Pages

शनिवार, १३ जून, २०२०

Bheda bhed amangal


मागे - पुढे

12.06.2020

भेदाभेद अमंगळ.....

     परवा आठ तारीखलाच लिहिलं होतं इथे हे असे चालले आहे. तीन तारीखला निसर्ग वादळ झालं . तेव्हापासून पाऊस दमदार हजेरी लावतोय. हल्ली तर संध्याकाळी सहा ते दहा जोरदार बरसतोय. इतका की कोणाला फोनही करता येत नाहीय , म्हणून सकाळी भावाला फोन केला तर तो गडबडलाच !  म्हटलं , सहज केलाय फोन . खुशालीसाठी. तेव्हा कुठे तो सावरला. हल्ली पाणी नऊ वाजता येतं. पण सत्त्या उर्मिच्या घराच्या बांधकामावर लक्ष ठेवायला आठ वाजल्यापासूनच हजर असतो. तशी कामावरची येणारी माणसं वेळेवर येतात. बंदू पाण्याची वाट बघत चुळबूळत असतो . हल्ली विसू विरळ झालाय तरी विकास वेळ आणि फेरी चुकवत नाही. हे सगळं मागच्या दारी गेलं की दिसतं, तसंच ते आजही दिसलं.  आज माझ्या भाचीला -  मीनलला मेसेज  केला. आज माझ्या स्वप्नात तिचे वडील  (ज्यांना आम्ही सारे भाऊ म्हणतो ) आले होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून मी बेचैन होतो. चहा घेतांना मी सौ. लाही सांगितलं. काल रात्री भाऊ माझ्या स्वप्नात आले होते. ते जयस्तंभाकडून राजीवडयात त्यांच्या मूळ घरी चालले होते व मी स्टेट बँकेकडून जयस्तंभाच्या दिशेने चाललो होतो. वेळ सकाळची असावी.  संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. एकही गाडी रस्त्यावर नव्हती. स्टेट बँकेसमोर आमची भेट होते. भाईंबद्दल ( त्यांचे अलिकडेच निधन पावलेले थोरले बंधू ) आमचे थोडे बोलणे झाले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. इथे स्वप्नं संपले व मी जागा झालो.   मीनलने माझा मेसेेज वाचून लगेच रिप्लाय दिला तो असा : सध्या भाऊंची तब्येत थोडी खराब होती आता बरे आहेत . म्हणजे स्वप्नं खरं होतं तर.  मीनल व तिचे वडील तर सिंधुदुर्ग जिल्हयात स्थायिक झाले आहेत.  पण स्वप्नात भाऊ मला रत्नागिरीत निर्मनुष्य रस्त्यावर भेटतात , त्या निर्मनुष्य रस्त्याचा अर्थ काय ?  जयस्तंभ परिसर का दिसला ? निर्मनुष्य रस्त्याचा कोरोनाशी काही संबंध असेल का ? काय घडत आहे ? काय घडणार आहे ? तिकडे 15 जूनपासून लॉक डाऊन पुन्हा सुरू होणार अशा अफवा सोशल मिडियावर उठू लागल्याने मुख्यमंत्र्यांना ट्वीट करून असे काही होणार नाही असे सांगावे लागले. मंत्रीमंडळातल्या तीन मंत्र्यांना कोरोना झाल्याची बातमी आहे. कोरोना भेद करीत नाही. भेदाभेद अमंगळ हे सांगतांना संतांना भविष्यातील कोरोनाची माहिती होती म्हणून तर त्यांनी तो इशारा दिला नव्हता ना ? हे संत नक्की कोण होते आणि त्यांना होणारी अनुभूती नक्की काय होती , याचा वस्तूनिष्ठ अभ्यास झाला पाहिजे. नुसतं ते संस्कृती , संस्कृती म्हणून भावनिक बोंबलण्यात अर्थ नाही . तिकडे नेपाळही आपल्यावर गुरगुरू लागला आहे. बिहार सीमेवर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय. इकडे रत्नागिरीत नवीन परिक्षण लॅब सुरूसुध्दा झालीय. आता अहवालही लवकर येतील. कालपर्यंत तरी चारशेचा आकडा पार झालेला नाहीय. वेग थोडा मंदावलाय . तेवढाच दिलासा. बातम्या येतच राहतील. नाहीच आल्या कुठून तरी लंबू वहिनी तरी कुठून तरी घेऊन येईल , असा विचार मनात येतो न तोच साक्षात लंबूवहिनी बातमी घेऊन आलीच ! गेले वर्षभर माहेरी जाऊन बसलेली  नरेशची थोरली सून आणि तिचे माहेरचे नातेवाईक बँकेत दागिने सोडवायला आले होते ! ती केवळ आम्हांला सांगून थांबली नाही तर नरेशच्या घरी जाऊनही तिने ही बातमी सांगितली. तिकडे बापलेकात फोनाफोनी झाली ! इकडे लंबू वहिनी खूष ! आजकाल मागे पुढे हे असे चालले आहे ....



( क्रमश: )
...........











   








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा