Pages

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

अविस्मरणीय जैतापूर !


जैतापूर : तुझा विसर न होई  !



नुकताच जैतापूरला जाऊन आलो . खरं म्हणजे , जाऊन आलो म्हणण्यापेक्षा पुन्हा (आणि बहुतेक पुन्हा पुन्हा ) जाण्यासाठीची पाहणी करून आलो . काही महिन्यांपूर्वीच मला माझ्या दहावीतल्या वर्गमित्रांना भेटण्याची ईच्छा झाली . त्या काळात मोबाईल नव्हते . कोण कोण कुठे कुठे आणि कसे कसे आहेत , हे चाळीस वर्षांनी बघण्याचे औत्सुक्य अचानक एके दिवशी मला का वाटावे , याचा विचार करण्यापेक्षा  अलिकडे माझ्या संपर्कात असलेल्या श्री . अश्रफ हसन मुक्री याला मला जैतापूरचा संपर्क दुवा देण्याची विनंती केली . त्यानुसार , त्यांने माझा वर्गमित्र श्री . विकास मांजरेकरचा अनेक वर्षांनी हल्लीच संपर्क घडवला होता . काल माझ्या मनात जैतापूरला जाण्याचा विचार येताच मी माझे तंत्रनिकेतनचे सहकारी मित्र श्री . शालिकराम लष्कर चव्हाण यांना विचारले . त्यांनी दुस-या दिवशी जाण्यास लगेच होकार कळवला . त्यानुसार , दि. 13.01.2019 रोजी दुपारी बाईकने जैतापूरला विकासकडे आम्ही दाखल झालो ! विकासबरोबर प्राथमिक गप्पा झाल्यावर त्याच्या मेडीकल स्टोअर्सला भेट दिली . त्याच्यापासून पन्नास पावलांवर असलेल्या आमच्या उदय भोपळे नामक वर्गमित्राचे चिकन सेंटर पाहिले. उदयही ब-याच काळानंतर भेटला . पुन्हा आम्ही विकासकडे आलो . तिथे  वहिनींनी एकटीने कमीत कमी वेळेत इतके सुंदर जेवण बनवले होते की ते जेवून आम्ही अगदी तृप्त झालो ! त्याची चव जिभेवर ठेवून विकास सोबत जैतापूरात फेरफटका मारला .

            पहिली पावले अर्थातच शाळेकडे वळली . शाळेच्या समोरच आमचा मित्र श्री . हरिदास देवळेकर राहतो . त्याला हाक दिली पण तो बाहेर गेल्याचे कळले . आमचे ज्येष्ठ मित्र श्री. दिवाकर आडविरकर हायस्कूलमध्येच भेटणार हा अंदाज खरा ठरला . अशा व्यक्ती जिथे उभ्या असतात तिथे चांगले कार्य निश्चितपणे घडत असते . समोरच हायस्कूलच्या सुशोभीकरणाचे कार्य सुरू होते . दिवाकरजी पटांगणातच होते.  त्यानंतर आम्ही हायस्कूलमध्ये प्रवेश केला . ज्या न्यू इंग्लिश स्कूल , जैतापूरच्या संस्कारांनी मी घडलो , त्या माझ्या शाळेपुढे आज अनेक वर्षांनी पुन्हा नतमस्तक झालो ! खूप समाधान वाटले . आपण इतकी वर्षे इकडे आलो नाही , ही बोचही थोडी कमी झाली . शाळेकडे माजी विद्यार्थ्यांनी लक्ष टाकणे गरजेचे आहे , हे दिवाकरजींचे म्हणणे कळकळीचे व खरे असल्याचे लक्षात आले . खरोखरच , दरवर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी बँचनिहाय मदत केल्यास शाळेच्या भरभराटीस हातभारच लागेल . हा विचार घेवूनच आम्ही शाळेचा आणि दिवाकरजींचाही निरोप घेतला . तितक्यात मशिदीतील आझान कानावर पडली . हया आवाजाने मला मांडवीकडे खेचले नसते , तरच नवल होतेे ! 

             वाटेत गुलाम हुसैनजींचा मेडिकल स्टोअर भेटला .  हया स्टोअरमध्ये त्यांचे सदैव हसमुख आणि बोलके व्यक्तीमत्व पाहून औषधे घ्यायला आलेला पेशंट किवा त्याचा नातेवाईक काही क्षण का होईना दु:खं विसरून जायचा ! आज त्यांना मला भेटता आलं नाही . नव्वदीत ते काळाबरोबर हासत विनोद करीत असल्याचा भास मला झाला आणि आम्ही सुनिता नारकरच्या घराजवळच्या जेटीकडे आम्ही वळलो . जेटीबद्दल विकास सांगत होता तेव्हा माझे मन समोरच्या खाडीच्या पाण्यावर तरंगत पलिकडच्या धाऊलवल्लीत गेले . त्याच काठावर मी जैतापूरला येण्यासाठी होडीत बसण्याकरिता आई , वडील आणि आजीबरोबर पहिले पाऊल उचलले होते .... तेव्हा मी बहुधा तीन चार वर्षांचा असेन ! तेव्हा लाटांवर वरखाली होणा-या होडीमधून मी जैतापूरच्या याच जेटीवर पहिले पाऊल टाकले होते ! तिथूनच बाजारपेठमार्गे  मांडवीकडचा माझा प्रवास सुरू झाला होता ! तेव्हा वाटेत समाधान हाँटेलमधून वडिलांनी घेतलेले नानकटक मला एवढे आवडले की मी त्यासाठी हट्ट करू लागलो होतो . नंतर दरवर्षी मी स्वत:च जाऊन ते नानकटक आणून खावू लागलो होतो . आम्ही याच समाधान हाँटेलसमोरून बाजारपेठेतून मांडवीकडे निघालो . वाटेत दत्ता टेलर अनेक वर्षांनी दिसला आणि पहिली फूलपँट त्याच्याकडे शिवल्याची आठवण आली . विकास मला दत्ताकडेही घेवून गेला . 

         दत्ताच्याच थोडे पुढे अाजही असलेले खुदबूचे दुकान आहे . हा खुदबू खूप प्रेमळ होता ! लहान मुले चणे शेंगदाणे विकत घ्यायला आली की तो स्वत: त्यांना मोफत गूळ दयायचा ! '' खुदबू वायच गाॅड दी '' असं जैतापूरी भाषेत मुलं सतत मागणी करतांना मी त्यावेळी खूपदा पाहिलं होतं . मीही हया खुदबू चाच्याचं आवडतं छोटं गि-हाईक होतो याचा मला आजही अभिमान आहे ! खुदबूचा नातू ते दुकान आता चालवतो . 

            तिथून पुढे निघालो . ती जुनी विहीर , खलील काझी व फाफा आजी यांची घरे आणि त्यापुढे कष्टम चाळ ! हयाच चाळीत दोन नंबरच्या रूममध्ये आम्ही रहायचो ! आता चाळ पडून बरीच वर्षे झाली . नवीन बांधलेली इमारतही पडायला आलीय . सर्वात दु:खं झालं ते चाळीसमोर बंदिस्त कंपाऊंड बघून ! तेव्हाची ती मोकळी हवा आता बंदिस्त झाली आहे ! पुढे गेलो तर मांडवी चौपाटीही अशीच बंदिस्त केलेली ! समोरच्या करगुटकरांच्या वाडयाचे कंपाउंडही साध्या दगडमातीचे उरले नव्हते . तेही पक्के बांधण्यात आले होते . कष्टम चाळीची ती दुरावस्था मला बघवेना ! कोणी तरी हृदयावर दगड ठेवले असल्याचे मला जाणवले ! मी मांडवीकडे सरकलो.  मांडवीत मोकळ्या वा-यावर , समोरच्या खाडीच्या पाण्यावर हेलकावणा-या लाटा आणि त्या लाटांवर हेलकावणा-या होडया पहात किती तरी वेळ त्या काळी बसलो होतो ... कधी वडिलांबरोबर , कधी मित्रांबरोबर तर कधी एकटाच .... ती बंदिस्त मांडवी बघून मी सून्नच झालो . कष्टम आँफीस तर बंदच होते . त्याच्यासमोरच्या महापुरूषाचे देऊळ मात् त्यामानाने सुस्थितीत होते . मला वडिलांची खूप आठवण आली ! दर सोमवारी इथे नारळ दयायचा मान माझ्या वडिलांचाच असायचा . माझे डोळे माझ्याही नकळत भरून आले . मी महापुरूषाच्यासमोर झुकलो . चाळीस वर्षापूर्वी याच मांडवीत मी किती तरी स्वप्नं पाहिली होती . इथेच मी आयुष्यातली पहिली कविता केली होती ; पहिला लेख लिहिला होता ! ती गजबजलेली मांडवी आज ओस पडली होती ! खरंच मांडवीची ती निर्मनुष्य अवस्था अधिक वेळ बघणे शक्यच नव्हते ... मी निघू या म्हटले व उदास अंत:करणाने चालू लागलो , तसे विकास व चव्हाण माझ्यासोबत परत फिरले . पुढे गेलो तोवर नमाज संपला होता . युसूफच्या घरातून त्याच्या पत्नीने आवाज दिला , पण पुढच्या वेळी नक्की येतो , असं सांगून पुढे निघालो . मशिदीसमोर थांबलो . हयाच मशिदीतली बांग ऐकून पहाटे लवकर उठण्याची सवय मला बालवयातच लागली होती . परमेश्वर आपल्याला असं किती वेळा जागे करीत असतो ! बालमित्र खलील आणि त्याचा छोटा भाऊ युसूफ बाहेर येताच पुन्हा एकदा आम्ही बालवयाच्या आठवणीत रमलो . वेळ खूप झाला होता . मी माझ्यासोबत चव्हाणांना आणले होते . वहिनी व त्यांची लहान मुलगी लक्षिता रत्नागिरीत एकटयाच होत्या . मी चव्हाणांचा फार वेळ घेतला आहे हे दुपारपासूनच मला जाणवत होतं. सायंकाळचे पाच वाजत आले होते . आता निघणे गरजेचे होते . आम्ही विकासच्या घरी आलो . वहिनी व विकासचा निरोप घेतला व बाईकवरून परत रत्नागिरीकडे निघालो तेव्हा जैतापूरच्या आठवणी दाटून आल्या होत्या . मनातले जैतापूरचे स्थान सायंकाळसारखेच अधिकाधिक गडद होत चालले होते !

            
..............

३ टिप्पण्या:

  1. मस्त अनुभव सांगितलं तुम्ही,मी पण दळे गावचा आहे आणि वर्षातुन मे महिना आवर्जून जातो गावी. तुम्ही लिहिलेले एक एक शब्द अंगावर शहारे येण्यासारखं आहेत. मस्त अनुभव आहे. माझे बालपण जरी मुंबईत गेले तरी जैतापूरची ओढ काही मला सुटत नाही..

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद राजेश ! तुम्ही सुंदर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडून मात्र प्रतिसादास खूपच उशीर झाला आहे, याबद्दल क्षमा असावी.

      हटवा