नामसप्ताहाची सुरूवात : भाग २
मराठवाडीच्या पहिल्या पहाऱ्याची सुरूवात तर आपण पहिल्या भागातील व्हिडिओत पाहिली. आता त्यानंतरच्या पहाऱ्याची म्हणजे देऊळवाडीच्या पहाऱ्याची काही भजने आपण पुढील व्हिडिओत पाहू.
देऊळवाडी
व्हिडीओ पाहण्यापूर्वी देऊळवाडीतील थोडी माहिती घेऊ. देऊळवाडी म्हणजे देवळापासून सुरू होऊन देवळाच्या मागे ३५-४० घरांचा पसरलेला अर्धवर्तुळाकार पसरलेला भूभाग . देऊळवाडीतील महिलाही मंदिरात नामसप्ताहाच्या पहाऱ्यात भजन करतात. इतकेच नव्हे तर एरव्हीही दर मंगळवारी त्या नवलाई पावणाई मंदिरात भजन करतात. फक्त हे भजन उभे राहून न करता बसून केले जाते. या महिलांच्या भजनाचा एक व्हिडिओच आता आपण पाहू :
तर अशा देऊळवाडीचा पहारा हा आजकाल पुरूष आणि महिला असा मिश्रित स्वरूपाचा असतो. पुरूष वर्गामध्ये पूर्वापार पहारे करण्याची एक परंपरा आहे. प्रामुख्याने कै. नारायण भाटकर यांचे नांव यासंदर्भात आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडे तीन तास न थकता गायन करण्याचे सामर्थ्य होते. आजची कर्ती पिढी ही त्यावेळी बाल्यावस्थेत होती. या पिढीला साठ वर्षांची नामसप्ताहाची माहिती आहे. या पिढीला कै. नारायण भाटकर यांना भजन करतांना पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कै. नारायण भाटकर यांचे त्यावेळचे सहकारी शिरधनकर , कीर , हातिसकर , पेडणेकर हेही या नामसप्ताहातील वैशिष्ट्यपूर्ण सहभागाबद्दल नावाजलेले होते. ही पिढी जबरदस्त शिस्तप्रिय होती व त्यांना पहारा सुरू असतांना कोणतेही वावगे कृत्य चालत नसे. इतकेच नव्हे ; तर कुठल्या मुलाचा ताल वा ठेका चुकला तर ते हातातला टाळ मारायलाही मागे पुढे बघत नसायचे. आजच्या कर्त्या पिढीने आजोबांच्या पिढीकडून असा मार कित्येक वेळा खाल्लेला आहे.
मधली व्रात्य पिढी
खरं तर , नातवंडांच्या अंगात जो हूडपणा आला होता तो मूळातच मधल्या म्हणजे वडिलांच्या पिढीकडून आला होता. आजोबांना करडी शिस्त , भजनातील तल्लीनता अभिप्रेत होती खरी , पण त्यांच्याच तरूण , विवाहित मुलांनी हळूहळू ही शिस्त मोडीत काढायला सुरूवात केली होती . मात्र त्यांच्यामध्येही भजनातील आवड आणि तल्लीनता कायम होती. या व्रात्य पिढीत शंकर हातिसकर , मधूकर कीर , वामन पेडणेकर , अंकुश पेडणेकर , मुरारी हातिसकर ही नांवे आघाडीवर होती. हे सगळे चांगले गाणारे होते . यातले मधुकर कीर तर गवळण अतिशय गोड आवाजात व पूर्ण तादात्मतेने म्हणायचे. मात्र या पिढीने गाण्यातून एकमेकांना टोमणे मारण्याची कला खूपच विकसित केली होती. पण हे टोमणेही ते खिलाडू वृत्तीने घ्यायचे , हे विशेष. त्यांच्या पुढील पिढीने मात्र टोमणे न मारता भजन करायला सुरूवात केली हेही विशेष ! या पिढीने हे पहारे करड्या शिस्तीला फाटा देत मोकळ्या वातावरणात , हसतखेळत होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले , हेही विशेष ! आज त्यांची मुले व नातवंडेही हाच कित्ता गिरवून नामसप्ताह आनंदाने पार पाडीत आहेत ! आज पन्नाशी- साठीतल्या या पिढीत श्री. शैलेंद्र शंकर हातिसकर व श्री. दीपक मधुकर कीर हे भजनीबुवा देऊळवाडीचे आदर्श आहेत. त्यांच्या बरोबरीने श्री. सुनिल तुकाराम भाटकर , श्री. कमलाकर तुकाराम भाटकर, श्री. अजित वसंत भाटकर, श्री. ययाती उदय हातिसकर , श्री. निलेश चंद्रकांत पेडणेकर, श्री. मंदार महेंद्र लिंगायत हे सुंदर गायन करत आहेत. सुनिल व कमलाकर या भाटकर बंधूंनी तर थेट त्यांच्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. ते न थकता बराच काळ सलग भजने म्हणतात ! अजित भाटकर हा त्यांचा चुलत भाऊही चांगला गातो . विशेषत: साईबाबांची भजने तो खूप तल्लीन होऊन गातो.
एक हृद्य आठवण :
अशीच एक हृद्य आठवण आहे ती एका हरहुन्नरी हसमुख कलाकाराची. भानुदास हातिसकर. जो गेल्या वर्षीच्या नामसप्ताहात उत्साहाने सहभागी होता ! पण यंदाच्या नामसप्ताहात त्याचे चैतन्यदायी व्यक्तिमत्व पाहण्याचे आमच्या भाग्यात नव्हते. त्याचे जाणे खऱ्या अर्थाने चटका लावून गेले ! भालचंद्र हा बाबा या टोपण नावाने सुपरिचित होता.
गेल्या वर्षीच्या नामसप्ताहातील बाबाच्या आठवणी जागवणारे काही व्हिडीओ :
बाबा स्वतःची रिक्षा चालवायचा. तो इतका प्रसिध्द होता की त्याच्या निधनानंतर शहरात काही ठिकाणी फ्लेक्स लागले होते. देऊळवाडीत तर त्याचे घरच आहे. पण बरीच वर्षे ही हातिसकर मंडळी शहरात राहतात. तिथूनच बाबा नामसप्ताहाला यायचा. नुकतीच त्याची मुलगी यशश्री नवलाई पावणाई मंदिरातील नामसप्ताहात येऊन गेली. जिथे बाबा पेटी वाजवत असायचा त्याच जागेजवळ तिची भेट झाली आणि बाबाच्या आठवणी दाटून आल्या...
Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर नामसप्ताहाचे व्हिडीओ उपलब्ध...
नामसप्ताहाचे व्हिडीओ Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यापैकी काही तुमच्यासाठी यू ट्यूब वरून इथे शेअर करीत आहोत.
नामसप्ताहात संस्कृतीची देवाणघेवाण
जेव्हा संस्कृती विकसित होत असते तेव्हा तिचा इतर संस्कृतींशी संपर्क येतो. या नामसप्ताहाचेही असेच आहे. जाकीमिऱ्यात हा नामसप्ताह जसा जसा अन्य गावांतील भजनी कलाकारांना माहिती होत गेला , तसे तसे हे बाहेरगावचे कलाकार जाकीमिऱ्यामध्ये प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या नामसप्ताहात येऊ लागले. इथल्या लोकांनीही त्यांना नामसप्ताहात भजन सादर करण्यास आनंदाने मोकळीक दिली. संस्कृतींचे हे आदानप्रदान यावर्षीही दिसून आले .
यावर्षी नारायणमळी गावचा मोर्या ग्रूप मंदिरात आला व त्यांनी अतिशय सुरेल अशी भजने सादर केली. त्यातल्या काही भजनांची झलक पुढील व्हिडीओमध्ये तुम्हांला आढळून येईल. त्यांच्या आणि इथल्या गायन व वादन पध्दतीतला फरकही आपल्या लक्षात येईल . चला तर आपण devidas patil creation या यू टयूब चॅनेलवरून प्रत्यक्ष व्हिडीओच पाहू.
अशा प्रकारे , नामसप्ताह सुरू आहे. त्याचं वार्तांकनही सुरू राहीलच. पण तूर्तास इथेच थांबू ! तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा .
Your blog is a valuable resource for anyone seeking knowledge.
उत्तर द्याहटवा