ONLY DEVIDAS ! Me to myself & You ! Top Marathi and Hindi articles, poems and gazals. फक्त देवीदास ! साहित्यिक देवीदासाचा स्वतःशी आणि तुमच्याशीही सुरू असलेला सुसंवाद ! आयुष्य तितकेसे सोपे नसतेच कुणालाही . आयुष्याकडे बघतांना बरेच काही जाणवते , आढळून येते. स्वतःच्या व इतर अनेकांच्या आयुष्यातील अनुभवांची ही शिदोरी...फक्त देवीदासाच्या शब्दांत... खास तुमच्यासाठी !
Pages
- ABOUT ME
- Privacy Policy
- पान परिचय
- अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख
- माझ्या मराठी गझला
- माझ्या हिंदी गझला
- माझे कार्यक्रम माझी भाषणे
- विचित्र स्वप्ने भयानक घटना
- माझ्या मराठी कविता
- माझी मराठी गाणी
- माझी मराठी भक्ती गीते
- आवडती गाणी
- माझे मराठी लेख
- राजकीय लेख
- मागे पुढे
- कोरोनाचा काळ
- स्फूट लेखन
- नवलाई पावणाई मंदिर , जाकीमिऱ्या
- कुटुंबासाठी
- पुस्तक परिक्षण
- सुंदर संदेश
- बोलके काव्य
मंगळवार, २५ जून, २०२४
लोकांचं काय राव ...
रविवार, २३ जून, २०२४
राहिला केर काढायचा
राहिला केर काढायचा
आदरणीय सुरेश भट यांचं आणि माझं नातं काय आहे हे नाही सांगता येणार. काही गोष्टी नात्यापल्याड असतात. बंधनांच्या धाग्यापल्याड जातात. मी असं का म्हणतो तर भटसाहेब कधी कधी असं लिहून गेलेत ना की ते कधी कधी अगदी माझ्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं. बाकीचं मी नंतर कधी तरी सांगतो.
आताची घटनाच बघा ना.
आताची घटनाच बघा ना. सकाळ झाली. मी सूर्यदर्शन घेऊन आलो. अंगण नीट झाडून झाले. आता घरातला कचरा काढायचा. मी तो रोजच काढतो. मराठी शाळेतली गुरुजींनी लावलेली शिस्त आहे ती ! हाती धरून झाडू ...हे तेव्हा पासून कानांवर पडलेले आणि अंतरात गेलेले बोल आहेत. तेव्हा ही स्वच्छतेची नाटके नाहीत. आपल्याला तोच तोच कचरा जागच्या जागीच ढकलून आपले काही फोटो काढून घ्यायचे नाहीत आणि कुठे छापून पण आणायचे नाहीत. आपल्याला कुठे महात्मा बनायचंय ! आपण पडलो सामान्य माणूस. त्यातही सेवानिवृत्त . सेवानिवृत्तीलाही साडेपाच वर्षे झालेली ! आपण आपलं अंगण , आपलं घर लख्खं करावं आणि त्या आनंदात डुंबावं. अर्थात, अंगण साफ झालं आता घरात येऊन झाडू लागतो तर मी पुढे जातो पण कचरा मागे उरतोच ! मग मी पुन्हा मागे येतो आणि पुन्हा तो कचरा पुढे घेऊन जातो. हे मात्र होतं. तेवढंच मागे पुढे होतं. आता जड व्यायाम जमत नाही तर हा हलका व्यायाम आपसूक होतो. असे नाही तसे हात पाय हलतात, कमर हलते ! मागे पुढे , खाली वर होतंय. बरं वाटतं. फक्त तेवढा कचरा ऐकत नाही. किती काढला तरी सौ. कुठल्यातरी कोपऱ्यातले नाही तर छतावरचे खुसपट दाखवतेच ! कचऱ्याचं हे रोजचंच असं आहे. मी किती काढला तरी काढायचा राहून जातोच. जातो तर जातो... सौ. च्या नजरेत येतो, खुपतो आणि ती मला दाखवूनही देते... कचऱ्याची आणि माझीही जागा ! आता इतकं सगळं झाल्यानंतर मला दररोज सुरेश भटांचे ते जणू काही माझ्यासाठीच लिहिलेले शब्द न आठवले तरच नवल ! कुठले म्हणता ? सांगतो. नाही तरी हे खूप लांबलंय. मुक्त कवितेसारखं. तर सुरेश भट लिहून गेले आहेत :
तर तो केर मागे राहतोच ! हे आठवत मी रोजच केर काढत असतो. गुरुची आठवण वेगळी काढावीच लागत नाही ! नशीब असते एकेकाचे राव !!
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२४.०६.२०२४
शनिवार, २२ जून, २०२४
फेसबूक प्रोफाईल प्रोफेशनल मोडमध्ये
मित्र हो, हल्ली मी फारसा व्हॉट्स अॅप वर दररोज सकाळ संध्याकाळ शुभसंदेश पाठवत नसतो . इतरही काही मी व्हॉट्स अॅपवर करीत नव्हतोच. हल्ली हल्ली म्हणजे अगदी हल्लीच म्हणजेच १७ मार्च २०२४ पासून . यात काही विशेष नाही म्हणा. म्हणजे त्यात व्हॉट्स अॅपला विशेष वाटण्यासारखे काही नाही किंवा व्हॉट्स अॅपवरच्या माझ्या सोबत्यांना , ग्रूप्सना विशेष वाटण्यासारखे काही नाही म्हणा आणि कोणाला काही वाटलेलेही नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. संदेश पाठवतांनाच त्यांचा किती वेळ जात असेल ... त्यात आता सगळ्यांचेच जीवन घाईगडबडीचे. आहे कुणाला वेळ इतक्या किरकोळ माणसासाठी इतका बारीक विचार करायला ! आपण समजून नको का घ्यायला ? अशा वेळी आपणच समजून घ्यायचं असतं. त्यात चुकीचं काहीच नाही, नाही का ? असो, विषय तो नाहीच आहे . पण अशीच तुम्हीही एक गोष्ट समजून घ्यावी म्हणून खरे तर हा पोस्ट प्रपंच !
विषय खरा असा आहे की माझी ही फेसबूकवरील प्रोफाईल प्रोफेशनल मोड मध्ये असल्याने मला आता इतर उद्योग सोडून कसे प्रोफेशनल मोडचे उद्योग करावे लागणार. म्हणजे मला ही जाग नेहमीप्रमाणे उशिराच आली आहे ! आधी मी बराच काळ फेसबूकवर नव्हतो. मग व्हॉट्स अॅपवर कमी झालो आणि परत फेसबूकवर आलो ( सवय आपली 😂 ! ) ...तर ही प्रोफेशनल मोडची अचानक जाणीव झाली. आता जाणीव झालीच आहे तर करावी काही तरी धडपड प्रोफेशनल व्हायची . आपल्या कलंदर भावनिक जीवनात तेवढीच उणीव राहिली होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बघू पुढे पुढे काय होईल ते....म्हणजे तुम्हांला ते दिसणारच आहे...
भेटत राहूच. तुमचा अपार स्नेह सोबत आहेच !
...देवीदास हरिश्चंद्र पाटील.
१४.०६.२०२४ दुपार १४. ००
#फेसबूक
#story
शुक्रवार, २१ जून, २०२४
राजकीय खुमखुमी
राजकीय खुमखुमी
लोकसभेची निवडणूक झाली. अब की बार चे बार हवेत उडून विरले आहेत. मग आता काय उरले आहे ? तर विधानसभा ! हल्ली निवडणूका आखाडा बनून गेल्या आहेत. विधानसभेचे रणकंदन तर आतापासूनच सुरू झाले आहे. हा याच्या बालेकिल्ल्यात , तो त्याच्या बालेकिल्ल्यात , हा वार करतो तो पलटवार करतो, तो ह्याला टोला हाणतो, हा त्याला टोला हाणतो, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढण्यावाचून या राजकारण्यांना काही काम असते की नाही हीच शंका येते ! मतदारांसाठी पवित्र कर्तव्य आहे बघा ! त्यांनी ते बजावण्यासाठी केवढा आटापिटा , केवढी जाहिरातबाजी त्यांच्याच खर्चाने केली जाते ! मतदारांचे पवित्र कर्तव्य काय तर मतदान करणे. मग उमेदवारांचे वा निवडून आलेल्यांचे पवित्र कर्तव्य काय हीन पातळीवरचे आरोप एकमेकांवर करणे हेच आहे का ? एकमेकांवर चिखलफेक करून हे कोणता महान आदर्श उभा करत आहेत ? राजकारण करणे म्हणजे केवळ नळावरची भांडणे करून बेलगाम वक्तव्ये करणे आहे का ? लोकसभेत वा विधानसभेत अर्वाच्च भाषेत बोलणे, रस्त्यावर असल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे , हे कशाचे द्योतक आहे ? मग त्या पवित्र मंदिरात जाण्याआधी पाया पडण्याची नाटके तरी कशाला ? या लोकांना काही नियम आहेत की नाहीत ? बंधने आहेत की नाहीत ? संविधान याबाबत काय सांगते ? सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचे यावर काय म्हणणे आहे ? याप्रकारे लोकशाहीची केली जाणारी क्रूर चेष्टा कशी थांबणार ? की ठोकशाही हा लोकशाहीचा गौरव म्हणायचा ? आता फलकयुध्ये सुरू आहेत. याचे फलक त्याच्या बालेकिल्ल्यात, त्याचे फलक याच्या बालेकिल्ल्यात आतापासूनच दिसू लागले आहेत. आत बरेच काही धुमसते आहे. राजकीय खुमखुमी डोके वर काढीत आहे. आखाडा पुन्हा रंगू लागला आहे.
पण हे जे राजकीय लोक आले ते आले कुठून ? त्यांना ही अर्वाच्च भाषा , ही खुमखुमी आली कशी आणि आली कुठून ? हे वाढले कुठे ? हे जे काय शिकले ते शिकले कुठे ? हे असे बनण्यात समाजाचे योगदान नाही काय ? यांना शाळेत शिक्षकांनी शिक्षा केलीच नसेल ? ती केल्यावर शिक्षकांनाच धारेवर धरणारे कोण होते ? ज्या शिक्षक वर्गाने स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून राष्ट्र घडविले त्या शिक्षकवर्गालाच वाहयात पोरांना शिस्त लावली म्हणून थेट पोलीस स्टेशन दाखवणारे कोण होते ? ही एक पिढी अशी होईपर्यंत आणि तिच्या नादाने पुढच्या काही पिढ्या नादान होईपर्यंत झोपा काढणारे कोण ? अंतर्मुख होऊन आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही ? की नुसतेच राजकारण्यांना दोष देत बसणार आहोत ? लोकशाहीसाठी आपण काही करणार आहोत की नाही ? की मतदान हेच आपले एकमेव पवित्र कर्तव्य आहे अशी साळसूदपणे ठाम समजूत करून घेणार आहोत ? ही लोकशाही कोणासाठी आहे ? लोकांसाठीच ना ? मग ती जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे की नाही ? याची उत्तरे प्रत्येकांने स्वतःलाच विचारायची की नाहीत ? हे लोकांचे सर्वात मोठे पवित्र कर्तव्य नाही का ? बेलगाम नेत्यांनी लोकशाही शिकवण्याइतके लोक अजूनही अजाण आहेत का ? ते सूज्ञ होणार तरी कधी ?
...देवीदास हरिश्चंद्र पाटील
२१.०६.२०२४ सकाळी ११.००
#politics
शुक्रवार, १४ जून, २०२४
वराडचो चिवडो , मालवणचो खाजो घेवा
दिवा एक्स्प्रेस
रविवार, ९ जून, २०२४
ओळखीच्या खुणा
ओळखीच्या खुणा
ओळखीच्या खुणा हा अविनाश फणसेकर सरांचा काव्यसंग्रह. आज मी ह्या काव्यसंग्रहातील काही कवितांवरच लिहिणार आहे. खरे तर, त्यात मला सापडलेल्या रत्नागिरीच्या मराठी गझलच्या ओळखीच्या पाऊलखुणांबद्दल मी इथे लिहिणार आहे. सर गणिताचे प्राध्यापक होते पण त्यांचे मन कवींचे होते. कलंदर कवींचे होते. त्यांचा हा काव्यसंग्रह रत्नागिरीच्या कीर पब्लिकेशनने मार्च २०१४ मध्ये प्रकाशित केला . दुर्दैवाने सर तेव्हा हयात नव्हते. दहा वर्षांनी या काव्यसंग्रहाची आठवण व्हायचे कारण म्हणजे या काव्यसंग्रहातील आदरणीय प्र. ल. मयेकर यांचे भावनोत्कट मनोगत . त्यात ते म्हणतात , " ...त्यांच्या प्रतिभेमध्ये आसमंत उजळून किंवा जाळूनही टाकण्याची शक्ती नक्कीच होती. पण त्यांनी स्वतःच तो अग्नी गिळून टाकला होता. कुठून आणली या माणसाने ही संतांची करूणा ? फणसेकर सर आपल्यासोबत या प्रश्नाचं उत्तरही घेऊन गेलेले आहेत..."
माझा दावा नाही पण...
प्र. लं. सारख्या थोर व्यक्तीला जे उत्तर सापडले नाही ते मला सापडले असा मी दावा करणे हास्यास्पद आहे व तो मी करीतही नाही. पण मला प्र. लं. च्या त्या प्रश्नांतील संतांची करूणा या शब्दांनी फणसेकर सरांच्या कवितेकडे अधिक ओढलं हे मात्र खरं ! फणसेकर सरांचा मला काही वर्षेच सहवास लाभला. ते विव्दान प्राध्यापक , नाटककार व कलंदर कवी. तर मी नुकताच काव्यमैफिलींमध्ये दिसू लागलेला. सुरूवातीला तर त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीतीच वाटायची. पण तरीही माझा स्नेह त्यांच्याशी जुळला यात त्यांचाच वाटा फार मोठा होता. सन १९८५-९० चा तो काळ होता. रत्नागिरीत साहित्यिक कार्यक्रम फार दुर्मिळ असायचे. पण स्मिताताई राजवाडे , विनय परांजपे यासारखी सतत धडपडणारी माणसे किमान छोटेखानी कवी संमेलन तरी अधूनमधून घडवायचीच. मी त्यांच्यासोबतच असायचो . बरेचदा फणसेकर सर व्यासपीठावर असायचे. तिथूनच ते सांगायचेत , " देवीदास, आज तुझी गझल झालीच पाहिजे " . कधी कधी तर हक्काने माझ्या पाठीवर थाप मारून ते तसं सांगायचेत. खरं तर सरांचा पिंड गझलकाराचा होता. त्यांची कलंदरी गझलियतशी मिळतीजुळती होती. पण चुकूनही कधी मी गझल लिहितो किंवा मी माझी गझल सादर करतो असं ते म्हणाले नाहीत. उलट माझ्यासारख्या यत्किंचित कवीला ते गझल सादर करायला आवडीने सांगायचे.
अशा या थोर मनाच्या माणसाच्या काळजात कुठेतरी खोल गझल होती. मला वाटतं, प्र. लं. सर म्हणाले ती संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. ' तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही ' हे शब्द सुरेश भटांनी किती खात्रीने लिहिले असतील ! सुरेश भटांना हे सामर्थ्य गझलनेच दिलं असावं आणि त्याच पध्दतीने संतांची करुणा पेलण्याचं सामर्थ्य फणसेकर सरांना गझलेनेच दिलं असावं. कारण, संकट काळात मन मजबूत करण्याचं सामर्थ्य गझलमध्ये आहे, हे जीवन संघर्षात मी अनेकदा अनुभवले आहे, अगदी आजही, हा लेख लिहीत असतांनाही अनुभवतो आहे.
फणसेकर सरांची कविता समजून घेण्यासाठी त्यांचं व्यक्तिमत्व जाणणंही आवश्यक आहे. मराठी गझल ही वृत्तात लिहिली जाते. पण फणसेकर सर कलंदरी वृत्तीचे. स्वच्छंद कवी. पण गझलची वृत्ती भिनलेले कवी. आदरणीय सुरेश भट ज्याला गझलची वृत्ती म्हणतात ती फणसेकर सरांकडे ठासून भरलेली होती. गझलेचा भाव, आवेश आणि आवेगही त्यांच्या रचना व सादरीकरणातही भरपूर असायचा. ते मोकळेढाकळे असल्याने वृत्तांच्या खटपटीत ते अडकले नसावेत. पण त्यांनी गझलच्या ढंगाने जाणाऱ्या कविताच नव्हे तर गीतेही लिहिली आहेत, याचा पुरावा म्हणून या काव्यसंग्रहाकडे पाहता येते !
या संग्रहातल्या पहिल्याच गीतात मला त्यांच्यातला गझलकार दिसला ! या गीताच्या पहिल्या दोन ओळीत गझलेतले यमक, अंत्ययमक डोकावते. आपण प्रत्यक्षच पाहुया :
मी स्वप्नात पाहिलेले कुणी एक गाव होते
आठवूनी आठवेना काय त्याचे नाव होते
यानंतरच्या कडव्यांच्या शेवटच्या ओळींही याच धर्तीवर लिहिलेल्या आहेत. पहा,
कुठे पहारे भासले चोरापरी ते, अंतरीचे साव होते
रस्त्यात भेटणारे रंक तेथील राव होते
भक्ताच्या चेहऱ्यावर देवतांचे भाव होते ...
अशीच गझलमयता ' नाहीच योग आता ' या गीतात व यापुढील काही गीतातही आढळते. काही कविताही गझलसदृष्य आहेत. ' हासू नकोस आता ' ही तर गझलच्या खूप जवळ जाणारी कविता. हिचे शिर्षकही गझलेच्याच ढंगाने जाणारे. तुमचे हजार सूर्य हीसुध्दा गझलचीच वृत्ती दाखवणारी. सूर एकदाच अपुले , मीही कुणीतरी आहे, बदनाम हा जगी या , नशेची खुमारी , खुद्द गजल या नावाच्या दोन रचना, कधी भेटलीस तर, जिंकुनी मैफिल गेली, आता नशेत आहे, चंद्र माझ्या मनीचा, त्यानंतर कागदाच्या या फुलांना , एका मुशाफिराला, दोस्तांनो, यांची शिर्षकेच नव्हेत तर यातल्या सर्व ओळी पाहिल्या की सर किती गझलमय झाले होते याची कल्पना येते. सरांनी गझलबद्दल तेव्हा चर्चा केली असती तर नक्कीच चित्र वेगळे दिसले असते. पण तो योग कधी आलाच नाही. मीही नुकताच गझलसदृष्यतेतून बाहेर पडलो असल्याने गझलबाबत काही सांगावे या कुवतीचा नव्हतो . ते माझ्या साध्याशा गझलांवरही प्रेम का करत होते, मला गझल सादर करायचा आग्रह का करत होते, ते स्वतःच्या गझलचं प्रतिबिंब तर माझ्या गझलांमध्ये पहात नव्हते इ. प्रश्नांचे उत्तर म्हणजे त्यांच्याच हृदयात खोल बसून राहिलेली गझल होय ! होय, याच गझलने त्यांना संतांची करुणा पेलण्याचे सामर्थ्य दिले असावे असे आज हटकून वाटते !
तुम्हांला याबद्दल काय वाटते ते नक्की कळवा, ही विनंती.
....देवीदास हरिश्चंद्र पाटील.
शनिवार, ८ जून, २०२४
मराठी गझलविषयक पान
मित्रांनो, या ब्लॉगवर मराठी गझलसाठी " अशी शिका मराठी गझल व गझलविषयक अन्य लेख " हे वैशिष्ट्यपूर्ण पान जोडण्यात आले आहे. यामध्ये मराठी गझल विश्वातील अनेक घडामोडींवरील वाचनीय लेख आपणांस मिळतील. अवश्य वाचा व प्रतिक्रिया द्या.
मराठी गझल आपला ठसा उमटवत चालली आहे. आद. कवीवर्य सुरेश भट किती द्रष्टे होते ते त्यांनी प्रत्यक्ष सांगितलेल्या दोन वाक्यात दिसून येते. या ब्लॉगच्या एडमीनना ते बरेचदा म्हणायचे , " देवीदास, तू मराठी गझलची चिंता करू नकोस. ती सर्वदूर जाणारच ! "
तर प्रत्यक्ष जन्मदात्याचे हे बोल अक्षरशः खरे झाल्याचे आज दिसते आहे आणि मराठी गझल अधिकाधिक बहरते आहे. त्याच मराठी गझलचे हे पान आपणांस निश्चितच आवडेल !
शुक्रवार, ७ जून, २०२४
विचित्र स्वप्ने भयानक घटना यांचे खास पान
विचित्र स्वप्ने भयानक घटना हे पान खरोखरच अंगावर काटा उभा करणारे पान आहे. यात फार विचित्र स्वप्नें पडलेली नमूद केलेली आहेत. अनेक भयानक घटनांची जंत्रीही इथे सापडेल. या पानात पूर्वी पडलेली प्रत्यक्ष स्वप्नें किंवा घडलेल्या भयावह घटना अंतर्भूत असलेल्या लेखांच्या लिंक्स दिल्या जातील जेणेकरून अन्य तपशिल वगळून स्वप्ने व घटना याबाबतची या ब्लॉगवरील मनोरंजक माहिती आपल्याला वाचता येईल. तसेच अन्य ब्लॉगवरील अशा काही लेखांच्या लिंक्सही दिल्या जातील. यातून स्वप्नांचे व घटनांचे एक वेगळेच जग आपल्यासमोर येईल.