आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे !
परवा निवेंडीवाडीच्या शाळेत वह्या वाटप करण्यासाठी गेलो होतो. सौ. निरजा शेट्येला तिच्या घरून गाडीत घेतलं. ती ग्रामपंचायत सदस्य आहे. निवेंडीवाडीची शाळा तिनेच सुचवली होती. तिने तिथली अधिक माहिती असणाऱ्या दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्या सौ. भरणकर यांनाही वाटेत सोबत घेतलं. त्या असल्याने प्रवास योग्य रस्त्यावरून झाला. पाऊस सुरूच होता. वाट बिकट होती. निरजाचा भाऊ निलेश पेडणेकर गाडी चालवत होता. त्याने गाडी सफाईने चालवली. शाळेच्या थोडं पुढे गाडी पार्क करावी लागली. आम्ही चौघेही पाऊस थांबण्याची वाट पहात बसलो. दहा मिनिटे वाट पाहूनही पाऊस कमी होण्याचे चिन्ह दिसेना. माझी एकमेव छत्री कारमध्ये होती. तिचा आधार घेऊन एकाने शाळेत जावे , मग कोणी जावे , वह्या आणि छत्री एकाच वेळी कसे धरायचे आणि वह्या न भिजवता शाळेत कसे पोचायचे यावर पुढची पाच मिनिटे चर्चा करून झाल्या. आता काय करायचं याच प्रश्नावर चर्चेची गाडी पुन्हा थांबली. आम्ही उगाचच अडकून पडल्यासारखे झालो होतो. उगाचच टेंशन वाढले होते. ते तिघे समस्येवर चर्चा करत होते आणि मी सोल्यूशनवर विचार करत होतो. मला उत्तरही सुचले. मी निरजाला म्हणालो, शाळेत फोन कर आणि मुलांना छत्र्या घेऊन पाठवायला सांग. झाले, तिच्याकडे मुख्याद्यापकांचा नंबर असल्याने, त्यानुसार तिने फोन केला आणि चार मिनिटातच चार मुलं छत्र्या घेऊन गाडीजवळ आली. आम्ही आणि वह्याही शाळेत सुखरूप गेलो ! थोडक्यात, परिस्थिती आपण कशी घेतो हे फार महत्वाचे असते.
अशाच घटना अनेकदा आयुष्यात घडतात. ही घटना तर किरकोळ होती, पण त्यावर चर्चा किती मिनिटे झाली ! मनाचा गोंधळ किती उडाला ! घटनेची सुरूवात हा घटनेचा सुरूवातीचा बिंदू . पण हा एकच बिंदू रहात नाही. या एका घटनेतून पुढे अनेक घटना घडू लागतात. हेच तुमचे कालचक्र असते. जीवन असते. अशा अनेक घटनांचे बिंदू पुढे सरकत राहतात. याच बिंदूंची एक रेषा बनते. कोणत्याही घटनेच्या सुरूवातीपासून निघालेली ही रेषा पुढे पुढे होत जाणाऱ्या घटनांना घेऊन पुढे सरकत राहते. तेव्हा आपण सावध झाले पाहिजे. ही रेषा कुठपर्यंत जाईल , तिची दिशा काय असेल याचा विचार सर्वसामान्य माणूस करत नाही. असं काही असतं हेच मुळी त्याच्या गावी नसतं. आपण काही घडलं की हबकून जातो. आपला गोंधळ उडतो. आपण विचार आणि विश्लेषण करत नाही. शक्याशक्यता पडताळून पहात नाही. आपण जे जीवन जगतो किंवा आपल्या वाटेला जे काही जीवन म्हणून येतं , त्या सर्व शक्यता असतात. त्या आधीपासूनच अस्तित्वात असतात. आपण त्यांना कुठे तरी भेटतो. नकळत सामोरे जातो. कोणत्या तरी अक्षांश रेखांशांवर ही भेट होते ! जे काही घडायला सुरूवात झाली आहे त्यात हे पण घडू शकते , घडेल ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही ! आपण अक्षांश रेखांशही काल्पनिक समजतो. पण इथे काहीच काल्पनिक नाही. ते अगोदरपासूनच अस्तित्वात असते म्हणून तर त्याचा विचार मानवी मेंदूत येतो. काही काळाने सत्य समोर येते पण तितका काळ खोटे असतेच ! काही काळ का होईना ; खोट्याचेही अस्तित्व असतेच ! थोडक्यात , शक्यतांचं अस्तित्व आधीपासूनच अस्तित्वात असतं. याचाच उपयोग करून काही जण प्रकरणांचा छडा लावतात ! आपण आपल्या आयुष्यात नवीन घटना घडायला सुरूवात झाली की ती चांगली असेल तर आनंदून जातो आणि वाईट असेल तर गोंधळून जातो. समस्यांमुळे तर आपण खचून जातो . स्वतःला स्थिर न करता अधिकच अस्थिर करतो . आपल्याला काही समजेनासं होतं. छोट्याश्या समस्येला आपण पार शनीच्या पीडेपर्यंत भिडवतो ! आपलं असं होणं हे अगदी स्वाभाविक असतं. हे असं का होतं ? एक तर मागील पिढ्यांनी वारंवर भीतीचे संस्कार केलेले असतात आणि दुसरे असे की आपलीही चूक होते ! आपण एखादी घटना कशी घेतो यावरच खरे तर तिच्या आपल्यावरील होणाऱ्या मनोकायिक परिणामांची तीव्रता व व्याप्ती अवलंबून असते. साधीच घटना घ्या. केळ्याच्या सालीवरून आपण घसरून पडलो तर आपणही हसतो की चार लोक आपल्याला हसले म्हणून आपल्या मनाला ते खूपच लागते ? खरं तर ही क्षणिक घटना असते. पण मनाला लावून घेतले तर त्या क्षणिक घटनेतूनही अगदी मारामारीचे प्रसंगही जन्म घेतात. थोडक्यात, आपण परिस्थितीच्या किती आहारी जातो , भावनेच्या भरात कसे अविचाराने वागतो , कसा विवेक हरवून बसतो , हे इथे लक्षात येते. इथे आपण हसत हसत उठून पुढे चालत गेलो असतो तर ते हसणारे लोक कधीच मागे पडले असते आणि आपल्यालाही त्या घटनेचा लगेचच विसर पडला असता. प्रकरण हातघाईवर येऊन राडा झाला नसता. शनीच्या पीडेचा तर मनास विचारही शिवला नसता ! थोडक्यात , आपण परिस्थितीच्या दडपणाखाली येतो. परिस्थितीचा समतोलपणे विचार करत नाही . बरेचदा, परिस्थिती चुकीच्या पध्दतीने घेतल्यामुळे आपण दुष्टचक्रात सापडतो. स्वतःवरचा विश्वास हरवून वेगळ्याच मार्गाला लागतो . हे बदलता येतं . फक्त त्यासाठी आपण परिस्थिती कशी घेतो हे महत्वाचे असते.
...देवीदास हरिश्चंद्र पाटील