सुरेश भटांची एक विलक्षण आठवण
सुरेश भटांचा आणि माझा पत्रव्यवहार सलग चार वर्षे सुरु होता. मी तो जपू शकलो नाही . त्यांना मी केवळ एकदाच भेटलो . बहुधा १९८८ मध्ये . पुण्यात . एक आख्खा दिवस मी त्यांच्या बरोबर होतो. त्यावेळी दीपक करंदीकर , नीता जोशी आणि पंढरपुरचे एक गझलकारही येवून गेले. भटसाहेब न थकता गझला ऐकवत होते. आम्ही जेवायला हॉटेलात गेलो तेव्हा वाटेत भटांचा वजनदार हात माझ्या खांद्यावर होता. त्यांना पेलवत रस्ता पार करण्याचे दिव्य मी कसेबसे पार पडले . दुसऱ्या बाजूने माझ्यासोबत आलेला प्रदीप मुरारी हातिसकर चालत होता. साक्षात सुरेश भटाना जेवताना आम्ही पहिले . जेवतानाही ते गझलबद्दल बोलत होते.
भट साहेबांचा निरोप घेवून रात्री आठ वाजता मी व हातिसकर पुणे स्टेशनला पोचलो . आम्हाला रत्नागिरीला यायचे होते . कसे कोण जाणे , पाठोपाठ भटसाहेब तिथे आले. आपला वजनदार हात पुन्हा एकदा माझ्या खांदयावर ठेवून मला म्हणाले , देवीदास , आज माझ्याकडेच थांब . पहाटे मुंबईला निघायचे आहे. मंगेशकरांकडे . लता, आशा , हृदयनाथही तिथे भेटणार आहेत . ते आग्रह करीत होते . एका दृष्ट्या कवीचा तो आग्रह होता. पण मी थांबू शकलो नाही. मी करंटा निघालो . भटांच्या मनात त्यावेळी काहीतरी होते . मी ते ओळखू शकलो नाही . त्यांचे मन मोडून मी रत्नागिरीला आलो . पण ते मनाने मोठे होते. मला रत्नागिरीला यायचे आहे असे त्यांच्या प्रत्येक पत्रात असायचे . पण अखेरपर्यंत ते येवू शकले नाहीत . त्यावेळी रेल्वे नव्हती एसटीने त्यांना झेपणारे नव्हते आणि गाडीने इतक्या दूर आणणे परवडणारे नव्हते . तो योग आलाच नाही . राहिली ती एक विलक्षण आठवण !
.............
टीप :
मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .
.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा