शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

Happpy Navratrotsav

 

Happpy Navratrostav  !




सर्वात प्रथम तुम्हांला आजपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देतो ! गेल्या भागात तुम्ही वाचलंत की ... अशी समजूत करीत मी पुन्हा सतिशबरोबर चर्चा सुरू केली. त्याच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. काही त्याला समजावून सांगितल्या.... अशी समजुतीची समजूत करीत पुढील भागात प्रवेश करू... चला तर ' मागे पुढे ' मध्ये पुढे काय घडतेय ते पाहू....


        माझ्या आयुष्यातील हा आतापर्यंतचा सर्वात खडतर कालखंड.... मुलाचे वर्क फ्राँम होम सुरू होऊन महिना होत आला. सुरूवातीला तो पुण्याहून यायलाच तयार नव्हता,  अखेर आम्ही तिकडे यायला निघतोय असं सांगितल्यावर पाठवलेल्या कारने तो घरी आला , हे तुम्हांला आठवत असेलच. आला तेव्हा स्वारी घुश्श्यातच होती. आमच्याकडे बघायलाही तयार नव्हती. विशेषत: त्याच्या आईवर त्याचा जास्त राग दिसत होता. शेजारच्या चुलत भावाच्या घरात तो 14 दिवस होम क्वारंटाईन होता. ते दिवसही खडतर गेले. सुरूवातीला इकडे नेटवर्क मिळणारच नाही , मला उगाच बोलावलंत , असा त्याने लावलेला सूरही हळूहळू निवळू लागला. घडी जरा कुठे बसतेय असे वाटते तोच कालचक्र फिरले. 1995-96 पासून डिसेंबर ते जुलै महिन्यात दुर्दैवाचे फटके बसायचे. नंतर काही वर्षांनी हेच कालचक्र बदलून 01 सप्टेंबर ते फेब्रुवारी मध्यापर्यंत वाईट कालखंड यायचा. यंदा फेब्रुवारी बरा गेला , पण 06 मार्च पासून पुन्हा आमचे दिवस फिरले. याच दिवशी आम्ही मुुलाला पुण्यात एकटे सोडून आमच्या गावी आलो . गुढी पाडवा झाला की दोनच दिवसांनी पुन्हा मुलाकडे जाऊ असा विचार आम्ही केला होता, पण कोरोना लाटेने आम्हांला गावातच बंदिस्त केले. मुलगा घरी आला हा आनंद बराचसा क्षणिकच ठरला. मायलेकांचे बोलीभाषण जसे वाढले तसे त्यांच्यात उडणारे खटकेही वाढू लागले. कोणीच कोणाला समजून घेईनासे झाले. कोण कोणाला हुकसवतोय आणि कोण कोणाची पाठ घेतोय हे सांगणे कठीण होऊ लागले. आयुष्यभर ज्या कुटुंबासाठी मी जीव टाकला , नोकरीतही खुळयासारखा वरिष्ठांशी भांडलो, तेच कुटुंब फुटणार हे आता उघड होऊ लागले. माझे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीच नव्हते. तरी अजून कश्यातच काही नव्हते , मुलाचे लग्नं झाले नाही तर ही परिस्थिती होती. पुढे काय होणार ? कुटुंबाच्या काळजीने मी हैराण होत होतो.  खरे तर , मला कोणी खिजगणतीतच धरत नव्हते. ज्यांच्यासाठी प्रत्येक क्षण जगलो त्यांना एकमेकांशी भांडतांना मी दिसतच नव्हतो ! इतकी वर्ष किमान ज्याचे अस्तित्व ज्यांच्या सतत अवतीभवती होते , ते अस्तित्वच विसरून , माझ्याकडे ढुंकूनही न बघता , दोघेही आपलेच मुद्दे रेटू लागले. मी प्रचंड व्यथित झालो. कधी नव्हे ती हरल्याची भावना मनात येऊ लागली ! अनेक वादळे एकटयाने झेलली, पण हे वादळ मला आडवे करून गेले. परिणामत: सकाळी पाणी भरतांना पावसात भिजल्याचे निमित्त होऊन मी आजारी पडलो. दोन दिवस सर्दी , ताप यांनी त्रास दिला. कोरोनाच्या कालावधीत डाँक्टरकडे जायचीच चोरी होती. पण न जाऊनही चालणारे नव्हते. अखेर 19 सप्टेंबरला दोन इंजेक्शन्स घेतली. दोन तीन दिवस गोळया घेतल्या. आँक्सीजन लेव्हल रोज चेक करून घेतली. साठ वर्षात अनेक आजारपणं पाहिली पण कधी कोणत्याही डाँक्टरने आँक्सीजन लेव्हल हया प्रकाराचा उपयोग वा प्रयोग केला नव्हता ! माझी लेव्हल उत्तम होती म्हणून बरे,  नाही तर मला तो आजार नसतांनाही कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले असते. कोरोनाची हकीगत ही अशी आहे ! ही हकीगत मरो , पुढे काय हाल झाले ते पहा. मी ब-यापैकी बरा झालो नाही तोच पत्नी आजारी पडली. तिला सुरूवातीला कोहाळयाचा रस नडला. 23 सप्टेंबरला तिला डाँक्टरकडे नेले. डाँक्टरने मला दिलेल्याच गोळया तिलाही दिल्या. त्यातली एक गोळी घेतली की तिची फक्त कपाळपट्टी तापायची . कानशिलापासून पायापर्यंतचं अंग गार असायचं. पहिल्या रात्री तर मी व मुलगा मिठाच्या पाण्याच्या घडया तिच्या कपाळावर ठेवीत राहिलो. तेवढेच नव्हते , तर त्याचवेळी तिला प्रचंड अंगदुखी व्हायची. त्यामुळे तिला काय होतंय हेच तिला समजेनासं झालं. ती ग्लानीत विचित्र बडबडू लागली.  असे दोन दिवस , दोेन रात्री गेल्या. त्या गोळीमुळेच तिला हायपर अँसिडीटी होत होती , त्या गोळीचे साईड इफेक्टस होत होते , हे नेटवर सर्च करायला तिनेच सांगितलं तेव्हा लक्षात आलं. लगेच ती गोळी बंद केली. लगेच पन्नास टक्के उतार पडला. पण त्यातच तिला खूपच अशक्तपणा आला. हे आजारपण पंधरा दिवस चालले. पाच-सहा तारखेला तिला प्रथमच थोडा आराम पडला. तरी एक दोनदा त्रास झाला. पण आता त्रास कमी कमी होतोय. मुलगाही आता ब-यापैकी बरा बोलतोय. खडतर काळ थोडा सुसहय होतोय. 


           बीना हल्ली पुन्हा विचित्र वागू लागली आहे. तिच्या आईचा तर तिने छळ मांडलाय. घराच्या मालकिणीलाच घर सोडून कुठेतरी दूर निघून जावे असे वाटते आहे, यावरून लक्षात येईलच. बीनाला लग्न हवे आहे. पण लग्नानंतर ती सासरी पण राडे करू लागेल , ही सार्थ भीती पाहता तिची आईसुध्दा पुढे पाऊल टाकायला कचरणे स्वाभाविक आहे. तेवढयात परवा म्हणजे 07.10.2020 रोजी तिचे काका वारले. वायंगणकर काका. खूप चांगला माणूस. अनेकांना उमेद दिलेले काका स्वत:च्या जीवनाच्या एका टप्प्यावर मात्र खचून गेले. अखेर ते गेलेच. अर्थात, बीनाला आईच्या दु:खाचे काहीच वाटत नसल्याचे व ती स्वत:च्याच कोषात असल्याचे सतत निष्पन्न होते आहे. ती सरडयासारखे रंग बदलते आहे. मूड बदलते आहे. तिचे वागणे अनाकलनीय होत चालले आहे.  आहे. व्यक्ती अशा का होतात ? अशा विचित्र का वागतात ? व्यक्तीनिहाय किंवा कुटुंबनिहाय असा कालखंड किती वर्षे राहतो ? शनीची साडेसातीवगैरे हल्ली कोण फारसे बोलत नाही. कारण , दुर्दैवाचा कालखंड साडेसात वर्षांपेक्षाही कितीतरी अधिक होत चाललाय. मग आता याला काय म्हणायचे, हा प्रश्न मला पडू लागला आहे. काळाच्या मनात आहे तरी काय ? माझ्या आजीपासून पाहतोय. न संपणारी दु:खाची वर्षे म्हणजे माझ्या आजीचे आयुष्य.  मी यू टयूबवरील माझ्या Devidas Patil या चँनेलवर " आयुष्याकडे बघतांना  " या प्लेलिस्टमध्ये " आज्जीची गोष्ट " सांगितली आहेच. आपण ती आवर्जून ऐका. अर्थात त्या दहा मिनिटात आजीचे आयुष्य मांडता येणे शक्यच नव्हते. तरी पण तिच्या जीवनावर मी नेमके भाष्य मात्र तिथे केले आहे. आजीची गोष्ट तशी. वडिलांचीही गोष्ट फार वेगळी नाहीच. त्यांचेही आयुष्य खडतरच गेले. अखेरच्या काही दिवसांत तर ते बोलूही शकले नाहीत. " आयुष्याकडे बघतांना " या प्लेलिस्ट मध्ये शेवटी शेवटी मी माझ्या जन्मरहस्याबद्दल भाष्य करणार आहे. मधल्या भागांमध्ये मी सूचक शब्द वा प्रसंग ( क्लूज ) पेरणार आहे. माझेही जीवन फारसे सुखावह नव्हते. पण माझ्या आताच्या जीवनात तरी मी काहीसा सुस्थितीत आहे असे म्हणता येईल. निदान नोकरीतल्या कटकटी नाहीत आणि पैसे कमवण्यासाठी वयाच्या साठीत कुठे जावे लागण्याचे कारण नाही . पण एक पाहतो आहे की अनेकांच्या जीवनात प्रत्येक वर्षातला काही काळ सलग सुखाचा तर काही काळ सलग दु:खाचा तसेच काही काळ सलग सुखदु:खाच्या मिश्रणाचा येतो. माझ्या जीवनात हे मी अनेकदा अनुभवले आहे. हे विचित्र काळचक्र का फिरत असते ? त्या त्या काळात काही विशिष्ट घटना घडतात , काही सूचक स्वप्नेंही पडतात. असे का होते ? यामागे कोण आहे ? गेली काही वर्षे मी याच्याच मागे आहे. मध्यंतरीचे पुराणातले ग्रंथवाचून उत्तरे शोधण्याचा तो विचारही आता मागे पडला आहे. भाऊ ग्रंथालय करणार होता तेही लांबले आहे. आता घटनांचे विश्लेषण करण्याशी काळाचे वागणे जोडून काही हाती लागते का ते पहावयाचा विचार आहे. बाकी आता आँनलाईन लेखनाचा कंटाळा येऊ लागला आहे.  LinkedIn, Rediffmail, Facebook,  Twitter,  YouTube, Instagram , Quora यात आता फारसे मन गुंतत नाही. माझ्या मनाचा हा मुख्य प्रश्न आहे. मला सतत काही काळानंतर त्याच त्या गोष्टी करण्यात स्वारस्य वाटेनासे होते. त्यामुळे Blogging चाही मला आता कंटाळा येऊ लागला आहे. मी हल्ली कविताही करीत नाही . पत्नीला गंभीर आजारपणातून बाहेर काढण्यासाठी व पत्नीला आणि मलाही विषयांतर हवे झाले म्हणून सहा वर्षे रखडलेले घराचे करायचे राहिलेले कामही हाती घेतले. तेही आता संपत आले आहे. पण अजून एक मुख्य प्रश्न सुटला नाहीय. तो सुटल्याशिवाय पत्नी , मी व मुलगा यांच्या जिवाला निश्चिंतता लाभणार नाही. बघू कसे होते ते पुढे. 




(क्रमश:)

                          ....................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: