मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

आपल्याला कळले नाही

आपल्याला कळले नाही !


आपले कर्तृत्व थिटे पडते . मग आपण आपल्याभोवती एक सुरक्षित कवच निर्माण करू पाहतो . एक तर आपण पांघरूण घेवून झोपतो किंवा चवताळून उठतो आणि एक प्रतीसृष्टी -आपली सृष्टी - निर्माण करू पाहतो . वसिष्ठ ऋषींचे काहीसे असेच झाले असावे. त्यांनी प्रतीसृष्टी निर्माण केली . आपण ? आपण ना  पांघरूण घेवून झोपू शकलो , ना  प्रतीसृष्टी निर्माण करू शकलो . आपल्याला आपला मार्गच सापडला नाही ! आपला शोधही अपूर्णच होता . त्यात जगाची हुशारी नव्हती ; स्वार्थकेन्द्री वृत्ती नव्हती !

निसगार्चे अवलोकन


आपण आठव्या इयत्तेतच निसगार्चे अवलोकन करायला गेलो. तिथेच थांबलो नाही तर त्यावर लेखन करू लागलो ! निसर्गातल्या माणूस सोडून सर्व घटकांची भूल आपल्याला पडली ! माणसे भेटली . तात्पुरती भेटली . पण माणूसपण आधीच वजा झाले होते. ना कुणाचा विश्वास वाटला ; ना कुणाची खात्री ! चूक आपलीच होती. आपला दुबळेपणा आपल्याला नडला. त्याचेही भांडवल करता आले नाही . मूळात आपले काही भले करायचे असते हेच मुळी आपल्याला कळले नाही ! परिस्थितीचे अचूक भान आपल्याला कधीच आले नाही .

भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ  !


जगात भावनेपेक्षा व्यवहार श्रेष्ठ असतो हे आपल्याला कधीच कळले नाही .आपण दैवते पुजत बसलो ! तन, मन, धन अर्पून बसलो . तिकडे जगाने त्याच दैवतांचे बाजारीकरण केले . स्वत:च्या फायद्यासाठी स्वत:चे कायदे केले ! दैवतांना जाणीवपूर्वक मोठे करता करता जग स्वत:च मोठे होऊन गेले ! ते खरे व्यवहारचतूर !


सोडवणारा वाईट ठरतो !

 
कळायला लागल्यापासून आजी आणि आई मधली भांडणे मिटवायची सवय आपल्याला नडली. घरातले वेगळे दारातले वेगळे हे आपल्याला कळलेच नाही ! आपल्याला वाटायचे निदान आपल्या आसपास तरी भांडणे असता नयेत. सर्वांनी गोडीगुलाबीने रहावे . पण शेवटी त्या भांडणाऱ्या माणसांचीच गोडीगुलाबी होते आणि सोडवणारा वाईट ठरतो, हे आपल्याला कळले नाही . दोघांच्या भांडणात पडून आपण आपले तोंड फोडून घेतले . ते लबाड स्वार्थी ; आपण निस्वार्थी मूर्ख !    माझ्या एका गझलेच्या शेरात मी काहीसा असाच व्यक्त झालो आहे :

          आयुष्यभर मी माझा भाबडेपणा जपला
           मी टग्यांशी लढाई नेहमी हरलो होतो !

तो म्हणाला गॅस एजन्सीकडून आलोय !


मला कोणाचेच अंतरंग कधीच कळले नाहीत . त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा , कुणावर ठेवू नये , याचे जलद राहुदेत , पण कुणी फसवून गेल्यावरही त्याने आपल्याला फसवले आहे , याचे सावकाशपणीही आकलन झाले नाही . माझ्या वडीलांचे निधन झाल्यानंतर काही दिवसांनी संध्याकाळी एक तरूण माझ्या घरी आला . गॅस एजन्सीकडून आलोय म्हणाला . मला खरंच वाटलं . त्याने सिलेंडरच्या खाली ठेवण्याची ट्राॅली दाखवली . तिचे उपयोग पाहून शेजारपाजारच्या लोकांनी ब-याच  ट्राँलीज घेतल्या , असं सांगून त्याने दोन नग माझ्या गळ्यात मारले आणि हजार रूपये घेऊन तो गेला पण ! तरी मी त्याची ती कंपनी कुठली होती , हेच त्याला का विचारले नाही याचाच विचार 
करीत किती तरी वेळ  बसलो होतो . तो गॅस एजन्सीकडून आला होता का किंवा त्या ट्राॅलीज कोणत्या कंपनीच्या आहेत , याचीही विचारणा मी केली नव्हती ! असा मी ....

जीवनाच्या महाभारतात मी गोंधळून गेलो... 
जग कुठले कळणार जिथे ; मलाच मी कळलो नाही ! 

#महाभारत

#जीवनाचे_महाभारत

#mahabharat