Pages

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अशी शिका मराठी गझल

 




मराठी गझल कशी लिहावी ?

मंगळवार , 03.11.2020


तुम्हां सर्वांना सस्नेह नमस्कार व तुम्हा सर्वांचे स्वागत ! 


तुम्ही सर्व गझलबाबत जाणून घ्यायला उत्सूक आहात  आणि माझ्या बडबडीने मी तुमचा रसभंग करावा हे ठीक नाही.


 पण गझलची सर्वात महत्त्वाची पार्श्वभूमी तेवढी सांगतो.


 तुम्ही गझल समजून घेऊ इच्छिता तशीच माणसेही समजून घेतल्यास गझल लिहिणे अधिक सोपे होते. कारण गझल बरीचशी मानवी प्रवृत्तींवर लिहिली जाते.


 सर्वात माणूस महत्त्वाचा. माणूसकी महत्त्वाची. आपुलकी महत्त्वाची. मनाचा मोठेपणा महत्त्वाचा. आपुलकी व मनाचा मोठेपणा ठेवून आपण गझल लिहूया. 


थोडीशी सुरूवात :


गझलच्या अंगभूत लयीमुळे गझलची ओढ निर्माण होते. आपली प्रत्येक रचना गझलच झाली पाहिजे असे गझलची ओढ मनात असल्याने वाटणे स्वाभाविक आहे. 


मात्र , आपण मूळचे कवी असल्याने , कोणती रचना गझल होईल आणि कोणती रचना इतर काव्यप्रकारात पुढे जाईल , हे आपण बहुतेक पहिल्याच ओळीत ओळखू शकतो. 


 रचनेची पहिली ओळ काव्यप्रकाराचे स्वरूप घेऊनच येते. 


   उरलेला भाग गझलेच्या रचनेचा आहे. खरे सांगायचे तर सुरेश भटांनी हे ओळखूनच गझलेची बाराखडी दिली आहे. 


मराठी गझल निर्माण करणाऱ्या सुरेश भटांच्या गझला वाचा. आपोआप गझलेची लय व बैठक पक्की होईल.


कल्पनेची कविता करायची, गीत करायचे , गझल करायची की मुक्त छंदात लिहायचे हा एक प्रश्न असतो व तोच प्रथम सोडवायचा असतो.  हे झाले की आपण बरेचसे मोकळे होतो.


एकदा  हे झाले की पुढे कल्पनेचे काय करायचे ते आपण ठरवू शकतो. 


      गझल होऊ शकेल अशी सुरूवातीची कल्पना किंवा ओळ असेल किंवा गझलच्या ओढीमुळे गझलच व्हावी, असे वाटले तर प्रथम रचनेची माहिती करून घ्यायला हवी. सुरेश भटांची गझलची बाराखडी वाचावी. त्यांच्या गझला वाचाव्यात. इतरांच्या प्रमाणित गझलाही वाचाव्यात. हया दोन गोष्टींचे काही काळ नीट मनापासून अवलोकन केले तर रचना कळतेच कळते. त्यात फार मोठे असे काही नाही. गझल ही वृत्तातच लिहावी . मात्र वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. असलीच तर मी ती समर्थपणे काढीन . पुढे याबाबत मी सविस्तर लिहीनच.


    गझलेबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपली काव्यप्रतिभा आटेल, रचनेत क्लिष्टता येईल , इतका आटापिटा कधीच करू नये ! यासाठीच , गझल थोडी मोकळीही सोडली पाहिजे. म्हणजेच, अक्षरगणात लिहितांना ओळीच्या दोन भागात यतीभंग होणार नाही , हेच पहावे. त्यापेक्षा अधिक तुकडे ( खंड ) पाडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथेच गुंता वाढतो ! 


जे वृत्त दोन समान लगावल्यांनी बनलेले असते , त्या दोन समान लगावल्यांच्यामध्ये अक्षरे जोडल्यास वाचतांना खटकते. यालाच यतीभंग म्हणतात. हे टाळावे. मात्र, डावीकडील वा उजवीकडील भागात आपणांस कसेही शब्द जोडण्याचे स्वातंत्र्य आहे. ( तेवढे तरी हवेच , नाही का 😃😃😃)

 गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.

-----------


शब्दांचे ओघवतेपण हे गझलेचे खरे सौंदर्य आहे.


एखादी कल्पना आपल्या मनात असते. तिची ओळ बनून आपसूक ओठावर येते तरी किंवा आपण तिचे काव्यात रूपांतर करायचा प्रयत्न तरी करतो. 


  

गझलमध्ये रचना , काव्य व चपखल बसणारे अर्थपूर्ण शब्द यांचे स्थान महत्त्वाचे आहे. 


गझलची रचना म्हणजे विशिष्ट नियमांनी बनलेला तिचा फाॅर्म किंवा स्वरूप होय. 


गझल शेरांनी बनते. शेर ही दोन ओळींची एक स्वतंत्र व संपूर्ण कविताच असते. पहिल्या ओळीत कवीला जे सांगायचे आहे त्याची प्रस्तावना असते तर दुसऱ्या ओळीत त्याचा समारोप असतो. मात्र या दोन्ही ओळींचा  परस्परांशी अर्थपूर्ण संबंध असणे अपरिहार्य आहे. गझल कमीत कमी ५ शेरांची असते.

गझलमध्ये शेरातील दोन्ही ओळींचा परस्परांशी संबंध असणे आवश्यक आहेच व तो संबंध वाचकांना किंवा श्रोत्यांना सहज कळेल असा असणेही आवश्यक आहे. थोडक्यात, तो संबंध ओढून ताणून आलेला नसावा , खूप दुरून आलेला नसावा. हा संबंध थेट असला तरी गझलकाराने मात्र तो सूचक शब्दांतून, प्रतिकांचा वापर करून व पुन्हा काव्यमयता जिवंत ठेऊन व्यक्त करावा , असे अभिप्रेत आहे. थोडक्यात, स्वतःच्या शेरांना स्वतःच एक उंची  प्राप्त करून देणे होय. या कसोट्यांवर आपण त्रयस्थपणे आपली गझल तपासून पहावी. बरेचदा आपले आपल्यालाच छान पर्यायी सुचून जाते . 


गझल यमक  ( काफिया ) व अंत्ययमक ( रदीफ ) असलेली  किंवा नुसत्याच यमकांची असते. 


अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते. 


.........

कोरा.काॅमवर मराठी गझलचा मंच 



........

अजून खूप आहे. पण आपल्याला कंटाळा न येता, अलगद आणि मजेत गझल पहायची आहे. टप्प्याने पण आत्मविश्वासाने पाहू.  दरम्यान शंका अवश्य विचारा.

.............. 

प्रथम जमेल तसे लिहाच. लिहिलेले गुणगुणून बघा. गाता आल्यास उत्तमच ! नियम आपोआप सवयीचे होतील. 

पाहिजे तर लिहिलेले मला स्वतंत्रपणे पाठवा.

गझलेच्या नियमात पहिले येते ते वृत्त. विशेषत: अक्षरगणवृत्त. खरे तर त्यामुळेच गझलांना स्वत:ची सुंदर लय येते आणि आपली प्रतिभाही उंचावते.  


 गझला मात्रा वृत्तातही लिहितात.


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 *गझलांमधे वापरली जाणारी काही वृत्ते*

१) वृत्त : आनंदकंद

लगावली : गागाल गालगागा गागाल गालगागा


२) वृत्त : चामर

लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा


३) वृत्त : वियदगंगा

लगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


४) वृत्त : हिरण्यकेशी

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा


५) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


६) वृत्त : कालगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगा


७) वृत्त : विद्युल्लता

लगावली - गागाल गालगागा गागाल गालगा


८) वृत्त : कलिंदनंदिनी

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा


९) वृत्त : मंजुघोषा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा


१०) वृत्त : मंदाकिनी

लगावलीही : गागालगा गागालगा गागालगा गागालगा


११) वृत्त : लज्जिता

लगावली : गालगा गालगा लगागागा


१२) वृत्त : मृगाक्षी

लगावली : लगागागा लगागागा लगागा


१३) वृत्त : सती जलौघवेगा

लगावली : लगालगागा लगालगागा लगालगागा


१४) वृत्त : पादाकुलक

लगावली : गागागागा गागागागा


१५) वृत्त : श्येनिका

लगावली : गालगाल गालगाल गालगा


१६) वृत्त : मनोरमा

लगावली : गालगागा गालगागा


१७) वृत्त : भुजंगप्रयात

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा


१८) वृत्त : सुमंदारमाला

लगावली : लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


१९) वृत्त : तोटक

लगावली : ललगा ललगा ललगा ललगा


२०) वृत्त : रंगराग

लगावली : गालगाल गागागा गालगाल गागागा


२१) वृत्त : वनहरिणी 

मात्रावृत्त : अष्ट मात्रिक ४ आवर्तने 


२२) वृत्त : राधा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गा


२३) वृत्त : मेनका

लगावली : गालगागा गालगागा गालगा


 २४) वृत्त : व्योमगंगा

लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा


२५) वृत्त : रसना ( विनोद  द्विरावृत्ता )

लगावली : गा गालगाल गा+ ,गा गालगाल गा+

( + म्हणजे निश्चित गुरू )

 

२६) मात्रावृत्त : विधाता 

लक्षणे : एकूण मात्रा २८ ( १४+१४ )


२७) वृत्त : देवराज

लगावली : गालगाल गालगाल गलगाल गालगा


२८) वृत्त : वरमंगला

लगावली : गालगा गालगा गालगा गालगा


२९) मात्रावृत्त : भूपति

लक्षणे : [ - l प l प l - + ] २२ मात्रा.

 प म्हणजे ८ मात्रा . + म्हणजे निश्चित गुरू . 


३०) वृत्त : पद्मावर्त

लक्षणे : गागागागा गागागागा गागा


३१) वृत्त : प्रेय

लगावली : गाललगा गालगा गाललगा गालगा


३२) मात्रावृत्त : मध्यरजनी

लक्षणे : गालगागा गालगागा गालगागा गालगा+ .

( + म्हणजे निश्चित गुरू )


३३) मात्रावृत्त : अनलज्वाला

लक्षणे : एकूण मात्रा २४ ( प + प  + प )  प म्हणजे ८ मात्रा.


३४) वृत्त : मानसभंजनी

लगावली : गाललगा लगालगा गाललगा लगालगा


३५) वृत्त : मातंगी

लक्षणे : गागागा ! गागागा

 

३६) वृत्त : भामिनी

लगावली : गालगा गालगा गलगा गा

 

३७) वृत्त : सुकामिनी द्विरावृत्ता

लगावली : गालगाल गालगा गालगाल गालगा


३८) वृत्त : वियतगंगा

दगावली : लगागागा लगागागा लगागागा लगागागा


३९) वृत्त : रम्याकृति

लगावली : गागाल लगागाल लगागा

 

४०) वृत्त : जलोद्धतगती

गण : लगालललगा  लगालललगा


४१) वृत्त : मानसहंस

गण : ललगालगा ललगालगा ललगालगा

 

४२) वृत्त : प्रभाव

गण : लगालगा लगालगा लगालगा लगा 

 

४३) मात्रावृत्त : शुभगंगा

मात्रा २२ ( ८ + ८ + ६ )


४४) वृत्त : श्येनिका

गण : गालगाल गालगाल गालगा


४५) वृत्त : मयूरसारिणी

गण : गालगा लगालगा लगागा


४६) वृत्त : पाणिबंध

गण : गालगाल गाललगा गालगाल गाललगा

.................


 वृत्तांचीच भीती अनेकांना जास्त वाटते. पण सरावाने सगळे जमते. तेव्हा तुम्ही चिंता करु नका. मी सतत सोबत आहेच.

 अगदी सुरुवातीला कठीण वृत्तात लिहू नका. कठीण व अपरिचित शब्दही टाळा.सुरूवातीला आनंदकंद किंवा भुजंगप्रयात ह्या वा अशा सोप्या वृत्तात लिहा व मला पाठवा.

-----------------


अक्षरगणवृत्तात समजा गा गा ल गा .... हा अक्षरक्रम आहे. गा म्हणजे गुरु किंवा दीर्घ आणि  ल  म्हणजे लघु किंवा -हस्व . 


 हा  मात्रा क्रम नाही. इथे मात्रा मोजायच्याच नाहीत. 


पहिल्या ओळीतील गा गा ल गा...हा अक्षरक्रम शेवटच्या शेरापर्यंत सांभाळायचाय.‌ 


अक्षरगण वृतत व मात्रा वृत्त हे दोन्ही स्वतंत्र प्रकार आहेत. त्यांची कधीच गल्लत करायची नाही.

इथे मात्रा म्हणजे गुरूला २ व लघुला १ अशा प्रकारे काही मोजायचे वगैरे नाही. 


दोन्ही मिक्स करायचे नाहीत.

मनात अनेक सुटे शेर जन्मतात. पण अनेकदा संपूर्ण गझल होतेच असे नाही. त्यावेळी ते शेर तसेच राहू द्या. अट्टाहासाने, घाईघाईने, गझल पूर्ण करायला जाऊ नका. गझल कळी आहे, ती आपसूक उमलू द्या.


........................

अलामत हा यमकाचा भाग आहे. सर्व यमकात शेवटचे अक्षर समान असते. अलामत किंवा स्वरचिन्ह नेमके त्याच्याआधीच्या अक्षरात येते .


एका गझलची यमके पाहू. 


 लागायचा

    जायचा

 भेटायचा

गंधाळायचा

      यायचा

     गायचा

  वागायचा


      यांमध्ये ' यचा ' ही  यमकांतली न बदलणारी अक्षरे आहेत. 


      मात्र त्यांच्या लगत डावीकडील अक्षरे बदलती आहेत. काय बदल आहे त्यात ? तर केवळ ही अक्षरे जरूर बदलली आहेत, पण त्या अक्षरांच्या उच्चारातला स्वर बदलला आहे का ; तर नाही. या सर्व अक्षरांत ' आ ' हा स्वर कायम आहे. ती स्वरचिन्ह म्हणजेच अलामत आहे.

अती अभ्यास नको. मोजक्याच गोष्टी सांभाळा. 

वृत्तांची भीती अजिबात बाळगू नका. सवय होईपर्यंत पुस्तकातल्या वृत्त्तात लिहिण्याचा सराव करा.

सुरेश भटांची गझलची बाराखडी . सुरेश भटांनी स्पष्ट नियम दिले आहेत. गझल वृत्तात लिहायची आहे हेही स्पष्ट केलेले आहे. मात्र अनवट, क्लिष्ट व तुमच्या प्रतिभेला मारक ठरतील अशी वृत्ते वापरू नयेत. साधी सरळ व ओघवती वृत्ते वापरावीत. लगावलीत  यतीभंग होणार नाही , म्हणजेच डावीकडे व उजवीकडे समान क्रम असल्यास ते दोन भाग जोडले जाणार नाहीत, एवढेच पहावे. वृत्त हे लयीसाठी आहे. लय भिनली की वृत्ती बनते किंवा वृत्ती ही मूळातच असते. गझलची वृत्ती असणे सर्वात महत्त्वाचे.

..................एक सांगतो नियमांची काळजी करू नका. सरावाने सर्व सोपे होते. तुम्ही निश्र्चितच चांगले लिहाल.


 फक्त शेराच्या दोन ओळीतला  तुम्हांला अभिप्रेत असलेला परस्पर संबंध,  ज्याला गझल माहीत नाही त्यालाही शक्यतो सहजपणे कळेल , असे पहा. काही वेळा लिहिण्याच्या ओघात आपण लिहून जातो व आपल्या दृष्टीने ते बरोबरही वाटते, पण आपली लिहिण्यामागची भूमिका वाचकाला माहीत नसल्याने वाचकाला तो शेर समजून घ्यावा लागतो. अशा वेळी आपण आणि वाचक यात अंतर पडते.

.................

गालगागा   गालगागा  , गालगागा    गालगागा


स्वल्पविराम पाहिलात ? त्याच्या डावीकडील शेवटचे व उजवीकडील पहिले अक्षर जोडून  शब्द करू नयेत. त्यालाच यतीभंग  म्हणतात.

.....................


२ टिप्पण्या:

  1. अप्रतिम सर 👌👌

    मराठी गझल संदर्भात खूपच सहज आणि सोप्या पद्धतीत माहिती दिलीत तुमचे मनापासून आभार 🌹🌹🌹

    माझ्या सारख्याला खुप मदत होईल... 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम सर 👌👌

    मराठी गझल संदर्भात खूपच सहज आणि सोप्या पद्धतीत माहिती दिलीत तुमचे मनापासून आभार 🌹🌹🌹

    माझ्या सारख्याला खुप मदत होईल... 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा