शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४

देवपूजा

 देवपूजा

करून करून भागल्यावर मीही देवपूजेला लागणार हे उघडच होतं. थोडक्यात, वृध्दापकाळाची चाहूल लागल्याची उपरती सुरू झाली आहे. तारूण्याची उर्मी, नवनिर्मितीचे धुमारे सरून आयुष्य सुमारे म्हणजेच कशाच्या तरी आधारे जगणे सुरू झाले आहे. आता मन रमवायला जगात कुठे तरी जाऊन जमण्यातले नाही , घरातच मन रमवायचे दिवस आलेत हे उमगले आहे. लहानपणापासून बघत आणि ऐकत आलेला देव आता थोडा थोडासा तरी दिसू लागला आहे. साहजिकच, मी हल्ली निदान नियमितपणे देवपूजा तरी करू लागलो आहे ! हे चांगले आहे , नाही का ? अर्थात, पूर्वी मी कधी कधी देवपूजा करायचो, तेव्हा देवावर फुले टाकायचो. आता ती नीट घालतो, ठेवतो. इतकाच फरक झाला आहे. स्वभाव पूर्णपणे थोडाच बदलणार आहे ! 

तर देवपूजा म्हटली की फुले हवीतच. मी फुले शोधायला जगभर जात नाही. इतकेच काय, शेजारच्या कंपाऊंडबाहेरूनही फांद्या वाकवून वाकवून फुले चोरत नाही. कधीच नाही. माझ्या कंपाऊंडमध्ये माझ्या सौ.ने ही सोय हौसेने करून ठेवलेली आहे. म्हणजे आपला पती सकाळच आपल्या कंपाऊंडच्या बाहेर जाऊ नये ही दक्षता तिने आधीच घेतली आहे. शेजाऱ्याची फुले कितीही आकर्षक वाटली तरी मीही कधी त्या फंदात पडत नाही. पण शेजारची काही जणं किंवा जणीं मात्र परवानगी न घेता माझ्या कंपाऊंडमध्ये सरळ सरळ घुसून माझा डोळा चुकवून किंवा अगदी माझ्या नाकासमोरूही  माझ्याच फुलझाडांची फुले बिनदिक्कतपणे घेऊन जातात ! म्हणजे अगदी उघड उघड चोरी ! मग मलाच माझीच फुले वेचायची चोरी होऊन बसते.  कधी कधी तर फुलझाडांजवळ जाऊन फुलाला हात घालतांना मीच माझ्या फुलांची चोरी करतोय की काय असे मला वाटून मीच क्षणभर हात मागे घेतो  ! कधी कधी तर मलाच फुले मिळत नाहीत. लोकांच्या या देवभक्तीपुढे मी नतमस्तक होऊन हात जोडतो आणि निमूटपणे फुलांविना देवपूजा करतो. देव काहीच बोलत नाही पण सौ. शेजारुन ( मला न बोलता ) फुले घेऊन येते आणि देवपूजेला पूर्णविराम देते ! मी निमूटपणे देवाला आणि सौ.लाही हात जोडतो !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील




बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

कोजागिरी पौर्णिमा

 कोजागिरी पौर्णिमा


आज कोजागिरी पौर्णिमा ! असे म्हणतात की ती को - जागरी पौर्णिमा आहे ! म्हणजे, का जागता , कशासाठी जागता वगैरै वगैरे चौकशांवाली पौर्णिमा. मीही मध्यंतरी तिला को - जागरी पौर्णिमाच म्हणून पाहिले, लिहून पाहिले, पण मला तशी सवय नसल्यामुळे मलाच ते खटकू लागले. झाले आहे काय, की मी राहतो रत्नागिरीत. रत्नागिरीचे रत्नागरी करणे कठीण आहे तसेच ते कोजागिरीचेही कठीण वाटले.‌ परत , कोणाला आवडो न आवडो, जास्त करून‌ न आवडणाऱ्यानीच ते नांव रेटूनरेटून उच्चारल्यामुळे गांधीगिरी या नावाशी आणि कृतीशी आमची हल्ली अधिक ओळख झाली ! त्यामुळे गिरीला गरी म्हणणे कसेसेच वाटते. मासे गरवायला एक गरी लागते हे अरबी समुद्र आमच्यापासून‌ शंभर पावलांवर असल्याने आम्हांला लहानपणापासूनच  माहिती आहे. एकूण काय , काय असेल ते शास्त्र अमान्य न करता, व्यवहारात कोजागिरीच बरे वाटते ! संतांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सध्याच्या व्यवहारी जगात त्या वापरणे कठीण होते ! म्हणूनच आता संत फारसे दिसत नाहीत ! दिसतात ते जिवाची कोजागिरी करणारे व नंतर तुरूंगात जाणारे लबाड (संधी)साधू ! असो, तो आता तरी आपला विषय नाही. माझे मित्र श्री. अरविंद धामणे यांनी काल रात्रीच मला आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या आगावू शुभेच्छा पाठवल्या आहेत. त्यांना जागून कोजागिरी पौर्णिमेकडे वळतो. 


आज कोजागिरी पौर्णिमा ! लहरी पाऊस काय करतोय ही धाकधूक आहेच ! आता सकाळी सहा वाजता  चालतांना तरी दिशा उजळल्या आहेत ! चालताचालताच मी टाईप करतो आहे. ही पोस्ट लिहितांना आणखी एक काळजी वाटते आहे. रात्री काळ्याकुट्ट मेघांसह पाऊस आलाच तर काही तासांसाठी तरी ती कोजागिरी अमावास्या होऊन जायची ! देव करो आणि तसे न व्होवो ! हो, देव हा वर असतो आणि पाऊस वरूनच पडत असल्यामुळे देवाला तो अधिक जवळ असणार अशी माझी भाबडी समजूत आहे. नाही म्हणजे आज संध्याकाळी रत्नागिरीच्या राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी कवी संमेलन आहे ! श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमुर्ती प्रतिष्ठान आयोजित या संमेलनात १०० कवींच्या सहभागाची हमी मित्रवर्य डॉ. दिलीप पाखरेंनी कालच वर्तमानपत्रातून दिली आहे. बहुतेक आज पावसाची शंभरी भरणार व कोजागिरी आनंदाने साजरी होणार !  तिकडे कोजागिरीवरच्या कवितांचा पाऊस पडणार आहे , पावसावरच्या कवितांचा नव्हे ! नाही म्हणजे कवींमध्ये एवढी शक्ती आहे की त्यांनी पावसाच्या कविता सुरू केल्या की खरोखरचा पाऊस कोसळायचा ! कवींचा काय भरोसा ! त्यातच एक कवी म्हणून सालाबादप्रमाणे मीही सहभागी असणार आहे ! मी कोजागिरीवर यंदा एकही कविता केली नाही अशीच सुरूवात असलेली कविता मी सादर करणार आहे. तेव्हा रसिक हो,  संध्याकाळी ०४.३० वाजता राम मंदिरात अवश्य या ! वाट पाहतोय ! 


#kojagiri_pournima

#कोजागिरी_पौर्णिमा

...देवीदास हरिश्चंद्र पाटील

१६.१०.२०२४ सकाळी ०६.२०

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

नववधूंचे रडवेले चेहरे

 नववधूंचे रडवेले चेहरे 

ती लग्नं होऊन सासरी आली … बावरलेली … स्वतःचे सर्व काही सोडून सासरी आलेली …. मनात धाकधूक होतीच... नवीन परिस्थिती... नवीन माणसं … नवीन नाती ... सगळंच तिला नवीन होतं . ते घर ... हे घर … काही गैरसमज तर होणार नाहीत ना ?  ती जरा साशंकच होती . तिचंही बरोबर होतं . तिच्या काही मैत्रिणींचंही असंच झालं होतं . 

अनेक ठिकाणी असं होतं . अशावेळी जी मुलगी आपल्या कुटुंबाचा नवा सदस्य झाली आहे तिला समजून घेताना सासर कमी पडतं . बावरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेमुळे काही चुकलं तर तिला सांभाळून घेणे , समजावून सांगणे सासरच्यांना कठीण जाते . गंमत अशी आहे की बायकाच बायकांना जास्त छळतात.  काही नातीच गैरसमज निर्माण करणारी आहेत . सासू सून आणि नणंद भावजय ही दोन नाती म्हणजे तर कळसच ! गैरसमज आणि भांडण हे यांचे खास मित्र ! त्यातही जाणीवपूर्वक पसरवलेले गैरसमज आणि मुद्दाम उकरून काढलेली भांडणे हे तर खडाजंगीतले चौकार-षटकार ! निमित्ते तर पाचवीलाच पुजलेली ! निमित्ते तयार करण्यात या जोड्यांचा हात , ज्याने ह्यांना निर्माण केलं असं म्हणतात तो खुद्द परमेश्वरही धरू शकणार नाही ! कांगावखोरपणा हा यांचा सर्वोत्तम जन्मजात आदर्श गूण ! कुरघोडी करणे त्यांच्या हातचा मळच ! कळ काढण्यात ह्या हुशार ! कळ काढून वर उलट्या बोंबा मारण्यात तर ह्या महामाया फार पटाईत !  अपवादात्मक परिस्थितीत सन्माननीय अपवाद ठरण्याचा विक्रमही ह्याच करू जाणोत ! स्त्रियांना स्त्रियांच इतक्या का छळतात हे एवढं रामायण होऊनही सांगणे कठीण आहे ! राम जाणे ! बाकी काय !


जारो वर्षे झाली तरी स्त्रीच्या नशिबीचा प्रामुख्याने स्त्रीकडून केलेला छळ काही टळत नाही ! स्त्रीला देवता समजणारी आपली उच्च संस्कृती स्त्रीची प्रत्यक्षात कशी पूजा करते ते पाहण्याजोगे आहे ! हतबल पुरूष वस्त्रहरणाच्या वेळेसारखे माना खाली घालून आजही गप्प बसतात !  आजच्या तथाकथित स्त्री स्वातंत्र्य युगातही हे कमी झालेले नाही हे विशेष !  घरोघरी त्याच चुली, बोलत नाही तीच बरी ही म्हण यामुळेच इतकी वर्षे टिकून आहे. विषय आलाच आहे म्हणून सांगतो . दुसरीही एक म्हण अशीच टिकून आहे . ती आहे पळसाशी संबंधित . वसंत ऋतूत पळस बहरतो . पळस आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पळस त्वचारोग नाहीस करतो असं म्हणतात . लाल केशरी व किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पळस लक्ष वेधून घेतो. पळस माझं लक्ष वेधून घेतो तो आणखी एका सामाजिक कारणासाठी. बेल आणि  निर्गुंडी यांनाही पळसाप्रमाणे तीनच पाने असतात.  पण पळसाला पाने तीनच ही म्हण पळसालाच का चिकटली हा प्रश्न मला पडतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे घरोघरीच्या चुली आपला गुण काही केल्या सोडत नाहीत. आपला गूण न सोडण्याची ही प्रवृत्ती मला पळसाला पाने तीनच या म्हणीच्या जवळची वाटते . काहीही केले तरी पळसाला पाने तीनच येणार ! अखेर,  अनेक नववधूंचे रडवेले चेहरे आणि त्यांचा सासुरवास मला टोचत राहतो . मनात एक बेचैनी भरून राहते.


...देवीदास हरिश्चंद्र पाटील



गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

प्रवेश कुठे घ्यायचा ... ?

 प्रवेश कुठे घ्यायचा ... ? 

Where to take admission ?


शिक्षणाची ऐशी तैशी पासून ते शिक्षणाच्या आयचा घो ... पर्यंत शैक्षणिक प्रवास करुन आपण सारे इथपर्यंत आलो आहोत ! हेही कमी नसे !  तरीही परीक्षा, निकाल अशा क्रमातून अखेर प्रवेशावर आपली गाडी येऊन रेंगाळतेच. ज्या विद्यार्थ्यांचे अमूक एका ठिकाणी जायचे ठरलेलेच असते , ज्यांना हवा तिथे प्रवेश मिळण्याची खात्री झालेली असते, त्यांचा प्रश्नच नसतो. पण ज्यांचे असे नसते असे अनेक भांबावलेले चेहरे दिसतात. अशा वेळी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेणेही किती कठीण होऊन बसले आहे, हे लक्षात येते. दहावी आणि बारावीचे निकाल लागले रे लागले की प्रवेश हा परवलीचा शब्द होऊन जातो. काही जणांनी अगदी खोलवर संशोधन केलेले असते , काही जण वरवर शोध घेतात तर काही जण तहान लागली की विहीर खणायला धावतात. काहीही असले तरी बहुतांशी पालकांनी हा प्रश्न मनावर घेतलेला असतो. बरीचशी मुलं एक तर भांबावलेली असतात किंवा आई वडील बघतील काय ते म्हणत मोबाईलमध्ये तोंड खुपसून असतात. मुलांचेही काही प्रकार असतात. काही मुले पालकांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःच प्रवेश प्रक्रियेतून जातात. ही मुले स्वतःचा मार्ग स्वतःच काढणारी असतात. परिस्थितीची खरी जाणीव त्यांना असते . काही मुले पालकांना म्हणतात तुम्ही घातलंत ना शाळेत मग आता तुम्हीच बघा काय ते. ही ऐतखाऊ असतात व पुढेही आईवडिलांना पिळून पिळून खातात. आईवडील आपल्या मुलाला त्रास पडू नये म्हणून स्वतः खस्ता खातात आणि मुलं मात्र कसं पदरात पाडून घेतलं म्हणून मनात हसत असतात. ही मुलं पुढे जाऊन पुरती निगरगट्ट होतात आणि स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. ती आईवडीलांचंच काय, कोणाचंच ऐकत नाहीत. ही मुलं वाममार्गालाही जाऊ शकतात. दहावी किंवा बारावी पास बाळांचे पाय पाळण्यात दिसत नसले तरी प्रवेशावेळचे हे चित्र पुढे अधिक भयावह होते. अशा मुलांना आयतेगिरीची घातक सवय होते , पण हे त्या त्या वेळी पालकांच्या लक्षात येत नाही. ते तेव्हा पाल्याच्या प्रवेशाच्या विवंचनेत अडकलेले असतात. या विषयावर आपण नंतर लिहू. सद्या मी लिहिणार आहे ते कोंकणातील एका नवीन अभ्यासक्रमाबाबत. 


त्याचं असं झालं की रत्नागिरी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमातील एक व्हिडीओ कालच माझ्या पाहण्यात आला. यामध्ये कोंकणात परफॉर्मिंग आर्टस या नावाचा चार वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम सुरू होतोय आणि त्याची अभ्यासपूर्ण माहिती असि. प्रोफे. डॉ. आनंद आंबेकर यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात आकाशवाणी रत्नागिरीच्या या कार्यक्रमात दिली आहे. कोणत्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हया अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतो.‌ हा अभ्यासक्रम येथे झाल्याने एक इंडस्ट्रीच इथे उभी राहील व अनेक कलाकारांच्या स्वप्नांना वास्तव रोजगार मिळेल. त्यांच्या विविध कलांना व्यावसायिक फिनिशिंग मिळू़न कोंकणची कला लोकल ते ग्लोबल होईल, असे या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आले आहे.  हेही नसे थोडके ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील



गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०२४

प्रदीप मालगुंडकर

 प्रदीप मालगुंडकर 


सन १९८५ ची गोष्ट. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नाही. कुटुंबात आईवडिलांचा शाळेतले धडे , कविता आणि  शिवलीलामृत वाचण्यापुरताच साहित्याशी संबंध.‌ मीही तेव्हा नवोदित कवी ! तेव्हा साहित्यक्षेत्री अनुभव शून्यच ! पण साहित्यक्षेत्रात व्यवसाय करायचा हे वेड होतेच ! ते वाढले ते प्रदीप मालगुंडकरमुळे.‌  त्यानेच माझी  ' राजकारण गेलं चुलीत '  ही कविता दै. रत्नभूमीत नेऊन दिली होती व ती १४ एप्रिल १९८५ रोजी प्रसिध्दही झाली होती. तेव्हा आदरणीय दत्तात्रय नाचणकर हे रत्नभूमीचे संपादक होते. प्रदीप त्यांच्याकडे जायचा.‌ प्रदीपमुळेच त्यांच्याशी नंतर ओळख झाली.  माझी प्रदीपशी ओळख होती. आम्ही एकाच रस्त्याचे प्रवासी. मी जाकीमिऱ्यात व तो पंधरा माड परिसरात . पंधरावीस मिनिटांचे अंतर . मी तेव्हा रत्नागिरीत क्वचितच होणाऱ्या कवितांच्या कार्यक्रमात कधी कधी सहभागी असायचो.‌ मी सन १९७४ ते १९८४ पर्यंत मी कविता लिहितो हे कुणाला सांगितलेच नव्हते. इतकी    वर्षे मी कविता वहीतल्या वहीतच लिहीत होतो. कविता वाचायची म्हटलं की प्राथमिक शाळेत जे टेंशन आले होते ते १९८५-८६ पर्यंत थोडेबहूत कायम होते ! मी भिडस्त, भित्रा ! आकाशवाणीत महेश केळूसकर नेहमीच सांभाळून घ्यायचा. बरेचदा तो रेकॉर्डिंगला स्वतः उपस्थित रहायचा.‌ पुढे त्याच्या आपुलकीच्या आग्रहाखातर जिल्हा नगर वाचनालयातल्या कवितांच्या कार्यक्रमांना जावेच लागे.‌ कविता वाचावीच लागे. नंतर स्मिता राजवाडे , अविनाश फणसेकर , विनय परांजपे इ.च्या आग्रहामुळे गाडीतळावरच्या जनसेवा वाचनालयात बरेचदा कविता वाचनात सहभागी व्हायचो. जनसेवाचे प्रकाश दळवी , सिनकर मॅडम , अमोल पालये व सर्व सहकारी आजही तितकेच प्रेम माझ्यावर करतात.‌


तर सन १९८५ मध्ये एकदा असाच जनसेवा वाचनालयातून बाहेर पडलो तोच प्रदीप भेटला. तो मिऱ्या बसस्टॉपवर बसची वाट बघत होता. तिथे त्याला मी कविता करतो हे कळले आणि तो मला समोरच्याच मोकळ्या पटांगणात घेऊन गेला. तिथे भाषणे व्हायची, अजूनही होतात.‌ माझ्या हातातली वही त्यांने घेतली आणि चाळली. तो कवी नसला तरी त्याला खूप उत्सुकता होती, आजही आहे. मी सन १९७४ पासून कविता लिहितो पण इतकी वर्षे कुठल्याच वर्तमानपत्राकडे मी कविता पाठवली नाही हे जाणून तो चिडला . त्यांने स्वतःच पाच सहा कविता निवडल्या आणि माझ्याकडून तिथेच लिहून घेतल्या ! शिवाय त्याच दिवशी त्या रत्नभूमी कार्यालयात नेऊनही दिल्या ! याचीच परिणती १४ डिसेंबरला माझी वर्तमानपत्रातील पहिली कविता छापून येण्यात झाली होती ! पुढे माझ्या अनेक कविता दै. रत्नभूमीत व दै. रत्नागिरी टाइम्समध्ये छापून आल्या. याची सुरूवात प्रदीप मालगुंडकरने केली. तो प्रकाशित करत असलेल्या एक दोन अनियतकालिकांचा त्याने मला कार्यकारी संपादकही बनवले होते ! पण पुढे मी सरकारी नोकरी व कुटुंब यात अडकलो , मी स्वतःचे परमप्रिय हे त्रैमासिकही एक वर्षात बंद केले आणि तो त्याच्या स्वप्नाळू स्वभावामुळे एकाकी पडला. आजही तो स्वप्नेच उराशी कवटाळून आयुष्याशी एकाकी झुंज देत आहे. त्याला मी आजपर्यंत एका मर्यादेच्या बाहेर जाऊन काहीच मदत करू शकलो नाही ही माझी कृतघ्नता आहे ! ही बोच माझ्या अंतरात कायम असते ! 


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

०३.१०.२०२४ सकाळी ०६.२०


सांत्वन

 ते सांत्वनासाठी आले होते .... तेच मारेकरी होते....




आपण कसे आहोत ?

 आपण कसे आहोत ? काही कल्पना आहे का ? 

बघा तर या व्हिडीओत.... आणखी एक बोलके काव्य ! 




बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

जरासा पाऊस पडला अन्....

 जरासा पाऊस पडला अन्....

#पाऊसप्रेमी




पुन्हा भरून येण्यासाठी...

 पुन्हा भरून येण्यासाठी... 

#आभाळ 



काळ्याशार मेघांचा थवा....

 

काळ्याशार मेघांचा थवा....

#पाऊस