राजकीय लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २१ जून, २०२४

राजकीय खुमखुमी

 राजकीय खुमखुमी


लोकसभेची निवडणूक झाली.‌ अब की बार चे बार हवेत उडून विरले आहेत. मग आता काय उरले आहे ? तर विधानसभा ! हल्ली निवडणूका आखाडा बनून गेल्या आहेत. विधानसभेचे रणकंदन तर आतापासूनच सुरू झाले आहे. हा याच्या बालेकिल्ल्यात , तो त्याच्या बालेकिल्ल्यात , हा वार करतो तो पलटवार करतो, तो ह्याला टोला हाणतो, हा त्याला टोला हाणतो, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढण्यावाचून‌ या राजकारण्यांना काही काम असते की नाही हीच शंका येते ! मतदारांसाठी पवित्र कर्तव्य आहे बघा ! त्यांनी ते बजावण्यासाठी केवढा आटापिटा , केवढी जाहिरातबाजी त्यांच्याच खर्चाने केली जाते ! मतदारांचे पवित्र कर्तव्य काय तर मतदान करणे. मग उमेदवारांचे वा निवडून आलेल्यांचे पवित्र कर्तव्य काय हीन पातळीवरचे आरोप एकमेकांवर करणे हेच आहे का ? एकमेकांवर चिखलफेक करून हे कोणता महान आदर्श उभा करत आहेत ? राजकारण करणे म्हणजे केवळ नळावरची भांडणे करून बेलगाम वक्तव्ये करणे आहे का ? लोकसभेत वा विधानसभेत अर्वाच्च भाषेत बोलणे, रस्त्यावर असल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे , हे कशाचे द्योतक आहे ? मग त्या पवित्र मंदिरात जाण्याआधी पाया पडण्याची नाटके तरी कशाला ? या लोकांना काही नियम आहेत की नाहीत ? बंधने आहेत की नाहीत ? संविधान याबाबत काय सांगते ? सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचे यावर काय म्हणणे आहे ? याप्रकारे लोकशाहीची केली जाणारी क्रूर चेष्टा कशी थांबणार ? की ठोकशाही हा लोकशाहीचा गौरव म्हणायचा ? आता फलकयुध्ये सुरू आहेत. याचे फलक त्याच्या बालेकिल्ल्यात, त्याचे फलक याच्या बालेकिल्ल्यात आतापासूनच दिसू लागले आहेत. आत बरेच काही धुमसते आहे. राजकीय खुमखुमी डोके वर काढीत आहे. आखाडा पुन्हा रंगू लागला आहे.‌

पण हे जे राजकीय लोक आले ते आले कुठून ? त्यांना ही अर्वाच्च भाषा , ही खुमखुमी आली कशी आणि आली कुठून ? हे वाढले कुठे ? हे जे काय शिकले ते शिकले कुठे ? हे असे बनण्यात समाजाचे योगदान नाही काय ? यांना शाळेत शिक्षकांनी शिक्षा केलीच नसेल ? ती केल्यावर शिक्षकांनाच धारेवर धरणारे कोण होते ? ज्या शिक्षक वर्गाने स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून राष्ट्र घडविले त्या शिक्षकवर्गालाच वाहयात पोरांना शिस्त लावली म्हणून थेट पोलीस स्टेशन दाखवणारे कोण होते ? ही एक पिढी अशी होईपर्यंत आणि तिच्या नादाने पुढच्या काही पिढ्या नादान होईपर्यंत झोपा काढणारे कोण ? अंतर्मुख होऊन आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही ? की नुसतेच राजकारण्यांना दोष देत बसणार आहोत ? लोकशाहीसाठी आपण काही करणार आहोत की नाही ? की मतदान हेच आपले एकमेव पवित्र कर्तव्य आहे अशी साळसूदपणे ठाम समजूत करून घेणार आहोत ? ही लोकशाही कोणासाठी आहे ? लोकांसाठीच ना ? मग ती जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे की नाही ? याची उत्तरे‌ प्रत्येकांने स्वतःलाच विचारायची की नाहीत ? हे लोकांचे सर्वात मोठे पवित्र कर्तव्य नाही का ? बेलगाम नेत्यांनी लोकशाही शिकवण्याइतके लोक अजूनही अजाण आहेत का ? ते सूज्ञ होणार तरी कधी ? 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०६.२०२४ सकाळी ११.००


#politics

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

Gadkari as ka bolale : Asle Faltu dhandhe band kara

 असले फालतू धंदे बंद करा 😀😀😀 काय छान झापलंय राव !

नितीन गडकरींचा व्हिडीओ 

Nitin Gadkari talks


वरील " असले फालतू धंदे बंद करा " या लिंकवर क्लिक करा आणि नितीन गडकरींचा व्हिडीओ पहा. 

व्हिडीओमध्ये नितीन गडकरी जे बोलले आहेत ते त्यांच्या कानपिचक्या देण्याच्या शैलीला साजेसेच आहे. गडकरी हे अनेकदा या शैलीचा भरपूर उपयोग करतात. काहीसे मिश्किल बोलतांना हसत हसत पण योग्य जागी चिमटे काढण्याचे कसब गडकरींकडे आहे , यात काही वाद नाही. आपल्याकडे काही तरी वेगळेपणा आहे याची झलक गडकरींच्या भाषणांमध्ये बरेचदा झळकते , तशीच ती आताही झळकली आहे. त्यांच्या मिश्किल भाषेमुळे कोणाला जखम होत नाही, हे विशेष .  या व्हिडीओत त्यांची भाषा बावनकुळेंबाबतही काहीशी अशीच आहे. 

बावनकुळेंचे जातीचे राजकारण

बावनकुळेंचे जातीचे राजकारण असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले . बावनकुळेंचे जातीचे हे राजकारण गडकरींना तितकेसे पसंत दिसत नाही. पण गडकरीनी स्वतःही पूर्वी असे जातींचे सेल केल्याचे जाहीरपणे सांगतात.‌ कदाचित त्यांना इथे स्वतःचा प्रामाणिकपणा दाखविण्याचा मोह आवरला नसावा. गेल्या काही वर्षात राजकारणाने जी हीन पातळी गाठली आहे त्यातूनच त्याची काही वैशिष्ट्येही निर्माण झाली आहेत. चाॅकलेटस वाटण्याचा किस्सा काय किंवा लाॅलीपाॅपचा किस्सा काय , यातले एक वैशिष्ठ्य सांगून जातो. ते म्हणजे , मोठे नेतेच काही विधाने बेधडकरित्या उघडपणे व्यक्त करू लागले आहेत व यातूनच जाहीरपणे बेलगाम वक्तव्ये करण्याचा सपाटा इतर नेते , उपनेते व कार्यकर्ते यांच्याकडूनही  लावला जातो आहे. आपण करतोय ते आता उघड उघड सांगण्यासारखेच आहे असे उघड उघड मानून हे सर्व उघड उघड बोलू लागले आहेत. हेही चांगलेच होते आहे . कारण यामुळे लोकांना एकूणच मतदानाचे आपले पवित्र कर्तव्य कशाच्या आधारावर उभे राहते आहे , आपण कसल्याकसल्या वाटपाला बळी पडून हे महान कर्तव्य पार पाडीत आहोत याचे हळूहळू का होईना , पण आकलन होऊ लागल्याचे दिसत आहे . बहूतेक गोपाळ गणेश आगरकरांना अभिप्रेत असलेले शहाणपण हे राजकीय नेतेच लोकांना देत आहेत , हे विशेष ! बाकी काहीशी पुनरुक्ती होऊनही  गडकरींनी बावनकुळेंना चांगलंच झापलंय म्हणा ! 

बावनकुळेंचे काय चालले आहे यापेक्षा...

इथे बावनकुळेंचे काय चालले आहे व ते बरोबर नाही , हे गडकरी दाखवून देत आहेत. कधी कधी कार्यकर्ते आणि इतर जनता जनार्दनातले उत्साही प्रेक्षक भरात येऊन वक्त्याला जोरदार प्रतिसाद देतात . वक्ताही याचा अर्थ फारच जोरदार लावून  ऐन भरात येतो आणि उत्साहाच्या भरात हवे नको ते बोलून जातो. मग मिडिया त्याला वेगवेगळे रंग देतो. कारण त्याला तसे करणे म्हणे भाग असते ! हल्ली हे म्हणे जरा जास्तच होते आहे असे तुम्हांला वाटते का ? नाही म्हणजे , दुसऱ्याच दिवशी वक्त्याला घूमजाव करावं लागतं , मी बोललोच नाही पासून ते माझे वाक्यं तोडून मोडून दाखवले किंवा माझ्या  प्रामाणिक (!) बोलण्याचा विपर्यास केला गेला ते अगदी हेतूपुरस्सर भलताच अर्थ काढला गेला , इथपर्यंत ही मोडस ऑपरेंडी जाते ! पुन्हा लोक संभ्रमातच  ! कधी कधी मी मारल्यासारखे करायचे तू रडल्यासारखे करायचे असेही चालते ! तेव्हा कोण काय किती बोलतोय यापेक्षा लोकांसाठी किती तळमळीने बोलतोय आणि लोकांना त्या बोलण्याचा किती उपयोग होतोय , हे महत्वाचे ! बाकी उत्तम वक्तृत्वाची अलंकारिक हास्यरसयुक्त वा रडरसयुक्त भावनिक राजकीय भाषणेच झडायची आणि भोळी जनता ऐकूनच तृप्त व्हायची 😀😀 !

#bhashan_kase_karave

#howtospeech

#फालतू_धंदे

#video

#nitin_gadkari

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?

हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ?


निकालोत्तर धूमश्चक्री 


गेले काही दिवस महाराष्ट्र राज्यात निवडणूक निकालोत्तर धूमश्चक्री चालू आहे . युती म्हणून निवडणूक लढून आणि जिंकूनही दोन मोठे पक्ष मोठा भाऊ छोटा भाऊच्या भाऊबंदकीत अडकले आहेत . यापैकी सर्वात मोठ्या पक्षाने सरकार स्थापनेत पुढाकार घेणे किंवा युतीधर्म म्हणून संपूर्ण युतीनेच पुढाकार घेवून सहजशक्य असलेले सरकार स्थापन करणे अपेक्षित होते .  निकालानंतर दहा दिवस उलटत आले तरी राज्यासमोरचे लोकांचे प्रश्न बाजूला ठेवण्याईतपत कोणते अडथळे आहेत , हे कोणीही जाहीर करीत नाहीत . मी येणार , मी येणारच्या अतीउत्साही आरोळयाही केव्हाच हवेत विरल्या आहेत . अजूनही कोणी वाघ बनतो आहे तर कोणी वनरक्षक बनतो आहे . हे राज्य म्हणजे सर्कस आहे काय ? कोण गाजराची शेती करतो आहे तर कोण राष्ट्रपती राजवटीचे भीतीयुक्त गाजर दाखवतो आहे . एकूण शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेला राज्यकारभाराच्या पध्दतीचा नेमका अंदाजच येईनासा झाला आहे ! ही लढाई खरी आहे की लुटूपुटूची आहे , हेही जनतेला कळत नाहीय. निवडणूकीपूर्वी मोठमोठी भाषणे करून जनतेकडे मते मागायची आणि निवडून आल्यानंतर आपसात भांडत बसायचे , हे अनाकलनीय आहे . राजकीय अपरिपक्वतेचीच ही निशाणी आहे . राज्य ही गोष्ट गंभीरपणे घ्यायची असते . कोलांट्या  माकडउडयांसाठी कुणाला दिलेले मोकळे मैदान म्हणजे राज्य नव्हे . राज्यकारभार गंभीरपणे आणि खंबीरपणे करावयाची बाब आहे . त्यासाठी स्थिर सरकार देणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे . वैयक्तिक किंवा पक्षाच्या हीत वा अहंकारापेक्षा राज्य किंवा राष्ट्र नेहमीच मोठे असले पाहिजे .

उशीर होऊ शकतो , पण... 

सरकार स्थापनेला उशीर होऊ शकतो . पण त्याबाबतीतल्या हालचालींचे संकेत तरी लोकांना दिसले पाहिजेत. काही वेळा म्हणे ज्योतिषाला विचारून सत्ता स्थापनेचा मुहुर्त जाहीर केला जातो . पण इथे ठोस तारीख जाहीरच होत नाही . दहा दिवसात दोन पक्षात याबाबत कोणतीही चर्चाच होवू नये , हे संयुक्तिक नाही. दिवाळी असली तर तीही राज्याच्या सर्वात महत्वाच्या कामांसमोर किती दिवस करायची , हाही प्रश्न उरतोच. अती झाले की दिवाळीचाही शिमगा व्हायला वेळ लागत नाही . लोकांनी पारदर्शक वागावे ही अपेक्षा करतांना सरकारनेही तितकेच पारदर्शक असणेही महत्वाचे असते . पारदर्शक राज्यकारभार ही नंतरची गोष्ट झाली . राज्यकारभाराला शुभारंभ नक्की कधी होणार , हे तरी लोकांना वेळेवर कळले पाहिजे . नुसती मतदानाची लोकांना घाई करायला सांगून उपयोग नाही . त्यांनी केलेल्या मतदानाचा योग्य आदर राज्यकर्त्यांकडून झालाच पाहिजे . थोडक्यात , लोकांना अधिकृतपणे माहिती कळलीच पाहिजे . सरकार हे लोकांच्या कल्याणासाठी चालविलेली एक यंत्रणा आहे . हया यंत्रणेने निवडून आल्यानंतर लोकांना अंधारात ठेवणे योग्य नाही .


लोकशाहीचे भान 

काही गोष्टी अशा असतात की तुमच्याही नकळत त्या तुमच्याविरूध्द आपोआप साचत असतात. सत्तेच्या धुंदीत वा अती कर्तव्यकठोर झाल्याने तुम्ही त्या केल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाहीत .  तुमची वेळ भरली की त्या तुमच्यासमोर उभ्या राहतात. या देशात लोकशाही आहे , याचे भान सतत ठेवावे लागते . ज्यांनी या देशाचा पाया रचला त्यांना पुढे तुम्ही काय करणार याची कल्पना होती . त्यांनी तुमच्या सगळया चावटपणावर आधीच इलाज करून ठेवला आहे आणि त्याची प्रचिती तुमचा फाजीलपणा वाढला की तुमच्या फाजील आत्मविश्वासाला      जाणा-या तडयातून तुम्हांला येतेच येते . लोकशाही ही कुणाला भीती दाखवून किंवा सतत गाजर दाखवून फार काळ करता येत नाही. ईतिहास नाकारला तर तोच बोकांडी बसतो ! मग सगळे सुरळीत होत असतांना अश्वमेधाचा वारूही रोखला जातो . कमावलेली किंवा नशिबाने लाभलेली ईज्जत पार धुळीस मिळते ! फाजील तोंड आणि फाजील आत्मविश्वास तोंडघशीच पाडतात !


सरकार स्थापन होणे आवश्यक आहे 


आता ही गेलेली ईज्जत मिळवायची झाली तर त्यासाठीही एकच मार्ग आहे . निमूटपणे लोकांना जाहीर सत्य निवेदन करून मुकाटपणे ,  आता अबकी बार वगैरे कुचकामी ठरलेल्या घोषणा न देता , कोणी तरी सरकार स्थापन करणे , म्हणजे लोकांचे काम शत प्रतिशत होईल . तेच होणे आवश्यक आहे .