ते मला उघड्या डोळ्यांनी दिसतं !
खरेच सांगतो , ही कपोलकल्पित कहाणी नाही ! माझ्या दुस-या ब्लाॅगवर मी इंग्रजी भाषेत यापूर्वी या विषयावर लिहिले आहेच . काल म्हणजे 10 जानेवारी 2018 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्याने मी अगदी जागा असतांना आणि पत्नीशी बोलत असतांना माझ्या डोळ्यांसमोर जे दिसले , त्याची प्रचिती दुस-या दिवशी दुपारी सव्वा तीन वाजता आलेल्या फोनमुळे आली ! हा विषय तसा थोडा विचित्रच आहे . सुरूवातीला तरी मलाच विचित्र वाटला होता ! तसे हे सारेच अविश्वसनीय आहे ! माझाही यावर विश्वास बसला नव्हता ! किमान मला पूर्ण जागेपणी , उघड्या डोळ्यांनी काही घटना घडत असतांना दिसतात ! काही माणसे , काही ठिकाणे बसल्या ठिकाणी दिसतात ! नंतर त्या घटना प्रत्यक्षात जशाच्यातशा किंवा थोड्याफार बदलाने घडतात ! ! अगदी अलिकडच्याच दोन घटना पहा . त्यानंतर 11 जानेवारी 2018 रोजी काय घडले ते सांगतो !
2017 च्या डिसेंबर महिन्यात मी आजारी पडल्याने मला एका हाँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते . सकाळची वेळ होती . सलाईन लाऊन नर्स गेली होती . माझी पत्नी माझ्याशी बोलत होती . अशक्तपणामुळे मी डोळे मिटून बोलत होतो . अचानक मला आमच्या स्पेशल रूममध्ये पाद्री , नन आणि काही जण क्रॉस घेऊन आलेले दिसले . माझ्या ऊशाशी त्यांनी क्रॉस ठेवला आणि मी डोळे उघडून पाहिले तर तिथे फक्त माझी पत्नीच होती . मी दरवाजाकडे बघितले तर दरवाजा चक्क बंद होता ! मी पत्नीला ह्या चमत्कारिक देखाव्याबद्दल सांगितले . तेवढयातच वरच्या मजल्यावर जाणा-या जिन्यावर दाणदाण असे पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले ! पाच मिनिटांनी चक्क प्रार्थनेचे शब्द माझ्या कांनी पडले ! डावीकडच्या खिडकीतून पाहिले तर त्या दिशेने वरच्या मजल्यावरून ते शब्द येत होते . तेव्हा मला मघाचच्या पाद्री , नन , क्रॉसचा अर्थबोध झाला ! हे तसे लगेचच आलेले प्रत्यंतर ! मात्र , दुस-या दिवशी दिसलेल्या घटनेचे प्रत्यंतर दोन तीन दिवसांनी आले !
ती घटना जबरदस्त आहे आणि जगाच्या चिंतेत भर घालणारी आहे ! त्या दिवशीही मला सलाईन लावलेलेच होते. मी आणि माझी पत्नी बोलत होतो . दुपारची वेळ होती . बोलणं थांबलं . मी क्षणभर डोळे मिटले ...आणि मला जे दिसले ते फार भयानक होते ! माझ्या रूमच्या समोरच्या रूममधून एक जगभरात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी बाहेर पडतांना दिसला ! त्याची पॅसेजमध्ये पडणारी पावले मी पाहिली ! पिवळसर सफेद झब्ब्यातल्या त्याला मी स्पष्ट पाहिले ! अवघ्या काही फुटांवरून चालतांना ! त्याच्या चेह-यावर गूढ स्मित होते ! मला या स्मिताचा अर्थ दोन तीन दिवसांनी तो त्याच्याच देशाच्या नजरकैदेतून सुटल्याची बातमी टीव्हीवर पाहिली , तेव्हा कळला ! माझ्या पत्नीलाही या प्रकाराने धक्काच बसला ! पुढे होणा-या घटना मला आधी अगदी जागेपणीसुध्दा दिसतात , यावर आता तिचाही विश्वास बसू लागला होता !
तर पहिल्या परिच्छेदातली ताजी घटना सांगतो . 10 जानेवारी 2018 ला मी माझ्या एका काकांच्या घरात एका खोलीत उभा दिसलो . वेळ रात्री 08 ते 09 ची असावी . माझ्यासमोर माझे काका अंथरूणावर बसलेले आणि त्यांचे कुटुंबीय अंथरूणात आडवे झालेले दिसले . मी तिथे गेलो तेव्हा ते आपसात बोलत असावेत . मला एवढेच दिसले की माझे काका माझ्याकडे कटाक्ष टाकीत आहेत . ते खूप बारीक झालेले माझ्या लक्षात आले आणि माझी लिंक तुटली . प्रत्यक्षात माझ्या त्या काकांचे निधन होऊन दोन वर्षे झालेली आहेत . मयत काका जिवंत परंतु अतिशय बारीक दिसले . असं कसं दिसलं असावं , याबद्दल माझी व पत्नीची चर्चा झाली आणि स्मरणकेंद्रात पडून राहिलेल्या काही घटना अशा अचानक डोळयासमोर तरळतात , असे आम्ही दोघेही म्हणालो . मला पटत नसूनही झोप महत्वाची असल्याने मी चर्चेला पूर्णविराम देऊन झोपी गेलो . पण मला काही तरी खटकत होते . मला भीती वाटत होती . काही तरी होणार , अशी मी मनाशी खूणगाठ बांधली होती . झालेही तसेच . मात्र मी शहरामध्ये माझ्या कामात काहीसा व्यस्त असल्याने मी काहीसा गाफील झालो होतो . पण घडणारे घडलेच होते . दुपारी 03.15 ला मला माझ्या एका शेजा-याचा फोन आला . बातमी वाईट होती . माझ्या मित्राच्या पत्नीचे निधन झाले होते ! काल डोळयासमोर मयत काका जिवंत दिसले होते आणि आज जिवंत वहिनी मयत झाली होती . ती नेमकी त्या काकांच्या मागच्या बाजुच्या लगतच्या घरातलीच ! ती बरीच वर्षे आजारीच होती आणि खूप बारीकही झाली होती ! माझ्या मनात ते काकांचे बारीकपण घोळू लागले आणि सगळी उकल झाली ! मी माझे काम गुंडाळले आणि तडक मित्राचे घर गाठले !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
१३.०१.२०१८
१३.०१.२०१८