Pages

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

फ्लॅट भाड्याने घेण्याबाबत कोणती चौकशी करावी ?



फ्लॅट भाड्याने घेण्याबाबत कोणती चौकशी करावी ?


                जेव्हा तुम्ही भाड्याच्या फ्लॅट्सचा शोध घेता तेव्हा तुम्हांला काही चौकश्या ह्या कराव्याच लागतात . ह्या चौकश्या दोन प्रकारच्या असतात.

१.    प्राथमिक चौकशी (फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी करावयाची चौकशी)

२.    फ्लॅटोत्तर चौकशी (फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाची चौकशी)

              

प्राथमिक चौकशीः-


                        ही चौकशी फ्लॅट भाड्याने घेण्यापूर्वी करावयाची असून ती फारच बारकाईने करावी लागते . विशेषतः तुम्ही जर त्या भागात नवीनच असाल आणि प्रथमच तिथे जात असाल , तर मग फार विचारपूर्वक ही चौकशी करावी लागते . अर्थात, प्रत्यक्ष नवीन भागात थेट जाण्यापूर्वी तुम्ही काही संदर्भ मिळवू शकता. तुमच्या भागातील कोण कोण नवीन भागात आधीपासून रहात आहेत , ते किंवा त्यांचे कोणी ओळखीचे वा मित्र तिकडे असतील तर त्यांच्याकडे साधारण चौकशी करू शकता . काही धागे त्यातून मिळू शकतात. ते धागे पकडून किंवा स्वतंत्रपणेही नवीन भागात जावून तुम्ही चौकशी करू शकता . काही एजंट्स किंवा ब्रोकर्स असतात. सोशल मिडियावर काही ग्रुप्स असतात. वर्तमानपत्रातही फ्लॅट भाड्याने घेण्याच्या जाहिराती असतात. काही वेबसाईट्सही असतात. तुम्ही त्याव्दारे एजंट्स किंवा ब्रोकर्स किंवा अगदी मालक लोकांशीही संपर्क करू शकता. ही चौकशी तुम्ही नवीन भागात प्रत्यक्ष जाण्यापूर्वीही करू शकता वा तिथे गेल्यावरही करू शकता .

           प्राथमिक चौकशी ही अनेक गोष्टींशी संबंधित असते. त्यातही काही बाबी अधिक महत्वाच्या असतात. फ्लॅट भाड्याने घेण्याचे तुमचे कारणही विचारात घ्यावे लागते . हे कारण म्हणजे तुमचा याबाबतीतला हेतू होय. ह्या हेतुनुसार तुमच्या आवश्यकता ठरतात . ह्या आवश्यकतांच्यानुसार तुमच्या फ्लॅटचे स्वरूप तुम्ही ठरवणार असता . तुमच्या गरजांचे प्रतिबिंब तुमच्या फ्लॅटमध्ये उमटणार असते . त्यानुसार तुमच्या फ्लॅटचे स्वरूप , त्यातील तुम्हांला हव्या असलेल्या सोयी आणि सुविधा या बाबींची प्राथमिक चौकशी तुम्ही करणार असता . फ्लॅट हे साधारणतः फर्निश्ड , सेमी फर्निश्ड व अनफर्निश्ड या तीन प्रकारचे असतात. तुम्हांला तुमच्या आवश्यकता व तुमचे बजेट यानुसार निवड करावयाची असते. बजेट म्हणजे तुम्ही फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भात किती खर्च करणे तुमच्या खिशाला परवडणार असते ती तुमच्याजवळ असलेली रक्कम होय. बजेट हा विषय पुढेही कायमच येत राहणार असतो. तुमच्याजवळ किती रक्कम आहे आणि तुम्हांला काय काय हवे आहे याचा ताळमेळ तुम्हांला वेळीच करावा लागतो. म्हणूनच तर, फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भातील प्राथमिक चौकशी फार बारकाईने करावी लागते.

      फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भातील प्राथमिक चौकशी करतांना अनेक बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो ; त्यापैकी काही प्रमुख बाबी आपण आता पाहूः

१.    परिसर

२.    नेहमी संपर्कात येणारे स्थानिक लोक

३.    दस्तूरखुद्द फ्लॅट

४.    सोई व सुविधा                  

आता आपण एकेक पाहू –


१.    परिसर 


  इथे परिसर म्हणजे तुमच्या फ्लॅट्च्या आजुबाजूचा भाग . हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्हांला अपेक्षित परिसर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी राहू ईच्छिणार नाहीत. तुम्ही तो एरिया पाहिल्यावर तो सुरक्षित वाटला पाहिजे , तुम्हांला तिथे दीर्घ काळ रहायचे आहे , तेथील लोक, बाजारपेठ , वाहतुकीची साधने याबाबतीत तुम्ही समाधांनी असला पाहिजेत , तुम्हांला अनुकूल स्थिती त्या परिसरात असली तर तुम्ही तिथे राहण्याचा विचार कराल. म्हणून परिसर महत्वाचा ठरतो .


२.    नेहमी संपर्कात येणारे स्थानिक लोक


                आपण जेव्हा एखाद्या परिसरात राहतो आणि विशेषतः भाड्याच्या फ्लॅट्मध्ये राहतो , तेव्हा तेथील स्थानिक लोकांशी आपला संपर्क येतोच. ह्या स्थानिक लोकांमध्ये अर्थातच मुख्य संपर्क येतो तो घरमालकाशी ! पण त्याचबरोबर तेथील दुकानदार , गॅस पुरवठादार , पाणी पुरवठादार, रिक्शावाले , ओला व अन्य कॅबवाले , अन्य वाहतूकदार इ. लोकांशी आपला संपर्क येतो. त्यांच्याशी आपल्याला चांगले संबंध ठेवावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातही नीट चौकशी करावी लागते .


३.    दस्तूरखुद्द फ्लॅटः-



 फ्लॅट हे तर तुमचे अवघे विश्व असते ! अगदी भाड्याचे असले तरी ! याचे एक चित्र तुमच्या मनात असतेच. इथेच तर तुमच्या आयुष्यातल्या अनेक घडामोडी घडणार असतात. तुमच्याकडे कधी तरी मित्र , नातेवाईक व अन्य पाहुणे येणार असतात. काही कार्यक्रम होणार असतात. म्हणूनच, फ्लॅट कोणत्या वस्तीत आहे , कोणत्या इमारतीत आहे, कोणत्या मजल्यावर आहे, कसा दिसतो आहे, तो फर्निश्ड आहे , सेमी फर्निश्ड आहे की अनफर्निश्ड आहे , तुम्हांला अपेक्षित सोईसुविधा त्यात आहेत का , घरमालक व त्यांचे कुटुंब कसे आहे , इ.बाबत सखोल चौकशी तुम्हांला करावी लागेल . तुम्ही एकटे राहणार की तुमचे कुटुंब राहणार यानुसारही तुमच्या चौकशीची दिशा ठरते. इतकेच नव्हे ; तर तुमच्या गरजांनुसार आजुबाजूच्या परिसरातही सोईसुविधांची उपलब्धता किती आहे व फ्लॅटपासून किती अंतरावर आहे याचीही सखोल चौकशी तुम्हांला वेळीच करावी लागते.  


४.    सोईसुविधाः-


वर उल्लेख केल्याप्रमाणे , आपल्याला आपल्या राहणीमानानुसार काही सोईसुविधांची फार गरज पडते . यामध्ये फ्लॅटमधील बाबी जसे स्वयंपाकाचा गॅस, वीज , पाणी यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. त्याचबरोबर आपल्याला फ्लॅट भाड्याने घेण्यासंदर्भात करार तसेच पोलीस व्हेरिफिकेशन वा अन्य काही कायदेशीर बाबींची पुर्तता करणा-या एजन्सीजही लक्षात घ्याव्या लागतात . मुले शिकणारी असतील तर शैक्षणिक संस्थांची चौकशीही आलीच . अर्थात , तुम्ही त्या भागात नवीन असल्याने शक्यतो घरमालक हा संपर्क करून देतात. वीजेच्या बीलाबाबतही आधीच ठरविलेले बरे असते .

ही झाली फ्लॅट भाड्याने घेतांना ढोबळ मानाने करावयाची प्राथमिक चौकशी. पण फ्लॅट भाड्याने घेतल्यावरही आपल्याला गरजेनुसार काही चौकश्या कराव्या लागतातच. त्या आता पाहूः-


२.फ्लॅटोत्तर चौकशी (फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाची चौकशी)



फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर काही कमतरता आढळतात, काही समस्या उद्भवतात. काही उणीवा जाणवतात. त्यानुसार ह्या चौकश्या ठरतात. ह्या बाबी आपण त्या भागात साधारण सरावलो की आपल्या लक्षात येतात. मुले शिकणारी असल्यास त्यासंदर्भातल्या चौकश्या करून निर्णय घ्यावे लागतात. नवीन ठिकाणी आजारी पडण्याची शक्यता असतेच. त्यामुळे चांगले डॉक्टर्स कुठे आहेत याची चौकशी करावी लागते. बॅंकांचीही चौकशी करावी लागते. हॉटेल्स, भाजी मंडई ,  किराणा, मेडीक्ल्स व अन्य दुकाने यांच्याबाबतीतही चौकशी करावी लागते. मांसाहारी असाल तर मासळी बाजार , मटण मार्केट यांचीही चौकशी करावी लागते. एकूण बाजारपेठ फ्लॅटपासून किती अंतरावर आहे हेही पहावे लागते. कोणत्या भागात कोणत्या वस्तुंची महागाई , स्वस्ताई आहे याची चौकशी करावी लागते. विशेषतः दूरवर फिरायला जातांना खर्च व वेळ वाचवणारी वाहतुकीची साधने, त्यांची ठिकाणे व वेळापत्रक इ.बाबतही आपल्याला चौकश्या कराव्या लागतात. स्थानिक परिस्थिती व येणारे अनुभव यातून कोणत्या चौकश्या कराव्या , कुठे चौकश्या कराव्या हे हळुहळू लक्षात येतेच. म्हणूनच, दर दिवशीच्या तसेच प्रसंगानुसार येणा-या आपल्या समस्या दूर करण्यासाठी फ्लॅट भाड्याने घेतल्यानंतर करावयाच्या चौकश्याही महत्वाच्या ठरतात.

२ टिप्पण्या: