Pages

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

Corona terrifies

मागे - पुढे

10.04.2020

                  आज लॉक्ड डाऊनचा सतरावा दिवस. काल रात्री अपेक्षेप्रमाणे फारशी झोप लागलीच नाही. कोरोनाच्या बातम्यांनी दोघांवरचा ताण एवढा वाढला की बारा वाजेपर्यंत बेडरूमकडे वळायची ईच्छाच झाली नाही. बारा वाजता बेडवर अंग टाकले. त्यानंतरही अधूनमधून जाग येतच होती. पण काल रात्री मिटलेल्या वा उघडया डोळयांसमोरही काही आले नाही. एकदम पहाटे सव्वापाचच्या दरम्याने मात्र विचित्रच स्वप्नं पडले. मी घरासमोरील प-यात खालच्या अंगणाच्या दक्षिण टोकाला कुठून आलेलो असतो काही कळत नाही. पण प-यात बरेचसे गवत , माडाच्या काही झावळा आणि कचरा असतो. मी त्याच्यावर बसलेला असतो. मी बसलो आहे तो उंचवटा असतो व मी पाय खाली सोडून बसलेला आहे. खाली पाणी आणि वेलीवगैरे आहेत. विशेष म्हणजे पोट-यांपासून खाली माझे पाय पाण्यात असूनही मला पाण्याचा वा वेलींचा स्पर्श अजिबात जाणवत नाहीय. मी पाय हलवू पाहतो पण ते हलतच नाहीत. मी चक्क कमरेखाली लुळा पडल्याचे माझ्या लक्षात येते. प-याच्या टोकाला सागाच्या पानांसारखी अगदी हिरवीगार पाने असलेली एक वेल एका रेषेत असते ती दुस-या  टोकाकडून चक्क हलू लागते आणि माझ्या डाव्या बाजूला येवून थांबते. पुन्हा पाच फुटावर पाण्यात हालचाल होते. त्याचे तरंगही काटकोनात वळतांना दिसतात . तो साप असणार आणि मला चावायला येणार हे मी ओळखतो. मी उजव्या कठडयाला हात धरून पाय हलवण्याचा जोरात प्रयत्न करतो. पण माझा फक्त उजवा पाय हलतो तोही थोडासाच ! आता आपले काही खरे नाही , तो साप आपल्यापर्यंत पोचण्याच्या आत पुन्हा हालचाल केली पाहिजे आणि कठडयावरून उडी मारली पाहिजे , या विचारात असतांनाच माझे डोळे उघडले. तेव्हा साडेपाच वाजल्याचे मी घडयाळात पाहिले. मला परत झोप लागली आणि काही मिनिटातच दुसरे स्वप्नं पडले. माझा मित्र प्रदीप मालगुंडकर हा माझ्या लेखनाबाबत काही तरी बोलायला पुढच्या दरवाज्यातून आत येतो आणि लेखनासंदर्भात काही तरी उभ्याउभ्याच बोलतो. त्याच्यासोबत आणखी कोणी तरी मित्र असल्याचे मला जाणवते .  पण माझे लक्ष त्याच्याकडे जात नाही. त्याअगोदरच डोळे उघडतात. मी जागा होवून घडयाळात पाहिले तर सहा वाजले होते. मग मी सरळ बेडमधून बाहेरच आलोे. म्हटले आता झोपलो तर तिसरे स्वप्नं पडायचे ! स्वप्नांचे असेच असते. त्यांची मालिकाही असू शकते ! सन 1990 मध्ये मला हायपर अॅसिडीटी झाली होती तेव्हा मी अनेकदा भयानक स्वप्नांच्या किती तरी मालिका अनुभवल्या होत्या. त्यातल्या एका स्वप्नात तर मी चक्क अमेरिकेत आयझँक न्यूटनना भेटलो होतो. त्यांच्याशी बराच वेळ बोललो होतो. त्यांच्या प्रयोगशाळेत हिंडलो होतो. विशेष म्हणजे प्रयोगशाळेतून बाहेर पडून रस्त्यात चालू लागल्यानंतर एका ठिकाणी मी थांबतो. प्रयोगशाळेकडे पहावे म्हणून मागे वळून पाहतो आणि दुस-याच क्षणाला माझी बोबडी वळते. मागे रस्ताच नसतो. फक्त आकाशरूपी पोकळी असते. आता पुढे जाण्यावाचून पर्यायच नसतो. मी चार पावले पुढे जाऊन धीर एकवटून मागे बघतो . पुन्हा तेच घडते ! मी जसा पाऊल पुढे टाकतो तसा पावलामागे रस्ता तुटत जात असतो. मी नक्की कुठे चाललेला असतो तेही मला कळत नसते . हया स्वप्नातून जागा झालो तेव्हा माझे पूर्ण अंग घामाने डबडबले होते. त्या रात्री मी झोपलोच नाही ! इतक्या वर्षांनीही मी ते स्वप्नं विसरू शकलो नाही , म्हणजे तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल ते बघा !

                  आज नळाला पाणी येणार नाही. मात्र साठयाचे पाणी वरच्या टाकीत चढवून ती फूल करून घेतली. पुढे आलो तर समोरच्या बंगल्यातल्या भाभीने स्वप्नातल्या त्या प-यालगतच कचरा जाळला होता. वा-याने त्याचा धूर आमच्या अंगणातून घरातही घुसत होता. मी एकदा मासळी बाजाराकडे लक्ष टाकले आणि पुढचा दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या. पंधरावीस मिनिटांनी धूर ओसरला तसा मी पुन्हा बाहेर आलो. आज शुक्रवार असल्याने मासळी बाजारात गर्दी होती. गेले काही दिवस हया गर्दीचे मला नवल वाटत होते. पण आज सौ. मासे आणायला गेली केव्हा कळले की तिथे गावातल्यापेक्षा शहरातलेच अनोळखी चेहरे जास्त होते ! काल हे नव्हते इथे , आज हे आले कसे ? शहरातून येणारे लोक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती घातक ठरू शकतात , हे गावातल्यांना कळत नसेल काय ? निदान , त्यांना आवश्यक ती खबरदारी तरी घ्यायला सांगायची. पण बहुधा , उपजिविकेपुढे ते हतबल असावेत. पैसा माणसाला इतका हतबल बनवतो की तो आपले आयुष्यही त्याच्यासाठी पणाला लावतो ! सर्वत्र हेच झाले आहे. कोरोनाला देशात आणणा-यांइतकेच कोरोनाच्या प्रसारास हातभार लावणारेही जबाबदार आहेत ! त्यामुळेच कोरोना आटोक्यात येत नाहीय. कुणी माश्यासाठी तर कुणी भाजीसाठी गर्दी करतोय . काही ठिकाणी विक्रेताच कोरोनाबाधित होतोय आणि वस्तू घरोघरी जात आहेत ! विनाशकाले विपरीत बुध्दी म्हणतात ती हीच ! संस्कृतीच्या उच्चतेची शेखी मिरवून छाती ताणण्यात अर्थ नसतो , तर ती संस्कृती आचरणात दिसावी लागते. नाही तर मग ते इंग्रजी शाळेत पोरे असणा-यांनी मराठीच्या अस्तित्वाबद्दल गळे काढावेत ना तशी अवस्था होते ! पुन्हा वादाचा मुद्दा आला. सद्य स्थितीत वाद नकोत. वाद निर्माण करणारी लंबू वहिनी सकाळी कुठून तरी फिरून आली ती थेट स्वयंपाकघरापर्यंत घुसत गेली. तिने मास्कही लावलेला नव्हता. तिच्या नंतर विकीला आली ती मास्क लावूनच आली आणि आत बोलावूनही बाहेरच पायरीवर बसते म्हणाली आणि बसलीही.  हा फरक आहे आणि यानेच खूप फरक पडतो , हे आता सिध्द झाले आहे. 

           शहरात आता ताज्या दमाचे गझलकार चांगल्या गझला लिहू लागले आहेत. विजयानंद जोशी , कौस्तुभ आठले,  वसुंधरा जाधव , शुभम कदम , विकास ढोकणे हे छान लिहीत आहेत. कोरोनानंतर त्यांना शहरात व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. सन 1986 पासूनचे माझे ते स्वप्नं आहे. त्याबाबत विजयानंद जोशीना मी सकाळीच मेसेज केला होता व त्यांचे हुरूप वाढवणारे उत्तरही आले आहे. शुभम कदमशी व्हॉट्सॲपवर आज माझा दिवसभर गझल संवाद चालू आहे.  

            उद्या नळाला पाणी  येणार असल्याचे सत्त्याने सांगताच ,  सव्वा सहा वाजले तसा मी झाडांना पाणी लावायला गेलो. सौ. आमचे घर बंद करून खालच्या घराच्या अंगणात इव्हीनिंग वाँक करीत होती.  पाणी शेंदून मी दिवाबत्ती केली. तेवढयात लंबूवहिनी दूधपिशव्या घेऊन आली. मी अंगणातच त्या घेतल्या , बेसीनमध्ये धूतल्या आणि फ्रीजमध्ये ठेवल्या. आता रात्र झाली आहे. टीव्हीवर कोरोनाचा प्रसार वाढल्याच्याच बातम्या. आज शहरात पाचवा कोरोनाग्रस्त रूग्ण झाला. सगळे कठीण होते आहे. लोक अजूनही ऐकत नाहीत. फेसबूकवर तर वेळ काय आणि पोस्टस काय अशी वेळ काहींनी आणली आहे. आज एक रचना मी फेसबूकवर टाकली आहे. ती अशी :

          अता घरी रहायचे  ....

खरोखरी घरोघरी ...  अता घरी रहायचे
स्वतः न जायचे कुठे , कुणा न बोलवायचे

अता न काळही बरा... अता न वेळही बरी..
उगाच हिंडुनी कुठे ... नको तसेच व्हायचे !

खुशाल तू तिथे गडया तुझ्या घरी सुखी रहा  !
घराविना कुठे न तू .... इथे तिथे फिरायचे ...

म्हणेल बायको तसे निमूट वाग राजसा ....
म्हणेल ती तसेच तू ... बसायचे , उठायचे  !

उदंड कालच्या तुझ्या ऊनाडक्या स्मरून तू
घरात आपल्याच रे .... हरी हरी करायचे... !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

         संध्याकाळी सात वाजता गेलेली लंबूवहिनी साडेनऊला परत आली आहे. मी अंगणात फिरतो आहे. ती सव्वा दहा वाजता गेली. तिला दुस-यांच्या बातम्या सांगण्यात आणि काढण्यात आसुरी आनंद मिळतो, हे दुर्दैवी आहे. आम्ही तिच्याशी जेवढयास तेवढेच बोलतो आहेत. ती गेली  , तरी आम्ही अंगणात फिरतच होतो. अखेर अकरा वाजता सौ.ला झोप आली. आम्ही झोपायला गेलो. मात्र तिने झोपेची गोळी घेऊनही रात्रभर तिला झोप आली नाही. मीही जागाच राहिलो.


         ( क्रमश: )

२ टिप्पण्या: