फुलेल प्रीत ही कधी ?
प्रत्येक क्षेत्रात नवोदित असतात . साहित्य क्षेत्रातला तोही काव्य प्रांतातला एक नवोदित मला परवाच भेटला . गोष्ट साहजिकच त्याच्या भावी वाटचालीवर आली .
तो त्याबाबत ठाम होता. कवीच तो , त्याने मला दोन दोन ओळी ऐकवल्याच !
तुझेच श्वास लाडके, तुझेच भास अंतरी
अजून दूर तू तरी , तुझा निवास अंतरी
ती त्याची अत्यंत लाडकी होती ! तिचे श्वास, भास सर्व काही त्याच्या मनात होते . ती दूर असली तरी तो तिला विसरूच शकत नव्हता ! तिचे स्थानच मुळी त्याच्या काळजात होते ! प्रश्न एवढाच होता की ती अंतरात असूनही खूप खूप दूर होती. कोण होती ती ? ती तर त्याची प्रतिभा होती ! तो नवोदित होता याची त्याला जाणीव होती. म्हणूनच तो तिला वर काढू इच्छित होता .
आपण जुने ते सोने म्हणतो . पण तो म्हणत होता :
नकोनकोच वाटती जुनेच मार्ग कालचे
तुझेच लागले अता नवीन ध्यास अंतरी
तो नाविन्याचा भक्त आहे . त्याला रोज नवीन ध्यास लागलेले आहेत . अर्थात प्रतिभेचेच ! कारण तो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो . त्याने मला सांगितले की तो तिला सारखा विचारता असतो :
फुलेल प्रीत ही कधी ? जुळेल गीत हे कधी ?
कधी फुलेल गे तुझा वसंतमास अंतरी ?
आणि मला ही भीती वाटत होती की , वसंत आला निघून गेला , मला कुठे ( त्या नेमक्या वेळी ) देहभान होते, अशी तर ह्याची अवस्था व्हायची नाही ना ? नको नकोच ! देवा असे होऊ देवू नकोस ! कारण तो तर बिचारा तिच्या भेटीसाठी आतुर झाला होता ! अतिशय आर्तपणे तो तिला साद घालीत होता :
उशीर लावतेस का ? दुरून छेडतेस का ?
अधीर जाहली अता . . . तुझीच प्यास अंतरी !
मला वाटते की आता तिने त्याला भेटावेच ! कारण ,
" क्षणोक्षणी जिथे तिथे दिसे मला तुझा ऋतू
तुझाच जाहलो अता , तुझाच दास अंतरी "
याप्रकारे तो आता तिचाच दास झालेला आहे ! त्याचा देवदास न होता त्याची मनोदेवता - साहित्यप्रतिभा - त्याला भेटावी , हीच ईच्छा !
1 टिप्पणी:
खूपच छान !!
टिप्पणी पोस्ट करा