिटाला पोलीस आलं. त्यांनी बघला तो बाल्या थरथर कापया लागलीला. भीतीपायी त्यांनं जवलकर बाईंना आणखीनच जवल केलीलं ! बाईंना मिठीतनं सुटता येईना. शेवटी पोलीसांनी त्यांना सोडीवलं आणि सगल्यांना हेडगुर्जींच्या खोलीत नेलंनी .तिथं समद्यांच्या जबान्या झाल्या. जबानीतनं पोलीसांना सगला परकार कलला. ते हसू लागलं आनि बाल्याची अटक टलली ! हयं पोर आपल्याला टराकतं हय बघून पोलीस खुशीत निघून गेलं. पोलीस गेलं. शाला सुटली. आमी समदं बाहयर पडलो. त्या समद्यात बाल्या गुरूजींना काय अपमानास्पद बोलला व्हता तं आम्हा पोरांपैकी कुनालाच कललं नाय. मी बाल्याला इचारलं तं ता म्होरलाच बोलून गेला. काय तं म्हने मी काय असा तसा वाटलो काय त्यांना ! समाजतात काय सौताला ? मला अटक करया यांचं बापजादं याया हवंत ! संध्याकाल होयत आली व्हती. घराकडं जावन मला कोंबडी झाकयाची व्हती. मी आपला गप व्हवून घरचा रस्ता धरला.