Pages

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

वडाच्या झाडावरून

 वडाच्या झाडावरून जमिनीवर !  


काल वटपौर्णिमा संपन्न झाली. मीही सौ. बरोबर गेलो होतो वडाच्या झाडाकडे. मी वड वड म्हणतोय पण ती तर वटपौर्णिमा आहे. मला हा प्रश्न पडतो की वडाच्या झाडावर सत्यवानाला बसवूनही वडपौर्णिमा ऐवजी वटपौर्णिमा का म्हणतात ? संसारात सौ.ची चालणारी वट आणि ह्या ' वट ' चा काही पूर्वापार संबंध तर नाही ना ? की संसारातल्या माझ्या काही चावटपणाचा ह्या वटशी संबंध आहे. गंमत केली हा. वड म्हणजेच वट हे माहिती आहे मला. वटावर म्हणजेच वडावर चढून बसलो होतो मी ! असो, अखेरीस आता जमिनीवर आलोय बा ! नाही आलो असतो तरी सौ. ने आणलेच असते की ! सावित्रीची शक्ती आहे ना तिच्याकडे ! 

तर सांगत होतो काय काल तिच्या एका भावजयीचा फोन आला होता. विषय अर्थात वटपौर्णिमा हाच होता. तू पूजा कधी केलीस ? मी पूजा कधी केली ? माझा सत्यवान माझ्या सोबत आला होता , तुझा तुझ्यासोबत आला होता का ? मुहूर्त अमूक ते अमूक होता. मी साधला . तू साधलास की नाही ? आमच्याकडे काही लोकांनी तर आज मासे पण खाल्ले ! तुमच्याकडे नाही खाल्ले का ? .... काय काय चविष्ट प्रश्नं होते तुम्हांला सांगू ! आमचा उपवास होता हो ! पूर्ण शाकाहारी ! तरी बरं , डाळ भात लोणचं कोण नाय कोणचं , असं असलं तरी मला तेच आवडतं. मी तसा बऱ्यापैकी शाकाहारी आहे .

माझं पुराण राहुदे. पुढचा प्रश्नं ऐका. मग बोला. विषय गर्दीवर आला. गर्दीच्या उत्साहावर आला. पण तो काही फारसा उत्साहवर्धक दिसला नाही. तू गेलीस तिकडे किती गर्दी होती ? किती जणी आल्या होत्या पूजा करायला ? या प्रश्नावर ती उद्गारली, अगं, कसली गर्दी नि कसलं काय ! नव्या सुनांना फारसं कौतुकच नाही मेलं ! आम्ही पण आता सवयीनेच करतो म्हणा ! इथे एक जन्म व्यवस्थित जमत नाहीय, चालत नाहीय तिथे सात जन्म म्हणजे फारच अवघड बाई ! आजकाल याच जन्मात पतींची अदलाबदल करतात म्हणे, तिथे तर पुढच्या जन्मात नक्कीच बदलून मागतील ! यावर नणंद भावजयीचं प्रचंड एकमत होऊन त्या खदखदा हसू लागल्या !  हे ऐकून व पाहून मी वडाच्या किंवा वटाच्या झाडावरून खाली सरसरत आलो नसतो तरच नवल ! मला सत्यवानांची ( दुरा )अवस्था कळली आणि मी सौ. आणि तिच्या भावजयीसमोर नतमस्तक झालो ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा