Pages

शनिवार, २३ मे, २०२०

Living with corona



मागे - पुढे

22.05.2020

        पुन्हा एकदा चार दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि आज दि  18.05.2020 पासूनचा चौथाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात आजपासून म्हणजेच 18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात सुमारे पंधरा हजार चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 126 झाली होती ती आज 135 झाली आहे. 04 था मृत्यूही झाल्याची बातमी काल रात्री उशिरा कळली आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर हे विविध वर्तमानपत्रातील बातम्या मला मेसेंजरवर नियमितपणे पाठवीत असतात. चाकरमान्यांची आवक वाढतीच राहणार आहे. आता इकडेही कोरोनासवे जगावे लागणार हे उघड झाले आहे.

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायचे तर गेले दोन तीन दिवस सकाळी सहा वाजता उठलो की मी पुढच्या दारात तासभर फिरत राहतो. गरम्यामुळे लादीवर झोपतो. दोन पंख्यांची हवा लागत असते. नाही म्हटले तरी कोणी म्हटले नाही तरी आपला आपल्याला वात होतोच !😀😀😀😀😀 सकाळचे कोवळे ऊन्ह हळूहळू येऊ लागले की कसे बरे वाटते. माझ्या घराच्या पुढील दारातून आणि खिडक्यांमधूनही मस्त कोवळे ऊन्ह येत असते.  मी अगदी घरात बसून हे ऊन्ह अंगावर घेऊ शकतो आणि घेतोही !


 हो एक सांगायचे राहिलेच. मला काही विचित्र स्वप्नं पूर्वीपासूनच पडतात. सगळयांचेच अर्थ लगेच लागतातच असे नाही . काहींचे तर कधीच लागलेले नाहीत ! पण ही सर्वच स्वप्ने विचित्रच असतात व काही काळ मला तणावाखाली ठेवतात , हे मात्र खरं ! गेले सलग तीन दिवस अशी भयानक स्वप्ने पडत आहेत. परवा स्वप्नात , बाथरूममध्ये मी आंघोळ करत असतांना माझी नजर बाथरूमच्या खिडकीकडे जाते तर खिडकीच्या काचांऐवजी भिंतच दिसते आणि त्या भिंतींच्या पाच भोकांमधून पाच लहान बालकांची डोकी मानेपर्यंत आत आलेली. सुरूवातीला ती भूतेच वाटली पण नंतर माणसे असल्याचं लक्षात आलं. त्यांच्या डोळ्यांतले सेक्स अाॅर्गन्सबद्दलचे आव्हान मला स्पष्ट जाणवते. मी म्हणतो , थांबा , तुम्हांला बघायचेच आहे ना, मी दाखवतोच  ! असे म्हणून मी माझी अंडरपँट खाली सरकवू लागतो आणि तेवढयात मी स्वप्नामधून जागा झालो ! तेव्हा पहाटेचे पावणेतीन वाजले होते.  परवा पाच मुंडकी दिसली तर काल तीन जण  ( जे स्मशान कार्यात नेहमी पुढे असतात ! ) दिसले . आठवडा बाजारात मी येतो तर गांधी काँलनीला रस्त्यावर एका ट्रँवल्स बसच्या समोर पपू, दीपक आणि बंदू तिघेही एकत्र उभे ! खरे तर मला पुन्हा एकदा पाच गोष्टी दिसल्या. ते तिघे, ती बस आणि मी ! आज मात्र एकटी स्नेहा आमच्या अंगणात येऊन बोलतांना स्वप्नात दिसली ! अर्थात, अर्थ लागलेला नाही. पण विचारांना चालना मात्र मिळते आहे. ऊन्हं घेता घेता मी हाच विचार करतो आहे. सात वाजले की मी तुळशीची पाने खुडून काढा शिजत टाकतो. अर्ध्या तासाने तो चांगला उकळला की सौ. ला उठवतो. तिच्यावर गोळीचा अंमल असतोच. पण त्यातूनही ती एकदा उठली की सडसडीतपणे व पटापटा सगळे आवरते. हे तिचे वैशिष्ट्यच आहे ! चहा पिऊन झाली तोच बंदूची हाक आली. आज साडेआठ वाजता नळाला पाणी आले होते. आज कुठे जायचे नव्हतेच.  लॉक डाऊन सुरू झाल्यापासून काल पहिल्यांदाच मितेशच्या बाईकवरून शहरात जाऊन दोन तास फिरून आलो. शहर रिते ओस पडल्यासारखे वाटले ! तुरळक रहदारी दिसली तीच काय ती शहराच्या जिवंतपणाची खूण !


( क्रमश: )
...........











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा