माझ्या मराठी गझला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या मराठी गझला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १ जुलै, २०२४

गझलकार देवीदास पाटील यांची मुलाखत प्रक्षेपित

 गझलसम्राट सुरेश भटांचे शिष्य मराठी गझलकार देवीदास पाटील यांची रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रक्षेपित 

मुलाखतीचा व्हिडीओ पहा : 


आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे  व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत. 

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र

#interview

#AIR

मंगळवार, ७ मे, २०२४

Yethe hasun Sara vaishakh sosala mi

 येथे हसून सारा वैशाख सोसला मी ...

डोळ्यातल्या घनांचा आषाढ रोखला मी !




Mi Veda hoto mhanuni

मी वेडा होतो म्हणुनी ...


मी वेडा होतो म्हणुनी ते सर्व शहाणे ठरले

ह्या वेड्याचे हे शहाणपण त्यांना कोठे कळले ?


ही अशी कशी बरे ह्या शब्दांची गफलत झाली ? 

मी गीत लिहाया बसलो ; गझलेचे शेरच लिहिले !


अंधार नशिबाचा मी असा मजेने पीत गेलो

पीता पीता माझे मीच अवघे नशीब उजळले !


मी अजून कोणाचा साधा निषेध केला नाही

खंजीर खुपसणारेही दिलगीर होऊन बसले !


मी लिहीत होतो ती केवळ एक कहाणी नव्हती

स्वप्नांनी मी आयुष्याचे पुस्तक नाही भरले ! 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील 




बुधवार, २९ मार्च, २०२३

ती टाळते की भाळते...

मराठी गझल

मराठी गझल



ही एक #मराठी_गझल आहे.‌ 

यामध्ये ज्या दोन दोन ओळी दिसत आहेत त्या प्रत्येकीला #शेर म्हणतात. शेर हा वेगळा काढून वाचला तरी तो अर्थपूर्ण असतो. गझलच्या पहिल्या दोन ओळीतच ( याला गझलचा मतला म्हणतात ) तिची  जमीन तयार होते.‌ म्हणजे , गझलचे #वृत्त , यमक , अंत्ययमक इ.सह अर्थातच रचना तयार होते. मूळात कोणतीही रचना कविता होणार आहे , गीत होणार आहे की गझल होणार आहे , हे प्रामुख्याने पहिल्या ओळीतच ठरते. आता वरती जी रचना आहे , तिची पहिली ओळच सांगून जाते की ही गझल होणार आहे. तर ही गझल झाली आहे.  यात मिळते , जाळते , माळते , चालते , फेटाळते , पाळते ही ' अ ' अलामत असलेली #यमके आहेत , तर ' माहीत नाही ' हे #अंत्ययमक आहे. गझलच्या शेवटच्या शेराला मक्ता म्हणतात . मक्त्यामध्ये कवी स्वतःचे नांव गझलच्या वृत्तात बसेल असे लिहू शकतो. 


रसिक वाचकांना विशेष विनंती

यातले सर्व शेर सुटे घेऊन वाचा. ज्यांचा स्वतंत्रपणे वाचल्यावर अर्थबोध होत नाही , अशा कोणत्याही एकत्रित असलेल्या दोन ओळी मला कमेंट द्वारे कळवा. तुमची प्रतिक्रिया मला माझ्या लेखनात #सुधारणा घडविण्यासाठी आवश्यक आहे !

मराठी गझल ही कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारी असते. यामध्ये रचनेचा म्हणजेच तंत्राचा आणि मंत्राचा म्हणजेच गझलीयतचा  किंवा वृत्तीचा सामावेश असतो.‌ यात प्रामुख्याने अनेकांना प्रश्न पडतो तो वृत्ताचा !  

.........................................................

अशी शिका मराठी गझल या लिंकवर आपण वाचू शकता मराठी गझलबाबत एक विशेष लेख.

.........................................................

हा लेख वाचल्यानंतरही मराठी गझल लेखनाबाबत काही शंका असल्यास त्याही अवश्य विचाराव्यात , ही विनंती.‌ 

#अशी_शिका_मराठी_गझल

बुधवार, ३० मार्च, २०२२

तारण : मराठी गझल

 तारण 

#gazal

#marathi_gazal


सोडून व्हायचे मी साजण दिले कधीचे

तेव्हा तसे तिनेही कारण दिले कधीचे...



जमिनीवरीच माझा संसार थाटला मी 

आकाश पाखरांना आंदण दिले कधीचे...



मजलाच हाय माझे झाले नकोनकोसे

सोडून हाय मीही भांडण दिले कधीचे 



माझा अखेर मीही झालो समुद्र होतो

त्यांना चिपीतले मी खाजण दिले कधीचे



आयुष्य सर्व माझे गेले तिच्याचसाठी !

गझलेस मीच माझ्या तारण दिले कधीचे



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



सोमवार, १४ जून, २०२१

मी सुंदर स्वप्नांचे

 मी सुंदर स्वप्नांचे


मी सुंदर स्वप्नांचे इमले बांधत असतो

वाळुवर पाण्याने चित्रे रेखत असतो



आयुष्य पुढे मागे सरकत बिरकत असते

माझ्याच हिशेबाने पण मी चालत असतो



होईल मनाजोगे... होईल कधी काळी...

मी आत असा माझ्या मज समजावत असतो



गावात कधी गेलो की आग्रह होतो अन्

मी पिंपळपारावर गोष्टी सांगत असतो 



हे दु:खं मला बघते बिलगून बसायाला

हटकून असा त्याला मीही टाळत असतो



संदर्भ जुने काही जातात पुन्हा लागुन

एकेक क्षणामधुनी मी मज शोधत असतो



ते फूल वहीमधले अजुनी छळते आहे

मी याद तुझी माझी अजुनी काढत असतो


हा बंद तुझा आता बाजार जगा झाला

घरट्यात स्वतःच्या मी आता हिंडत असतो


... देवीदास हरिश्चंद्र पाटील   


टीप  : मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



मंगळवार, २५ मे, २०२१

मराठी गझल

 कोंडमारा


बरेच काही म्हणावयाचे अजून बाकी मनात आहे

कुठे तरी एक कोंडमारा म्हणे मजा थांबण्यात आहे


फिकाफिकासा ... उदासवाणा... मलूल आहे असा बिचारा...

अजून चाफा अबोल आहे... अजूनही दु:खं आत आहे


खरेच ती एक चूक माझी मलाच होती नडून गेली 

तसा कुणाचाच ह्यात काही म्हणावयाला न हात आहे


 जरी असा मी निवांत आहे तरी जिवालाच घोर लागे

 तसा इथे सावलीतसुद्धा उभा खरा मी उन्हात आहे


 तसे मला वाटले खरे ते मला कधी बोलता न आले अजूनही जीभ चावण्याचा जुनाच माझा प्रघात आहे


पुन्हा पुन्हा युद्ध जिंकताना पुन्हा पुन्हा युद्ध हारलो मी 

रणात मी धूळ चारलेली अजूनही संभ्रमात आहे !


अजून तू पान पान माझे कुठे तसे वाचलेस आहे ...?

अजूनही ओळ ओळ माझी कुठे तुझ्या काळजात आहे?


मनाप्रमाणे जगावयाचा विचारही दूर ठेवला मी !

मनातले मी मनात माझ्या तसेच ठेवून जात आहे ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  





बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

सहवास गझलांचा




मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

Marathi Gazal

 

सहवास गझलांचा 


मी न केला अती अभ्यास गझलांचा

अंतरी ठेवला मी ध्यास गझलांचा


मी न सांभाळली वृत्ते पुस्तकी ती

फक्त ' वृत्ती ' त होता श्वास गझलांचा


हात सोडून गेली माणसे होती

लाभला हात पण हमखास गझलांचा


ओळ सुचली तशी लिहिली गझल होती

गुणगुणत राहिलो मधुमास गझलांचा


मज दिली गझल बापाने गझलच्या अन् 

आवडू लागला सहवास गझलांचा


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील. 


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

दोन मराठी गझला

      सत्य 


रोखलेली आसवें मोकळी कर !

काळजाशी तू मला एकदा धर !


कोणते हे अंतरी दु:खं आहे ?

कोंडलेले हुंदके बोलु दे तर !


मेघ हृदयी थांबले का कळेना...

सांग हृदयी थांबली का बरे सर...


हया उन्हाला रोजचे सोसशी तू 

काय बोलू ; सावली भाजते जर !


कोणते हे सत्य जे झाकशी तू ?

हा कशाला चेहरा चेह-यावर ?



.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील


..............................................


        दरी 


मला आता जरा शंका तुझी आली खरी आहे

सुखा तू थांब दाराशी ; व्यथा माझ्या घरी आहे !


कधीपासून ते मीही स्वत:शी बोललो नाही

तुला जे सांगतो आहे मनाच्या मंदिरी आहे !


तुला आता हवी आहे कथा माझ्या जवानीची

तुलाही वाटते आहे ... तिथे काही तरी आहे ... !


तुझ्यावर शेर एखादा मला आता करू दे ना...

मला तू सांग आता जे तुझ्याही अंतरी आहे !


कितीसे खोल जावे मी ... कितीसे खोल जावे तू ...

कळेना खोल प्रेमाची कितीशी ही दरी आहे !



.... देवीदास हरिश्चंद्र पाटील


टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  



सोमवार, ११ मे, २०२०

Baan Marathi Gazal

बाण


किती बाण त्यांनी सोडले होते
फुलांसारखे मी झेलले होते  !


सुखी मी असे दु:खासवे हेही
सुखाच्या जिव्हारी लागले होते


करू सांग मी तक्रार कोणाशी ?
धरेला नभाने झोडले होते !


कसा सांग बोलू आपल्यांशीही ?
कुठे आपलेही आपले होते ?


कसे मी तुलाही ओळखायाचे ?
कुठे तू मलाही जाणले होते !


कितीदा ख-याचे पूर आलेले
कितीदा खरे ना वाटले होते !


गुणाकार होता शून्य आयुष्या !
जमेला वजाने भागले होते !


किती उंच गेला आपला झोका !
किती श्वास आपण रोखले होते !


तरी राहिले ते केवढे मागे ...
जरी लोक शिकले सवरले होते !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

सोमवार, २० एप्रिल, २०२०

Ek mazi Gazal mala pureshi

एक माझी गझल



मांडले मी मला तुझ्या पटावर
खेळणे हे अता तुझ्या मनावर


आसवे रोखली जरी किती मी 
हुंदक्यांचा तरी सुरूच वावर !


हे ऋतू अंग चोरुनी उभे अन्
मी असा आवरूनही अनावर !


एक माझी गझल मला पुरेशी
(भट म्हणाले मला , तिलाच सावर !)
मी कशाला मरू दुज्या कुणावर !


नांव बदलूनही जुना तोच मी !
भ्रमर येतो जसा पुन्हा फुलावर !




... देवीदास हरिश्चंद्र पाटील

रविवार, १९ एप्रिल, २०२०

ओळ : Marathi Gazal

              ओळ


पान पान आयुष्याचे पलटत गेलो
मी असाच माझा मजला चाळत गेलो


तेवढाच आयुष्याला अर्थ मिळाला
उत्सवात जगण्याच्या मी हरवत गेलो


वेचला न केव्हा कणकण माझा मीही
मी स्वत:स वा-यावर उधळत गेलो


जो दिसून आला तोही भासच होता
त्यात मीच माझी स्वप्नें मिसळत गेलो


मी अजून माझा मजला सुचलो नाही
ओळ येत गेली तीही विसरत गेलो



...देवीदास हरिश्चंद्र पाटील. 

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  


शनिवार, १८ एप्रिल, २०२०

Nivadnuk Marathi Gazal

            निवडणूक


ते कौलारू घर कुठे दिसते का ते बघ !
गोठयात उभी गाय हंबरते का ते बघ !


उरल्यासुरल्या माणसांचा शोध घे !
मातीत , राखेत कुणी मिळते का ते बघ !


अंतर ठेव , पण कधी अंतर करू नकोस !
कोणासाठी काळीज जळते का ते बघ !


नवे विषाणू येत राहतील , सावध हो !
आयुष्याची किंमत समजते का ते बघ !


मानवाच्या अस्तित्वाचीच ही लढाई !
ही निवडणूक नाही , हे कळते का ते बघ !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गुरुवार, १६ एप्रिल, २०२०

Savali Marathi Gazal

सावली

तू न भेटलास तर मी कुणीच ना इथे !
नांव-गांव कोठले ? ती हमीच ना इथे !

घे मला तुझ्याजवळ... साथ दे तुझी मला ...
पाहिजे मला तशी जिंदगीच ना इथे !

नेहमीच हा तुझा संग लाभु दे मला !
सांग भेटशील तू नेहमीच ना इथे !

आरशात हे तुझे सारखे दिसे हसू
अन् तयार झाकण्या पापणीच ना इथे !

गावही तुझे कसे ... दूर तारकांपरी....!
काय चालले तिथे ? ... बातमीच ना इथे !

काय चांदण्या करू ? काय चंद्रही करू ?
साथ जी हवी तुझी नेमकीच ना इथे !

सारखे उन्हातुनी तू फिरायचे तिथे
अन् तुझ्याविना मला सावलीच ना इथे !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

Gidhade Marathi Gazal


                           गिधाडे


विजयोन्माद वाढतो पराभूतांना खिजवण्यासाठी
पुढे काळ बदलतो चक्र , विजेत्यांची जिरवण्यासाठी !


काय नेतो सोबत सांग दुनियेचा निरोप घेतांना ?
आयुष्यभर असते धडपड , आयुष्यच हरवण्यासाठी !


युगे युगे हे गूढ कुणाला कळले नाही सृष्टीचे
काहींना मारले जाते, काहींना जगवण्यासाठी  !


मी दिले व्यथेस माझ्या धुमारे नवनिर्मितीचे अन्
अश्रुत मिसळले हास्य मी, हुंदक्यांना हसवण्यासाठी !


प्रेताच्या टाळूवरचे लोणी खातातच केव्हाही ....
जगतात गिधाडे ही फक्त स्मशानात मिरवण्यासाठी !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

मराठी गझल : किनारे

किनारे



जसे हे दिलासे फसू लागले
मला दुःखं माझे हसू लागले


जिथे जायचे ना तिथे पोचलो
अता जे नको ते दिसू लागले


किती काल केली तयारी तरी
कमी आज काही असू लागले


अशी येत आहे सफाई अता
अता हात माझे बसू लागले


कुठे नांगरू मी बरे नाव ही ?
तुला का किनारे नसू लागले ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

मराठी गझल : काय बोलू ?


             काय बोलू ?


बोलतांना प्रश्न पडतो ; काय बोलू ?
मी मुक्याने गप्प बसतो ; काय बोलू ?


सारखे आढेवेढेच तुझे होते ....
मी सरळ सरळ विचारतो ; काय बोलू ?


पहा मी आभास नाही , सत्य आहे !
अन् तरी स्वप्नात असतो ; काय बोलू ?


काळजाचा थांगपत्ता लागतो का ?
फक्त काळा डोह दिसतो ; काय बोलू ?


तूच आता सांग माझी वाट कुठली  ?
मी तुझ्या वाटेत फसतो ; काय बोलू ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

मराठी गझल : जे नको ते छेडले मी

    गाणे 

भेटल्या खाचखळग्यांचा वाटला आधार होता
हा असा रस्ता निघाला चालण्याच्या पार होता


मी जरी बोलून गेलो शब्द थोडेसेच होतो
लागले होते जिव्हारी...खोल झाला वार होता ...


बोललो नाही कधी मी हया उजेडाची कहाणी
हया उजेडामागचा मी पाहिला अंधार होता


फक्त दु:ख्खानेच केली साथ आयुष्यास होती !
तू कधी माझा सुखा रे घेतला कैवार होता .... ?


जे नको ते छेडले मी ...एकदा गाणे जरासे ...
ओठ माझे पोळले अन् ; कंठही बेजार होता !



...देवीदास हरिश्चंद्र पाटील