वरील लिंक मध्ये आपण पाहू शकता एक सुंदर आठवण....
ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
सोमवार, १६ डिसेंबर, २०२४
बुधवार, ११ डिसेंबर, २०२४
वेळीच सावरले नाही तर
वेळीच सावरले नाही तर
आपण जोडतो त्याला जोडपे म्हणतो. पती पत्नीचे नाते हे जोडण्यासाठी असते. जोडण्याची कला आणि दृष्टी ज्यांच्या अंगी असते ते सतत एकमेकाला एकमेकांशी जोडत राहतात. प्रसंगी राग गिळतात. कडू घोट गिळतात. पण दुसऱ्याला दुखवत नाहीत. कटुता कटाक्षाने टाळतात. एकमेकांना कायम धरुन राहतात. ते एकमेकांची किंमत जाणतात. ओळखतात. संसाराचे मर्म जाणतात. खरा संसार करतात. एकमेकांसाठी, कुटुंबासाठी जगतात.
काहींचे मात्र याच्या अगदी उलट असते. दोघांचेही अहंकार इतके आडवे येतात की कुटुंबात असूनही ते परस्परांना दोन स्वतंत्र व्यक्ती समजतात. रीतसर धार्मिक विवाह करून , धर्माला , देवादिकांना स्मरून लग्नमंडपात आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेऊन, शेवटी एकेरीवर , लढाई झगड्यांवर येतात. किती केले तरीही देव, धर्म, संस्कार हे सारे कुचकामी ठरतात. नवरा बायकोचे अहंकार डोके वर काढतात. आपण, आपला हे शब्द ती चुकूनही उच्चारत नाहीत. उलट मी, माझे हेच शब्द गोंजारत बसतात. याचा दुष्परिणाम आपल्या मुलांवर होतो आहे हे स्वतःला जाणवूच देत नाहीत. प्रसंगी मुले यांच्याच पावलांवर पाऊल टाकतात व त्यांनाही यांच्याप्रमाणेच कुटुंबापेक्षा स्वतःचेच मुद्दे व जीवन महत्वाचे वाटू लागते. ही मुले बिघडतात. पुन्हा मुलगा तुझ्यामुळे बिघडला असे नवरा पत्नीला म्हणतो तर मुलगी तुमच्यामुळे बिघडली असे तिची आई आपल्या नवऱ्याला म्हणते. मुलगा असो वा मुलगी , पती पत्नी एकमेकांवर मूल दुसऱ्यामुळे बिघडले हाच एकमेव आरोप करतात. यातून दोघेही एकमेकांचा उध्दारच करतात ! एकमेकांना शिवीगाळ करतात. प्रसंगी मारामारी करतात. पत्नी मिळेल ती वस्तू पतीला फेकून मारते. पती दारू पिऊन पुन्हा पुहा धिंगाणा करतो. हे संसार चक्र असेच अव्याहतपणे चालू राहते. जीव गेलाच तर आपल्याच माणसाचा जाईल हे यांच्या गावीच नसते. पत्नी पतीचा मुलांसमोर अपमान करते. पती मुलांसमोर पत्नीला मारझोड करतो. हे चालूच राहते. मुले कधीच वाईट मार्गाला लागलेली असतात. चांगले जगण्याची कुटुंबाची वेळ कधीच निघून गेलेली असते. ते कुटुंबच उध्वस्त झालेले असते. मित्रांनो, त्यांचे त्यांनीच उध्वस्त करून घेतलेले असते.
असे दिसून येते की, जोडप्यांमध्ये ही भांडणे साधारणतः पन्नाशीच्या आसपास घोंघावतात. तेव्हा मुलेही मोठी होऊन त्यांचे गूण कळलेले असतात. पती पत्नी मधील नवेपण संपत आलेले असते. प्रत्येकाचे एक स्वतंत्र आयुष्य आता सुरू झालेले असते. खरे तर आतून ते हवेसे वाटू लागलेलेच असते. आता मी सुटलो किंवा आता मी सुटले, माझ्या मनाप्रमाणे मी जगायला मोकळा किंवा मोकळी अशी वाक्यं सर्रास बाहेर पडू लागतात. ह्यातल्या आता या शब्दाला विशेष महत्व आहे. कारण आता, विशेष म्हणजे जीवनाचे वाढते व्याप वा वयाचा परिणाम म्हणून, या वयात पती पत्नीमधील शारिरिक संबंध कमी होऊन , त्यामुळेही त्यांना एकत्र ठेवणारा दुवा कमकुवत होऊ लागलेला असतो. प्रजननक्षमता हाच खरा मानवाचा नैसर्गिक शक्ती स्त्रोत आहे. तोच कमी झाला तर हार्मोन्समध्ये बदल होऊन काही गोष्टी घडतात. शरिराची, मनाची तगमग, तडफड बुध्दीवरही परिणाम करते. विचारांचा समतोलपणा कमी होतो. चिडचीड होते. जरा काय झालं तर दुसऱ्याची चूक लगेच दिसतेच असे नाही, तर तिच्यावर बोटही ठेवले जाते ! पराचा कावळा होतो. संशयाची परिसीमा होते ! इथेच आग लागते ! सर्वांच्याच बाबतीत हे होईल असे नाही. पण काहींच्या बाबतीत हे होते एवढे नक्की ! वाढणारी भांडणे जोडप्यातले उरलेसुरले आकर्षण वा प्रेमही संपवतात. त्यातून आपुलकी संपते. बारिकसारीक कारणांवरून वाद होत राहतात. लक्षात घ्या मित्रांनो, वेळीच सावरले नाही तर संसार उध्वस्त होतात.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
३०.०६.२०२४ सकाळी ०७.५०
मोबाईल व इंटरनेट
मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक
इंटरनेट सुरू झालं तेव्हा रंगीत संगणकही आम्ही नुकतेच वापरू लागलो होतो. डेस्कटॉप म्हटलं की कसं त्या जमान्यात गेल्यासारखं वाटतं. मला ते दिवस आठवतात. संगणकावर काम करायला खूप मजा यायची. मी पूर्वीही कुठेतरी लिहिलंय की विजय तुरळकर आणि मालवणहून आलेले सुनिल मयेकर हे आमचे ब्लॅक अॅंड व्हाईट ( काळे-गोरे म्हटल्यास उडदामाजी वाटण्याची शक्यता आहे ! ) संगणकाचे मास्टर्स होते. त्यावेळी साहेब या दोघांशिवाय कोणाला संगणकाला हात लावू देत नसत. मी पगारबिलाची रजिस्टर्स लिहून पुढ्यात घेऊन बसायचो. हे दोघे स्ट्रक्चर तयार करायचे आणि मी लिहिलेल्या रकमा पटापट संगणकात फीड करायचे. मी नुसताच बघत बसायचो. मला ते काम करायला हे दोघेही सांगायचे. मनातून आवडत असले तरी संगणकाला हात लावायचा नाही हे साहेबांचे शब्द आठवायचे आणि माझ्या मनातली संगणकाची भीती आणखी वाढायची. पण सहा महिन्यांत ह्या दोघांनी मला संगणकावर काम करायला लावलंच. त्यांच्या प्रेमळ आग्रहामुळे मी भीत भीत का होईना संगणकाला हात लावला ! तो हात पुढे सेवानिवृत्त होईपर्यंत कायम राहिला. मी पुढे केलेला हात पाहून संगणकानेही हात पुढे केला असावा. पुढे आमची दोस्तीच झाली. संगणकामुळे माझं काम किती तरी कमी झालं. मी तर त्याला गणपतीच समजायचो. माय फ्रेंड गणेशा हे गाणं तेव्हा जन्मालाही आलं नव्हतं तेव्हा आमची घट्ट मैत्री झाली होती ! रंगीत संगणक आणि इंटरनेट आल्यावर तर काय बहारच आली ! तेव्हा आम्ही वरिष्ठांचे डोळे चुकवून कधी कधी इंटरनेटच्या जगात जायचो. गूगल, रेडीफमेल आणि ब्लॉगींगशी ओळख इथेच झाली. तेव्हा सगळं इंग्रजीत असायचं. माझं इंग्रजी चांगलं असल्यामुळे मला या गोष्टी फारशा कठीण गेल्या नाहीत. मात्र तेव्हा इंटरनेटची स्पीड फारच कमी असायची. ऑफीसची कामंही कधी कधी रात्री एक एक वाजेपर्यंत करावी लागायची. या कामातही आम्ही कधी कसूर केलेली नव्हती. उलट ही कामे ऑनलाईन असल्याने आनंदच वाटायचा. याच काळात कधी तरी स्पीडमास्टर भगवान मुकादम भेटला ! मी आणि आमचे काशिनाथ नार्वेकर तर त्याची संगणकाच्या कीबोर्डवर गतीने फिरणारी बोटं पाहून आमच्याच तोंडात बोटं घालायचो ! आमच्यादृष्टीने तो वेगाचा भगवान होता. हसतमुख भगवान बोलतोही गतीने . सद्या तो मित्रवर्य अभिजित हेगशेट्येच्या नवनिर्माण संस्थेत आहे. मध्यंतरी नवनिर्माणमध्ये माझा गझलांचा कार्यक्रम झाला होता. तेव्हा तो भेटला होता. त्यानेच रेडीफमेलवर आमची पहिली ईमेल आयडी तयार करून दिली होती. तेव्हा आम्हांला केवढा आनंद झाला होता ! जीमेलचा शोध आम्हांला खूप नंतर लागला !
ऑनलाईन समाज माध्यमे व व्यावसायिक
आता तर फेसबूक, इन्स्टाग्राम ( यातला ग्राम हा शब्द मराठी वाटावा इतका मराठी माणसांच्याही ओळखीचा झालेला आहे ! ) , व्हॉट्स अॅप सारखे केवळ सोशल मिडीयाच नव्हेत तर अॅमेझॉन , फ्लिपकार्ट सारखे अनेक व्यावसायिक ऑनलाईन प्रकारही आता आले आहेत. बरेच जणं आता ऑनलाईन खरेदी करतात ! आता इंटरनेट त्यामानाने अधिक गतीमान झाले आहे. तेव्हा आम्ही शासकीय कामे करतांना भूकतहानही विसरून जायचो. आताही लोक तहानभूक विसरून कामं करतात. पण केवळ तहानभूकच नाही तर आपल्या बाजूला माणसंच आहेत हे विसरून जातात ! माणसाला माणसाची चाहूल लागत नाही. माणसांचा माणसाशी संवादच तुटला आहे. मौनव्रत हे कठीण काम मोबाईल व इंटरनेटने किती सहजपणे सोपं केलं आहे पहा ! ते शिकवायला आता कोण्या योगी महात्म्याची गरज पडत नाही. मोबाईल व इंटरनेट हे आताच्या काळाचे महान योग प्रशिक्षक झाले आहेत. हे गूण ते बोलल्याशिवाय शिकवतात !! पण ते अबोलपणा व न ऐकणे हे दोन दोषही शिकवतात. पुढच्या पिढ्यांना बोलायची व ऐकायची सवय राहिली नाही तर अनेकजण मुके व बहिरे होतील, हे नक्की ! काळजी घ्या मित्रांनो ! जर शरीराचा एखादा भाग दीर्घ काळ वापरलाच नाही तर तो बंद पडतो किंवा गळून पडतो. आपल्या शेपटीसारखाच ! आता तरी कळलं ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
सौ. टीव्ही मालिका बघत असते
सौ. टीव्ही मालिका बघत असते. मी बाजुला माझे लेखन करत तिला साथ देत असतो. तसा आमच्याकडे दिवसातून फार तर दोन अडीच तास टीव्ही चालू असतो. टीव्ही चालू असतो म्हणजे काय , तर मालिका चालू असतात. त्याच त्या. बाकी बातम्या बघणे मी गेली काही वर्षे जवळजवळ सोडूनच दिले आहे. बऱ्याचश्या बातम्या राजकीयच असतात आणि त्याच त्याच ब्रेकींग न्यूज म्हणून दिवसरात्रभर हंबरडे फोडीत असतात. आता पाऊस नुकताच सुरू झालाय . नैसर्गिक गोष्ट आहे ती. पण यामागेही कोणी तरी माजी नेता असावा अशी राजकीय ओरड सुरू व्हायची शक्यता नाकारता येत नाही. हे उदाहरण मी हल्ली बातम्या राजकीय हेतूनेही दिल्या जातात , त्यांची त्यांची म्हणे चॅनेल्स असतात, आरोप-प्रत्यारोप होतच असतात, हे सांगण्यासाठी दिलंय. एरव्ही आता ही सगळी सोंगं आपल्या अंगवळणी पडून गेली आहेत. तुमच्याही 😂 ! आपल्याला सोंगे आणि सोंगाडे याविषयी काही बोलायचं नाही. आपला विषय समस्त महिला वर्गाच्या आवडीचा विषय आहे. टीव्हीमालिका !
जेवढ्या म्हणून सौ. मालिका बघते त्या सगळ्यांतच एक समान गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल दुसरं काय असणार, रटाळपणाच असणार ! अहो, तोही परवडला. नाही तरी आपल्याला कुठे ते पहायचंय ! आपला लेखन उद्योग करता करता कानाडोळयावर अधूनमधून ते पडत असतंच. शिवाय सौ. जोरात व्यक्त , रिअॅक्ट हो, झाली की आपलं लक्ष जातंच. सौ.साठीतरी आपल्यालाही प्रतिक्रिया द्यावीच लागते. कधी कधी अशी प्रतिक्रिया देता देता आपणच त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकतो. हो, मी टीव्हीला आता ईडीयट बॉक्स समजत नाही. आपल्याला धूर्तपणे त्याच्या जाळयात ओढणारा कोळी समजतो. होतं काय, एखाद्या प्रसंगाला रिअॅक्ट होतांना सौ.बरोबर आपणही नकळतपणे एवढे ओढले जातो की आपणही काही काळ का होईना ती मालिका बघत बसतो. ( सौ.चा ! ) गूण नाही तरी वाण लागतो म्हणतात ना तो असा. मग आता धूर्त कोळी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ? टीव्हीला म्हणतोय हा मी . हसू नका !
तर ह्या टीव्ही मालिका. त्यांच्यातला एक समान धागा. तो म्हणजे प्रत्येक मालिकेतल्या प्रत्येक कुटुंबात सतत चालणारी कपटनीती ! यात चांगल्या तीन चार महिला आणि त्यांना साथ देणारे किमान एक दोन पुरूष तर असतातच. ह्या पुरूषांना डोके नावाचा भाग नसतोच आणि त्या दुष्ट बाया नाचतील तसं नाचण्यावाचूनही पर्याय तिथे नसतोच, असं चित्र असतं ! त्या बायका सारखे आपल्याच घरातल्या एखाददुसऱ्या बाईला उध्वस्त करण्याचेच प्लॅन करत असतात. कधी कधी वाटतं आपल्या योजना आयोगात यांची भरती करावी. तिथे देशाच्या भल्यासाठी योजना करतात ! पण टॅलेंट यूजफूल ! उपयुक्त कौशल्य ! काही असो, पण मालिकेत किमान महाराष्ट्रातल्या तरी राजकारण्यांनाही हरवतील अशी कपटनीती त्या करतात ! तीही न थकता ! मी परत येईन, मी परत येईन, असं नुसतंच न म्हणत बसता, त्या हटकून परत येतात. परत , परत परत येतात ! चांगली माणसे बोलतांना तर त्या हटकून तिथे टपकतात आणि कितीही अंतरावरून शब्दनशब्द ऐकतात ! कर्णपिशाच्चंही त्यांच्यापुढे हात टेकतील ! बरं, हे एकदोनदा नव्हे तर अनेकदा होते ! ही कपटनीती थांबत नाही . मालिका संपत आली असं वाटत असतानाच त्या असा काही ट्विस्ट ( हा हल्ली तिथे परवलीचा शब्द झालेला आहे ! ) आणतात की ती मालिका मैलोनमैल लांबत जाते !! म्हणजे ह्या कपट नीती करणाऱ्या बायकां निर्मात्यांना अधिक हात देतात की काय असे वाटण्याजोगीच ही परिस्थिती आहे ! ही कपट नीती व मालिकांचे अनावश्यक लांबत जाणे कधी थांबणार , हाच खरा प्रश्न आहे !
भाग २ :
टीव्ही मालिकेतले लेडीज व्हिलन आणि त्यांची सततची वाढती कपटनीती हा कालचा लेखनप्रपंच तुम्ही वाचलात . त्यावर बोलक्या प्रतिक्रियाही दिल्यात याबद्दल मनापासून धन्यवाद. अर्थात, टीव्ही मालिकांचे जग हे काल्पनिक आहे. कधी कधी तर ते वास्तवाच्याही पुढे जाते. आपणही ते खरंच मानून जातो. हिरीरीने त्यावर चर्चाही करतो. माणसांचा गूणधर्म आहे तो ! माणसांचा आणखी एक गूणधर्म म्हणजे एकत्र येणे. काही ना काही निमित्तांनी, कारणांनी माणसे एकत्र येतात. माणसांचे गट बनतात. आता तर आॅनलाईनही गट बनतात. गटांचे उपक्रम ठरतात. ते मोठ्या उत्साहात सुरूही होतात. त्यांचे फोटो होतात, व्हिडीओ होतात. मंडळी अगदी आनंदित होतात. एकमेकांच्या कौतुकात न्हाऊन निघतात. काय करू नि काय नको असं होऊन जातं. हात आभाळाला टेकले या उक्तीचा आनंद घेत तरंगत आपापल्या घरी जातात. यानंतरही काही कार्यक्रम होतात. पण तो पहिलेपणाचा उत्साह काहीसा कमी होतो. प्रारंभ दिवशीची गटाची हजेरी घसरते. फोन करूनही काही जण काही ना काही कारणांनी त्यांच्या नाईलाजास्तव येऊ शकत नाहीत. गटाला गळती लागते. पुढेही अशीच काही ना काही माशी शिंकत राहते आणि एके दिवशी सर्वांचाच उत्साह मावळतो. आता कुणालाच रस उरत नाही. आरंभशूर लोकांचं हे असंच होतं. हे नाईलाजास्तव होत जातं. सतत बदलणे हा सृष्टीचा स्वभाव आहे. त्याला ते तरी बिचारे काय करणार !
मात्र, या उलटही घडत असतं. अनेक वर्षे लोक टिच्चून एकत्र येतात, नियमित कार्यक्रम करतात. आरंभशूर लोकांना याचेच आश्चर्य वाटते. ते आपलं असं का झालं याचा उहापोह करत नाहीत. आपला नाईलाज होता म्हणतात आणि याच कोषात पडून राहतात. पुन्हा कधी तरी कोणाला तरी उर्मी येते आणि तो नवा गट स्थापन करतो. पुन्हा तोच आरंभशूरपणा होतो. पुन्हा एक गट थंड होतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा गट आपला कितवा तरी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत असतो. त्यातही फोटो होतात, व्हिडीओ होतात. पण शेवट होत नाही. मंडळी त्याच उत्साहाने पुढील उपक्रमाच्या नियोजनाकडे वळतात आणि तो उपक्रम करूनही मोकळे होतात. हा क्रम वर्षोनवर्षे सुरू राहतो. दुसरीकडे मात्र शिथिलता येते जाते. मग एकमेकांवर खापर फोडले जाते . दोषारोप होतात किंवा सोयीस्करपणे सारे विसरले जाते. काहीही होवो, हे गट गटांगळ्या खात राहतात. उपक्रमांच्या जगात ह्या दोन घडामोडी घडतच राहतात ; घडतच राहतात.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
वडाच्या झाडावरून
वडाच्या झाडावरून जमिनीवर !
काल वटपौर्णिमा संपन्न झाली. मीही सौ. बरोबर गेलो होतो वडाच्या झाडाकडे. मी वड वड म्हणतोय पण ती तर वटपौर्णिमा आहे. मला हा प्रश्न पडतो की वडाच्या झाडावर सत्यवानाला बसवूनही वडपौर्णिमा ऐवजी वटपौर्णिमा का म्हणतात ? संसारात सौ.ची चालणारी वट आणि ह्या ' वट ' चा काही पूर्वापार संबंध तर नाही ना ? की संसारातल्या माझ्या काही चावटपणाचा ह्या वटशी संबंध आहे. गंमत केली हा. वड म्हणजेच वट हे माहिती आहे मला. वटावर म्हणजेच वडावर चढून बसलो होतो मी ! असो, अखेरीस आता जमिनीवर आलोय बा ! नाही आलो असतो तरी सौ. ने आणलेच असते की ! सावित्रीची शक्ती आहे ना तिच्याकडे !
तर सांगत होतो काय काल तिच्या एका भावजयीचा फोन आला होता. विषय अर्थात वटपौर्णिमा हाच होता. तू पूजा कधी केलीस ? मी पूजा कधी केली ? माझा सत्यवान माझ्या सोबत आला होता , तुझा तुझ्यासोबत आला होता का ? मुहूर्त अमूक ते अमूक होता. मी साधला . तू साधलास की नाही ? आमच्याकडे काही लोकांनी तर आज मासे पण खाल्ले ! तुमच्याकडे नाही खाल्ले का ? .... काय काय चविष्ट प्रश्नं होते तुम्हांला सांगू ! आमचा उपवास होता हो ! पूर्ण शाकाहारी ! तरी बरं , डाळ भात लोणचं कोण नाय कोणचं , असं असलं तरी मला तेच आवडतं. मी तसा बऱ्यापैकी शाकाहारी आहे .
माझं पुराण राहुदे. पुढचा प्रश्नं ऐका. मग बोला. विषय गर्दीवर आला. गर्दीच्या उत्साहावर आला. पण तो काही फारसा उत्साहवर्धक दिसला नाही. तू गेलीस तिकडे किती गर्दी होती ? किती जणी आल्या होत्या पूजा करायला ? या प्रश्नावर ती उद्गारली, अगं, कसली गर्दी नि कसलं काय ! नव्या सुनांना फारसं कौतुकच नाही मेलं ! आम्ही पण आता सवयीनेच करतो म्हणा ! इथे एक जन्म व्यवस्थित जमत नाहीय, चालत नाहीय तिथे सात जन्म म्हणजे फारच अवघड बाई ! आजकाल याच जन्मात पतींची अदलाबदल करतात म्हणे, तिथे तर पुढच्या जन्मात नक्कीच बदलून मागतील ! यावर नणंद भावजयीचं प्रचंड एकमत होऊन त्या खदखदा हसू लागल्या ! हे ऐकून व पाहून मी वडाच्या किंवा वटाच्या झाडावरून खाली सरसरत आलो नसतो तरच नवल ! मला सत्यवानांची ( दुरा )अवस्था कळली आणि मी सौ. आणि तिच्या भावजयीसमोर नतमस्तक झालो !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४
ऐन दिवाळीत पाऊस
पणत्यांवर पाणी ...
ऐन दिवाळीत पाऊस पडतो आहे. भक्तीभावाने लावलेल्या पणत्यांवर पाणी पडते आहे. बहुतेक पाऊस पडू दे , बहुतेक पाऊस पडू दे च्या प्रार्थना जास्त झाल्या असाव्यात. माणसाने बाकी काय केले ते बोलायचे नाही. कित्येक वर्षे रस्त्यांची कामे रखडत सुरू आहेत. हजारो किलोमीटर दूतर्फा असलेल्या झाडांच्या कत्तलीबद्दल बोलायचे नाही. माणसाने काय केले याबद्दल माणसानेच ब्र देखील काढायचा नाही. आयाराम गयारामगिरीबद्दल बोलायचे नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा तर आता गेल्यातच जमा आहे.
कालच लक्ष्मी पूजन झाले. लक्ष्मीसाठी काहीही करावे लागते. करतात. पण त्याबद्दल बोलायचे नसते. लक्ष्मीचा कोप होतो अशा कहाण्या आधीच पेरलेल्या आहेत. वाट्टेल ते केले , भ्रष्टाचार केला तरी चालते , त्याने लक्ष्मीच प्रसन्न होणार. किती चांगले आहे ना ! उपासतपास करून, साधना करून लक्ष्मी प्रसन्न होते ही भावना आहे. दुसऱ्यांना गंडवून, भ्रष्टाचार करून लक्ष्मी प्रसन्न होते हा शुध्द व्यवहार आहे. जग व्यवहाराने चालते. तुमच्या भावनांचे मतांमध्ये रूपांतर केले जाते त्याला व्यवहार म्हणतात. कथांच्या आणि स्लोगन्सच्या माध्यमातून तुम्हांला भावनिक बनवले आहेच. उल्लू बनवले की नाही तुम्हांला ? या उक्तीमध्ये प्रचंड व्यवहार असतो. हा व्यवहार जे साधतात त्यांच्याकडे लक्ष्मी येते. बाकीचे संध्याकाळचे दरवाजे उघडून आयुष्यभर वाटच बघत बसतात . वर म्हणत बसतात, दिवाळीत पाऊस कसा , दिवाळीत पाऊस कसा !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०२.११.२०२४. सकाळी ०६.३०
ते अनारसे वेगळे होते !
ते अनारसे वेगळे होते !
दिवाळी म्हटली की फराळ आला. फराळ म्हटले की अनारसेही आलेच. आता ते दुकानात कधीही मिळतात. पण आमच्या लहानपणी ते दिवाळीतच केले जायचे. मला ते खूप प्रिय झाले होते. घरच्यापेक्षा सुगंधाकाकूच्या हातचेच अनारसे मला जास्त आवडू लागले होते. सुगंधाकाकू म्हणजे सीताराम गुरव काकांची पत्नी. आमच्या देऊळवाडीत त्यांचे घर शेवटी तर पहिले घर आमचे होते. मधली पंचवीस तीस घरे ओलांडून ती माऊली माझ्यासाठी दिवाळीच्या सकाळीच अगदी नुकतेच केलेले अनारसे घेऊन न चुकता यायची ! तिच्या हातचे पहिले अनारसे खाण्याचे भाग्य अनेक वर्षे मलाच मिळायचे !
तिचा माझ्यावर खूप जीव होता. त्यालाही वेगळेच कारण होते. तिचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. ती गाईम्हैशी खरेदी करायला स्वतः जायची. एकदा ती अशीच निघाली होती तेव्हा जाण्यापूर्वी आमच्याकडे थांबली होती. आमचे घर वाटेवरच होते. तिच्या काय मनात आले कोण जाणे , तिने अचानक मला विचारले की म्हैस आणायला जाते आहे, जाऊ का ? मी हो म्हणालो तशी ती उठली आणि येते म्हणून म्हैस खरेदीला निघून गेली. त्या दिवशी तिने खरोखरच एक म्हैस खरेदी करून तिच्या घरी आणली. त्या म्हैशीने तिला खरी बरकत दिली. दुधाचा धंदा वाढला. काकू तिला लक्ष्मी म्हणू लागली आणि ही लक्ष्मी तिला माझ्या शब्दांमुळे मिळाली हे ती सगळ्यांना सांगू लागली. इतकेच नाही तर पुढे ती कोणत्याही कामाला निघाली की मला विचारायला यायची. अशा अशा कामाला जातेय, ते काम होईल की नाही ते सांग म्हणायची. मीही सहजपणे बरेचदा हो म्हणायचो. कामही व्हायचे.
एके दिवशी मी तिला जाऊ नको म्हणालो . पण तिचे घरात काही तरी बिनसले असावे. ती इरेसच पेटून आली होती. मी नको म्हटल्यावर ती पेचात सापडली खरी. पण अखेर ती गेलीच. तिकडून आली ती माझ्याकडेच ! ती म्हणाली मी तुझे ऐकले नाही , हट्टास पेटले आणि व्यवहार करायला गेले. पण तो फिसकटलाच. यापुढे तू जा म्हणालास तरच जाईन. नाही तर जाणारच नाही. हे काय चालले होते ते कळण्याचे माझे वय नव्हते. मी तेव्हा अवघा चारपाच वर्षांचा होतो. पण हे प्रसंग ज्या चुलत आजीच्या समोर बरेचदा होत होते, तीही मला तिच्या नातवाची मुंबईहून मनीऑर्डर कधी येईल ते विचारू लागली. इथेही बरेचदा मी सांगेन तेव्हा मनीऑर्डर यायची ! हे माझ्या आकलनापलिकडचे होते. पुढे थोडा मोठा झाल्यावर मी जगाच्या व्यवहाराच्या दरीत ढकलला गेलो आणि माझे ते खरे होणारे शब्दही त्या दरीत हरवले !
सुगंधा काकूचा जीव माझ्यावर असल्याने ती दर दिवाळीत मला आवडणारे अनारसे घेऊन यायची. तिच्या हातच्या अनारशांची चव वेगळीच होती. काही वर्षांनी काकू अपघाताने गेली पण तिच्या त्या अनारशांची चव आजही जिभेवर आहे. काकू गेल्यानंतर मी अनारसे खाणे सोडले. त्या काळी लोक दिवाळीला एकमेकांकडे फराळाला जायचे. आज कोणी जात नाही. पन्नास साठ वर्षांत केवढा बदल झाला माणसांत ! ती माणसे राहिली नाहीत, राहिल्या त्या त्यांच्या आठवणी... सुगंधाकाकूच्या हातच्या चविष्ट अनारशांसारख्या !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०१.११.२०२४ सकाळी ०६.१५
शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४
देवपूजा
देवपूजा
करून करून भागल्यावर मीही देवपूजेला लागणार हे उघडच होतं. थोडक्यात, वृध्दापकाळाची चाहूल लागल्याची उपरती सुरू झाली आहे. तारूण्याची उर्मी, नवनिर्मितीचे धुमारे सरून आयुष्य सुमारे म्हणजेच कशाच्या तरी आधारे जगणे सुरू झाले आहे. आता मन रमवायला जगात कुठे तरी जाऊन जमण्यातले नाही , घरातच मन रमवायचे दिवस आलेत हे उमगले आहे. लहानपणापासून बघत आणि ऐकत आलेला देव आता थोडा थोडासा तरी दिसू लागला आहे. साहजिकच, मी हल्ली निदान नियमितपणे देवपूजा तरी करू लागलो आहे ! हे चांगले आहे , नाही का ? अर्थात, पूर्वी मी कधी कधी देवपूजा करायचो, तेव्हा देवावर फुले टाकायचो. आता ती नीट घालतो, ठेवतो. इतकाच फरक झाला आहे. स्वभाव पूर्णपणे थोडाच बदलणार आहे !
तर देवपूजा म्हटली की फुले हवीतच. मी फुले शोधायला जगभर जात नाही. इतकेच काय, शेजारच्या कंपाऊंडबाहेरूनही फांद्या वाकवून वाकवून फुले चोरत नाही. कधीच नाही. माझ्या कंपाऊंडमध्ये माझ्या सौ.ने ही सोय हौसेने करून ठेवलेली आहे. म्हणजे आपला पती सकाळच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊ नये ही दक्षता तिने आधीच घेतली आहे. शेजाऱ्याची फुले कितीही आकर्षक वाटली तरी मीही कधी त्या फंदात पडत नाही. पण शेजारची काही जणं किंवा जणीं मात्र परवानगी न घेता माझ्या कंपाऊंडमध्ये सरळ सरळ घुसून माझा डोळा चुकवून किंवा अगदी माझ्या नाकासमोरूही माझ्याच फुलझाडांची फुले बिनदिक्कतपणे घेऊन जातात ! म्हणजे अगदी उघड उघड चोरी ! मग मलाच माझीच फुले वेचायची चोरी होऊन बसते. कधी कधी तर फुलझाडांजवळ जाऊन फुलाला हात घालतांना मीच माझ्या फुलांची चोरी करतोय की काय असे मला वाटून मीच क्षणभर हात मागे घेतो ! कधी कधी तर मलाच फुले मिळत नाहीत. लोकांच्या या देवभक्तीपुढे मी नतमस्तक होऊन हात जोडतो आणि निमूटपणे फुलांविना देवपूजा करतो. देव काहीच बोलत नाही पण सौ. शेजारुन ( मला न बोलता ) फुले घेऊन येते आणि देवपूजेला पूर्णविराम देते ! मी निमूटपणे देवाला आणि सौ.लाही हात जोडतो !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४
कोजागिरी पौर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा
आज कोजागिरी पौर्णिमा ! असे म्हणतात की ती को - जागरी पौर्णिमा आहे ! म्हणजे, का जागता , कशासाठी जागता वगैरै वगैरे चौकशांवाली पौर्णिमा. मीही मध्यंतरी तिला को - जागरी पौर्णिमाच म्हणून पाहिले, लिहून पाहिले, पण मला तशी सवय नसल्यामुळे मलाच ते खटकू लागले. झाले आहे काय, की मी राहतो रत्नागिरीत. रत्नागिरीचे रत्नागरी करणे कठीण आहे तसेच ते कोजागिरीचेही कठीण वाटले. परत , कोणाला आवडो न आवडो, जास्त करून न आवडणाऱ्यानीच ते नांव रेटूनरेटून उच्चारल्यामुळे गांधीगिरी या नावाशी आणि कृतीशी आमची हल्ली अधिक ओळख झाली ! त्यामुळे गिरीला गरी म्हणणे कसेसेच वाटते. मासे गरवायला एक गरी लागते हे अरबी समुद्र आमच्यापासून शंभर पावलांवर असल्याने आम्हांला लहानपणापासूनच माहिती आहे. एकूण काय , काय असेल ते शास्त्र अमान्य न करता, व्यवहारात कोजागिरीच बरे वाटते ! संतांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सध्याच्या व्यवहारी जगात त्या वापरणे कठीण होते ! म्हणूनच आता संत फारसे दिसत नाहीत ! दिसतात ते जिवाची कोजागिरी करणारे व नंतर तुरूंगात जाणारे लबाड (संधी)साधू ! असो, तो आता तरी आपला विषय नाही. माझे मित्र श्री. अरविंद धामणे यांनी काल रात्रीच मला आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या आगावू शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्यांना जागून कोजागिरी पौर्णिमेकडे वळतो.
आज कोजागिरी पौर्णिमा ! लहरी पाऊस काय करतोय ही धाकधूक आहेच ! आता सकाळी सहा वाजता चालतांना तरी दिशा उजळल्या आहेत ! चालताचालताच मी टाईप करतो आहे. ही पोस्ट लिहितांना आणखी एक काळजी वाटते आहे. रात्री काळ्याकुट्ट मेघांसह पाऊस आलाच तर काही तासांसाठी तरी ती कोजागिरी अमावास्या होऊन जायची ! देव करो आणि तसे न व्होवो ! हो, देव हा वर असतो आणि पाऊस वरूनच पडत असल्यामुळे देवाला तो अधिक जवळ असणार अशी माझी भाबडी समजूत आहे. नाही म्हणजे आज संध्याकाळी रत्नागिरीच्या राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी कवी संमेलन आहे ! श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती प्रतिष्ठान आयोजित या संमेलनात १०० कवींच्या सहभागाची हमी मित्रवर्य डॉ. दिलीप पाखरेंनी कालच वर्तमानपत्रातून दिली आहे. बहुतेक आज पावसाची शंभरी भरणार व कोजागिरी आनंदाने साजरी होणार ! तिकडे कोजागिरीवरच्या कवितांचा पाऊस पडणार आहे , पावसावरच्या कवितांचा नव्हे ! नाही म्हणजे कवींमध्ये एवढी शक्ती आहे की त्यांनी पावसाच्या कविता सुरू केल्या की खरोखरचा पाऊस कोसळायचा ! कवींचा काय भरोसा ! त्यातच एक कवी म्हणून सालाबादप्रमाणे मीही सहभागी असणार आहे ! मी कोजागिरीवर यंदा एकही कविता केली नाही अशीच सुरूवात असलेली कविता मी सादर करणार आहे. तेव्हा रसिक हो, संध्याकाळी ०४.३० वाजता राम मंदिरात अवश्य या ! वाट पाहतोय !
#kojagiri_pournima
#कोजागिरी_पौर्णिमा
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१६.१०.२०२४ सकाळी ०६.२०
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४
नववधूंचे रडवेले चेहरे
नववधूंचे रडवेले चेहरे
ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आलेली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … काही गैरसमज तर होणार नाहीत ना ? ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचंही असंच झालं होतं .
अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवा सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात. काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार ! कळ काढून वर उलट्या बोंबा मारण्यात तर ह्या महामाया फार पटाईत ! अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !
हजारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला छळ काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात ! आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष ! घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात. पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर, अनेक नववधूंचे रडवेले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४
प्रवेश कुठे घ्यायचा ... ?
प्रवेश कुठे घ्यायचा ... ?
शिक्षणाची ऐशी तैशी पासून ते शिक्षणाच्या आयचा घो ... पर्यंत शैक्षणिक प्रवास करुन आपण सारे इथपर्यंत आलो आहोत ! हेही कमी नसे ! तरीही परीक्षा, निकाल अशा क्रमातून अखेर प्रवेशावर आपली गाडी येऊन रेंगाळतेच. ज्या विद्यार्थ्यांचे अमूक एका ठिकाणी जायचे ठरलेलेच असते , ज्यांना हवा तिथे प्रवेश मिळण्याची खात्री झालेली असते, त्यांचा प्रश्नच नसतो. पण ज्यांचे असे नसते असे अनेक भांबावलेले चेहरे दिसतात. अशा वेळी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणेही किती कठीण होऊन बसले आहे, हे लक्षात येते. दहावी आणि बारावीचे निकाल लागले रे लागले की प्रवेश हा परवलीचा शब्द होऊन जातो. काही जणांनी अगदी खोलवर संशोधन केलेले असते , काही जण वरवर शोध घेतात तर काही जण तहान लागली की विहीर खणायला धावतात. काहीही असले तरी बहुतांशी पालकांनी हा प्रश्न मनावर घेतलेला असतो. बरीचशी मुलं एक तर भांबावलेली असतात किंवा आई वडील बघतील काय ते म्हणत मोबाईलमध्ये तोंड खुपसून असतात. मुलांचेही काही प्रकार असतात. काही मुले पालकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःच प्रवेश प्रक्रियेतून जातात. ही मुले स्वतःचा मार्ग स्वतःच काढणारी असतात. परिस्थितीची खरी जाणीव त्यांना असते . काही मुले पालकांना म्हणतात तुम्ही घातलंत ना शाळेत मग आता तुम्हीच बघा काय ते. ही ऐतखाऊ असतात व पुढेही आईवडिलांना पिळून पिळून खातात. आईवडील आपल्या मुलाला त्रास पडू नये म्हणून स्वतः खस्ता खातात आणि मुलं मात्र कसं पदरात पाडून घेतलं म्हणून मनात हसत असतात. ही मुलं पुढे जाऊन पुरती निगरगट्ट होतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. ती आईवडीलांचंच काय, कोणाचंच ऐकत नाहीत. ही मुलं वाममार्गालाही जाऊ शकतात. दहावी किंवा बारावी पास बाळांचे पाय पाळण्यात दिसत नसले तरी प्रवेशावेळचे हे चित्र पुढे अधिक भयावह होते. अशा मुलांना आयतेगिरीची घातक सवय होते , पण हे त्या त्या वेळी पालकांच्या लक्षात येत नाही. ते तेव्हा पाल्याच्या प्रवेशाच्या विवंचनेत अडकलेले असतात. या विषयावर आपण नंतर लिहू. सद्या मी लिहिणार आहे ते कोंकणातील एका नवीन अभ्यासक्रमाबाबत.
त्याचं असं झालं की रत्नागिरी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमातील एक व्हिडीओ कालच माझ्या पाहण्यात आला. यामध्ये कोंकणात परफॉर्मिंग आर्टस या नावाचा चार वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम सुरू होतोय आणि त्याची अभ्यासपूर्ण माहिती असि. प्रोफे. डॉ. आनंद आंबेकर यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात आकाशवाणी रत्नागिरीच्या या कार्यक्रमात दिली आहे. कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हया अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम येथे झाल्याने एक इंडस्ट्रीच इथे उभी राहील व अनेक कलाकारांच्या स्वप्नांना वास्तव रोजगार मिळेल. त्यांच्या विविध कलांना व्यावसायिक फिनिशिंग मिळू़न कोंकणची कला लोकल ते ग्लोबल होईल, असे या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे. हेही नसे थोडके !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४
प्रदीप मालगुंडकर
प्रदीप मालगुंडकर
सन १९८५ ची गोष्ट. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नाही. कुटुंबात आईवडिलांचा शाळेतले धडे , कविता आणि शिवलीलामृत वाचण्यापुरताच साहित्याशी संबंध. मीही तेव्हा नवोदित कवी ! तेव्हा साहित्यक्षेत्री अनुभव शून्यच ! पण साहित्यक्षेत्रात व्यवसाय करायचा हे वेड होतेच ! ते वाढले ते प्रदीप मालगुंडकरमुळे. त्यानेच माझी ' राजकारण गेलं चुलीत ' ही कविता दै. रत्नभूमीत नेऊन दिली होती व ती १४ एप्रिल १९८५ रोजी प्रसिध्दही झाली होती. तेव्हा आदरणीय दत्तात्रय नाचणकर हे रत्नभूमीचे संपादक होते. प्रदीप त्यांच्याकडे जायचा. प्रदीपमुळेच त्यांच्याशी नंतर ओळख झाली. माझी प्रदीपशी ओळख होती. आम्ही एकाच रस्त्याचे प्रवासी. मी जाकीमिऱ्यात व तो पंधरा माड परिसरात . पंधरावीस मिनिटांचे अंतर . मी तेव्हा रत्नागिरीत क्वचितच होणाऱ्या कवितांच्या कार्यक्रमात कधी कधी सहभागी असायचो. मी सन १९७४ ते १९८४ पर्यंत मी कविता लिहितो हे कुणाला सांगितलेच नव्हते. इतकी वर्षे मी कविता वहीतल्या वहीतच लिहीत होतो. कविता वाचायची म्हटलं की प्राथमिक शाळेत जे टेंशन आले होते ते १९८५-८६ पर्यंत थोडेबहूत कायम होते ! मी भिडस्त, भित्रा ! आकाशवाणीत महेश केळूसकर नेहमीच सांभाळून घ्यायचा. बरेचदा तो रेकॉर्डिंगला स्वतः उपस्थित रहायचा. पुढे त्याच्या आपुलकीच्या आग्रहाखातर जिल्हा नगर वाचनालयातल्या कवितांच्या कार्यक्रमांना जावेच लागे. कविता वाचावीच लागे. नंतर स्मिता राजवाडे , अविनाश फणसेकर , विनय परांजपे इ.च्या आग्रहामुळे गाडीतळावरच्या जनसेवा वाचनालयात बरेचदा कविता वाचनात सहभागी व्हायचो. जनसेवाचे प्रकाश दळवी , सिनकर मॅडम , अमोल पालये व सर्व सहकारी आजही तितकेच प्रेम माझ्यावर करतात.
तर सन १९८५ मध्ये एकदा असाच जनसेवा वाचनालयातून बाहेर पडलो तोच प्रदीप भेटला. तो मिऱ्या बसस्टॉपवर बसची वाट बघत होता. तिथे त्याला मी कविता करतो हे कळले आणि तो मला समोरच्याच मोकळ्या पटांगणात घेऊन गेला. तिथे भाषणे व्हायची, अजूनही होतात. माझ्या हातातली वही त्यांने घेतली आणि चाळली. तो कवी नसला तरी त्याला खूप उत्सुकता होती, आजही आहे. मी सन १९७४ पासून कविता लिहितो पण इतकी वर्षे कुठल्याच वर्तमानपत्राकडे मी कविता पाठवली नाही हे जाणून तो चिडला . त्यांने स्वतःच पाच सहा कविता निवडल्या आणि माझ्याकडून तिथेच लिहून घेतल्या ! शिवाय त्याच दिवशी त्या रत्नभूमी कार्यालयात नेऊनही दिल्या ! याचीच परिणती १४ डिसेंबरला माझी वर्तमानपत्रातील पहिली कविता छापून येण्यात झाली होती ! पुढे माझ्या अनेक कविता दै. रत्नभूमीत व दै. रत्नागिरी टाइम्समध्ये छापून आल्या. याची सुरूवात प्रदीप मालगुंडकरने केली. तो प्रकाशित करत असलेल्या एक दोन अनियतकालिकांचा त्याने मला कार्यकारी संपादकही बनवले होते ! पण पुढे मी सरकारी नोकरी व कुटुंब यात अडकलो , मी स्वतःचे परमप्रिय हे त्रैमासिकही एक वर्षात बंद केले आणि तो त्याच्या स्वप्नाळू स्वभावामुळे एकाकी पडला. आजही तो स्वप्नेच उराशी कवटाळून आयुष्याशी एकाकी झुंज देत आहे. त्याला मी आजपर्यंत एका मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीच मदत करू शकलो नाही ही माझी कृतघ्नता आहे ! ही बोच माझ्या अंतरात कायम असते !
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
०३.१०.२०२४ सकाळी ०६.२०
बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
वादळ
येत्या ४८ तासात वादळ येऊ घातलाय...विश्रांती घेऊ लागलेला पाऊस अचानक वादळी बनून परत फिरतोय. #नवरात्र तोंडावर आहे. परवा ०३ तारीखलाच. इकडे आकाशात विजा चमकतायत..... आणि पावसाच्या कल्पनेने शहारलेला वेडि प्रेमवीर कवी काय म्हणतोय ? पहा तर....खालील व्हिडीओत ...
काही आक्षेप आहेत
आजपासून बोलके काव्य हे नवे पान जोडत आहे . हे बोलके काव्य आहे व्हिडीओ स्वरूपात. हल्ली रील्स म्हणतो आपण त्यांना.
यातले पहिले बोलके काव्य तुमच्यासाठी सादर करतोय.
" काही आक्षेप आहेत "
बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४
ही उपेक्षा का ?
ही उपेक्षा का ?
संगीतकार राम कदमांवरची किरण माने यांची पोस्ट अलिकडे फेसबूकवर वाचनात आली. तिची लिंक अशी आहे :
https://www.facebook.com/share/dycaxtaCZ3F1zNFY/?mibextid=oFDknk.
राम कदमांसारखा मराठीतील एक संगीतकार आजच्या एका मराठी तरूणाला माहीत नसणे आणि कदमांची त्यांच्या हयातीत उपेक्षा होणे, या दोन गोष्टी किरण मानेंच्या मनाला फार लागल्या. त्याबाबत त्यांनी कदमांच्या प्रेमापोटी व आत्यंतिक तळमळीने लिहिले आहे. कोणी असे कोणाबद्दल कळकळीने लिहिते तेव्हा त्याला फार महत्व असते. त्यामागे एक युग असते. त्या माणसाची साधना असते. जसे इथे संगीतकार राम कदमांनी निर्माण केलेले त्यांचे युग आणि त्यांची कलासाधना मानेंच्या समोर आहे.
प्रश्न फक्त राम कदमांचा नाही, तर प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्यासारख्याच अनेक विभुतींच्या नशिबी अवहेलना, फसवणूक , उपेक्षा अशा वाईट गोष्टी का आल्या हा आहे ! त्यांचे चुकले, दैवाचे चुकले, देवाचे चुकले, त्यांच्या आसपासच्या मोठ्या मोठ्या माणसांचे चुकले की त्यांच्या असंख्य सर्वसामान्य चाहत्यांचे चुकले ? देवाच्या निर्मितीचे माणूस केवढे कौतुक करतो ! पण माणूस सुंदर निर्मिती करतो त्याचे पुरेसे कौतुक माणसेच का करत नाहीत ? ती निर्मिती करण्यामागचे त्याचे अथक प्रयत्न लोकांना दिसत नाहीत , लोक फार तर मागाहून काही वेळा चुकचुकतात , तेवढ्यापुरते शाब्दिक पुळके दाखवून मोकळे होतात, पण त्याच कलावंताच्या कलेचा पुरेपूर आस्वाद घेऊन , काही जण तर फायदा उपटून मोकळे झालेले असतात. पण त्या माणसावर अन्याय होतो आहे हे लक्षात येताच आपण त्या गावचेच नाही असे दाखवतात. साधी ओळखही दाखवत नाहीत. समोरून आलात तर काटकोनात वळून पळ काढतात. कटतात. टाळता आले नाही तर थातूरमातूर बोलून कटवतात तरी ! याचसाठी केला का अट्टाहास असे त्या माणसाला वाटते ! ही उपेक्षा का हा प्रश्नं अनुत्तरीतच राहतो. किमान हे असे का होत असते यावर तरी चर्चा होणे हा या लेखाचा किमान उद्देश आहे .
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२०.०८.२०२४
शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४
नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह २०२४
मित्र हो, सोमवार दि. ०५ ते सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत माझ्या शेजारच्या नवलाई पावणाई मंदिरात श्रावण नाम सप्ताह सुरू होता. मी माझ्या फेसबूक प्रोफाईलवर व यू ट्यूब चॅनेल देवीदास पाटील क्रियेशनवर त्याचे थोडे व्हिडीओ पोस्ट केले होते. अजूनही काही व्हिडीओ आहेत जे येत्या काही दिवसांत पोस्ट करीनच. आमच्या जाकीमिऱ्याप्रमाणेच भाटीमिऱ्यातील दत्तमंदिर व सडामिऱ्या भागातील नवलाई पावणाई मंदिरातील नाम सप्ताहही वरील नमूद कालावधीत संपन्न झाला. कोंकणात असे एक्का वा नाम सप्ताह अनेक ठिकाणी संपन्न होतात. ही इथली संस्कृती आहे.
आमचा मिऱ्या गाव तीन बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. शहराकडून येणारा एकमेव मुख्य रस्ता व त्यालाच फुटलेले उपरस्ते तसेच समुद्रसपाटीपासून चढत्या क्रमाने असलेले गावाचे भाटीमिऱ्या, जाकीमिऱ्या, आनंदनगर , सडामिऱ्या व पुन्हा उतारावरून समुद्रसपाटीला असणारे मिऱ्याबंदर हे भौगोलिक अर्धगोलाकार भाग . बंधारा एका बाजुने आहे. मध्ये मिऱ्या डोंगर उभा आहे. पण त्यानंतर उघडा समुद्र किनारा आहे , समुद्र खाडी स्वरूपात आत घुसलेल्या आहे. तिथूनही समुद्राचे पाणी घुसून हाहाकार उडू शकतो.
अशा भूभागातील लोकांना देवाचाच आधार वाटतो. त्याला अनुसरून, भाटीमिऱ्यात दोन , जाकीमिऱ्यात एक अशी तीन दत्तमंदिरे , जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे एक व हनुमंताची दोन मंदिरे, माझ्या हयातीत बांधलेली गणपतीची दोन मंदिरे व सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर ही इथली मंदिरे आहेत. खरे तर सडामिऱ्यातले नवलाई पावणाईचे मंदिर हे प्रथम निर्माण केले गेले. पण नंतर वाढत्या लोकसंख्येमुळे विविध सांस्कृतिक उपक्रमांना मंदिरातील जागा अपुरी पडू लागली. जाकीमिऱ्यात नवलाई पावणाईचे मंदिर कधी बांधले गेले तो उल्लेख त्याच्या सध्याच्या कमानीवर आढळतो. अर्थात, भूतकाळात कधी काय झाले यावर जाणूनबुजून वाद निर्माण करण्यापेक्षा आणि दाणे टाकून कोंबडया झुंजवण्यापेक्षाही , शंभर वर्षांहूनही अधिक काळाचा हा वारसा नामसप्ताहासारख्या उपक्रमांतून जुन्या व नव्या पिढीकडून पुढे आनंदाने आणि एकोप्याने चालवला जात आहे , हेच अधिक महत्वाचे व अभिमानाचे आहे ! हा सोहळा मानवी जीवनाच्या आनंदाचा भाग बनावा, हीच परमेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !
मी कालच्या पोस्टमध्ये दाणे टाकणारांचा व ते टिपण्यासाठी भांडणे करणाऱ्यांचा ओझरता उल्लेख केला होता. संस्कृतीवर जाणकार भाष्य करतात. ते मी ऐकतो. चांगले भाष्य करतात. पण होते काय काही भाष्यकार इकडे प्रभावी बोलतात पण तिकडे दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात. खरे तर चूक त्यांची नसतेच ! चूक त्यांचे दाणे टिपणाऱ्या आणि डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवून आपसातच भांडणाऱ्या कोंबड्यांचीच असते ! भांडणे लावणे ही ज्यांची विकृती असते ते भांडणे लावून मजा घेतच बसणार ! त्याबद्दल त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या नादाला न लागणे केव्हाही श्रेष्ठच ! दाणे टाकणारे आणि ते दाणे टिपून आपसात भांडणारे हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत.
खरे तर संस्कृती ही जीवनाच्या उपक्रमांमधून बनते. या उपक्रमांशी व पर्यायाने संस्कृतीशी धर्माला जोडण्यात आले. माणूस अगोदरचा, संस्कृती नंतरची आणि धर्म तर खूपच मागाहून आला आहे. पण तोच कानामागून येऊन तिखट झाला आहे. कारण मध्यंतरीच्या काळात तो सत्तेशी पर्यायाने राजकारणाशी जोडला गेला. राजकारण हे सत्तेतून आले असले तरी राजकारणी आपल्यातूनच येतात हे विसरता येत नाही ! तेव्हा लोकशाहीत अंतिम बोट कुणाकडे वळते आहे ते पहा.
मूळात माणसांच्या विविध संस्कृती विविध ठिकाणी अस्तित्वात होत्या. आजही आहेत. मग त्यांना धर्म ही संकल्पना कशासाठी जोडला गेली ? संस्कृतीत जसे सुष्ट लोक असतात तसेच दुष्टही असतात. वर दाणे टाकणारे आणि झुंजणारे या दोन्हींचा उल्लेख आलाच आहे. खरे तर चांगल्या वाईट ह्या दोन्ही प्रवृत्ती विश्व चालण्यासाठी आवश्यकच आहेत. तेव्हा त्यांचे स्वागतच आहे . एक तर समाजाला शिस्त लावण्यासाठी धर्म ही संकल्पना आली आणि वाईटांना निदान भीती वाटावी व ती कमी पडू लागली म्हणून पुढे देव ही संकल्पनाही धर्मांशी जोडली गेली. पण वाईट लोक देवाधर्माला विकून खाणारे निघतात आणि चांगले लोक सांस्कृतिक उपक्रम नित्य नेमाने व भक्तीभावाने करतात ! मानवी संस्कृतीचे हे दोन घटक अव्याहतपणे सुरू राहणार हे नक्की !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०८.२०२४
............
रविवार, ११ ऑगस्ट, २०२४
शरदाचे चांदणे....
शरदाचे चांदणे....
नवलाई पावणाई मंदिर, जाकीमिऱ्या येथे श्रावण नाम सप्ताह २०२४ निमित्त देऊळवाडी महिला मंडळातर्फे भजन सादर झाले. त्यावेळी सौ. सुजाता देवीदास पाटील यांनी सुरेल आवाजात म्हटलेले शब्दांचे चांदणे हे गीत प्रत्यक्ष ऐका....
गुरुवार, १ ऑगस्ट, २०२४
आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !
आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !
परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं. त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो. दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते. ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली. आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.
अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
मंगळवार, १६ जुलै, २०२४
उद्याचा विचार
उद्याचा विचार
भीष्म पितामहांचा एक संदर्भ
पुढच्या वर्गात गेल्याबद्दल बक्षिस
मोफत वह्या वाटप
गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो. वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच, त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.
मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे. तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते. माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती. काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.
अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
गुरुवार, ४ जुलै, २०२४
खोके नि पेट्या मिळवा
राजकीय लावणी
खोके नि पेट्या मिळवा
राया तुम्ही संपत्ती कमवा || धृ ० || राया तुम्ही...
सत्ताधारी असो वा परका
तुम्ही गळाभेट घ्या बरं का ...
काढा फोटो, सोबत मिरवा... || ०१ || राया तुम्ही...
बघू नका रंग हिरवा
करू नका हट्ट भगवा
स्वार्थाचे चित्र रंगवा ... || ०२ || राया तुम्ही...
बघा कोण किती देतो
कोण सोबतीने नेतो
हवी तेव्हा टोपी फिरवा... || ०३ || राया तुम्ही...
बसून खातील पिढ्या सात
पडणार नाही कसली ददात
बंगले नि माड्या बनवा... || ०४ || राया तुम्ही...
सोडा शामळूपणा आता
तुम्ही बाईकने का हो जाता ?
चार चाकी गाड्या उडवा.... || ०५ || राया तुम्ही...
....देवीदास हरिश्चंद्र पाटील
०४.०७.२०२४ सकाळी०९.१०
सोमवार, १ जुलै, २०२४
गझलकार देवीदास पाटील यांची मुलाखत प्रक्षेपित
गझलसम्राट सुरेश भटांचे शिष्य मराठी गझलकार देवीदास पाटील यांची रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रक्षेपित
मुलाखतीचा व्हिडीओ पहा :
आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत.
#interview
#AIR
मंगळवार, २५ जून, २०२४
लोकांचं काय राव ...
लोकांचं काय राव ...
जगरहाटी काय आहे ?
.... देवीदास हरिश्चंद्र पाटील
रविवार, २३ जून, २०२४
राहिला केर काढायचा
राहिला केर काढायचा
आदरणीय सुरेश भट यांचं आणि माझं नातं काय आहे हे नाही सांगता येणार. काही गोष्टी नात्यापल्याड असतात. बंधनांच्या धाग्यापल्याड जातात. मी असं का म्हणतो तर भटसाहेब कधी कधी असं लिहून गेलेत ना की ते कधी कधी अगदी माझ्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं. बाकीचं मी नंतर कधी तरी सांगतो.
आताची घटनाच बघा ना.
आताची घटनाच बघा ना. सकाळ झाली. मी सूर्यदर्शन घेऊन आलो. अंगण नीट झाडून झाले. आता घरातला कचरा काढायचा. मी तो रोजच काढतो. मराठी शाळेतली गुरुजींनी लावलेली शिस्त आहे ती ! हाती धरून झाडू ...हे तेव्हा पासून कानांवर पडलेले आणि अंतरात गेलेले बोल आहेत. तेव्हा ही स्वच्छतेची नाटके नाहीत. आपल्याला तोच तोच कचरा जागच्या जागीच ढकलून आपले काही फोटो काढून घ्यायचे नाहीत आणि कुठे छापून पण आणायचे नाहीत. आपल्याला कुठे महात्मा बनायचंय ! आपण पडलो सामान्य माणूस. त्यातही सेवानिवृत्त . सेवानिवृत्तीलाही साडेपाच वर्षे झालेली ! आपण आपलं अंगण , आपलं घर लख्खं करावं आणि त्या आनंदात डुंबावं. अर्थात, अंगण साफ झालं आता घरात येऊन झाडू लागतो तर मी पुढे जातो पण कचरा मागे उरतोच ! मग मी पुन्हा मागे येतो आणि पुन्हा तो कचरा पुढे घेऊन जातो. हे मात्र होतं. तेवढंच मागे पुढे होतं. आता जड व्यायाम जमत नाही तर हा हलका व्यायाम आपसूक होतो. असे नाही तसे हात पाय हलतात, कमर हलते ! मागे पुढे , खाली वर होतंय. बरं वाटतं. फक्त तेवढा कचरा ऐकत नाही. किती काढला तरी सौ. कुठल्यातरी कोपऱ्यातले नाही तर छतावरचे खुसपट दाखवतेच ! कचऱ्याचं हे रोजचंच असं आहे. मी किती काढला तरी काढायचा राहून जातोच. जातो तर जातो... सौ. च्या नजरेत येतो, खुपतो आणि ती मला दाखवूनही देते... कचऱ्याची आणि माझीही जागा ! आता इतकं सगळं झाल्यानंतर मला दररोज सुरेश भटांचे ते जणू काही माझ्यासाठीच लिहिलेले शब्द न आठवले तरच नवल ! कुठले म्हणता ? सांगतो. नाही तरी हे खूप लांबलंय. मुक्त कवितेसारखं. तर सुरेश भट लिहून गेले आहेत :
तर तो केर मागे राहतोच ! हे आठवत मी रोजच केर काढत असतो. गुरुची आठवण वेगळी काढावीच लागत नाही ! नशीब असते एकेकाचे राव !!
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२४.०६.२०२४
शनिवार, २२ जून, २०२४
फेसबूक प्रोफाईल प्रोफेशनल मोडमध्ये
मित्र हो, हल्ली मी फारसा व्हॉट्स अॅप वर दररोज सकाळ संध्याकाळ शुभसंदेश पाठवत नसतो . इतरही काही मी व्हॉट्स अॅपवर करीत नव्हतोच. हल्ली हल्ली म्हणजे अगदी हल्लीच म्हणजेच १७ मार्च २०२४ पासून . यात काही विशेष नाही म्हणा. म्हणजे त्यात व्हॉट्स अॅपला विशेष वाटण्यासारखे काही नाही किंवा व्हॉट्स अॅपवरच्या माझ्या सोबत्यांना , ग्रूप्सना विशेष वाटण्यासारखे काही नाही म्हणा आणि कोणाला काही वाटलेलेही नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. संदेश पाठवतांनाच त्यांचा किती वेळ जात असेल ... त्यात आता सगळ्यांचेच जीवन घाईगडबडीचे. आहे कुणाला वेळ इतक्या किरकोळ माणसासाठी इतका बारीक विचार करायला ! आपण समजून नको का घ्यायला ? अशा वेळी आपणच समजून घ्यायचं असतं. त्यात चुकीचं काहीच नाही, नाही का ? असो, विषय तो नाहीच आहे . पण अशीच तुम्हीही एक गोष्ट समजून घ्यावी म्हणून खरे तर हा पोस्ट प्रपंच !
विषय खरा असा आहे की माझी ही फेसबूकवरील प्रोफाईल प्रोफेशनल मोड मध्ये असल्याने मला आता इतर उद्योग सोडून कसे प्रोफेशनल मोडचे उद्योग करावे लागणार. म्हणजे मला ही जाग नेहमीप्रमाणे उशिराच आली आहे ! आधी मी बराच काळ फेसबूकवर नव्हतो. मग व्हॉट्स अॅपवर कमी झालो आणि परत फेसबूकवर आलो ( सवय आपली 😂 ! ) ...तर ही प्रोफेशनल मोडची अचानक जाणीव झाली. आता जाणीव झालीच आहे तर करावी काही तरी धडपड प्रोफेशनल व्हायची . आपल्या कलंदर भावनिक जीवनात तेवढीच उणीव राहिली होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बघू पुढे पुढे काय होईल ते....म्हणजे तुम्हांला ते दिसणारच आहे...
भेटत राहूच. तुमचा अपार स्नेह सोबत आहेच !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०६.२०२४ दुपार १४. ००
#फेसबूक
#story
शुक्रवार, २१ जून, २०२४
राजकीय खुमखुमी
राजकीय खुमखुमी
लोकसभेची निवडणूक झाली. अब की बार चे बार हवेत उडून विरले आहेत. मग आता काय उरले आहे ? तर विधानसभा ! हल्ली निवडणूका आखाडा बनून गेल्या आहेत. विधानसभेचे रणकंदन तर आतापासूनच सुरू झाले आहे. हा याच्या बालेकिल्ल्यात , तो त्याच्या बालेकिल्ल्यात , हा वार करतो तो पलटवार करतो, तो ह्याला टोला हाणतो, हा त्याला टोला हाणतो, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढण्यावाचून या राजकारण्यांना काही काम असते की नाही हीच शंका येते ! मतदारांसाठी पवित्र कर्तव्य आहे बघा ! त्यांनी ते बजावण्यासाठी केवढा आटापिटा , केवढी जाहिरातबाजी त्यांच्याच खर्चाने केली जाते ! मतदारांचे पवित्र कर्तव्य काय तर मतदान करणे. मग उमेदवारांचे वा निवडून आलेल्यांचे पवित्र कर्तव्य काय हीन पातळीवरचे आरोप एकमेकांवर करणे हेच आहे का ? एकमेकांवर चिखलफेक करून हे कोणता महान आदर्श उभा करत आहेत ? राजकारण करणे म्हणजे केवळ नळावरची भांडणे करून बेलगाम वक्तव्ये करणे आहे का ? लोकसभेत वा विधानसभेत अर्वाच्च भाषेत बोलणे, रस्त्यावर असल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे , हे कशाचे द्योतक आहे ? मग त्या पवित्र मंदिरात जाण्याआधी पाया पडण्याची नाटके तरी कशाला ? या लोकांना काही नियम आहेत की नाहीत ? बंधने आहेत की नाहीत ? संविधान याबाबत काय सांगते ? सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचे यावर काय म्हणणे आहे ? याप्रकारे लोकशाहीची केली जाणारी क्रूर चेष्टा कशी थांबणार ? की ठोकशाही हा लोकशाहीचा गौरव म्हणायचा ? आता फलकयुध्ये सुरू आहेत. याचे फलक त्याच्या बालेकिल्ल्यात, त्याचे फलक याच्या बालेकिल्ल्यात आतापासूनच दिसू लागले आहेत. आत बरेच काही धुमसते आहे. राजकीय खुमखुमी डोके वर काढीत आहे. आखाडा पुन्हा रंगू लागला आहे.
पण हे जे राजकीय लोक आले ते आले कुठून ? त्यांना ही अर्वाच्च भाषा , ही खुमखुमी आली कशी आणि आली कुठून ? हे वाढले कुठे ? हे जे काय शिकले ते शिकले कुठे ? हे असे बनण्यात समाजाचे योगदान नाही काय ? यांना शाळेत शिक्षकांनी शिक्षा केलीच नसेल ? ती केल्यावर शिक्षकांनाच धारेवर धरणारे कोण होते ? ज्या शिक्षक वर्गाने स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून राष्ट्र घडविले त्या शिक्षकवर्गालाच वाहयात पोरांना शिस्त लावली म्हणून थेट पोलीस स्टेशन दाखवणारे कोण होते ? ही एक पिढी अशी होईपर्यंत आणि तिच्या नादाने पुढच्या काही पिढ्या नादान होईपर्यंत झोपा काढणारे कोण ? अंतर्मुख होऊन आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही ? की नुसतेच राजकारण्यांना दोष देत बसणार आहोत ? लोकशाहीसाठी आपण काही करणार आहोत की नाही ? की मतदान हेच आपले एकमेव पवित्र कर्तव्य आहे अशी साळसूदपणे ठाम समजूत करून घेणार आहोत ? ही लोकशाही कोणासाठी आहे ? लोकांसाठीच ना ? मग ती जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे की नाही ? याची उत्तरे प्रत्येकांने स्वतःलाच विचारायची की नाहीत ? हे लोकांचे सर्वात मोठे पवित्र कर्तव्य नाही का ? बेलगाम नेत्यांनी लोकशाही शिकवण्याइतके लोक अजूनही अजाण आहेत का ? ते सूज्ञ होणार तरी कधी ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२१.०६.२०२४ सकाळी ११.००
#politics
शुक्रवार, १४ जून, २०२४
वराडचो चिवडो , मालवणचो खाजो घेवा
दिवा एक्स्प्रेस
रविवार, ९ जून, २०२४
ओळखीच्या खुणा
ओळखीच्या खुणा
ओळखीच्या खुणा हा अविनाश फणसेकर सरांचा काव्यसंग्रह. आज मी ह्या काव्यसंग्रहातील काही कवितांवरच लिहिणार आहे. खरे तर, त्यात मला सापडलेल्या रत्नागिरीच्या मराठी गझलच्या ओळखीच्या पाऊलखुणांबद्दल मी इथे लिहिणार आहे. सर गणिताचे प्राध्यापक होते पण त्यांचे मन कवींचे होते. कलंदर कवींचे होते. त्यांचा हा काव्यसंग्रह रत्नागिरीच्या कीर पब्लिकेशनने मार्च २०१४ मध्ये प्रकाशित केला . दुर्दैवाने सर तेव्हा हयात नव्हते. दहा वर्षांनी या काव्यसंग्रहाची आठवण व्हायचे कारण म्हणजे या काव्यसंग्रहातील आदरणीय प्र. ल. मयेकर यांचे भावनोत्कट मनोगत . त्यात ते म्हणतात , " ...त्यांच्या प्रतिभेमध्ये आसमंत उजळून किंवा जाळूनही टाकण्याची शक्ती नक्कीच होती. पण त्यांनी स्वतःच तो अग्नी गिळून टाकला होता. कुठून आणली या माणसाने ही संतांची करूणा ? फणसेकर सर आपल्यासोबत या प्रश्नाचं उत्तरही घेऊन गेलेले आहेत..."
माझा दावा नाही पण...
प्र. लं. सारख्या थोर व्यक्तीला जे उत्तर सापडले नाही ते मला सापडले असा मी दावा करणे हास्यास्पद आहे व तो मी करीतही नाही. पण मला प्र. लं. च्या त्या प्रश्नांतील संतांची करूणा या शब्दांनी फणसेकर सरांच्या कवितेकडे अधिक ओढलं हे मात्र खरं ! फणसेकर सरांचा मला काही वर्षेच सहवास लाभला. ते विव्दान प्राध्यापक , नाटककार व कलंदर कवी. तर मी नुकताच काव्यमैफिलींमध्ये दिसू लागलेला. सुरूवातीला तर त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची. पण तरीही माझा स्नेह त्यांच्याशी जुळला यात त्यांचाच वाटा फार मोठा होता. सन १९८५-९० चा तो काळ होता. रत्नागिरीत साहित्यिक कार्यक्रम फार दुर्मिळ असायचे. पण स्मिताताई राजवाडे , विनय परांजपे यासारखी सतत धडपडणारी माणसे किमान छोटेखानी कवी संमेलन तरी अधूनमधून घडवायचीच. मी त्यांच्यासोबतच असायचो . बरेचदा फणसेकर सर व्यासपीठावर असायचे. तिथूनच ते सांगायचेत , " देवीदास, आज तुझी गझल झालीच पाहिजे " . कधी कधी तर हक्काने माझ्या पाठीवर थाप मारून ते तसं सांगायचेत. खरं तर सरांचा पिंड गझलकाराचा होता. त्यांची कलंदरी गझलियतशी मिळतीजुळती होती. पण चुकूनही कधी मी गझल लिहितो किंवा मी माझी गझल सादर करतो असं ते म्हणाले नाहीत. उलट माझ्यासारख्या यत्किंचित कवीला ते गझल सादर करायला आवडीने सांगायचे.
अशा या थोर मनाच्या माणसाच्या काळजात कुठेतरी खोल गझल होती. मला वाटतं, प्र. लं. सर म्हणाले ती संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. ' तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही ' हे शब्द सुरेश भटांनी किती खात्रीने लिहिले असतील ! सुरेश भटांना हे सामर्थ्य गझलनेच दिलं असावं आणि त्याच पध्दतीने संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. कारण, संकट काळात मन मजबूत करण्याचं सामर्थ्य गझलमध्ये आहे, हे जीवन संघर्षात मी अनेकदा अनुभवले आहे, अगदी आजही, हा लेख लिहीत असतांनाही अनुभवतो आहे.
फणसेकर सरांची कविता समजून घेण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व जाणणंही आवश्यक आहे. मराठी गझल ही वृत्तात लिहिली जाते. पण फणसेकर सर कलंदरी वृत्तीचे. स्वच्छंद कवी. पण गझलची वृत्ती भिनलेले कवी. आदरणीय सुरेश भट ज्याला गझलची वृत्ती म्हणतात ती फणसेकर सरांकडे ठासून भरलेली होती. गझलेचा भाव, आवेश आणि आवेगही त्यांच्या रचना व सादरीकरणातही भरपूर असायचा. ते मोकळेढाकळे असल्याने वृत्तांच्या खटपटीत ते अडकले नसावेत. पण त्यांनी गझलच्या ढंगाने जाणाऱ्या कविताच नव्हे तर गीतेही लिहिली आहेत, याचा पुरावा म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहता येते !
या संग्रहातल्या पहिल्याच गीतात मला त्यांच्यातला गझलकार दिसला ! या गीताच्या पहिल्या दोन ओळीत गझलेतले यमक, अंत्ययमक डोकावते. आपण प्रत्यक्षच पाहुया :
मी स्वप्नात पाहिलेले कुणी एक गाव होते
आठवूनी आठवेना काय त्याचे नाव होते
यानंतरच्या कडव्यांच्या शेवटच्या ओळींही याच धर्तीवर लिहिलेल्या आहेत. पहा,
कुठे पहारे भासले चोरापरी ते, अंतरीचे साव होते
रस्त्यात भेटणारे रंक तेथील राव होते
भक्ताच्या चेहऱ्यावर देवतांचे भाव होते ...
अशीच गझलमयता ' नाहीच योग आता ' या गीतात व यापुढील काही गीतातही आढळते. काही कविताही गझलसदृष्य आहेत. ' हासू नकोस आता ' ही तर गझलच्या खूप जवळ जाणारी कविता. हिचे शिर्षकही गझलेच्याच ढंगाने जाणारे. तुमचे हजार सूर्य हीसुध्दा गझलचीच वृत्ती दाखवणारी. सूर एकदाच अपुले , मीही कुणीतरी आहे, बदनाम हा जगी या , नशेची खुमारी , खुद्द गजल या नावाच्या दोन रचना, कधी भेटलीस तर, जिंकुनी मैफिल गेली, आता नशेत आहे, चंद्र माझ्या मनीचा, त्यानंतर कागदाच्या या फुलांना , एका मुशाफिराला, दोस्तांनो, यांची शिर्षकेच नव्हेत तर यातल्या सर्व ओळी पाहिल्या की सर किती गझलमय झाले होते याची कल्पना येते. सरांनी गझलबद्दल तेव्हा चर्चा केली असती तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते. पण तो योग कधी आलाच नाही. मीही नुकताच गझलसदृष्यतेतून बाहेर पडलो असल्याने गझलबाबत काही सांगावे या कुवतीचा नव्हतो . ते माझ्या साध्याशा गझलांवरही प्रेम का करत होते, मला गझल सादर करायचा आग्रह का करत होते, ते स्वतःच्या गझलचं प्रतिबिंब तर माझ्या गझलांमध्ये पहात नव्हते इ. प्रश्नांचे उत्तर म्हणजे त्यांच्याच हृदयात खोल बसून राहिलेली गझल होय ! होय, याच गझलने त्यांना संतांची करुणा पेलण्याचे सामर्थ्य दिले असावे असे आज हटकून वाटते !
तुम्हांला याबद्दल काय वाटते ते नक्की कळवा, ही विनंती.
....देवीदास हरिश्चंद्र पाटील.
शनिवार, ८ जून, २०२४
मराठी गझलविषयक पान
मित्रांनो, या ब्लॉगवर मराठी गझलसाठी " अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख " हे वैशिष्ट्यपूर्ण पान जोडण्यात आले आहे. यामध्ये मराठी गझल विश्वातील अनेक घडामोडींवरील वाचनीय लेख आपणांस मिळतील. अवश्य वाचा व प्रतिक्रिया द्या.
मराठी गझल आपला ठसा उमटवत चालली आहे. आद. कवीवर्य सुरेश भट किती द्रष्टे होते ते त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेल्या दोन वाक्यात दिसून येते. या ब्लॉगच्या एडमीनना ते बरेचदा म्हणायचे , " देवीदास, तू मराठी गझलची चिंता करू नकोस. ती सर्वदूर जाणारच ! "
तर प्रत्यक्ष जन्मदात्याचे हे बोल अक्षरशः खरे झाल्याचे आज दिसते आहे आणि मराठी गझल अधिकाधिक बहरते आहे. त्याच मराठी गझलचे हे पान आपणांस निश्चितच आवडेल !
शुक्रवार, ७ जून, २०२४
विचित्र स्वप्ने भयानक घटना यांचे खास पान
विचित्र स्वप्ने भयानक घटना हे पान खरोखरच अंगावर काटा उभा करणारे पान आहे. यात फार विचित्र स्वप्नें पडलेली नमूद केलेली आहेत. अनेक भयानक घटनांची जंत्रीही इथे सापडेल. या पानात पूर्वी पडलेली प्रत्यक्ष स्वप्नें किंवा घडलेल्या भयावह घटना अंतर्भूत असलेल्या लेखांच्या लिंक्स दिल्या जातील जेणेकरून अन्य तपशिल वगळून स्वप्ने व घटना याबाबतची या ब्लॉगवरील मनोरंजक माहिती आपल्याला वाचता येईल. तसेच अन्य ब्लॉगवरील अशा काही लेखांच्या लिंक्सही दिल्या जातील. यातून स्वप्नांचे व घटनांचे एक वेगळेच जग आपल्यासमोर येईल.
सोमवार, २७ मे, २०२४
तीर पुन्हा चर्चेत...
#मराठीगझल हा विषय तसा आजकाल आपल्यासमोर अनेकदा येतो. #सुरेशभट , #भीमरावपांचाळे , #मभाचव्हाण ते #नितीनदेशमुख, #सतिशदराडे अशी अनेक नांवे मराठी गझलसंदर्भात घेतली जातात. आदरणीय सुरेश भट यांच्या हयातीत कोकणातील त्यांनी घडविलेले गझलकार म्हणून देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचे नांव घेतले जाते. देवीदास पाटील यांनी रत्नागिरीत मराठी गझल पहिल्यांदा आणली. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र अजिज हसन मुक्री हेही त्यांच्याबरोबर मराठी गझल लिहू लागले व नावारूपास आले.
देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची तीर ही सुप्रसिध्द गझल आहे. तिचे दोन शेर मराठी गझलसाठी जिवाचे रान करणारे गझलनवाज श्री. भीमरावजी पांचाळे हे अनेकदा देशोविदेशातील मैफिलींमध्ये सुरूवातीलाच गाऊन मैफिलीचा माहौल तयार करतात व मैफील एका उंचीवर नेऊन ठेवतात . हे अनेक श्रोते ही सांगतात.
वाचकांनीही या शेरांबद्दल बोलक्या प्रतिक्रिया #फेसबूकवर दिल्या आहेत. त्या पोस्टचा फोटो खाली दिला आहे. तसेच, वरती " तीर पुन्हा चर्चेत " या शब्दांना क्लिक केल्यास आपल्याला ती पोस्टही प्रत्यक्ष पाहता येईल व कमेंट्स करता येतील.
मंगळवार, ७ मे, २०२४
Yethe hasun Sara vaishakh sosala mi
येथे हसून सारा वैशाख सोसला मी ...
डोळ्यातल्या घनांचा आषाढ रोखला मी !
Mi Veda hoto mhanuni
मी वेडा होतो म्हणुनी ...
मी वेडा होतो म्हणुनी ते सर्व शहाणे ठरले
ह्या वेड्याचे हे शहाणपण त्यांना कोठे कळले ?
ही अशी कशी बरे ह्या शब्दांची गफलत झाली ?
मी गीत लिहाया बसलो ; गझलेचे शेरच लिहिले !
अंधार नशिबाचा मी असा मजेने पीत गेलो
पीता पीता माझे मीच अवघे नशीब उजळले !
मी अजून कोणाचा साधा निषेध केला नाही
खंजीर खुपसणारेही दिलगीर होऊन बसले !
मी लिहीत होतो ती केवळ एक कहाणी नव्हती
स्वप्नांनी मी आयुष्याचे पुस्तक नाही भरले !
... देवीदास हरिश्चंद्र पाटील
शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४
शनिवार, ३० मार्च, २०२४
नारी शक्ती
०८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायतीत दिमाखात साजरा .
जाकीमिऱ्यातील देऊळवाडी महिला मंडळाने या प्रथम क्रमांक मिळविलेल्या कार्यक्रमाबरोबरच नारी शक्तीचे एक सुंदर गीतही सादर केले.