गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०२१

Short stories - 5

 स्फूट


बंडखोर संतकवी


आठवीत होतो. कवितेचा तास होता. सर संत , पंत, तंत कवींबद्दल सांगत होते. संत कवींबद्दल सर म्हणाले संत कवी हे बंडखोर कवी होते. त्यांनी अन्यायावर कठोर शब्दप्रहार केले. झाले. सरांचे हे वाक्य माझ्या डोक्यात जाऊन बसले. माझ्या बुद्धीमान डोक्यात बंडखोरपणा शिरला. मला अन्याय दिसू लागला. शिक्षकही काही वेळा मुलांवर अन्याय करतात असे मला दिसून येऊ लागले. मी शिक्षकांविरूध्दच बंडखोरी करू लागलो ! अक्कल ठिकाणावर येईपर्यंत हे चालूच होते. तोपर्यंत शाळेत आणि शाळेतल्या तक्रारी घरी आल्याने घरीही बराच (+बौध्दिक!) मार पडला होता !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२१

...............................


काही तरी असेलच ना ?

परवा एकाकडे बऱ्याच वर्षांनी जायचा योग आला. घरात दोघंजणच दिसली. अर्धा तास इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. दोन मुलांपैकी एकही दिसेना. ती दोघंही मुलांबद्दल काहीच बोलत नाहीत हे लक्षात आल्याने मलाही विचारण्याचा धीर झाला नाही. अखेर मी निघालो. पण मनात एकच विचार आला म्हातारा म्हातारी ब्लाॅकमध्ये बंदिस्त. पंख फुटलेली पाखरे स्वाभाविकपणे उडून गेली असावीत. पण त्यांचा विषयही आई वडिलांनी का काढला नसावा ? काही तरी असेलच ना ? हसऱ्या चेहऱ्याआडही काही दु:खं असेलच ना ?


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

२९.०१.२०२

................................


फुटुराचा तवा


परवा शेजारणीची घरभरणी होती. घर म्हणजे चाळीस लाखांचा सुंदर बंगलाच तो ! स्विमिंग पूल नाही एवढीच त्रुटी फारतर ! बाकी तिच्यासारखाच भरभक्कम बंगला ‌. घरभरणी पण सुंदर झाली. कशात कमतरता नव्हती. पण शेजारणीला एक कमतरता जाणवलीच ! ती माझ्या सौ.ला म्हणाली, " मला प्रेझेंट म्हणून पाकीटातून पैसे घालू नकोस. तवा दे, तो पण फुटुराचाच दे ! " दिला. आम्ही हजार रूपयाचा फुटुराचा तवाच तिला प्रेझेंट म्हणून आणून दिला ! आमचे (मनातले !) आणखीचे हजार रूपये वाचले म्हणून आम्ही खूश आणि तवा मिळाला म्हणून शेजारीण खूश ! करना पडता हैं भाई !


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

३०.०१.२०२१

...............................


तावातावाने....


नोकरीत असतानाचा एक प्रसंग. एक कर्मचारी तावातावाने बोलत माझ्या टेबलसमोर उभा राहिला. मी शांतपणे त्याला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. माझी ती पध्दतच होती. हो ना करता करता तो अखेर बसला. काय झालंय , एवढा का वैतागलायस , असं मी विचारता तो घुश्श्यातच बोलला, किती दिवस झाले माझं तुम्ही कामच करीत नाहीयत. हे काय चाललंय ? त्यावेळी मी नेमकं त्याचंच काम करीत होतो. मी कागद पुढे केले. हे बघ मित्रा तू यायच्या आधीच मी तुझंच तर काम हातात घेतलेलं आहे. यावर किंचित नरमून तो म्हणाला, होय पण किती दिवस लावलेत ? मी शांतपणे त्याला त्याच्या विभागाकडून माझ्याकडे त्याचा अर्ज पाठविल्याची आणि माझ्याकडे अर्ज आल्याची तारीख दाखवली. आजच माझ्याकडे अर्ज आल्याचं आणि मी आजच त्यावर कार्यवाही करीत असल्याचं बघून तो गडबडलाच ! आठ दिवस त्याचा अर्ज त्याच्याच विभागात होता हे बघून त्याने माझी क्षमा मागितली आणि धन्यवादही दिले. पुढच्याच क्षणी , मघाशी ज्या तावातावाने तो माझ्याकडे आला होता त्याच तावातावाने तो त्याच्या विभागाकडे भांडायला निघून गेला ! तिकडे काय झाले असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता. 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०२.०२.२०२१

