मागे - पुढे
17.04.2020
( क्रमश: )
17.04.2020
- आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग चौवीसावा दिवस. आजही मी सकाळी सहा वाजताच उठलो. आज नळाला पाणी येणार नव्हते. आता उन्हाळा कडक होत चालला आहे. पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने दर शुक्रवारी नळाला पाणी येणार नाही. आज शुक्रवार असल्याने पाणी येणार नाही. सबब मी करीत असलेला हलका व्यायाम दहा मिनिटांनी वाढवला. नेमका सात वाजता बंदिनी वहिनीनी फोन केला. मला वाटले पाणी आले की काय ! मी पटकन फोन घेतला. ऐकतो तर पाणी येणार नाहीच. मी म्हटले, छान ! आज सौ.ला (तिच्याच) हुकुमावरून सकाळी सात वाजता उठवले. आज तिच्या आईचा प्रथम स्मृती दिन आहे. गेल्या वर्षी 28 एप्रिलला तिच्या आईचे देहावसान झाले. तिथीनुसार तो मागे आला आहे. आज आठ वाजताच बीनाची आई मासे आणायला निघाली तिच्याबरोबर हिने जाऊन मासे आणले. त्याची आमटी केली. मग जेवण बनवल्यानंतर तिने तिच्या आईला वाडी दाखवली तेव्हा त्यात मासे ठेवले . तिकडे माझ्या सासरवाडीला वर्षश्राध्दाचे कार्य सुरू झाले तसा आम्हांला फोन आला. तिकडून जतीनने व्हिडीओ कॉल केला. त्यामुळे कोरोनामुळे प्रत्यक्ष जाता आले नाही तरी याचि देही याचि डोळा ते पाहता आले. जतीनने मग पुण्यातल्या माझ्या मुलाला आणि मुंबईतल्या हिच्या मावसबहिणीलाही अॅड केले. ते कार्य संपल्यानंतर आम्ही जेवलो.
आज प्रथमच कोरोनाचा वेग देशभरात थोडा मंदावलेला दिसला. महाराष्ट्रालाही थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र , लोकांना अजूनही धावणे , गर्दी करणे , अफवा पसरवणे , व्देष पसरवणे , अवैध वाहतूक करणे यात रस आहेच. परिस्थितीचे भान मरणाच्याही दारात नसणारे लोक आपल्या देशात आहेत. मेरा भारत महान ! या महानतेच्या बातम्या टीव्हीवर सुरू आहेत. वाहनावर ' अत्यावश्यक ' असा बोर्ड लावून दारूची वाहतूक करतांना काहींना पकडले आहे. आपल्या महान देशात ' अत्यावश्यक ' काय तर दारू ! दुसरा प्रभावी धंदा म्हणजे अफवा पसरविणे . त्याचीच दुसरी बातमी आहे. एका भागात दरोडेखोर आल्याची अफवा काहींनी पसरविली होती. तिथल्या लोकांनी दरोडेखोर समजून तीन साधूंनाच यमसदनाला पाठवले आहे. हा देश साधूसंतांचा आहे ! चोर , लुटेरे, खुनी , दरोडेखोर , बलात्कारी हे अफवांमधूनच येतात ! आज दुपारपर्यंत तरी लंबूवहिनीसहीत कोणीही आमच्याकडे आलेले नाही. आज आम्ही वामकुक्षी करायला हॉलमध्ये पहुडलो. हिने टीव्ही लावलेलाच होता आणि बाळाचे बाप ब्रम्हचारी हा विनोदी चित्रपट लागलेला होता. मग कसली वामकुक्षी न काय ! ब-याच दिवसांनी मनसोक्त हसता आले , हे मात्र खरे.
संध्याकाळी लंबूवहिनी येऊन गेली. हल्ली तिला जास्त बोलूच देत नाही. तिचे लक्ष इतरांवर जास्त असते. कुणाच्या खात्यात पाचशे रूपये जमा झाले , कुणी दिवे लावले , कोण कुठे चाललाय , कोण कोणाशी केव्हा काय बोलतंय यातच तिला स्वारस्य . बरे कुठली गोष्ट ती स्वत:कडे ठेवीत नाही. कधी एकदा दुस-याला ती बातमी तिखटमीठ लावून सांगते , असं तिला होऊन जातं. बातम्या काढण्यासाठी आणि त्या हव्या तिथे पेरण्यासाठी ती दिवसभर सर्वत्र संचार करीत असते. कामावर येऊ नको सांगितल्यानंतर बरीचशी आमच्याकडे यायची कमी झाली आहे. पण आली की कान , नाक , डोळे आणि जीभ उघडी ठेऊन असते. तिची श्रवणशक्ती इतकी जबरदस्त आहे की मी अंगणात फिरतांना आमच्या पुढच्या दारी मला कोणी रस्त्यावरून जरी हाक मारली तरी ती मागच्या दारावरून कानोसा घेऊन विचारते, कोन हो ता बावा ?म्हणजे बघा ! बरे एवढे करून ती थांबत नाहीच. तिला मी सांगितले की तुझ्यापर्यंत काही नाही म्हणून तरी ती घरातून बाहेर येऊन बघते ! मग डोकं फिरणारच ना !
अशी दोन चार माणसं येऊन गेली तोवर सात वाजले. देवळात घंटानाद सुरू झाला. मीही दोन्ही घरातली दिवाबत्ती केली. रोजच्याप्रमाणे कोरोना जगातून नष्ट कर म्हणून देवाकडे प्रार्थना केली. नंतर टीव्ही , बातम्या , मालिका , गाणी , यासह रात्रीचे जेवण आणि झोपेकडे मोर्चा ....
( क्रमश: )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा