मागे - पुढे
30.03.2020
आज कोरोना लाॅक्ड डाऊनचा सहावा दिवस सुरू झाला. सकाळी मागचा दरवाजा उघडला , तर धंज्या त्याच्या घराच्या उंब-यावर पायाखालच्या पायरीवर पाय सोडून बसलेला . समोर अर्थातच सत्त्या उभा होता. दात घासत. त्याची ही दररोज सकाळची फेरी . पण आज ते दृष्य पाहून हे मागच्या आणि पुढच्या दरवाजात घडणा-या घटनांचं संकलन करावं , अशी कल्पना अचानक सुचून गेली ! मग स्वाभाविकपणे, पुढच्या दरवाज्यात काय दिसतंय , ते पहावं म्हणून पुढचा दरवाजा उघडला. सूर्याची कोवळी किरणं घरात आली . ती अंगावर घेत अंगणात आलो तर वरच्या बाजूच्या शिरवनकरांच्या आमराईत आणि समोरच्या बंगल्याच्या चिकूच्या झाडावर वानरसेना बसलेली. मागच्या संत्याने काही कलमे केली आहेत. यंदा आंबा कमीच आहे , पण ज्या काय बारीक कै-या आहेत , त्यांचीही वानर वाट लावीत आहेत. तीच गोष्ट चिकूचीही. मी दगड उचलायला वाकलो तोच संत्याच माकडांना हाकवायला आला. बंगल्यातली भाभी विहिरीचे पाणी रहाटाने काढत होती , पण तिने चिकविनीवरच्याही माकडांना हाकलले नाही, याचे आश्चर्य करीत मी घरात आलो. सौ.ला मणक्याचा त्रास आहे. ती खाली वाकू शकत नाही. म्हणून मीच कचरा काढला तोवर ' तोंड धुवा, चहा घ्या ' असा सौ. चा आदेश स्वयंपाकघरातून आला. मी तात्काळ आदेशाचे पालन केले. हो, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक्ड डाऊनचे आदेश आल्यापासून तर आदेश पालनाचे काम मी भलतेच मनावर घेतले आहे.
चहानाश्ता झाला तसा मघाशी सुचलेल्या कल्पनेस अनुसरून हॉलमध्ये येवून कागद , पँड , पेन घेवून बसलो . चार ओळी लिहिल्या तोच दारात संत्याची हाक आली. ये रे म्हटल्यावर तो आत आला . लॉक्ड डाऊनमुळे बाजारात जाता येत नाही. त्यामुळे त्याने त्याच्याकडे शिल्लक असलेले शेवयाचे पँकेट आणले होते. सौ. ने त्याच्यासाठी चहा आणला , तसा तो खाली बसून चहा पिऊ लागला. मी हातातली लेखनसामग्री हातातच धरून बसलो होतो. संत्याची चहा पिवून झाली की तो जाईल आणि मी लिहायला सुरूवात करीन , असा विचार करीत होतो एवढयात संत्याने खिडकीतून बघून नाना येतोय म्हणून सांगितले आणि संत्या नानाशी दोन मिनिटं बोलून निघून गेला.
मी ऊठलो , हातातली लेखनसामग्री टेबलवर ठेवली , फँन लावला , खुर्ची पुढे ओढली , तोवर नाना आत आला. मी बस म्हटले. तो बसला. कोरोना धामधुमीत माझा मुलगा पुण्यात अडकला असल्याने तो चौकशीला आला होता. आम्ही चार शब्द बोलतोय तोच मुलाचाच फोन आला. माझ्या हातातच फोन असल्याने मी तो उचलतच उठलो आणि अलिखित आदेशाप्रमाणे तो सौ.कडे दिला. ती दोघं बोलू लागली . इकडे नाना आणि मी बोलू लागलो. नाना दोन तास बोलतच होता. कोरोनाकडून सुरू झालेली गोष्ट देश , चीन , दुबई , मक्का करीत करीत नमोभोवती स्थिरावू लागली . इथे गाडी रेंगाळणार हे ठरलेलेच होते. मी पुन्हा ती संस्कृतीच्या रूळावर आणली. आपली संस्कृती निश्चितपणे चांगली आहे व याप्रकारच्या काही संस्कृतींशी साधर्म्य राखणारी आहे. मानवाचा विकास होत असतांना काही टप्पे सर्वच संस्कृतींमध्ये आले. त्या टप्प्यांमुळे हे साधर्म्य स्वाभाविकपणे आले आहे. पण आपल्या संस्कृतीत लपविण्याच्या वृत्तीमुळे आलेला ढोंगीपणा , कर्मकांडांचा झालेला अतिरेक , वाढलेला भेदभाव , बोकाळलेला जातीयवाद , धर्माचा वाढता राजकीय वापर, बुवाबाजी , अडाणीपणा आणि नंतर शिकूनही आलेला अडाणीपणा यांमुळे आपण आपली खरी संस्कृती विसरलो , यांवर आमचे एकमत झाले . ऐपत नसतांना काहींनी आपली मुले केवळ बडेजावासाठी व इंग्रजी शाळांच्या आकर्षणापायी तिकडे शिकायला घातली. पुढे त्यांनीही काही मोठे दिवे लावले अशातली गोष्ट नाही , असे नानाचे मत पडले. मलाही ते फारसे चुकीचे वाटले नाही. कारण , त्या नादात मराठी शाळा ओस पडल्या , हे मी पाहिले आहे. नाना निघाला तोवर बारा वाजले होते. माझी आंघोळही राहिली होती ! हा लॉक्ड डाऊनचा परिणाम आहे. याला मी जबाबदार नाही , असे सौ.ला सांगून मी बाथरूमकडे वळतोय तितक्यात मागच्या बीनाची आई पुढच्या दारावर आली ! सौ. तिचे स्वागत करतेय हे पाहून मी बाथरूममध्ये गेलो. आंघोळ केली आणि देवासमोर बसून श्रीपाद श्रीवल्लभांचे दोन अध्याय वाचले. तरी बीनाची आई व ही पुढे पायरीवर बसून बोलतच होत्या. त्यात भर पडली होती ती बीनाची . मी पुढे येईपर्यंत बीना निघून गेली होती. मी मोबाईल घेतला आणि दरवाज्याला टेकून बसत त्या दोघींच्या संभाषणात सहभागी झालो. बीनाची आई निघाली तोवर दीड वाजला . जेवणाची वेळ झाली.
जेवायला निघतांनाच मुलाला फोन केला . तो खिचडी खाऊन दुपारची झोप घेण्याच्या विचारात होता. संध्याकाळी सहा ते पहाटे तीन असे त्याचे वर्क फ्रॉम होम सद्या सुरू आहे. त्यामुळे संध्याकाळी लवकर उठून सहाच्या आत त्याला रात्रीचे जेवण तयार करून ठेवावे लागणार आहे. आम्ही जेवल्यानंतर सौ. म्हणाली मी झोपते . तिला काल रात्रभर झोप लागली नाही. माझा अधूनमधून तरी डोळा लागला होता. ती झोपली तसा मी मोबाईल घेवून पुढच्या पायरीवर बसून त्यावरच हे सारे टाईप करू लागलो.
सौ. अर्धा पाऊण तास झोपली नसेल तेवढयात बीनाची आई मिरची मोडायला आली. तिने बीनाला हाक मारली आणि ती ऐकून ही जागी झाली . तिघी जणी मिरची मोडू लागल्या . मिरची मोडून झाल्यावर बीना घरी गेली. दुपारचा चहा झाला तसा बीनाची आई आणि सौ. पुढच्या दारी पायरीवर बसून गप्पा मारू लागल्या. मी टीव्हीवर बातम्या चालू केल्या. सर्वत्र एकाच विषयाच्या बातम्या सुरू होत्या. कोरोना भारतात वेगाने पसरतोय. संपूर्ण संचारबंदीचे तीन तेरा वाजवीत लोक मुक्त संचार करू लागले आहेत. जिवाच्या आकांताने पोलीस शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत , पण लोक पोलीसांच्याच जीवावर उठत आहेत. आपण कोणत्या वेळी काय करीत आहोत याचे भान कोणाला दिसत नाहीय. हे अतिशय दुर्दैवी आहे. सोशल मिडीयावर अनेक जण याही परिस्थितीत पक्षनिहाय टीका करण्यात धन्यता मानीत आहेत. अफवा पसरवल्या जात आहेत आणि अाॅनलाईन गंडे घालणारे हरामखोर जागे झाले आहेत. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणा-यात या नालायकांचाही सामावेश आहे. माणसांची आणि दारूचीही अवैध वाहतूक सुरू झाली आहे. होते काय आणि आपण करतोय काय ! कोणालाच कसेलच भान नाही ! हे सुविद्य भारतीय नागरीक आहेत का जे संपूर्ण देशाच्याच जीवावर उठले आहेत ? विचार करून डोके सुन्न होऊ लागले तसा मी टीव्ही बंद केला. ढोकणे सरांनी गझलसद्रुष्य रचना पाठवून चारपाच दिवस झाले होते. ती माझ्या कुवतीने मी थोडी व्यवस्थित करून व्हॉट्सॲपवर पाठवली. दोन दिवसांपूर्वी जाधव मँडमनीही त्यांची रचना पाठवलीय , पण त्याबाबत आज काही करणे शक्य दिसत नाहीय. साँरी मँडम. बसून बसून कंटाळलो तसा अंगणात फिरू लागलो. मोकळया हवेने जरा बरे वाटले. थोडया वेळाने बीनाची आई तिच्या घरी गेली.
संध्याकाळ झाली . शेजारी चुलत भावाचे घर आहे. तो मुंबईत असतो. त्याच्या आणि आमच्याही देवापुढे दिवाबत्ती केली. कोरोना संपावा म्हणून प्रार्थना केली. सौ. टीव्ही लावून बसली. आठ साडेआठला मुलाचा फोन आला. सौ. त्याला सूचना करू लागली . कशावरून तरी त्यांचे भांडण झाले आणि सौ.ने फोन माझ्या हातात दिला. तिला पुढे बोलवेचना . ती रडू लागली . तिला सावरत सावरतच मी मुलालाही फोनवरून समजावले . ती वेळ अधिक बोलण्याची नव्हतीच. सौ. ची अवस्था बघून माझे प्रेशर वाढले. मनावरचा ताण पोटावर आला . गळयापर्यंत दडपण येवू लागले. घाम फुटला. मला काही तरी होतय या कल्पनेने सौ. अधिकच घाबरली . तशाही परिस्थितीत मी स्वत:ला कसोशीने सावरले. दोघांचीही जेवायची ईच्छा मेली होती. शेजारच्या मिल्याला फोन करून ओवा मागून घेतला. तो येईपर्यंत सौ.ला दूध गरम करायला सांगितले. मिल्याला थांबवून त्याच्याशी बोलता बोलता मी व सौ. ने दूध व बिस्कीटे खाल्ली. मी दुधातच ओवा टाकला होता. मिल्या बोलत थांबला म्हणून मी जरा सावरलो. मात्र , मिल्या गेला तरी मला थोडेसे अस्वस्थ वाटतच होते . मग मी सौ. ला म्हटले , जरा अंगणात फिरूया. बरे वाटेल. पण तिचा पाय दुखत असल्याने हॉलमध्येच फिरा असे ती म्हणाली. मीही मग टीव्ही बघता बघता हॉलमध्येच फे-या मारू लागलो. जरा बरे वाटले. झोपायची वेळ झाली. अकरा वाजले. आदल्या रात्री आम्हांला अजिबात झोप आली नव्हती. सौ. ने झोपेची गोळी घेतली. माझी अवस्था बघून मलाही घ्या म्हणाली. पण मी ते टाळले. थोडया वेळाने मीही बेडवर पडलो. थकलो होतोच. मध्येच साडेबाराला दोघांनाही जाग आली. मग परत झोप लागली ते सकाळीच उठलो. कोरोना लॉक्ड डाऊनचा आणखी एक दिवस संपला व पुढचा सुरू झाला ....