हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?
निकालोत्तर धूमश्चक्री
गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते . निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .
उशीर होऊ शकतो , पण...
सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .लोकशाहीचे भान
काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत . तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !सरकार स्थापन होणे आवश्यक आहे
आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे , आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .