Pages

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

सौ. टीव्ही मालिका बघत असते

सौ. टीव्ही मालिका बघत असते. मी बाजुला माझे लेखन करत तिला साथ देत असतो. तसा आमच्याकडे दिवसातून फार तर दोन अडीच तास टीव्ही चालू असतो. टीव्ही चालू असतो म्हणजे काय , तर मालिका चालू असतात. त्याच त्या. बाकी बातम्या बघणे मी गेली काही वर्षे जवळजवळ सोडूनच दिले आहे. बऱ्याचश्या बातम्या राजकीयच असतात आणि त्याच त्याच ब्रेकींग न्यूज म्हणून दिवसरात्रभर हंबरडे फोडीत असतात. आता पाऊस नुकताच सुरू झालाय . नैसर्गिक गोष्ट आहे ती. पण यामागेही कोणी तरी माजी नेता असावा अशी राजकीय ओरड सुरू व्हायची शक्यता नाकारता येत नाही. हे उदाहरण मी हल्ली बातम्या राजकीय हेतूनेही दिल्या जातात , त्यांची त्यांची म्हणे चॅनेल्स असतात, आरोप-प्रत्यारोप होतच असतात, हे सांगण्यासाठी दिलंय. एरव्ही आता ही सगळी सोंगं आपल्या अंगवळणी पडून गेली आहेत. तुमच्याही 😂 ! आपल्याला सोंगे आणि सोंगाडे याविषयी काही बोलायचं नाही. आपला विषय समस्त महिला वर्गाच्या आवडीचा विषय आहे. टीव्हीमालिका ! 


जेवढ्या म्हणून सौ. मालिका बघते त्या सगळ्यांतच एक समान गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल दुसरं काय असणार, रटाळपणाच असणार ! अहो, तोही परवडला. नाही तरी आपल्याला कुठे ते पहायचंय ! आपला लेखन उद्योग करता करता कानाडोळयावर अधूनमधून ते पडत असतंच. शिवाय सौ. जोरात व्यक्त , रिअॅक्ट हो, झाली की आपलं लक्ष जातंच. सौ.साठीतरी आपल्यालाही प्रतिक्रिया द्यावीच लागते. कधी कधी अशी प्रतिक्रिया देता देता आपणच त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकतो. हो, मी टीव्हीला आता ईडीयट बॉक्स समजत नाही. आपल्याला धूर्तपणे त्याच्या जाळयात ओढणारा कोळी समजतो. होतं काय, एखाद्या प्रसंगाला रिअॅक्ट होतांना सौ.बरोबर आपणही नकळतपणे एवढे ओढले जातो की आपणही काही काळ का होईना ती मालिका बघत बसतो. ( सौ.चा ! ) गूण नाही तरी वाण लागतो म्हणतात ना तो असा. मग आता धूर्त कोळी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ? टीव्हीला म्हणतोय हा मी . हसू नका !


तर ह्या टीव्ही मालिका. त्यांच्यातला एक समान धागा. तो म्हणजे प्रत्येक मालिकेतल्या प्रत्येक कुटुंबात सतत चालणारी कपटनीती ! यात चांगल्या तीन चार महिला आणि त्यांना साथ देणारे किमान एक दोन पुरूष तर असतातच. ह्या पुरूषांना डोके नावाचा भाग नसतोच आणि त्या दुष्ट बाया नाचतील तसं नाचण्यावाचूनही पर्याय तिथे नसतोच, असं चित्र असतं !  त्या बायका सारखे आपल्याच घरातल्या एखाददुसऱ्या बाईला उध्वस्त करण्याचेच प्लॅन करत असतात. कधी कधी वाटतं आपल्या योजना आयोगात यांची भरती करावी. तिथे देशाच्या भल्यासाठी योजना करतात ! पण टॅलेंट यूजफूल ! उपयुक्त कौशल्य ! काही असो, पण मालिकेत किमान महाराष्ट्रातल्या तरी राजकारण्यांनाही हरवतील अशी कपटनीती त्या करतात ! तीही न थकता ! मी परत येईन, मी परत येईन, असं नुसतंच न म्हणत बसता, त्या हटकून परत येतात. परत , परत परत येतात ! चांगली माणसे बोलतांना तर त्या हटकून तिथे टपकतात आणि कितीही अंतरावरून शब्दनशब्द ऐकतात ! कर्णपिशाच्चंही त्यांच्यापुढे हात टेकतील ! बरं, हे एकदोनदा नव्हे तर अनेकदा होते ! ही कपटनीती थांबत नाही . मालिका संपत आली असं वाटत असतानाच त्या असा काही ट्विस्ट ( हा हल्ली तिथे परवलीचा शब्द झालेला आहे ! ) आणतात की ती मालिका मैलोनमैल लांबत जाते !! म्हणजे ह्या कपट नीती करणाऱ्या बायकां निर्मात्यांना अधिक हात देतात की काय असे वाटण्याजोगीच ही परिस्थिती आहे ! ही कपट नीती व मालिकांचे अनावश्यक लांबत जाणे कधी थांबणार , हाच खरा प्रश्न आहे ! 


भाग २ :


टीव्ही मालिकेतले लेडीज व्हिलन आणि त्यांची सततची वाढती कपटनीती हा कालचा लेखनप्रपंच तुम्ही वाचलात . त्यावर बोलक्या प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल मनापासून धन्यवाद. अर्थात, टीव्ही मालिकांचे जग हे काल्पनिक आहे. कधी कधी तर ते वास्तवाच्याही पुढे जाते. आपणही ते खरंच मानून जातो. हिरीरीने त्यावर चर्चाही करतो. माणसांचा गूणधर्म आहे तो ! माणसांचा आणखी एक गूणधर्म म्हणजे एकत्र येणे. काही ना काही निमित्तांनी, कारणांनी माणसे एकत्र येतात. माणसांचे गट बनतात. आता तर आॅनलाईनही गट बनतात. गटांचे उपक्रम ठरतात. ते मोठ्या उत्साहात  सुरूही होतात. त्यांचे फोटो होतात, व्हिडीओ होतात. मंडळी अगदी आनंदित होतात. एकमेकांच्या कौतुकात न्हाऊन निघतात. काय करू नि काय नको असं होऊन जातं. हात आभाळाला टेकले या उक्तीचा आनंद घेत तरंगत आपापल्या घरी जातात. यानंतरही काही कार्यक्रम होतात. पण तो पहिलेपणाचा उत्साह काहीसा कमी होतो.‌ प्रारंभ दिवशीची गटाची हजेरी घसरते. फोन करूनही काही जण काही ना काही कारणांनी त्यांच्या नाईलाजास्तव येऊ शकत नाहीत. गटाला गळती लागते. पुढेही अशीच काही ना काही माशी शिंकत राहते आणि एके दिवशी सर्वांचाच उत्साह मावळतो. आता कुणालाच रस उरत नाही. आरंभशूर लोकांचं हे असंच होतं. हे नाईलाजास्तव होत जातं. सतत बदलणे हा सृष्टीचा स्वभाव आहे. त्याला ते तरी बिचारे काय करणार ! 


मात्र, या उलटही घडत असतं. अनेक वर्षे लोक टिच्चून एकत्र येतात, नियमित कार्यक्रम करतात. आरंभशूर लोकांना याचेच आश्चर्य वाटते. ते आपलं असं का झालं याचा उहापोह करत नाहीत. आपला नाईलाज होता म्हणतात आणि याच कोषात पडून राहतात. पुन्हा कधी तरी कोणाला तरी उर्मी येते आणि तो नवा गट स्थापन करतो. पुन्हा तोच आरंभशूरपणा होतो. पुन्हा एक गट थंड होतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा गट आपला कितवा तरी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. त्यातही फोटो होतात, व्हिडीओ होतात. पण शेवट होत नाही. मंडळी त्याच उत्साहाने पुढील उपक्रमाच्या नियोजनाकडे वळतात आणि तो उपक्रम करूनही मोकळे होतात. हा क्रम वर्षोनवर्षे सुरू राहतो.  दुसरीकडे मात्र शिथिलता येते जाते. मग एकमेकांवर खापर फोडले जाते . दोषारोप होतात किंवा सोयीस्करपणे सारे विसरले जाते. काहीही होवो, हे गट गटांगळ्या खात राहतात. उपक्रमांच्या जगात ह्या दोन घडामोडी घडतच राहतात ; घडतच राहतात. 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा