मागे - पुढे
08.04.2020
( क्रमश: )
08.04.2020
आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा पंधरावा दिवस . बुधवार. आज काही स्वप्नंवगैरे पडले नाही. हवे तेच काय नको ते पण कोणी स्वप्नात आले नाही. शेजारच्या हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी होत होती. कोरोनामुळे माणसे जास्त जमू शकत नव्हती. नेहमीप्रमाणे मागच्या दारी जाऊन पाण्याची व्यवस्था केली. आजही मी व्यायाम सुरूच ठेवला. आता अंग थोडे सैल झाले आहे. पाय दुखायचे कमी आले आहेत. पुढच्या दारी सूर्याची कोवळी किरणे स्वीकारत अंगणात आलो तर खालच्या दिशेने मासळी बाजार तुडूंब भरलेला. आज हनुमान जयंती असूनही मासे खरेदी सुरू होती. कदाचित , लोक सकाळीच मंदिरात जाऊन शुचिर्भूत झाल्याने दुपारी मासे खायला हरकत नसावी. पण खरेदी मात्र सकाळच होत होती. म्हणजे मंदिरात जायचं , हात जोडून पाया पडून घराकडे परततांना वाटेत मासे घ्यायचे आणि घरी जायचे असा क्रम आहे. तसंही देव तर सर्वत्र असतो. सर्वात असतो.
हल्ली सकाळची लंबूवहिनी काजूबियांसाठी डोंगरावर जाते. त्यामुळे इकडची तिची प्रभातफेरी चुकते. एका अर्थाने ते बरेच असते. सकाळी तरी पूर्वग्रहदूषित वातावरणापासून सुटका मिळते. उगाच नको ते वाद नको त्या वेळी तरी नकोत ! तीच काय , दुसरेही कोणी बराच काळ न आल्याने आमचा नाश्ता व्यवस्थित झाला . आज साफसफाई लांबल्याने माझी आंघोळही लांबली होती. सौ.ला बचत गटाच्या कामासाठी बँकेत जायचे होते. बस , रिक्शा लाॅक्ड डाऊनपासून बंदच असल्याने शहरात जायला काहीही साधन नाही. आमची गाडीही मुलाने त्याच्या मित्राकडे आणि त्याच्या मित्राने त्याच्या बहिणीकडे पूर्वीच ठेवली असल्याने तीही आणणे शक्य नाही आणि आणूनही फिरता येणार नाही. एखाद्या वेळीसाठी मग मिलेश आहेच. ही मिलेशच्या बाईकवरून बँकेत गेली. घरात मी तासदोन तास एकटाच असणार , काय काय करायचे याचा विचार करीत मी बाथरूमकडे वळण्यासाठी पुढचे दार बंद करणार तोच गेट उघडून उदू येतांना दिसला. हे असे अनेकदा घडते. आपण एक विचार करतो आणि घडते दुसरेच. आपणही दुस-याशी महत्वाचे बोलायला म्हणून त्याच्याकडे जावे तर तिथे नेमके कोणी तरी आपल्या आधीच येवून बसलेले असते , नाही तर नंतर तरी मध्येच कडमडायला येते. बिचारा उदू कोरोना लाॅक्ड डाऊनपासून आलेलाच नव्हता. ब-याच दिवसांनी तो आला. साहजिकच तासभर गप्पा रंगल्या. उदू गेला तसा मात्र मी दरवाजा बंद करून आंघोळ करायला गेलो. मग देवपूजा , अध्याय वाचन झाले. थोडया वेळाने ही आली. दुपारचे जेवण झाले. मी काही वामकुक्षी केली नाही. ही झोपली होती. मी हॉलमध्ये फिरत होतो. साडेतीन वाजता लंबूवहिनी दारात उगवली . मी तिला ही झोपली आहे एवढेच खिडकीतून सांगितले. दरवाजा उघडलाच नाही. मला जगभर माणसे मरत असतांना , मरणाच्या दारातही माणसांमाणसांमध्ये भेदभाव करणा-या हया मानवी भूतांना दरवाजा बंदच करायचा आहे. नशीब ती निघून गेली. एक तर हया पार्श्वभूमीवर आणि मुलाच्या व भावाच्या काळजीने रात्र रात्र आम्हांला झोप नसते. दुपारी झोपायला जावे , तर ही पिशाच्चं उठवायला येतात. येतात तीही सतरा ठिकाणी फिरून . जगभरच्या बातम्या गोळा करून कुणाच्या तरी मनातले ऐकीव गरळ ओकण्यासाठी ! व्देषाचा विषाणू पसरवण्यासाठी. आज सौ. पावणेपाचला उठली . चहा घेतला. मग आम्ही टीव्ही लावून बसलो. थोडया वेळात लंबूवहिनी आलीच. सौ. ने शहरात तिसरा रूग्ण झाल्याचे बोलताच लंबूवहिनीने '' कोणाचा ? '' असा विशिष्ट अंगुलीनिर्देश होईल अशा स्वरात अधीरतेने विचारलं. मी तिला झापलीच. कोरोना कोणाचाच नाही . तुझ्यावर ही वेळ येत नाही किंवा तुझे जवळचे कोणी कोरोनाबाधित होत नाही किंवा मरत नाही तोपर्यंतरच तू हे बोलू शकतेस हे लक्षात घे , असे तिला सांगताच तिचे थोबाड बंद झाले. हया नशिबाच्या गोष्टी आहेत. काळ कोणाला पकडील हे सांगता येणार नाही. आता तरी सगळे एकच आहेत हे लक्षात घ्यायला हवे. कोरोना ही निवडणूक नाही , हे युध्द आहे . मानवाच्या अस्तित्वाच्या संघर्षाचे. अजूनही अफवा पसरवणा-या हया अर्धवटांना हे कळत नाही. यांना माणसे तरी कसे म्हणायचे ? उद्या हे लोक अन्नधान्याचे पीक कोणी पिकवले आहे , पाणी कोणी पुरवले आहे, हेही तपासून बघतील. याच दिशेने हया वेडयांची वाटचाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. एवढयाश्या गावात ही केवढी वैचारिक पातळी गाठली जाते आहे ! या विचारांनी मी रात्रीही व्यथितच होतो...
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा