Pages

मंगळवार, २५ मे, २०२१

मराठी गझल

 कोंडमारा


बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे

कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे


फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...

अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे


खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली 

तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे


 जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे

 तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे


 तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे


पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी 

रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !


अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?

अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?


मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !

मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा