मित्र हो, सोमवार दि. ०५ ते सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत माझ्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह सुरू होता. मी माझ्या फेसबूक प्रोफाईलवर व यू ट्यूब चॅनेल देवीदास पाटील क्रियेशनवर त्याचे थोडे व्हिडीओ पोस्ट केले होते. अजूनही काही व्हिडीओ आहेत जे येत्या काही दिवसांत पोस्ट करीनच. आमच्या जाकीमिऱ्याप्रमाणेच भाटीमिऱ्यातील दत्तमंदिर व सडामिऱ्या भागातील नवलाई पावणाई मंदिरातील नाम सप्ताहही वरील नमूद कालावधीत संपन्न झाला. कोंकणात असे एक्का वा नाम सप्ताह अनेक ठिकाणी संपन्न होतात. ही इथली संस्कृती आहे.
आमचा मिऱ्या गाव तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. शहराकडून येणारा एकमेव मुख्य रस्ता व त्यालाच फुटलेले उपरस्ते तसेच समुद्रसपाटीपासून चढत्या क्रमाने असलेले गावाचे भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या, आनंदनगर , सडामिऱ्या व पुन्हा उतारावरून समुद्रसपाटीला असणारे मिऱ्याबंदर हे भौगोलिक अर्धगोलाकार भाग . बंधारा एका बाजुने आहे. मध्ये मिऱ्या डोंगर उभा आहे. पण त्यानंतर उघडा समुद्र किनारा आहे , समुद्र खाडी स्वरूपात आत घुसलेल्या आहे. तिथूनही समुद्राचे पाणी घुसून हाहाकार उडू शकतो.
अशा भूभागातील लोकांना देवाचाच आधार वाटतो. त्याला अनुसरून, भाटीमिऱ्यात दोन , जाकीमिऱ्यात एक अशी तीन दत्तमंदिरे , जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे एक व हनुमंताची दोन मंदिरे, माझ्या हयातीत बांधलेली गणपतीची दोन मंदिरे व सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर ही इथली मंदिरे आहेत. खरे तर सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर हे प्रथम निर्माण केले गेले. पण नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे विविध सांस्कृतिक उपक्रमांना मंदिरातील जागा अपुरी पडू लागली. जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे मंदिर कधी बांधले गेले तो उल्लेख त्याच्या सध्याच्या कमानीवर आढळतो. अर्थात, भूतकाळात कधी काय झाले यावर जाणूनबुजून वाद निर्माण करण्यापेक्षा आणि दाणे टाकून कोंबडया झुंजवण्यापेक्षाही , शंभर वर्षांहूनही अधिक काळाचा हा वारसा नामसप्ताहासारख्या उपक्रमांतून जुन्या व नव्या पिढीकडून पुढे आनंदाने आणि एकोप्याने चालवला जात आहे , हेच अधिक महत्वाचे व अभिमानाचे आहे ! हा सोहळा मानवी जीवनाच्या आनंदाचा भाग बनावा, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !
मी कालच्या पोस्टमध्ये दाणे टाकणारांचा व ते टिपण्यासाठी भांडणे करणाऱ्यांचा ओझरता उल्लेख केला होता. संस्कृतीवर जाणकार भाष्य करतात. ते मी ऐकतो. चांगले भाष्य करतात. पण होते काय काही भाष्यकार इकडे प्रभावी बोलतात पण तिकडे दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात. खरे तर चूक त्यांची नसतेच ! चूक त्यांचे दाणे टिपणाऱ्या आणि डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपसातच भांडणाऱ्या कोंबड्यांचीच असते ! भांडणे लावणे ही ज्यांची विकृती असते ते भांडणे लावून मजा घेतच बसणार ! त्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या नादाला न लागणे केव्हाही श्रेष्ठच ! दाणे टाकणारे आणि ते दाणे टिपून आपसात भांडणारे हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत.
खरे तर संस्कृती ही जीवनाच्या उपक्रमांमधून बनते. या उपक्रमांशी व पर्यायाने संस्कृतीशी धर्माला जोडण्यात आले. माणूस अगोदरचा, संस्कृती नंतरची आणि धर्म तर खूपच मागाहून आला आहे. पण तोच कानामागून येऊन तिखट झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात तो सत्तेशी पर्यायाने राजकारणाशी जोडला गेला. राजकारण हे सत्तेतून आले असले तरी राजकारणी आपल्यातूनच येतात हे विसरता येत नाही ! तेव्हा लोकशाहीत अंतिम बोट कुणाकडे वळते आहे ते पहा.
मूळात माणसांच्या विविध संस्कृती विविध ठिकाणी अस्तित्वात होत्या. आजही आहेत. मग त्यांना धर्म ही संकल्पना कशासाठी जोडला गेली ? संस्कृतीत जसे सुष्ट लोक असतात तसेच दुष्टही असतात. वर दाणे टाकणारे आणि झुंजणारे या दोन्हींचा उल्लेख आलाच आहे. खरे तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती विश्व चालण्यासाठी आवश्यकच आहेत. तेव्हा त्यांचे स्वागतच आहे . एक तर समाजाला शिस्त लावण्यासाठी धर्म ही संकल्पना आली आणि वाईटांना निदान भीती वाटावी व ती कमी पडू लागली म्हणून पुढे देव ही संकल्पनाही धर्मांशी जोडली गेली. पण वाईट लोक देवाधर्माला विकून खाणारे निघतात आणि चांगले लोक सांस्कृतिक उपक्रम नित्य नेमाने व भक्तीभावाने करतात ! मानवी संस्कृतीचे हे दोन घटक अव्याहतपणे सुरू राहणार हे नक्की !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०८.२०२४
............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा