Pages

शुक्रवार, २९ मे, २०२०

Sleepless night


मागे - पुढे

28.05.2020

       पुन्हा काही सांगायचे तर पुन्हा एकदा चार सहा दिवसांनी जरा मागे-पुढे पाहू म्हटले.  काळाचा अंदाज आताही घेतोच आहे. बाकी पुढील 3 वाक्ये मी  लॉक डाऊन उठेपर्यंत कायम ठेवणार आहे. दि. 04.05.2020 पासून नव्याने सुरू झालेल्या म्हणजेच कोरोना लॉक डाऊन 1 , 2 व 3 आणि दि . 18.05.2020 पासूनचा 4 थाही धरून आज सलग कितवा तरी दिवस असावा. मी ते दिवस मोजणेही सोडून दिले आहे. हा लॉक डाऊन 17 मे पर्यंत वाढवलेला होता. तोच आता चौथ्या टप्प्यात18 मे पासून 31 मे पर्यंत पुढे ओढण्यात आला आहे. तो पुढे वाढेल न वाढेल.  लॉक डाऊनमध्ये कायदेशीर आणि अवैध प्रवासी वाहतूक होऊन रत्नागिरी जिल्हयात अनेक चाकरमानी आले आहेत. कोरोना अहवाल टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहेत. तसे तसे चित्र स्पष्ट होत जाते आहे. कालपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 195 झाली होती ती आज सकाळीच 196 झाली आहे. 05 वा मृत्यूही झाल्याची बातमी  आहे. माझे मित्र श्री. राजन किल्लेकर आणि श्री. अलिमियाँ काझी हे विविध बातम्या मला मेसेंजरवर व व्हॉट्सॲपवर नियमितपणे पाठवीत असतात. त्यांच्यामुळे गावात राहूनही शहरातल्याच नव्हे तर जिल्ह्यातल्याही ब्रेकींग न्यूज मला घरबसल्या मिळतात. मी त्यांच्या हया सहकार्याबद्दल त्यांचा ऋणी आहे.  ब्रेकींग न्यूजपेक्षाही झंझावाती असतात त्या लंबूवहिनीच्या भयंकर बातम्या ! खरंच, मेरा महान भारत सुशिक्षित झाला आहे का ? असा प्रश्न पडावा , असे लंबूवहिनीचा दुषित दृष्टीकोण पाहून वाटते. पासष्टीतली ही बाई योग्य अयोग्य ओळखू शकत नाही. ती पुस्तकी शिक्षण नसेल शिकली पण आयुष्याचे , माणूसकीचे  उघडे पुस्तक वाचू शकली नाही. अर्थात , काही उच्चशिक्षितांनाही हे जमलेले नाही , हेही कितकेच खरे आहे ! कोरोनाकडे अजूनही ते पक्षीय दृष्टीकोनातूनच बघत आहेत , हे या महान देशाचे दुर्दैव आहे ! 

           ..... तर इकडे म्हणजे मागच्या पुढच्या दारी सांगायच्या  आधी कालच्या रात्रीबद्दल थोडेसे. काल रात्री आम्हां दोघांनाही भयंकर स्वप्नांच्या मालिकांना सामोरे जावे लागले. तिला देवाघरी गेलेल्या तिच्या आईवरून स्वप्नें पडत होती तर मला वेगवेगळीच स्वप्ने पडत होती ! ती घाबरून उठली की मी तिला धीर दयायचो आणि जरा कुठे डोळा लागतोय नाही तोच मी स्वप्नं पडून जागा व्हायचो ! पुन्हा मला पडलेले स्वप्नं तिला सांगायचीही सोय नव्हती ! ती डबल घाबरली असती ! या काही स्वप्नातले एक विचित्र स्वप्नं तुमच्यासाठी नमूद करतो. माझ्या बायकोला प्लीज सांगू नका ! तीन ते सव्वातीनच्या दरम्याने पडलेले हे स्वप्न पहा. त्यात मी रत्नागिरीच्या जयस्तंभाजवळ रस्त्यात उभा असतो. मी पुण्याला मुलाकडे जाण्यासाठी रात्री नऊ वाजता तिथे वाहन बघत असतो. तिथे बसथांब्याच्या अलिकडे एक सतरा सीटर प्रवासी बस लागलेली होती. मी तिच्या मागील बाजुने आत जाऊन शेवटच्या सीटवर बसतो. तेवढयात आबा त्या गाडीत येऊन माझ्या पुढच्या सीटवर बसतो. मी त्याला कुठे जातोयस विचारल्यावर तो म्हणाला , इथे जवळच, गयाळवाडीला . मी गाडीत पाहतो तर गाडी पूर्ण भरलेली असते. पुढच्याच क्षणी ती सुटते आणि दोन मिनिटातच सिव्हील हाँस्पीटलजवळ थांबते. एक धिप्पाड तरूणी उठते आणि तीन चार पुष्पगुच्छ घेऊन खिडकीजवळ उभी राहते . मागून काही जण येतात त्यांना ती ते देते आणि परत जाग्यावर येऊन बसते. ती चक्क नवरी असते. माझा लक्ष तिच्या टोपी घातलेल्या नव-याकडे जाते. आता कुठे माझ्या लक्षात येते की ही गाडी लग्नाची आहे. ही त्यांच्या लहरीप्रमाणे जाणार आणि आपण पुण्याला कधी पोहचणार देव जाणे , इथेच उतरून घरी जावे आणि उद्या परत प्रयत्न करावा असे मला प्रकर्षाने वाटते. मी उतरायला बघतो इतक्यात मला जाग येते ! यानंतरही पावणेपाचच्या दरम्याने आणखी एक विचित्र स्वप्नं पडले पण ते आता आठवत नाही.

                 संध्याकाळी पाचच्या दरम्याने डोंबिवलीतून विलासचा फोन आला. गावात आलो तर चालेल काय ? मी म्हटले ये आणि चौदा दिवस होम क्वारंटाईन रहा. घर तर तुझेच आहे. प्रवासाची परवानगी आणि प्रवासात चेक नाक्यावर गाडया तुंबतात तेव्हा बाधीत होण्याचा धोका यांचाही विचार कर असे मी त्याला सांगितले. फोन ठेवला आणि शिल्लक पाणी बघायला गेलो. ते कमी असल्याने दोनच झाडे शिंपली आणि गप्प बसलो. आज पाणी आलेले नाही, पण उद्या येणार म्हटल्यावर टाकी थोडी रिकामी करून ठेवली. रात्री उशिरा आणखी 12 रूग्ण वाढून जिल्ह्यात एकूण रूग्णसंख्या 208 झाल्याचा संदेश आलाच. विचारांनी आम्हांला झोपच येईना. आता आम्ही साठीत आलोत. सहनशीलता आणि ताकतही कमी झाली आहे. इकडे आणि सासरवाडीतही दोन्ही कुटुंबात वडीलधारे असे आम्हीच आहोत ! सासूबाई गेल्यानंतर तर आम्हांला सख्खे वडीलधारे असे आता कोणीच उरले नाही. मनावर ताण येतो. आताही तेच झाले. रात्री सव्वा बारा वाजता मुलाला फोन लावला तर त्याची कंपनीबरोबरची मिटींग नुकतीच संपली होती. याच्यानंतर तो आंघोळ करणार , मग जेवणार आणि नंतर झोपणार ! उन्हाळयामुळे तो दोनदा आंघोळ करतो. त्याच्याशी आम्ही बोललो . तरी झोप येईना. शेवटी दोघांनीही ब-याच रात्रीनंतर आपापले मोबाईल उचलले आणि दोन वाजेपर्यंत त्यातच होतो.  माझे एक उत्तर क्वोरावर नऊ हजार सहाशे वेळा पाहिले गेल्याचे  वाचले. रात्री दोन वाजता मी क्वोरावर एका प्रश्नाला उत्तर दिले आणि पाठ लादीला टेकली.  रात्री तीन नंतर बहुधा डोळा लागला असावा. 
           
( क्रमश: )
...........











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा