Pages

मंगळवार, ९ जून, २०२०

He ase chalale aahe



  • मागे - पुढे

    हे   असे  चालले   आहे

08.06.2020 

     बरेच दिवस मागे-पुढे काही घडत असतांनाही इथे काही लिहिलेच नाही. ( वाटलेच नाही. पाच लॉक डाऊन पचवलेयत. त्यांनी नेमकं काय साधलं ते सांगणे कठीणच आहे.   लॉक डाऊनमध्येच लोक धावत सुटतात. सूट दिली तर घरात बसतात ! आता तर  लॉक डाऊनमध्येच अनलॉक सुरू झाले आहे. काहीही करा, लोक त्यांना करायचे ते करतातच ! मुंबईकर तर याबाबतीत आघाडीवर आहेत. आता कोरोनासोबतच जगायची तयारी केली जाऊ लागली आहे. जयपूरमध्ये एका कंपनीने स्पर्शविरहीत आँफीस तयार केले आहे. इकडे मुंबईकरांनी बेस्टमध्ये चढण्यासाठी अभूतपूर्व उत्साह दाखवला तो त्यांच्या अंगभूत सवयीमुळेच ! जाऊ दे, शेवटी त्यांनाच जीवनाशी लढायचे आहे . इकडे रत्नागिरीतही लोक लढत आहेतच ! आता चारशेच्या दिशेने प्रवास सुरू आहे. उद्या नवीन तपासणी लँबचे उदघाटन आहे. रिपोर्टस् इथेच मिळू लागले की हा आकडा वाढलेला दिसण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत बरेच पूल आहेत आणि त्या प्रत्येक पुलाखालून शहकाटशहाचे बरेच राजकीय पाणी याबाबत  वाहून गेले आहे. पाण्यावरून आठवले.

निसर्ग चक्रीवादळाची छायाचित्रे व व्हिडीओज :











02 जूनच्या उत्तररात्री म्हणजे 03 जून 2020 च्या पहाटे 03 वाजता ' निसर्ग ' चक्रीवादळ आमच्या भागात घुसले. जवळपास 100 च्या वेगाने वाहणारा वारा आणि धो धो पडणारा पाऊस ! त्यातच 04.30 ला वीज गेली ! घरावरचे पत्रे आता उडतायत की मग या अवस्थेत सकाळ झाली. सकाळीही वादळपाऊस जोरातच होते. उत्तर दिशेची बाग तर पिळवटून निघत होती. हे अकरा साडेअकरापर्यंत सुरू होते. अधूनमधून वारा व पावसाचा वेग कमी होत होता. पण मध्येच वाढतही होता , तेव्हा धडकी भरवत होता. झाडे चक्राकार गतीने फिरत होेती. नशीब एकही मोठी फांदी मोडली नाही. शंभर वर्षाच्या झाडांनी वादळाचा यशस्वी सामना केला हे विशेष ! यातल्या काही झाडांच्या फांद्या आमच्या घरावर पडू शकत होत्या.... दुपारपासून यात खूपच फरक पडत गेला आणि जरा हायसे वाटले . त्या रात्री आम्ही भावाला फोन करून त्याच्या घरात झोपतोय म्हणून सांगितले. त्याचे घर स्लँबचे आहे. तो म्हणाला खुशाल झोपा. पुढचेही काही दिवस तिकडेच झोपा. वादळ पुन्हा येऊ शकते. मी म्हटले नको रे बाबा आता वादळबिदळ ! मुंबईकडून वादळ त्वरेने पुण्याच्या दिशेने सरकल्याने भाऊ मुंबईत निर्धास्त झोपू शकत होता. आम्ही तिकडे झोपलो पण झोप लागलीच नाही. ती रात्रही आम्ही जागूनच काढली. दुस-या दिवशी स. 11.30 वाजता वीज आली. तेव्हा प्रथम मोबाईल्स चार्जिंगला लावले !

                आज सकाळी मागच्या बाजूला गेलो तर उर्मिच्या घराचा प्लँन बदललेला दिसला. भटजींनी साग्रसंगीत पूजा करून दिल्यानंतर विधीवत बसवलेला दरवाजा त्यांनी काढला आहे. त्याच्यापुढे आता हाँलची आखणी करून नवीन दरवाजा बसवण्यात येणार आहे. घर हे असं असतं. ते मनासारखं होईपर्यंत आपण पार मेटाकुटीस येतो ! माझ्याही घराचा पार खेळखंडोबा झाला आहे. पत्रे किती काळ टिकतील हा प्रश्नच आहे पण घर अवाढव्य आहे आणि त्यात माणसे फक्त दोनच आहोत ! आज काँट्रँक्टर मुल्लाला बोलवलं होतं. तो आलाही. चर्चा झालीही. पण माळा करायचा की डायरेक्ट स्लँब टाकायचा हा प्रश्न काही सुटला नाहीच ! काही तरी लवकरच करायला हवे आहे , हे मात्र निश्चित ! मी मुल्लाला या किंवा फार तर पुढच्या वर्षी काही तरी एक करू असं सांगितलंय. 

                  लॉक डाऊनच्या काळात मला भयानक स्वप्नें पडली . तोच क्रम आता अनलॉकच्या काळातही सुरू आहे. स्वप्नांत जी माणसे दिसतात ती काही चांगली आणि काही चांगल्याचीही दिसत नाहीत ! सर्वसाधारणपणे त्यांना डाव म्हणतात ! मी अशा अनेक डावांना आजपर्यंत खाऊन बसलो आहे !  एक तर सलग दोन तीन तासही झोप मिळत नाही. झोप उर्फ चुटका लागतो तोच स्वप्नं चटका देते. त्यात सौ.ला दर दिवशी नाही तर दर रात्री काही ना काही तरी होतच असते. दोघांनाही दिवसा वा रात्री स्वास्थ नाही.  हे असे चालले आहे .



( क्रमश: )
...........









     








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा