शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मराठी गझल : लोकशाही बंद झाली !

लोकशाही बंद झाली !



लोकशाही बंद झाली !
हुकुमशाही छंद झाली !

रंग बेरंगास आला !
संयमी स्वच्छंद झाली !

बेबनावाशीच नाते !
भावकी बेबंद झाली !

सभ्यता शरमे न आता !
शरमही बेधुंद झाली !

प्रतिक्रिया उमटे न कोठे !
माणसे का मंद झाली !

.... श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील

मराठी गझल : सत्य ते गंगेस ठावे !

सत्य ते गंगेस ठावे !  


सत्य ते गंगेस ठावे !  मी कहाणी सांगणारा !
पाप न्हाते , पुण्य होते ; धन्य होतो नाहणारा !

ठेवले बगलेत ज्यांनी लपवुनी आहे सु-याला
वाटते त्यांना तसा तो राम नाही पावणारा !

भावनांना हात जेव्हा घातला काही खुळ्यांनी
कायद्याने हात त्यांचा कलम केला वाढणारा !

एक वेडा दाखवाया लागला स्वप्नें नको ती ...
वाटला त्याला अडाणी काय जो तो भेटणारा  ?

देश म्हणजे गावचा तो पार नाही बैठकीचा
गावगप्पांनी कधी हा देश नाही चालणारा !

... देह उर्फ देवीदास हरिश्चंद्र पाटील

मराठी गझल : अर्धे अर्धे !

Life is half half ... No full satisfaction you get from many incidents in life. This half half situation in life is described in the following marathi gazal . 


आयुष्य कसे अर्धे अर्धेसे ... ब-याच गोष्टी अशा अर्ध्या अर्ध्याच राहतात ! बोलणे अर्धे , आजमावणेही अर्धे ! रस्ता , चालणे , पौर्णिमा चांदणेही अर्धेच असते ! जीव जडतो तोही अर्धा आणि त्याचे किंवा तिचेही दुरावणेही अर्धेच ! असा आयुष्याचा रंग उडता उडता ... स्वाभाविकपणे रंगणेही अर्धेच राहते  ! आयुष्यात धड काही पूर्णत्वाने घडतच नाही ! अशा वेळी काय करायचे ?..... मग अशी मराठी गझल जन्मते !


कसे बोलणे होते ... अर्धे अर्धे !
आजमावणे होते ...अर्धे अर्धे !

कसा संपतो रस्ता फिरता फिरता ...
कसे चालणे होते  ... अर्धे अर्धे !

कशी पौर्णिमा होती अर्धी अर्धी !
कसे चांदणे होते ... अर्धे अर्धे !

कसा जीवही जडला अर्धा अर्धा
कसे तोडणे होते  ... अर्धे अर्धे !

कसा रंग होता तो उडता उडता ...
कसे रंगणे होते ... अर्धे अर्धे !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील