Pages

सोमवार, २० एप्रिल, २०२०

One more day

मागे - पुढे

20.04.2020

              आज लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग सत्तावीसावा दिवस.  काल रात्री सौ. ला साडेनऊ वाजताच झोप आली .  कधी गोळी लवकर लागू पडते. कधी कधी दुस-या दिवशी सकाळी अंमल सुरू होतो. ती दहाच्या सुमारास झोपली पण मला बराच काळ झोप येतच नव्हती. सर्फींग करत बसलो. कधी तरी झोप आली तसा मोबाईल बंद केला व झोपलो. आज पहाटे पाच वाजता जाग आली. काही तरी स्वप्नं पडलं जे नंतर आठवलंच नाही. पुन्हा मी सहा वाजता उठलोच. मागे जाऊन वरच्या टाकीत पाणी फूल केले. आज सोमवार. नळाला पाणी येणार नसल्याने साफसफाईकडे मोर्चा वळवला. पुढचे , मागचे अंगण साफ झाल्यानंतर खालच्या अंगणात गेलो. आज गच्चीच्या पाय-याही साफ केल्या.  परिसर स्वच्छता झाली. घरे साफ झाली. चांगलाच घाम आला. आज पाण्याची गडबड नसल्याने सफाईला बराच वेळ मिळावा. 

             आज दुपारी एक वाजता माझे एक चाहते व दहीगांवचे रहिवासी श्री. सुबोध रेचे यांचा ब-याच काळाने फोन आला. ते बराच काळ बोलत होते. ते सद्या अमरावतीत त्यांच्या घरापासून पन्नास किमीवर असलेल्या मुलीच्या घरी सपत्नीक रहात आहेत. त्यांचा मुलगा व सून रायगडमध्ये अडकून पडले आहेत. त्यांचा मुलगा एस.टी. त कंडक्टर आहे. सुबोधजी माझी आपुलकीने चौकशी करीत होते.  मी माझ्या मुलाचीही हकीगत सांगितली. दुसरी गोष्ट म्हणजे राजू परत शहरातील त्याच्या निवासस्थानी रहायला गेला. खरे तर तो काल सकाळी माझ्याकडे गप्पा मारायला येणार होता. पण तो असा अचानक गेला. सौ. शेजाराहून येतांना तिला ते कुटुंब रस्त्यात भेटले. राजूच्या मुलीने नेलेल्या दोरी उडया आठवणीने परत केल्या. राजूचीही स्वतंत्र कहाणी आहे. ती नंतर कधी तरी. 

        आजचा कोरोनाचा दिवसही भयावहच आहे. आकडेवारी वाढते आहे. संपूर्ण पुणे शहर सील झाले आहे. आमचे प्राण कंठाशी येऊ लागले आहेत. मुलांच्या काळजीने आमच्यासारखेच किती तरी लोक हैराण असतील. आपल्या भागात रोजगाराच्या संधी नसल्या की मुले अशी नोकरीसाठी  आईवडिलांपासून दूर एकटी राहतात. कोरोनासारख्या परिस्थितीत तर फारच ताण येतो. पण कोणाला सांगणार आणि सांगून उपयोग तरी काय म्हणा !  त्यात सर्वसामान्यांचे हाल तर सर्वत्रच असतात. त्यांना स्वत:च्या मनाप्रमाणे जगताच येत नाही. सुरेश भटांची , कुठे तरी मी उभाच होतो , कुठेतरी दैव नेत होते , सारखीच माझ्याही आयुष्याची त-हा झालेली आहे. सुरेश भट माझ्या मनात घर करून राहण्याचे हेही एक कारण आहे. 

          हळूहळू संध्याकाळ झाली आहे. मुलाला फोन करून झाला आहे. मनात चिंता उरली आहे. सौ. शेजारच्या अंगणात ईव्हीनिंग वॉक करते आहे. मी झाडांना पाणी देऊन झाल्यानंतर हे लेखन मोबाईलवर करीत आहे. दिवाबत्तीची वेळ होत आली आहे. थोडया वेळाने शेजारच्या मंदिरात घंटानाद होईल. मग दिवाबत्ती, टीव्ही, जेवण , अजून कोणी शेजारचे आलेच तर, मग झोप आणि पुन्हा उद्या......भेटूच.


( क्रमश: )









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा