फेसबूकवरून साभार
परीस...
सुरेश भटांच्या कवितांचे पुस्तक हातात आहे .
"सुरेश भट ह्यांची निवडक कविता -१९४६ ते १९९६" ....संपादन आणि प्रस्तावना केली आहे "शिरीष पै " ह्यांनी .
पुस्तक काय हातात पडले, नव्हे.. खजिनाच मिळाला! एक एक कविता... एक एक भावगीत ....एक एक गझल... हृदयात उतरते!
प्रथम तर शिरीष पै यांची प्रस्तावना ही कितीतरी सुंदर! खरेतर हे सर्व लोक खूप आदरास पात्र. साहित्याला जणू त्यांनी आपले जीवन वाहून घेतलेले .
"सुरेश भट ह्यांची निवडक कविता" या पुस्तकातील सर्व कविता शिरीष पै यांनी सुरेश भटांच्या अनेक काव्य संग्रहातून निवडून एकत्र संपादित केल्या आहेत व प्रस्तावनाही लिहिली आहे.
प्रस्तावना ही इतकी अभ्यासपूर्ण आणि सखोल आहे की पुनः पुनः वाचत रहाविशी वाटते .सुरेश भटांच्या विषयी व त्यांच्या कवितांची पूर्ण ओळख प्रस्तावनेत आपल्याला होते.
"रुपगंधा" हा सुरेश भटांचा पहिला काव्यसंग्रह. १९६१ साली प्रसिद्ध झाला ."रंग माझा वेगळा" हा दुसरा काव्यसंग्रह.( १९७०) "एल्गार" हा तिसरा काव्यसंग्रह. "झंजावात" हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह.
या चारही काव्यसंग्रहातून उत्कृष्ट कवितांची निवड करून शिरीष पै यांनी हे "निवडक कविता" पुस्तक संपादित केले आहे. सुरेश भटांच्या ज्या काव्यप्रकारा मुळे त्यांच्या प्रतिभेला खरे उत्तेजन आणि प्रेरणा मिळाली आणि त्यांची प्रतिभा संपन्न झाली ...त्या "गझल" या काव्य प्रकाराला त्यांनी आद्य स्थान दिले आहे.
आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्यांनी "गझल" साठी सुरेश भट ह्यांनी जे नियम सांगितले आहेत ते देखील लिखित स्वरूपात दिले आहेत. ते नवोदित गझलकार व नव कवींना खूप उपयुक्त आहेत .आपल्या प्रस्तावनेत शिरीष पै ह्या "गझले "विषयी सुरेश भटांनी आपल्या "एल्गार" या काव्यसंग्रहातील प्रस्तावनेत व्यक्त केलेले विचार आपल्याला सांगतात.
सुरेश भट म्हणतात, "गझले विषयी " एक महत्त्वाची गोष्ट ही की केवळ "रचनाकौशल्य" म्हणजे गझल नव्हे! नुसते तंत्र समजले आणि ते वृत्त (बहर )यमक (काफिया) आणि अन्त्ययमक (रदीफ) इत्यादी राखून तंतोतंत अमलात आणले तरी ...अखेर... ....प्रभावीपणे काहीही सांगता आले नाही तर तो शेर.. कोसळतो!! शेर रचला जात नाही.. तो कवितेतून ...त्यांच्या जगण्यातून... त्याच्या जीवनातून.. निर्माण व्हावा लागतो! त्याच्या रक्तातून तो वाहत येतो... आणि सामर्थ्यसंपन्न शब्दातून अनुभूतीचा स्फोट होतो!!
गझल ही एक जीवनशैली आहे. ते एक तत्त्वज्ञान आहे. मराठी गझलच्या क्षेत्रात सुरेश भट हे अनभिषिक्त सम्राट होते. "१९४६ ते १९९६ पर्यंत केलेल्या पन्नास वर्षांच्या काव्य लेखनातील निवडक कवितांचा संग्रह म्हणजे "सुरेश भट ह्यांची निवडक कविता१९४६ ते १९९६"!
रसिकांनो! आपण आपल्या दैनंदिन आणि व्यावहारिक जीवनामध्ये एवढे गुंग असतो की ,आपण पुस्तकांकडे वळत नाही! आणि वाचत नाही! महाराष्ट्रात अनेक कवी आणि लेखक होऊन गेले... त्यांच्या अजरामर साहित्यकृती आज ग्रंथालयात उपलब्ध आहेत. जेव्हा ते आपल्या दृष्टीस पडतात.. तेव्हा त्यांची महती कळते! सुरेश भटांची कितीतरी भावगीते आणि गझला आपण ऐकतो. त्या कानात गोड वाटतात .पण ते शब्द ..त्या कविता... त्या भावना... ज्या प्रतिभेने कवी पानावर उतरवतो ...त्याला तोड नाही! आपण या प्रतिभेच्या पुढे नतमस्तक होतो. सुरेश भट यांच्या अनेक सुंदर गझला तुम्हाला ही माहीत आहेत . या पुस्तकात वाचलेल्या काही गझलांचा ओळी मी तुम्हाला वाचण्यासाठी येथे देत आहे.
आनंद ....(गझल )
कवी -सुरेश भट.
आसवांना कोणता अधिकार होता ?
घाव जो केलास तो सुकुमार होता!
चालण्यासाठी उन्हाची वाट होती,
सांत्वनासाठी तुझा संसार होता!!!!!
मेघ ..(गझल)
कवी -सुरेश भट.
पुन्हा तेजाब दुःखाचे उरी फेसाळूनि गेले !
पुन्हा ओठांवरी गाणे तुझे घोटाळुनी गेले !
मनाच्या खोल अंधारी कुणाच्या ऐकतो हाका ?
मघाशी कोणते डोळे मला ओवाळूनी गेले?
निर्धार ...(गझल)
कवी -सुरेश भट.
माझिया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे !
माझीया द्वेषास विश्वाच्या व्यथेची धार आहे !
चालली माझी शिलेदारी जनांसाठीच माझ्या ,
गीत माझे माझिया हातातली तलवार आहे.!
अत्यंत सुंदर असे निवडक कवितांचे पुस्तक, प्रत्येकाने वाचावे असे .
दुःख भेटे मला सांत्वनासारखे! गीत भेटे मला यौवनासारखे!
शेवटी शेवटी मी कशाला कण्हू ?हे मनासारखे ! ते मनासारखे! ....सुरेश भट.
सौ वर्षा दौंड.
14/7/2021.
अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा