देवपूजा
करून करून भागल्यावर मीही देवपूजेला लागणार हे उघडच होतं. थोडक्यात, वृध्दापकाळाची चाहूल लागल्याची उपरती सुरू झाली आहे. तारूण्याची उर्मी, नवनिर्मितीचे धुमारे सरून आयुष्य सुमारे म्हणजेच कशाच्या तरी आधारे जगणे सुरू झाले आहे. आता मन रमवायला जगात कुठे तरी जाऊन जमण्यातले नाही , घरातच मन रमवायचे दिवस आलेत हे उमगले आहे. लहानपणापासून बघत आणि ऐकत आलेला देव आता थोडा थोडासा तरी दिसू लागला आहे. साहजिकच, मी हल्ली निदान नियमितपणे देवपूजा तरी करू लागलो आहे ! हे चांगले आहे , नाही का ? अर्थात, पूर्वी मी कधी कधी देवपूजा करायचो, तेव्हा देवावर फुले टाकायचो. आता ती नीट घालतो, ठेवतो. इतकाच फरक झाला आहे. स्वभाव पूर्णपणे थोडाच बदलणार आहे !
तर देवपूजा म्हटली की फुले हवीतच. मी फुले शोधायला जगभर जात नाही. इतकेच काय, शेजारच्या कंपाऊंडबाहेरूनही फांद्या वाकवून वाकवून फुले चोरत नाही. कधीच नाही. माझ्या कंपाऊंडमध्ये माझ्या सौ.ने ही सोय हौसेने करून ठेवलेली आहे. म्हणजे आपला पती सकाळच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊ नये ही दक्षता तिने आधीच घेतली आहे. शेजाऱ्याची फुले कितीही आकर्षक वाटली तरी मीही कधी त्या फंदात पडत नाही. पण शेजारची काही जणं किंवा जणीं मात्र परवानगी न घेता माझ्या कंपाऊंडमध्ये सरळ सरळ घुसून माझा डोळा चुकवून किंवा अगदी माझ्या नाकासमोरूही माझ्याच फुलझाडांची फुले बिनदिक्कतपणे घेऊन जातात ! म्हणजे अगदी उघड उघड चोरी ! मग मलाच माझीच फुले वेचायची चोरी होऊन बसते. कधी कधी तर फुलझाडांजवळ जाऊन फुलाला हात घालतांना मीच माझ्या फुलांची चोरी करतोय की काय असे मला वाटून मीच क्षणभर हात मागे घेतो ! कधी कधी तर मलाच फुले मिळत नाहीत. लोकांच्या या देवभक्तीपुढे मी नतमस्तक होऊन हात जोडतो आणि निमूटपणे फुलांविना देवपूजा करतो. देव काहीच बोलत नाही पण सौ. शेजारुन ( मला न बोलता ) फुले घेऊन येते आणि देवपूजेला पूर्णविराम देते ! मी निमूटपणे देवाला आणि सौ.लाही हात जोडतो !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा