Pages

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

स्फूट लेखन ७





दंतकथा पसरवणे हे आपले जुनेच काम आहे. दंतकथा मार्फत कोणाला तरी महात्मा बनवलं किंवा कसली तरी भीती समाजमनावर घातली की पिढयांपिढयांची सोय झालीच म्हणून समजा. खूप डोकं चालवलं बघा काहींनी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

.............

माझे आॅफीसला उशिरा जाणे...


एके दिवशी मला आॅफीसला जायला उशिरा झाला. बाॅस जाम उखडला. दहा मिनिटे तो ताडताड तोंडसुख घेत होता. मी शांतपणे उभा होतो. मला माहीत होते मिस. राधिका अजून आली नव्हती व ती येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तिच्या हाय हिल्सचा टाॅक टाॅक आवाज व्हरांड्यात आलाच. मी बाॅसला बोललो , सर राधिका आताच येतेय. तोपर्यंत ती लचकत मुरडत , पर्स हेलकावीत आमच्यासमोर येऊन उभी राहिलीही ! वर मधाळ हसत ती गुड मॉर्निंगही म्हणाली ! त्याचक्षणी मघाशी दहा मिनिटे मला ताडताड बोलणारा बाॅस माझ्याकडे न बघता यू टर्न घेऊन त्याच्या केबीनमध्ये अंतर्धान पावला ! विषय कट !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०३.२०२१    

............


भाईकाकांची रीतच न्यारी

अंधश्रद्धेला पडले लय भारी !


आमचे भाईकाका एकदम कडक माणूस. फक्त विमलाकाकींपुढे ते थोडेफार नरम पडायचे. काकींनी एकदा श्रध्दापूर्वक एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. काकांनी नाईलाज होऊन परवानगी दिली खरी. पण त्यांच्या मनात काही तरी घोळत होतं. वेळ रात्रीची होती. कार्यक्रम सुरू झाला. काकींनी चुलीत जाळ केला. धुपारटयात निखारे घेतले. त्यात धूप टाकला. धुपारटयासह त्या आत आल्या. सर्वत्र धूप पसरला. त्यासरशी काही एक महिला घुमू लागली. तिच्या अंगात आले होते.‌ थोड्याच वेळात आणखी महिला घुमूडोलू लागल्या. भाईकाका शांत चित्ताने पहात होते. ते चुलीकडे गेले. एका भांड्यात दोन तीन निखारे घेतले. झाकण लावून ते आत आले. तोपर्यंत घुमते जोरावर आले होते. जास्त घुमणाऱ्या बाईने विचारा काय विचारायचे आहे ते, असं म्हणताच काकांनी तू कोण आहेस, असं विचारलं. ती म्हणाली मी देव आहे. काका म्हणाले, सांग माझ्या हातात काय आहे ? तिने डोळे किरकिरे करून डबा म्हणून सांगितले. लोकांनी हात जोडले. डब्यात काय आहे, या प्रश्नावर ती अधिकच घुमू लागली. आरडाओरडा करू लागली. भाईकाका म्हणाले , सांग लवकर. ती काही सांगेना. भाईकाकांनी तिला हात पुढे करायला सांगितले. म्हणाले, देवा, तूच बघ काय आहे ते, असं म्हणत त्यांनी पटकन झाकण काढून निखारे देवाच्या हातात ओतले. देवाचे घुमते तिथेच थांबले आणि देव खरोखरचा आरडाओरडा करू लागला. काकींनी बर्नाॅल आणले आणि लावले. तोपर्यंत एकीमेकींचं बघून जोरजोरात घुमणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या सर्व महिला तिथून गायब झालेल्या होत्या. भाईकाका शांतपणे सारं बघत बसले होते. त्यांच्या मनात घोळणारं हसू आता त्यांच्या गालावर पसरलं होतं.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१     

.....................


देवाला जन्माला घालणारा माणूस 



                   देवाला जन्माला घालणारा माणूस मला सापडला ! तो चार अनुयायांना म्हणत होता , " मित्रांनो , हे विश्व कुणी निर्माण केले हे कुणालाच कळलेले नाही . अनेकांचा हातभार ह्या निर्मितीला लागला असणार . पण एकाचा वा अनेकांचाही शोध घेणे जमणारे नाही . असंख्यांची जंत्री करण्यापेक्षा हे विश्व कुणा एकानेच निर्मिले असे जाहीर करावे असे मला वाटते . "


                   यावर त्या चौघांनी सवयीनुसार माना डोलावल्या . यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला दूर निघून गेले . आपण हात जोडले, माथे टेकले आणि भक्तीत दंग झालो !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

.....................


झाकली मूठ सव्वा लाखाची !


  देवाला जन्माला घालणारा तो म्होरक्या पुढे सांगू लागला , " असेही आहे की तो एक कोण आहे , कुठे आहे , कसा दिसतो हे प्रश्न विचारले गेले तर आपल्याला त्यांची उत्तरेही देत येणार नाहीत . यापेक्षा तो अदृश आहे असे सांगितल्याने हे सर्व प्रश्न आपोआपच संपुष्टात येतील ! ज्यांना शोध घ्यायचा असेल ते आयुष्यभर शोध घेत राहूदेत ! आपल्यापुरता हा प्रश्न आता कायमचा संपला आहे. हे विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे , तो सर्वशक्तिमान आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो अदृश्य आहे , एवढेच आपण सांगायचे आहे . झाकली मूठ सव्वा लाखाची असते , एवढेच लक्षात ठेवा ! काय ? "


               यानंतर तो माणूस आणि त्याचे ते चार अनुयायी वरील विचारांचा प्रसार करायला पुन्हा एकदा दूर निघून गेले . 


................


       एक माणूस स्वत:ला चौघांचा पुढारी म्हणवून घेत होता . तो त्यांना सांगत होता : " दोस्त हो , परमेश्वर मीच आहे ! तेव्हा माझ्या छत्राखाली या . जे येणार नाहीत ते माझे असणार नाहीत आणि जे माझे असणार नाहीत त्यांचे अस्तित्व सन 2021 नंतर राहणार नाही ! काय ? चला , लागा कामाला ! "



             गम्मत म्हणजे याही " काय ? " वर अनुयायांनी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ते माना हलवीत त्यांना सापडलेल्या परमेश्वराचा प्रसार करायला निघून गेले. ही बातमी आधुनिक मिडियाने पकडली आणि टीआरपी वाढवण्यासाठी दर तासांनी ब्रेकिंग न्यूजची सीडी लावून दिली !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.०३.२०२१

..............

करणारे आणि ( ओरड ) करणारे 


सभेत जोरदार धूम:चक्री झाली. नेहमीचेच आरोप प्रत्यारोप झाले. सेक्स रॅकेट, बलात्कार हेच विषय होते. अखेर गुन्हेगारांना शासन केले जाईल या ग्वाहीवर ओरडणारे शांत झाले. त्यांना माहीत होते की जास्त ताणलं तर त्यांचीही लफडी वर आणली जातील. परवाच एकाने काॅमेंट केली होती. सेक्स रॅकेटबद्दल पण लिहा. खरं तर हे काही प्रथमच घडलेलं नाही. काही वर्षांपूर्वी शहरातल्या नामांकित शाळेच्या सहावी सातवीतल्या मुलांचं सेक्स रॅकेट गाजलं होतं. त्यावेळी करणारे आणि ओरड करणारेही वेगळे होते. त्यावेळी काॅमेंट करणारा कितवीत होता कोण जाणे ! आज करणारे आणि ओरड करणारे यांच्या केवळ जागा बदलल्या आहेत. सर्वोच्च अतीसभ्य संस्कृतीचे विकार तेच राहिले आहेत. जागा बदलून, सोयीनुसार आरडाओरडा करून उपयोग नाही. हे सर्व का होतं याचा विचार करून त्यावर उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. एकमेकांचे विरोधक बनण्यापेक्षा गुन्हेगारीवर एकत्रित काम झाले तर उत्तम. 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०३.२०२१

............................


माणूस हतबल झाला की त्याला काही सुचत नाही. तो सैरावैरा धावू लागतो. बुडत्याला काडीचाही आधार मिळत नाही. दररोज संकटांमागून संकटे येतात. अशा वेळी बहुतेक अखेरची आशा म्हणूनही तो भगत, बुवा , बाबा यांच्याकडे वळत असावा. नाईलाजाने अंधश्रद्ध होण्यावाचून त्याला पर्यायही रहात नसावा. याबाबत माणूसकीने पावले उचलली पाहिजेत.‌


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०६.०३.२०२१

............................

आपल्या मुलाचा विवाह करून देणे ही आई-वडिलांची प्रामाणिक ईच्छा असते. पण सगळयांच्याच जीवनात हे घडत नाही. काहींच्या मुलांची लग्नेच होत नाहीत. काही मुलेच स्वतंत्र निर्णय घेतात. काही आई वडिलांचेच मत वेगळे पडते ! काहीही असले तरी एक आंतरिक प्रामाणिक तळमळ पूर्ण होत नाही. त्या आई-वडिलांना व मुलांनाही काय वाटत असेल ! आयुष्यभर ते ह्या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव आहे ! यातून सर्वमान्य, सर्वांना आनंद देईल असा मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. वस्तु:स्थितीदर्शक व वास्तव विश्लेषण करून किमान उचित निर्णय घेणे आवश्यक आहे. 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०७.०३.२०२१

............................


काळाने खिंडीत गाठले आहे. काळ बेरकी गोलंदाज आहे. तो फिरकी टाकत नाही ; तर माझी फिरकी घेतो आहे. कालपरवापर्यंत मी त्याचा प्रत्येक चेंडू छान टोलवत आलो. सरळ , साधे जगत आलो. त्या लबाडाच्या हातून सतत निसटत आलो. तेल लावलेला ( किमान दुसऱ्या क्रमांकाचा तरी ) पैलवान ठरत आलो ! याचा राग त्यांने मनात ठेवला होता. आता ऐन साठीत त्यांने पाठीत घातलेल्या दणक्याने कात्रीत सापडलो आहे. रोजच कोंडमारा होतो आहे. मनावर घेऊ नका मित्रांनो. कधी तरी मी चिडेन आणि काळालाही भिडेन ! कारण अनेकदा, 


     माझ्यात बांधल्या मी पक्क्या अजिंक्य भिंती !

     माझी मला दिली मी सारी इथे उभारी !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०९.०३.२०२१

............................


मन लागो रे लागो रे...


एका ठिकाणी महिलांचे भजन सुरू होते . मन लागो रे लागो रे...भजन सम्राज्ञी लागो रे लागो रे , हे लागोरे लागोरे असे जोडून तल्लीन होऊन गात होती. शेजारीच भांडण सुरू होते. एक म्हातारी कुणा तरी बाईला म्हणत होती , लागोरा रांडू... विषय कट ! 



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.०३.२०२१

............................

कोमावारसाहेबांनी मला गायकवाड साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटायला या असा निरोप द्यायला सांगितला. आॅफीस सुटण्याच्या वेळेलाच मी तिथे गेलो. दरवाजा बाहेरच बोर्ड दिसला. त्यावर लिहिले होते : फक्त सुपरिटेंडेंटनाच भेटून आपले म्हणणे सांगा. मी साहेबांना ओळखत नव्हतो. दबकत दबकत मी सुपरिटेंडेंटसमोर उभा राहिलो. टेबलावरची नेमप्लेट न बघताच मी बावळटपणाने इथे गायकवाड साहेब कोण ? असे विचारले. ते म्हणाले, " मीच. काय काम आहे ? " मी नेहमीच्या आवाजात कोमावारसाहेबांनी आपल्याला भेटायला बोलावलंय , असं सांगितलं. ते म्हणाले , " बसा, बसा , बसा. हळू बोला. " बसल्यावर मी पुन्हा आॅफीस सुटल्यावर बोलावलंय, असं सांगितलं. ते थोडे थांबले आणि माझ्याकडे बघत म्हणाले, " चेहऱ्यावरून तुम्ही कवी वाटता." मी उडालोच. त्यांनी अचूक कसे काय ओळखले हा प्रश्नं मला पडला. ते पुढे म्हणाले, " तुम्ही जा आणि त्यांना येतो म्हणून सांगा. आणि हो, असे निरोप हळूच सांगा. तुम्ही भाबडे आहात म्हणून सांगतो. " पुढेही या दुनियेचे व्यवहार कळायला मला खूप वर्षे लागली, हे सांगायला नकोच ! विषय कट !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१९.०३.२०२१

............................


तुमच्याकडे कसं आहे ?


कुटुंबात तीन माणसे. तो, ती आणि मुलगा. तो मोबाईल मध्ये मग्नं. ती एकाच वेळी मोबाईल आणि टीव्हीमध्ये मग्नं. मुलगा मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये मग्नं. जुनी माणसं उगाच म्हणायची, " घरात माणसं असली तरच घराला घरपण असतं " . आता माणूस घरातल्या घरात जवळ असूनही दूरपण असतं ! विषय एवढाच ! बाकी तुमच्याकडे कसं आहे ?

 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०३.२०२१

............................

बबन एवढंच म्हणाला, बंड्याने अजून वाडीचा ग्रूप बनवला नाहीय. बबनची बायको लगेच म्हणाली, तुम्ही त्या टीव्हीवाल्याला आणि गिझरवाल्याला किती दिवस फोन करताय ! बबन गप्प ! 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२६.०३.२०२१

...........................

शाळेत जायच्या आधीच आई मला शिकवायची‌ . बबन कमळ बघ, हे मी छप्पन्न वर्षांपूर्वी वाचलेलं आणि लिहिलेल़ही पहिलं वाक्यं. काही कालची पोरं मी आजच कमळ बघतोय या समजूतीत आहेत म्हणून सांगितलं इतकंच 😁😁😁😁😄😄😀😀


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०३.२०२१

...........................

बागूलबुवा


लहानपणी अनेकांना त्यांच्या आज्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भीती घातली असेल. ते आता आजी-आजोबा झाले तरीही आज्ज्यांऐवजी मनावर भीती घालणारी यंत्रणा कार्यरत आहेच. अनेक गोष्टींचा बागूलबुवा आजही उभा केला जातो आहेच. समाजमाध्यमांचा यासाठी मोठ्या धूर्तपणे उपयोग केला जात आहे. एकूण काय , आपण कोणत्याही काळात दहशतीखालीच रहायचे. कोणाला ना कोणाला तरी घाबरूनच रहायचे. कुणी चुकून मुक्त जगा म्हटलंच तर तेही दबक्या आवाजात म्हणायचं. अनावश्यक भीती जनमानसावर घालणाऱ्यांचं काय करायचं हा प्रश्नंही कुठेतरी दबला जात असावा, असं वाटतं ! 

...........................

१९.०४.२०२१ : 


परवा एकाचा फोन आला. म्हणाला, तो मेसेज वाच. त्याचा मेसेज एका मंत्राच्या उच्चारणामुळे होणाऱ्या फायद्यांचा होता. मी म्हटले, वाचला. तो खूष झाला. चार दिवसांनी मी त्याला एक मेसेज पाठवला. चांगले वागण्याचे फायदे. मी पण फोन केला. म्हटले वाचलास का ? तर म्हणे , " अरे कुठचा वाचतोय ! बघितलाच नाहीय. सकाळपासून घरात भांडणं, शेजाऱ्यांशी पण भांडणं चाललीयत नुसती. " मी विषय सोडून दिला. 


...........................


          जास्त बोलण्यामुळे सिम्पेथिटेक नससंस्थेवर परिणाम होतो. एक तास बोलण्यामुळे पाच तास शारीरिक कामासाठी लागणारे रक्त व स्नायूंची शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त बोलणे हे ताणास निमंत्रण देण्यासारखे असते. 

...........................


२०.०४.२०२१

युगे युगे मी संभ्रमी ! 


कुछ तो गडबड हैं दया...दया दरवाजा तोड दो...दया...दरवाजा तोड दो....

या डायलाॅगची उगाचच आठवण येते...खरंच उगाचच असेल का हो ? दरवाज्याच्या आत खरेच कोरोना असेल का ? की काही नवीनच वाढून ठेवलंय तिथे ? रात्रीस खेळ चाले सुरू आहे. रघू सांगतोय, " तो आसा, तो बघताहा ! " खरेच तो आहे ? बघतो आहे ? घेणार आहे का जबाबदारी ? यापूर्वी तीन चार वा जास्त वेळाही असले भयावह आजार आणि संकटे जगावर कोसळलीयत राव ! सगळ्यांचा शेवट असाच... काय वाढून ठेवलंय पुढे , हा प्रश्नं प्रत्येक वेळीच उपस्थित झाला आहे. आजही ओठांवर येतोय. राजकारण करणारे राजकारणच करीत आहेत. लढणाऱ्यांचा अभिमन्यू होत चाललाय. प्रत्येक वेळी हे असेच का होत आहे ? सत्य नक्की काय आहे ? की मी आपला युगे युगे संभ्रमीच ? 

...........................

काही माणसे इकडचं तिकडे करण्यासाठीच फिरतात. दुसऱ्याकडे जायचे, तिसऱ्याचा साळसूदपणे विषय काढायचा. दुसरा काय बोलतो ते कानांत साठवायचे आणि तिसऱ्या चौथ्याकडे जाऊन आपले चार शब्द त्यात घालून आग लावून द्यायची. हेच यांचे छुपे उद्योग. काहींची प्यादी म्हणूनही ही मंडळी काम करतात. काही लोक तुमच्याशी गोड राहतात, पण तुमच्या मागे अशा प्यादयांचा वापर करून तुम्हांला उपद्रव देतात. तुम्हीच जर हलक्या कानाचे असाल आणि सहज हुकसवले जाऊ शकत असाल तर मग प्यादी आणि त्यांच्यामागे लपलेले उपद्रवी यांच्या हातात आयते कोलीत देता. माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर ते जाळीतच सुटणार. आग लागली. विषय संपला.


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२७.०४.२०२१

............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा