Pages

शुक्रवार, २१ जून, २०२४

राजकीय खुमखुमी

 राजकीय खुमखुमी


लोकसभेची निवडणूक झाली.‌ अब की बार चे बार हवेत उडून विरले आहेत. मग आता काय उरले आहे ? तर विधानसभा ! हल्ली निवडणूका आखाडा बनून गेल्या आहेत. विधानसभेचे रणकंदन तर आतापासूनच सुरू झाले आहे. हा याच्या बालेकिल्ल्यात , तो त्याच्या बालेकिल्ल्यात , हा वार करतो तो पलटवार करतो, तो ह्याला टोला हाणतो, हा त्याला टोला हाणतो, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढण्यावाचून‌ या राजकारण्यांना काही काम असते की नाही हीच शंका येते ! मतदारांसाठी पवित्र कर्तव्य आहे बघा ! त्यांनी ते बजावण्यासाठी केवढा आटापिटा , केवढी जाहिरातबाजी त्यांच्याच खर्चाने केली जाते ! मतदारांचे पवित्र कर्तव्य काय तर मतदान करणे. मग उमेदवारांचे वा निवडून आलेल्यांचे पवित्र कर्तव्य काय हीन पातळीवरचे आरोप एकमेकांवर करणे हेच आहे का ? एकमेकांवर चिखलफेक करून हे कोणता महान आदर्श उभा करत आहेत ? राजकारण करणे म्हणजे केवळ नळावरची भांडणे करून बेलगाम वक्तव्ये करणे आहे का ? लोकसभेत वा विधानसभेत अर्वाच्च भाषेत बोलणे, रस्त्यावर असल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे , हे कशाचे द्योतक आहे ? मग त्या पवित्र मंदिरात जाण्याआधी पाया पडण्याची नाटके तरी कशाला ? या लोकांना काही नियम आहेत की नाहीत ? बंधने आहेत की नाहीत ? संविधान याबाबत काय सांगते ? सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचे यावर काय म्हणणे आहे ? याप्रकारे लोकशाहीची केली जाणारी क्रूर चेष्टा कशी थांबणार ? की ठोकशाही हा लोकशाहीचा गौरव म्हणायचा ? आता फलकयुध्ये सुरू आहेत. याचे फलक त्याच्या बालेकिल्ल्यात, त्याचे फलक याच्या बालेकिल्ल्यात आतापासूनच दिसू लागले आहेत. आत बरेच काही धुमसते आहे. राजकीय खुमखुमी डोके वर काढीत आहे. आखाडा पुन्हा रंगू लागला आहे.‌

पण हे जे राजकीय लोक आले ते आले कुठून ? त्यांना ही अर्वाच्च भाषा , ही खुमखुमी आली कशी आणि आली कुठून ? हे वाढले कुठे ? हे जे काय शिकले ते शिकले कुठे ? हे असे बनण्यात समाजाचे योगदान नाही काय ? यांना शाळेत शिक्षकांनी शिक्षा केलीच नसेल ? ती केल्यावर शिक्षकांनाच धारेवर धरणारे कोण होते ? ज्या शिक्षक वर्गाने स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून राष्ट्र घडविले त्या शिक्षकवर्गालाच वाहयात पोरांना शिस्त लावली म्हणून थेट पोलीस स्टेशन दाखवणारे कोण होते ? ही एक पिढी अशी होईपर्यंत आणि तिच्या नादाने पुढच्या काही पिढ्या नादान होईपर्यंत झोपा काढणारे कोण ? अंतर्मुख होऊन आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही ? की नुसतेच राजकारण्यांना दोष देत बसणार आहोत ? लोकशाहीसाठी आपण काही करणार आहोत की नाही ? की मतदान हेच आपले एकमेव पवित्र कर्तव्य आहे अशी साळसूदपणे ठाम समजूत करून घेणार आहोत ? ही लोकशाही कोणासाठी आहे ? लोकांसाठीच ना ? मग ती जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे की नाही ? याची उत्तरे‌ प्रत्येकांने स्वतःलाच विचारायची की नाहीत ? हे लोकांचे सर्वात मोठे पवित्र कर्तव्य नाही का ? बेलगाम नेत्यांनी लोकशाही शिकवण्याइतके लोक अजूनही अजाण आहेत का ? ते सूज्ञ होणार तरी कधी ? 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०६.२०२४ सकाळी ११.००


#politics

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा