देवानंदच्या सिनेमातील गाणे
#जुनी_गाणी कुणाला आवडत नाहीत ?
आजही गाण्यांच्या विविध स्पर्धांमध्ये जुनी गाणी अत्यंत तन्मयतेने म्हटली जातात. त्यांना भरपूर प्रतिसादही मिळतो ! अगदी आजही ! ही जुनी गाणी पडद्यावरही खूप कलात्मक रीतीने सादर केली गेली होती. त्यातले नायक नायिकाही खूप छान वाटायचे. विशेषतः देव आनंद सारखा रोमॅंटिक हिरो असला तर खूपच बहार यायची ! देव आनंद माझा खूप आवडता. मराठी शाळेत असतांनाच शेजारी राहणाऱ्या गंगाराम रेवाळेने मला एकदा रात्रीच्या पिक्चरला शहरातल्या टाॅकीजमध्ये नेलं. खरं तर , मी आदल्या दिवशीच पडलो होतो आणि माझं उजवं ढोपर ठणकत होतं. पण गंगाराम ऐकत नाही म्हटल्यावर माझाही नाईलाज झाला. त्याने माझ्या घरच्यांची परवानगीही मिळवली . मला तेव्हा फारसं काही कळत नव्हतंच. मी तेव्हा पाचवीत शिकत होतो ! हिंदी भाषेचा नुकताच कुठे परिचय होऊ लागला होता !
मी पाहिलेला देव आनंदचा पहिलाच चित्रपट : हरे रामा हरे कृष्णा .
मी पाहिलेला तो देव आनंदचा पहिलाच आणि एकूणच माझा दुसरा चित्रपट होता ! सखू आली पंढरपुरा हा मराठी चित्रपट मी चौथीत असताना पाहिला होता. तो गुरवांच्या बेबल्याने मला दाखवला होता. मला बहीण नाही. तिला भाऊबीजेला मी ओवाळायचो. मराठी शाळेत जायच्या आधीपासूनच मी गुरव मंडळीत जास्त असायचो. बेबल्याताई आज हयात नाही पण तिच्या स्मृती आहेत !
गंगारामने मला पिक्चरला नेलं तो पिक्चर होता हरे रामा हरे कृष्णा !
देव आनंदचा चित्रपट ! पण मला मूळात तो चित्रपट पाहण्यापूर्वी देव आनंदच काय , कुठलाच हिरो माहीत नव्हता ! गंगारामचं याबाबतीतलं ज्ञान मात्र भारीच होतं. त्यानेच मला हा हिरो देव आनंद आहे म्हणून सांगितलं , तेव्हा कुठे मला कळलं की ह्या चिकण्या नटाला देव आनंद म्हणतात ! चित्रपटात छोटा देव आनंद आणि त्याच्या बहिणींचं जे विदारक आयुष्य दाखवलं ते पाहून त्या छोट्या वयात मला रडू कोसळलं होतं. ते गाणं ऐकू या...
पण पुढे नायिकेच्या मागे दुडक्या चालीत तिरका तिरका धावणारा देव आनंद पाहण्यातही मी रमून गेलो ! कोणाला त्याचं दिल तोडावेसे वाटेल...? बघा ना , कांची रे कांची रे ...म्हणत देव आनंद कसा धावतोय ते....
हा देव पाहण्यात मी इतका की माझ्या दुखावलेल्या ढोपरावरची जखम चिघळत जातेय याचंही मला भान राहिलं नव्हतं ! चित्रपट संपला तेव्हा मी खुर्चीतून उठायला गेलो तर माझा उजवा पाय आखडल्याचं जाणवलं. मला पाऊल पुढे टाकता येईना ! गंगारामने मला कसंबसं टाॅकीजच्या बाहेर आणलं , सायकलवर बसवलं आणि घरी आणलं. मी गुपचूप अंथरूणात शिरलो. सकाळी मला उठवेना ! थंडी भरून ताप आला ! मग शाळा तीन चार दिवस बुडालीच !
तर...देव आनंदशी माझी ओळख ही अशी झाली !
पुढे पुढे तो भेटतच गेला. प्रकर्षाने भेटत गेला ! त्याच्या विविधांगी व्यक्तिमत्वावर चे अनेक लेख वाचले. त्याची खूप गाणीही मी पाहिली, ऐकली .
खणखणतं नाणं... मला खूप आवडतं... आवडेल तुम्हांलाही... कमेंट्स करालच...
ख्वाब हो तूम या ... कोई हकीगत....
तीन देविया या चित्रपटातील हे सुंदर गीत आहे. देवानंदचं गाणं
( फोटो सौजन्य : गुगल व यू ट्यूब .)
#देव_आनंद
#देवानंद
#cinema
#devanand
#picture
#gaana
#hindigeet