मागे - पुढे
26.04.2020
आज कोरोना लॉक डाऊन 1 व 2 धरून सलग तेहत्तीसावा दिवस. आज पाणी कमी आले आहे. उद्या सोमवार आहे म्हणजे उद्या पाणी येणार नाही. त्यामुळे किमान आज झाडे शिंपता येणार नाहीत. आज रविवार असल्याने सौ. मासे घेऊन आली आहे. मागच्या दारी ती ते नीट करीत आहे . मी मागच्या पायरीवर बसलो आहे त्यामुळे कावळे आणि मांजरे लांबूनच मी इथून जाण्याची वाट बघत थांबली आहेत. मला त्यांची दया येते पण भलत्याच बाबतीत दया परवडत नाही ! मागे बंदूकडे बंदूमंडळ जमा झाले आहे. सत्त्या , संत्या , विसू, विकू सारे चर्चेत सहभागी आहेत. जशी काही कोरोनाच्या लसीसंदर्भात गंभीर चर्चा सुरू असावी. कदाचित केंद्रीय पथकं आणि काही राज्य यांच्यात कोरोनासंदर्भातल्या चर्चेचासंदर्भ हयांना मिळाला की काय असे त्यांचे चेहरे दिसतायत. पुढे आलो तर टेबलावरच्या बचत गटाच्या बैठक अहवाल नोंदवहीकडे लक्ष गेले. ती अपडेट करायला सौ. ला हातभार लावला पाहिजे. कारकुनी करीत सेवानिवृत्त झालो . आता सेवानिवृत्तीनंतरही कारकुनीच करावी लागतेय ! एखादयाच्या नशिबात काही गोष्टी कायम असतात. त्या टाळताच येत नाहीत. आज अक्षय तृतीया. खूप जण वेगवेगळे संदेश देत आहेत . मी माझा वेगळा संदेश दिला आहे...........
आज अक्षय तृतीयावगैरे असली तरी रविवार पण आहे. संस्कृती, पाप पुण्य , उपासतपास वगैरे बोलायलाच ठीक असते हे कित्येक वर्षे उघडउघड दिसतेच आहे. उच्च व स्वच्छ संस्कृतीचा टेंभा मिरवणारेच संस्कृतीला तोंडघशी पाडतात व साडेतीन मुहुर्तालाही मासळीबाजारात धावतात ! हक्काचा रविवार सोडतो कोण ! सोय महत्वाची ! आणि भांडणाची खाज भागवण्यासाठी संस्कृतीचा उपयोग करण्याचीही सोय महत्वाची ! शेवटी सारे कसे सोयीनुसार असते. हयालाच जीवन म्हणायचे असते. जगणे महत्वाचे असते. बाकी सारे झूठ असते. पण ढोंगी लोक आडूनआडून सारे करूनही आपण तेवढे निर्मळ , सदाचारी असे दाखवण्यात वाकबगार असतात. मुँहमें राम , बगल में छुरी आणि मी नाही त्यातली नि कडी लावा आतली , असा हा सगळा प्रकार आहे ! वेश्या तोंड वर करून बोलते आणि पतिव्रता मान खाली घालूनच चालते , असा हा प्रकार आहे. ओळखणारे ओळखतातच ! मांजर कितीही डोळे झाकून दूध पिऊदेत. आमच्या आसपासही हेच प्रकार आहेत. तंगडयात तंगडे असल्याने म्हणजेच व्यवहारात गुरफटल्याने एकामेकांचे उणेदुणे काढत नाहीत इतकेच ! काढले तरी मर्यादेतच आणि भांडले तरी लगेच एकमेकांना चिकटतातच ! शेवटी एकमेकांची बिळे एकमेकांना माहीत असतातच ना ! कोणालाही आपल्या भानगडींची वाच्यता परवडण्यातली नसते ! असो !
आज दुपारी जेवल्यानंतर मात्र वामकुक्षी छानच झाली. वामकुक्षीपेक्षा चांगली झोपच झाली. मी पावणेतीन वाजता लवंडलो तो साडेचार वाजता उठलो. छान वाटले. बरेच दिवसांनी हा सुखद अनुभव आला. पुन्हा एकदा हळूहळू संध्याकाळ झाली आहे. दिवाबत्ती , प्रार्थना झाली आहे. खालच्या अंगणात आजही स्नेहा सौ.ला भेटायला आली आहे. बुधवारच्या डोंगरी मटणपार्टीचा बेत अधिकच पक्का केला जातो आहे. चंगळवाद पुन्हा बोकाळणारच आहे. कोरोनाचीही भीती काही शिकवू शकत नाही , ही वस्तू:स्थिती आहे. मूळ स्वभाव काही केल्या जात नाही. मी अंगणात फिरतो आहे. हे चक्र असेच फिरत राहणार आहे. अनादिअनंत काळ.
( क्रमश: )
...........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा