Pages

सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

स्वभावाला औषध नाही ?

स्वभावाला औषध नाही ...?


माणसे नेमकी कशी वागतील हे सांगता येत नाही . कधीच सांगता येत नाही . एखादा माणूसही कोणत्या वेळी कसा वागेल हे खुद्द तोही सांगू शकणार नाही . #मानवी_स्वभाव हा असा आहे . काय करणार ? 

#स्वभावाला_औषध_नाही . #स्वभाव हा असा आजार आहे की ज्याच्यावर आजही १०० टक्के  औषध   सापडलेले नाही , असे म्हटले जाते. खरे तर , हे खरे आहे का ? हे तपासण्यासाठी मी माझ्याच स्वभावाचा मागोवा घेतला. त्याचीच ही एक गमतीदार गोष्ट ( तुम्हांला म्हणून सांगतो ) ! 

माझा स्वभाव कसा होता ?

एकाच शब्दात सांगायचे तर भित्रा होता ! समजायला लागले तेव्हापासून भीती मला ओळखत होती आणि भीतीला मी ओळखत होतो ! सगळ्यात पहिली वडिलधाऱ्यांची भीती होती ; त्यातही खुद्द आईची भीती सर्वात जास्त होती ! ती अतिशय कडक होती . शिस्तप्रिय होती. तिनेच मला त्या काळात वयोमर्यादेपेक्षा शाळेत लवकर घालण्याचा हट्ट धरला होता. मुख्याध्यापकांनी तो अमान्य केला व माझा शाळा प्रवेश एक वर्षाने लांबला. पण तिने मला घरीच शिकवायला सुरूवात केली ! ती केवळ दुसरी शिकलेली होती पण मी दुसरीत असतानाच बाहेरगावी नोकरी करीत असलेल्या माझ्या वडिलांना पत्र लिहू लागलो होतो , इतके तिने मला  छान शिकवले होते ! म्हणजे , स्वतःजवळ जे आहे त्याचाच पुरेपूर वापर केला तर माणूस खूप काही करून जातो ! आईची भीती असूनही मी तिच्याकडूनच शिकलो !

शैक्षणिक धोरण बदलले !


पुढे शाळेत शिक्षकांची भीती वाटायची. कोपऱ्यात उभी केलेली छडी माझ्याकडेच डोळे वटारून पाहतेय असे सारखे वाटायचे ! त्यामुळे शिक्षक प्रश्नं विचारू लागले की मी आधीच #छडीग्रस्त झालेलो असायचो ! त्यांनी फक्त शिकवावे , प्रश्न विचारूच नये , असे मला वाटायचे. पुढे फक्त शिक्षण असावे , परीक्षा असूच नये असे यामुळेच तर मला  सारखे वाटायचे . (  पुढे माझे हे मत चाळीस एक वर्षांनंतर मायबाप सरकारला अखेर पटले व सरकारने परीक्षारहीत धोरण स्वीकारल्याचेही मला पहायला मिळाले ! आता पुन्हा पाचवी ते आठवीची परीक्षा घेणार असे या जून २०२३ मधले ताजे वृत्त आहे ! ) . पण शिक्षणाची भीती असूनही मी वाणिज्य शाखेचा पदवीधर होईपर्यंत शिकलो !

भीती बालमित्रांची ...😀😀😀


खरे तर , अगदी बालवयातच मला माझ्या बालमित्रांचीही भीती वाटायची. अगदी खेळतांनासुध्दा ! मी लहानपणापासून इतरांपेक्षा किरकोळ प्रकृतीचा . शिवाय मागच्या बाजूचे माझे शेजारी मित्र पटकन एक व्हायचे. एकदा तर खेळता खेळता चक्क गंमत म्हणून सहा सात जण माझ्या अंगावर पडले. मी म्हणजे एकदमच जमीनदोस्त झालो होतो. जमिनीशी माझी ही दोस्ती जुनीच ! मी पटकन पडायचो. बरेचदा ढोपरं फुटायची . ढोपरं फुटणे हा वाक्प्रचार तरुणपणी वेगळाच ठरतो , हे कळायला मला बरीच वर्षे लागली होती ! तर मी जमिनीवर पालथा पाडला गेलेलो , ते सगळे मला आणखीन चेपू लागलेले , माझा श्वास कोंडू लागलेला आणि उठण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत असलेला....एवढासा मी ...माझे अस्तित्वच संपू लागलेले...तेवढ्यात  काय झाले कोणास ठाऊक , बहूतेक कोणीतरी मोठे जवळपास आले असावे , तयामुळे की काय कोण जाणे , पण ते खिदळत उठले ! त्यांना माझे खाली काय होत होते हे कळलेच नव्हते ! त्या अजाण , निष्पाप , आडदांड बालकांना तो सगळा खेळच वाटला होता. त्यांचा खेळ होत असतांना माझा जीव जात आला होता . विशेष म्हणजे हे त्यांच्या गावीच नव्हते. तर त्या प्रसंगाने माझ्या गावातल्या शेजारच्याच बालमित्रांची भीती माझ्या मनात खूप लहानपणीच बसली होती ! तरीही मी पुढे अनेकांचा मित्र झालो , अनेकजण माझे मित्र झाले ! 

हायस्कूल आणि काॅलेजमध्येही मला माझ्या किरकोळ प्रकृतीमुळे पी.टी.चा तास म्हणजे शिक्षाच वाटायची. इतकी पी.टी. शिक्षकांची मला भीती वाटत असे. तरी पण मी त्यांच्या सांगण्यानुसार कसरती करून मोकळा झालोच की !  गणिताची भीती तर सुरूवातीपासूनच होती पण चक्क कवितेची भीती माझ्या मनात दुसरी तिसरीपासूनच निर्माण झाली होती ! तरीही मी नवव्या इयत्तेतच कविता लिहू लागलो ! त्याहीपुढे जाऊन मी गुरूवर्य सुरेश भट यांची मराठी गझल लिहू लागलो आणि गेली अडतीस वर्षे गझलकार म्हणून माझ्यावर शिक्काच बसला ! 

आता मला सांगा...


भीतीचे असे अजूनही कित्येक किस्से माझ्या रोज धडपडत्या आयुष्यात घडले आहेत , घडत आहेतही ! भीती वाटणे हा माझा जणू स्वभावच होऊन गेला होता ! असे असले तरी हा चुकीचा स्वभाव आहे हे ओळखून मी प्रत्येक भीतीवर मात करीत आलो आहे ! स्वभावाला औषध नाही असे कोणी कितीही म्हटले तरी मी माझा स्वभाव बदलला आहे ! स्वभाव नक्कीच बदलता येतो , एकदा तुम्ही ठरवलेत आणि ठरविल्याप्रमाणे वागू लागलात की स्वभाव सहज बदलून जातो ! मला सांगा , आता तुम्हांला स्वभावाला औषध नाही असे म्हणावेसे वाटते का ? 😀😀
(२८.०६.२०२३ सायंकाळी ०६.००)

#मनुष्य_स्वभाव

#स्वभाव_meaning_in

#मानवी_स्वभावाचे_प्रकार

#मानवी_स्वभाव_कसा_ओळखावा

#स्वभाव_आणि_यश


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा