शुक्रवार, २६ जुलै, २०२४

काळजी घ्या मित्रांनो !

काळजी घ्या मित्रांनो !

तुमचे आजार तुम्हीच निर्माण करता असं मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही आणि बसला तरी तुम्ही मान्य करणार नाही ! स्वतःवर कोण घेतो ! अनेकांची आजारपणं अनुभवली. स्वतः चौसष्ट वर्षात अनेक आजारपणातून गेलो ! सगळ्या आजारांची एक कार्यपध्दती असते. बरेचदा आजार कसल्या तरी माध्यमातून येतात. आधी व्हायरल आजार होतो आणि मग त्याची चर्चा व्हायरल होते. कोरोनाचे हेच झाले ! चर्चेनेच दहशत पसरली आणि अनेक लोक धक्क्यानेच गेले ! त्यांना तो आजार झालेलाच नव्हता ! किंबहुना ते निरोगी होते ! शोले सिनेमातला गब्बर सिंगचा, " जो डरेगा‌ वो मरेगा " हा डायलॉग ते विसरले ! त्यांनी त्यांचा नसलेला आजार स्वतःच निर्माण केला आणि ते प्राणास मुकले ! त्यांची वेळच आली हे समाधान आम्ही करुन घेतले !

मी माझा खूप जुना अनुभव सांगतो ! कॉलेजला असताना मी दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाने आजारी पडायचो. खरं तर ते वय लव्हेरियाने आजारी पडायचं होतं , पण ते आपल्या नशिबातच नव्हतं ( असं आपलं समाधान करून घ्यायचं ! दुसरं तरी काय करणार , नाही का ! )  मी पावसाळ्यातच आजारी पडायचो याचं कारण उघड होतं ! मी पावसात भिजल्यानेच मला थंडी भरून ताप यायचा. मी का भिजायचो तर मी कॉलेजकुमार होतो ! कॉलेजकुमार कसा रस्त्याने बेडरपणे पाऊस झेलत झेलत चालला पाहिजे ! छत्री धरुन कॉलेजकुमार रस्त्याने चालला आहे हे चित्र बावळट दिसतं ! काय विचित्र कल्पना होत्या तेव्हा ! रेनकोट मध्ये आपण चंद्रावरचा माणूस नाही तर ससा दिसणार असं वाटायचं ! ती तारूण्याची मस्ती होती आणि सिनेमातल्या हिरोंचा पगडा होता ! म्हणूनच माझा पावसाशी झगडा होता ! त्यामुळे मी पावसाला भीक न घालता गोगटे कॉलेज ते बसस्थानक असा टेचात भिजत जायचो ! हे तीन चार दिवस झाले की पुढील किमान  पंधरा दिवसांसाठी तरी मी अंथरूणात पडायचो ! आता मला सांगा माझा दरवर्षीचा हा आजार काय पावसाने निर्माण केला होता !

माझ्यासहीत अनेकांचे आजार अभ्यासले तेव्हा एक गोष्ट बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतांना आढळली ! काही आजार सुरू होण्याच्या आधी त्याचा विचार त्यांच्या मनात यायचा ! हे मी स्वतः माझ्याच काही आजारपणात अनुभवलं आहे ! असा विचार मनात आला म्हणून तो आजार मला झाला की पुढे जे होणार आहे त्याची लिंक कुठून तरी मनाला मिळाली ? मी आजारी पडणार हे मनाने आधीच ताडले होते की मनात आजाराचा विषय आल्यामुळे त्या धसक्यानेच मी आजारी पडायचो ? याच गोष्टी इतरांच्याही बाबतीत घडतांना मी पाहिले होते व म्हणूनच या निष्कर्षापर्यंत मी आलो ! माझा आणखी एक अनुभव असा की, आजाराची कसलीही कल्पना नसतांना मी काही दिवस जास्त वेळा बिस्कीटे खाऊ लागतो आणि विशेषतः बिस्कीटे खातांना माझ्या तोंडातील लाळ सुटण्याचे प्रमाण वाढते ! त्यानंतर मला कसले ना कसले आजारपण येते किंवा दुखापत होऊन तरी मी आजारी पडतो ! आता मी सावध झाल्याने जास्त खाणे आणि लाळ प्रकरण सुरू झाले की मी जास्त खाणेच बंद करतो  आणि शक्यतो दुखापत होणार नाही ही काळजी घेतो ! असे अनुभव व विचार अनेकांना आलेले असतील म्हणूनच या मुद्द्यांवर अधिक चर्चा होणे गरजेचे आहे.

एक नक्की, कोणताही आजार ही एक विचित्र परिस्थिती असते ! अशा वेळी माणूस दडपणाखाली येतो व अधिक  आजारी पडतो. एक पक्के लक्षात ठेवा : दडपण झुगारू शकलात तर  परिस्थितीच्या वर रहाल ! अन्यथा, तुम्ही स्वतःला स्वतःच परिस्थितीच्या खाली न्याल ! म्हणजे आजारी पडून बेड रेस्ट आणि औषधे घेत रहाल ! सद्या पावसाळा आहे. २६ जुलैही जवळ येतोय. काळजी घ्या मित्रांनो !

... देवीदास हरिश्चंद्र पाटील
१५.०७.२०२४ सकाळी ०६.००

चाला ... चालत रहा...

  चाला ... चालत रहा...

चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण...पाय हे माणसाच्या उमेदीवर उभे असतात. टेंशनने माणूस खचला की तो पायातच मोडतो.‌ त्याला चालत जा म्हणणे  सोपे आहे, पण आधार देणे, उभे करणे कठीण आहे. हे टेंशन फार घातक असतं.

आयुषचे माजी महासंचालक डॉ.जी.डी.लवेकर यांच्या नावाचा एक संदेश व्हॉट्स अॅपवर वाचनात आला. त्यात ते म्हणतात :

" *वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!*
*पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !! ....* चाला.▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते▪️.... *३६५ दिवस चाला*▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.... " असं त्यांनी खूप लिहिलंय. कळकळीने लिहिलंय.

🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️

खूप छान संदेश आहे. पण एवढे पुरेसे नाही. म्हणूनच मी सुरूवातीला म्हटलंय : चालल्याशिवाय पर्याय नसतो हे खरे. पण... हा पण आज फार महत्वाचा आहे. खरंच, जीवनातील वाढत्या व्यापांमुळे जीवनात अनेक संकटे येतात. अनेक धक्के बसतात. हे सगळंच पचवून बसणं एवढं सोपं नसतं. त्यांचा परिणाम शरीरावर होतोच ! माणूस मनाने खचतो आणि तो खचला की पहिले पाय खचतात. पायातली शक्तीच निघून जाते.‌ कोरोना काळानंतर तर अनेक माणसे लंगडतानाच दिसतात. पाण्यातच खचलेली दिसतात. काही जण याचा बूस्टर डोसशीही संबंध जोडतात, पण त्याबाबत अधिकृत तपशिल हाती आलेला नाही. काय असेल ते असो , पण मन खचल्याने पायातली ताकत जाते, हे खरे !

आपल्या आसपास अशी खचलेल्या मनाची, लंगडणाऱ्या पायांची लटपटती माणसं दिसतात. तेव्हा एक विचार स्पर्शून जातो. ही माणसे कोणत्या धक्क्याने खचली असतील ? त्यापूर्वी तर ती धडधाकटपणे सहज चालत असतील. मग त्यानंतर काय झाले असेल त्यांच्या आयुष्यात ? खचलेली ती माणसे पुन्हा उभारी धरावीत म्हणून काय करता येईल ? ईश्वरानं त्यांना उभं करण्याचं सामर्थ्य मला दिलं तर त्यांना उभं करण्याची माझी इच्छा नक्कीच आहे !

...देवीदास हरिश्चंद्र पाटील
०५.०७.२०२४ सकाळी ०६.००

मंगळवार, १६ जुलै, २०२४

उद्याचा विचार

 

उद्याचा विचार


हो, कितीही झालं तरी काल , काल रहातच नाही. नाही म्हणजे कितीही कालमध्ये म्हणजे भूतकाळात रमलात तरी वर्तमानात यावंच लागतं ! दुनिया व्यवहारांवर चालते राव ! स्वप्नरंजनात फार काळ राहता येत नाही. मनात मांडे खात राहिले तर आपलीच लाथ मडक्यावर बसते , मडकेही फुटते आणि स्वप्नंही तुटते ! हाती धुपाटणे येते. आपण अब की बार कशाच्या पार जाऊन पोचतो ते कळतच नाही. स्वप्ने पाहणे वेगळे आणि काहीच कृती न करता ती नुसतीच पहात बसणे वेगळे ! भानावर यावेच लागते. जसा आजचा विचार पडतो तसाच उद्याचाही विचार पडतोच. अर्थात जो विचारी असतो त्यालाच विचार पडतो म्हणा. बरोबर ना ? तुम्ही पण हाच विचार करताय ना ? विचारी आहात ! करणारच. दुसरा कसला विचार नाही पडलाय मला. उद्या लेखनासाठी कुठला विषय सुचतोय , हाच एकमेव विचार पडलाय मला ! मारून मुटकून आपण लिहीत नाही. तुम्हांला काय वाटलं ? नाही म्हणजे, तुम्हांला वेगळं वाटणं अगदी स्वाभाविकच आहे ! कारण, अनेक विचार पडतात माणसाला ! काय काय व्याप आणि उपदव्याप करावे लागतात ते ज्याचे त्यालाच माहिती ! बरोबर ना ? भोग असतात ते ! भोगायलाच लागतात ! त्याशिवाय पुढे जाताच येत नाही.

भीष्म पितामहांचा एक संदर्भ

ह्या भोगांवरून आठवलं. परवाच एक व्हिडीओ तोही व्हाॅटस अॅपवर पाहण्यात आला. त्यात भीष्म पितामहांचा एक संदर्भ देण्यात आला होता. त्यांना शरपंजरी मरण येणार ते पूर्वजन्मातील घटनेमुळे येणार असं श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं. तेही मागच्या ५२ व्या वर्षातील घटनेमुळे. भीष्मांना एवढे पूर्वजन्म पाहण्याची शक्ती होती. आपल्याला याच जन्मातील कालचं आज आठवत नाही. ५२ पूर्वजन्म कुठले आठवणार ! ते न आठवो, पण एक प्रश्नं मात्र इथे पडतोच. तो म्हणजे भीष्मांच्या आयुष्यात ती घटना कोणी निर्माण केली ? तो सरडा त्यांच्या नेमका वाटेत कोणी आणला आणि बाणाच्या टोकाने त्याला उडवायची सणक भीष्मांना त्या पूर्वजन्मात आली कशी ? असा विचार त्यांच्या मनात आला कसा ? बरं, आला आणि त्यांनी तो सरडा बाणाच्याच टोकाने का उडवला ? उडवलाच का ? त्याला त्याच्या वाटेनं जाऊ का नाही दिलं ? तोही निवडुंगावर जाऊन पडलाच कसा ? तिथे नेमकं निवडुंगच कसं उगवून राहिलं होतं ? हे नियोजन इतक्या कल्पकतेने आणि अचूकपणे कोणी केलं असावं ? ही त्या मास्टरमाईंडची नैतिकवगैरे जबाबदारी नाही का ? हा कोण कट टू कट मास्टरमाईंड आहे ? कुणाला सापडला तर सांगा. तोवर उद्या कोणत्या विषयावर लिहावे याचे मी चिंतन करतो. तोपर्यंत आजचा लेख तर तयार झाला ! हेही नसे थोडके ! आता उद्याचा विचार...


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

पुढच्या वर्गात गेल्याबद्दल बक्षिस

 मोफत वह्या वाटप

गेली तीन वर्षे आम्ही दोघे बंधू शाळांमध्ये जमेल तेवढं  मोफत वह्या वाटप करतो. मी वाटप व्यवस्था बघतो.  वाटप करतांना एक गोष्ट लक्षात आली. काही मुलांनाच मोफत वह्या नको असतात. कदाचित , त्यांचा या सगळ्या सामाजिक कार्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल. कदाचित, त्यांच्या पालकांना ते आवडत नसावे. घरात या विषयावर बोलणे होत असावे. पालक श्रीमंत असोत वा गरीब असोत. ते स्वाभिमानी असू शकतात. त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नसावे. ते त्यांच्या पाल्यांना वह्या विकत घेऊन देण्यास सक्षम असतील. साहजिकच,  त्यांच्या मुलांनाही काही मोफत घेणे आवडत नसावे. संस्कार असू शकतात. अशी मुलं वर्गातही घरच्या संस्कारांना अनुसरून मोफत वह्या घेण्यास नकार देतात यात गैर काहीच नाही. त्यांच्या ठिकाणी ते बरोबरच आहेत. मात्र, त्याचा परिणाम इतर विशेषतः गरीब मुलांवरही होऊ शकतो. गरज असूनही मदत ही भीक समजून विचार होऊ लागला तर प्रश्न उभा राहतोच.

In the school with students

मग हा प्रश्नं मुलांचा स्वाभिमान न दुखावता कसा सोडवता येईल याबाबत विचार सुरू केला. कारण , काहींचे ठीकच होते. ते वह्या विकत घेऊ शकत होते किंवा परवडत नसतांनाही विकत घेऊन स्वाभिमान जपू शकत होते. काही अपवादही असतात, तसेच समजायचे. म्हटलं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊदे.‌ तेही चुकत नसतील. आपणही चुकायचं नाही. आपण आपल्या मार्गाने जाऊ, पण मोफत वह्या वाटप करुच. विशेषत: ग्रामीण भागात याची फार मोठी आवश्यकता असल्याचे गेल्या तीन वर्षांत आढळून आले होते. पण आवश्यकता असूनही काही पालकांचा म्हणा, मुलांचा म्हणा, स्वाभिमान आडवा येत होता. नजरेसमोर गरजू दिसत होते. या मानसिकतेतून गरजूंना बाहेर कसे काढायचे ? गरजूंमध्ये अशा चुकीच्या प्रकारे स्वाभिमानाची साथ पसरली तर ते समाजहीताच्या दृष्टीने योग्य होणार नव्हते.  माझी तगमग, अस्वस्थता वाढत चालली होती.  काही तरी करणे भाग होते. कारण या वर्षीच्या वह्या वाटपाला सुरूवात करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती. शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या.

अखेर , १४ जून उजाडला ! संस्कारवाली एक विद्यार्थीनीं घरासमोरच्या रस्त्याने जातांना दिसली आणि उत्तर सापडले ! मी तिला लगेच हाक मारून बोलावले. ती आलीही. मी उद्यापासून वह्या वाटप करणार आहे हे तिला सांगतानाच हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे, असं सांगितलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ती म्हणाली, " काका, उद्यापासून कशाला ? मला आजच, आताच द्या की वह्या ! " मी तिथेच यंदाच्या मोफत वह्या वाटपाचा शुभारंभ केला ! आता मी ज्या शाळेत जातो तिथे आवर्जून ' हया वह्या तुम्ही पुढील वर्गात गेल्याबद्दल तुम्हांला बक्षिस म्हणून देणार आहे ' हे वाक्य ऐकवतो ! मुलं हसून वह्या स्वीकारतात. मुलं चांगली असतात. निर्मळ मनाची असतात. त्यांना फक्त योग्य प्रकारे संस्कारांकडे वळवावं लागतं , हा अनुभव आणि हे उत्तरही २०२४ च्या वह्या वाटपात सापडले !


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

गुरुवार, ४ जुलै, २०२४

खोके नि पेट्या मिळवा

 राजकीय लावणी


खोके नि पेट्या मिळवा 

राया तुम्ही संपत्ती कमवा  || धृ ० ||  राया तुम्ही...


सत्ताधारी असो वा परका

तुम्ही गळाभेट घ्या बरं का ...

काढा फोटो, सोबत मिरवा...   || ०१ || राया तुम्ही...


बघू नका रंग हिरवा 

करू नका हट्ट भगवा

स्वार्थाचे चित्र रंगवा ...           || ०२ || राया तुम्ही...


बघा कोण किती देतो

कोण सोबतीने नेतो

हवी तेव्हा टोपी फिरवा...        || ०३ ||  राया तुम्ही...


बसून खातील पिढ्या सात

पडणार नाही कसली ददात

बंगले नि माड्या बनवा...        || ०४ || राया तुम्ही...


सोडा शामळूपणा आता

तुम्ही बाईकने का हो जाता ?

चार चाकी गाड्या उडवा....     || ०५ || राया तुम्ही...


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

०४.०७.२०२४ सकाळी०९.१०

सोमवार, १ जुलै, २०२४

गझलकार देवीदास पाटील यांची मुलाखत प्रक्षेपित

 गझलसम्राट सुरेश भटांचे शिष्य मराठी गझलकार देवीदास पाटील यांची रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून मुलाखत प्रक्षेपित 

मुलाखतीचा व्हिडीओ पहा : 


आकाशवाणी रत्नागिरीवर कवीवर्य सुरेश भटांचे शिष्य व रत्नागिरीमध्ये मराठी गझल प्रथमतः सुरू केली त्या देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची मुलाखत रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून अलिकडेच प्रसारित झाली होती. ती वरीलप्रमाणे  व्हिडीओ स्वरूपात यू ट्यूबवर दि. ०१.०७.२०२४ रोजी अपलोड करण्यात आली आहे. रसिक त्यांचा आनंद घेत आहेत. 

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र

#interview

#AIR

मंगळवार, २५ जून, २०२४

लोकांचं काय राव ...

लोकांचं काय राव ...


लोकांचं काय राव , लोक बोलून जातात... आपण ते खरं धरून बसतो ना ! पण खरं तसं नसतंच. कधी आपल्याला बरं वाटावं , दिलासा मिळावा म्हणून‌ तर कधी ही बला टळावी म्हणून तोंडदेखलंही लोक बोलतात... पण चूक आपलीच होते ना भाऊ ! आपण आपल्याच मूर्ख समजुतीपायी आपला प्रश्न आता नक्की सुटणार हेच स्वप्नरंजन करत राहतो ! मनात मांडे खात राहतो. पण पुढच्याच क्षणाला लोक दुसरीकडेच वळलेले असतात. आपण पुन्हा आपल्याच प्रश्नांच्या खोल गर्तेत फेकले गेलेलो असतो. दुनिया स्थिर नाही . सतत बदलत राहते हे आपल्या गावी नसते, लोक रिकामटेकडे नसतात, त्यांना त्यांचे आयुष्य असते, प्रश्न असतात, उद्योग असतात. त्याला लोक तरी काय करणार ? तेही जागा बदलतात. शब्द बदलतात. अनेक गोष्टी बदलतात. पण आपण आपल्याच कोषात असतो ना महाराजा ! आपला भाबडेपणाच मारतो आपल्याला. आपण समजतो तसे जग नाही चालत. जगाचा व्यवहार नाही चालत. आपण भावनेचे बुडबुडे बनून आपले आपणच फुटत राहतो.‌ बुडत्याला काडीचा आधार शोधत राहतो. पण जग आपला आधार आपणच तयार करते हे लक्षातच येत नाही आपल्या. आपण आपल्याच डोळयांवर आपलीच झापडे ओढून बसतो. कोणी तरी येईल आणि आपल्याला मदत करील म्हणून वेडी आशा लावत बसतो. स्वतःला फसवत बसतो. हे फसवणं आता सोडलं पाहिजे. जगरहाटीचं अनुकरण तरी केलं पाहिजे. तुमचा काय सल्ला आहे मित्रांनों... ?

जगरहाटी काय आहे ?

तसं उद्याचा विचार यावर अधिक विचार करायची गरज नाही. मी हल्ली इतर ठिकाणच्या कार्यमग्नतेमुळे व्हाॅटस अॅपवर क्वचितच असतो. ( मी एवढं काय करतो कोण जाणे ! ) कधी कधी खूपच जिवाभावाच्या मित्रांच्या संदेशांना प्रतिसाद देतो मी. तोही अलिकडे क्वचितच. तरीसुध्दा, मला बिचारे मित्र दररोज न चुकता ( मी कधी तरी सुधरेन या आशेवर ) मला संदेश पाठवतातच. मी त्यांचा खरंच ऋणी आहे आणि अपराधीही. कधी तरी मी माझ्या दोन व्हाॅटस अॅप ( " Devidas Patil Shares " आणि " चला मराठी गझलवर बोलू " ) चॅनेलवर पोस्ट करतो. पण तेही प्रमाण हल्ली कमीच झालंय. मला झालंय तरी काय ? मी करतोय तरी काय ? घाबरू नका. मी काही ना काही करीत असतोच. कधी यू ट्यूब, कधी फेसबूक. कधी ब्लॉगर. कधी रेडीफ. कधी कोरा...तर कधी गोरा ! नाही , गोरा हे कुठलंही समाज माध्यम नाही. निदान, असेल तर मला अजून ती ब्रेकींग न्यूज मिळालेली नाही. गोरा मी स्वतःच. माझा रंग थोडा गोरा आहे ना. लहानपणापासून ते फिल्मी गाणं ओठांवर असतं माझ्या. गोरे रंग पे इतना न गुमान कर... ! मी बालपणापासून कुठली गाणी गातो ते महत्वाचं नाहीय. माझ्यादृष्टीने आता महत्वाचा आहे तो उद्याचा विचार !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

रविवार, २३ जून, २०२४

राहिला केर काढायचा

 राहिला केर काढायचा 


आदरणीय सुरेश भट यांचं आणि माझं नातं काय आहे हे नाही सांगता येणार. काही गोष्टी नात्यापल्याड असतात. बंधनांच्या धाग्यापल्याड जातात. मी असं का म्हणतो तर भटसाहेब कधी कधी असं लिहून गेलेत ना की ते कधी कधी अगदी माझ्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं.‌ बाकीचं मी नंतर कधी तरी सांगतो. 

आताची घटनाच बघा ना.‌ 

आताची घटनाच बघा ना.‌ सकाळ झाली. मी सूर्यदर्शन घेऊन आलो. अंगण नीट झाडून झाले. आता घरातला कचरा काढायचा. मी तो रोजच काढतो. मराठी शाळेतली गुरुजींनी लावलेली शिस्त आहे ती ! हाती धरून झाडू ...हे तेव्हा पासून कानांवर पडलेले आणि अंतरात गेलेले बोल आहेत. तेव्हा ही स्वच्छतेची नाटके नाहीत. आपल्याला तोच तोच कचरा जागच्या जागीच ढकलून आपले काही फोटो काढून घ्यायचे नाहीत आणि कुठे छापून पण आणायचे नाहीत. आपल्याला कुठे महात्मा बनायचंय ! आपण पडलो सामान्य माणूस. त्यातही सेवानिवृत्त .‌ सेवानिवृत्तीलाही साडेपाच वर्षे झालेली ! आपण आपलं अंगण , आपलं घर लख्खं करावं आणि त्या आनंदात डुंबावं. अर्थात, अंगण साफ झालं आता घरात येऊन झाडू लागतो तर मी पुढे जातो पण कचरा मागे उरतोच ! मग मी पुन्हा मागे येतो आणि पुन्हा तो कचरा पुढे घेऊन जातो. हे मात्र होतं. तेवढंच मागे पुढे होतं. आता जड व्यायाम जमत नाही तर हा हलका व्यायाम आपसूक होतो. असे नाही तसे हात पाय हलतात, कमर हलते ! मागे पुढे , खाली वर होतंय. बरं वाटतं. फक्त तेवढा कचरा ऐकत नाही. किती काढला तरी सौ. कुठल्यातरी कोपऱ्यातले नाही तर छतावरचे खुसपट दाखवतेच ! कचऱ्याचं हे रोजचंच असं आहे. मी किती काढला तरी काढायचा राहून जातोच. जातो तर जातो... सौ. च्या नजरेत येतो, खुपतो आणि ती मला दाखवूनही देते... कचऱ्याची आणि माझीही जागा ! आता इतकं सगळं झाल्यानंतर मला दररोज सुरेश भटांचे ते जणू काही माझ्यासाठीच लिहिलेले शब्द न आठवले तरच नवल ! कुठले म्हणता ? सांगतो. नाही तरी हे खूप लांबलंय. मुक्त कवितेसारखं.‌ तर सुरेश भट लिहून गेले आहेत : 



तर तो केर मागे राहतोच !  हे आठवत मी रोजच केर काढत असतो. गुरुची आठवण वेगळी काढावीच लागत नाही ! नशीब असते एकेकाचे राव !!


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०६.२०२४

शनिवार, २२ जून, २०२४

फेसबूक प्रोफाईल प्रोफेशनल मोडमध्ये

मित्र हो, हल्ली मी फारसा व्हॉट्स अॅप वर दररोज सकाळ संध्याकाळ शुभसंदेश‌ पाठवत नसतो . इतरही काही मी व्हॉट्स अॅपवर करीत नव्हतोच. हल्ली हल्ली म्हणजे अगदी हल्लीच म्हणजेच १७ मार्च २०२४ पासून .  यात काही विशेष नाही म्हणा. म्हणजे त्यात व्हॉट्स अॅपला विशेष वाटण्यासारखे काही नाही किंवा व्हॉट्स अॅपवरच्या माझ्या सोबत्यांना , ग्रूप्सना विशेष वाटण्यासारखे काही नाही म्हणा आणि कोणाला काही वाटलेलेही नाही. हे अगदी स्वाभाविक आहे. संदेश पाठवतांनाच त्यांचा किती वेळ जात असेल ... त्यात आता सगळ्यांचेच जीवन घाईगडबडीचे. आहे कुणाला वेळ इतक्या किरकोळ माणसासाठी इतका बारीक विचार करायला ! आपण समजून नको का घ्यायला ? अशा वेळी आपणच समजून घ्यायचं असतं. त्यात चुकीचं काहीच नाही, नाही का ? असो, विषय तो नाहीच आहे . पण अशीच तुम्हीही एक गोष्ट समजून घ्यावी म्हणून खरे तर हा पोस्ट प्रपंच ! 

#facebook_profile


विषय खरा असा आहे की माझी ही फेसबूकवरील प्रोफाईल प्रोफेशनल मोड मध्ये असल्याने मला आता इतर उद्योग सोडून कसे प्रोफेशनल मोडचे उद्योग करावे लागणार. म्हणजे मला ही जाग नेहमीप्रमाणे उशिराच आली आहे ! आधी मी बराच काळ फेसबूकवर नव्हतो. मग व्हॉट्स अॅपवर कमी झालो आणि परत फेसबूकवर आलो ( सवय आपली 😂 ! ) ...तर ही प्रोफेशनल मोडची अचानक जाणीव झाली. आता जाणीव झालीच आहे तर करावी काही तरी धडपड प्रोफेशनल व्हायची . आपल्या कलंदर भावनिक जीवनात तेवढीच उणीव राहिली होती. ती भरून काढण्याचा प्रयत्न मी करणार आहे. बघू पुढे पुढे काय होईल ते....म्हणजे तुम्हांला ते दिसणारच आहे...


भेटत राहूच. तुमचा अपार स्नेह सोबत आहेच ! 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील.

१४.०६.२०२४ दुपार १४. ००

#फेसबूक

#story

#facebook

शुक्रवार, २१ जून, २०२४

राजकीय खुमखुमी

 राजकीय खुमखुमी


लोकसभेची निवडणूक झाली.‌ अब की बार चे बार हवेत उडून विरले आहेत. मग आता काय उरले आहे ? तर विधानसभा ! हल्ली निवडणूका आखाडा बनून गेल्या आहेत. विधानसभेचे रणकंदन तर आतापासूनच सुरू झाले आहे. हा याच्या बालेकिल्ल्यात , तो त्याच्या बालेकिल्ल्यात , हा वार करतो तो पलटवार करतो, तो ह्याला टोला हाणतो, हा त्याला टोला हाणतो, असे चित्र पुन्हा दिसू लागले आहे. एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढण्यावाचून‌ या राजकारण्यांना काही काम असते की नाही हीच शंका येते ! मतदारांसाठी पवित्र कर्तव्य आहे बघा ! त्यांनी ते बजावण्यासाठी केवढा आटापिटा , केवढी जाहिरातबाजी त्यांच्याच खर्चाने केली जाते ! मतदारांचे पवित्र कर्तव्य काय तर मतदान करणे. मग उमेदवारांचे वा निवडून आलेल्यांचे पवित्र कर्तव्य काय हीन पातळीवरचे आरोप एकमेकांवर करणे हेच आहे का ? एकमेकांवर चिखलफेक करून हे कोणता महान आदर्श उभा करत आहेत ? राजकारण करणे म्हणजे केवळ नळावरची भांडणे करून बेलगाम वक्तव्ये करणे आहे का ? लोकसभेत वा विधानसभेत अर्वाच्च भाषेत बोलणे, रस्त्यावर असल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर धावून जाणे , हे कशाचे द्योतक आहे ? मग त्या पवित्र मंदिरात जाण्याआधी पाया पडण्याची नाटके तरी कशाला ? या लोकांना काही नियम आहेत की नाहीत ? बंधने आहेत की नाहीत ? संविधान याबाबत काय सांगते ? सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाचे यावर काय म्हणणे आहे ? याप्रकारे लोकशाहीची केली जाणारी क्रूर चेष्टा कशी थांबणार ? की ठोकशाही हा लोकशाहीचा गौरव म्हणायचा ? आता फलकयुध्ये सुरू आहेत. याचे फलक त्याच्या बालेकिल्ल्यात, त्याचे फलक याच्या बालेकिल्ल्यात आतापासूनच दिसू लागले आहेत. आत बरेच काही धुमसते आहे. राजकीय खुमखुमी डोके वर काढीत आहे. आखाडा पुन्हा रंगू लागला आहे.‌

पण हे जे राजकीय लोक आले ते आले कुठून ? त्यांना ही अर्वाच्च भाषा , ही खुमखुमी आली कशी आणि आली कुठून ? हे वाढले कुठे ? हे जे काय शिकले ते शिकले कुठे ? हे असे बनण्यात समाजाचे योगदान नाही काय ? यांना शाळेत शिक्षकांनी शिक्षा केलीच नसेल ? ती केल्यावर शिक्षकांनाच धारेवर धरणारे कोण होते ? ज्या शिक्षक वर्गाने स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून राष्ट्र घडविले त्या शिक्षकवर्गालाच वाहयात पोरांना शिस्त लावली म्हणून थेट पोलीस स्टेशन दाखवणारे कोण होते ? ही एक पिढी अशी होईपर्यंत आणि तिच्या नादाने पुढच्या काही पिढ्या नादान होईपर्यंत झोपा काढणारे कोण ? अंतर्मुख होऊन आपण याचा विचार कधी करणार आहोत की नाही ? की नुसतेच राजकारण्यांना दोष देत बसणार आहोत ? लोकशाहीसाठी आपण काही करणार आहोत की नाही ? की मतदान हेच आपले एकमेव पवित्र कर्तव्य आहे अशी साळसूदपणे ठाम समजूत करून घेणार आहोत ? ही लोकशाही कोणासाठी आहे ? लोकांसाठीच ना ? मग ती जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी स्वतःमध्ये काही बदल घडवून आणणे आवश्यक आहे की नाही ? याची उत्तरे‌ प्रत्येकांने स्वतःलाच विचारायची की नाहीत ? हे लोकांचे सर्वात मोठे पवित्र कर्तव्य नाही का ? बेलगाम नेत्यांनी लोकशाही शिकवण्याइतके लोक अजूनही अजाण आहेत का ? ते सूज्ञ होणार तरी कधी ? 


...देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०६.२०२४ सकाळी ११.००


#politics