....................

भविष्य जाणले कुणी ?

वास्तव ओळखूनही पुढे काय होणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. अनेकदा भविष्यात असेही होते, तसेही होते. सर्वसाधारण आकलन होऊनही तारूण्याच्या उर्मीमुळे वा बुध्दीला पडलेल्या भुलीमुळे मन मानत नाही. मन ऐकत नाही; बुध्दी चालत नाही अशी अवस्था होते ! हेलकावे खात खात शेवटी काही तरी निर्णय घ्यावाच लागतो. तो बरोबर निघाला तर आनंदच. पण  तो चुकीचा निघाला की वाईट वाटतेच, पण वेळ निघून गेलेली असते. दुर्दैव आहे ! 


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

०८.०२.२०२१

.........................................................

पोटदुखीसे मजबूर !

तो आज त्या पदापर्यंत पोचला तशी काहींची पोटदुखी जागी झाली. हा जगभरातला आजार. कायमचा. कोरोनापेक्षाही चिवट. काहींनी तो इथपर्यंत कसा पोचला याची खमंग चर्चा सुरू केली. कोण म्हणाला कोणाच्या तरी पाठी फिरून, तर कोण म्हणाला , बायकोचे योगदान आणि ते सारे छद्मी हसले. पण कोणीच म्हणाला नाही की तिथपर्यंत येण्यासाठी त्याने काय काय आणि किती किती सोसले ! किती वर्ष पड खाऊन काय काय भोगले ! त्याची ही किंमत कोणीच जाणली नाही. पोटदुखीसे मजबूर ! काय करणार !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

........................................................

डॅंबीस

" तो तसो चांगलो हाय, पण त्याच्याभवती जे हायत ना, ते डॅंबीस हायत " एक अशिशित खेडूत महिला एका राजकारण्याला सर्टिफिकेट देतांना म्हणाली. खरं तर, राजकारणात आता चांगलेपणाचा उपयोग आणि एकूणच राजकारणाची पातळी यातून सर्वत्र जे पसरायचे ते पसरले तर नवल नाही  ! आता हेच बघांना, जिने हे सर्टिफिकेट दिलं ते काय तिचं खरं मत थोडंच होतं ! तिला त्या नेत्याकडून पैसे उकळायचे होते ( तीच म्हणाली !) ! न जाणो तो पक्का डॅंबीस आहे हे तिचं खरं मत ती माझ्याशी बोलली आणि मी ते त्यालाच सांगितलं तर....या हुशारीने तिने सराईतपणे भाषा बदलली होती. गंमत म्हणजे तो नेता तिला अशिक्षित, अडाणी , गरीब बाई म्हणतो ! आता यात नक्की डॅंबीस कोण ?


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

१०.०२.२०२१

................

रोजगार उद्योगाची गंमत


नुकतीच बातमी वाचली. सगळ्या योजना तालुक्यातील एकाच गावात राबवून तरूणांना रोजगारामार्फत उद्योगशील बनवायचे व एक आदर्श गाव तयार करायचा , ही  योजना एका चांगल्या संस्थेने सदहेतूने जनकल्याणार्थ जाहीर केली होती. पण जाहीर केलेल्या योजनेला शून्य प्रतिसाद मिळाल्याचे संयोजकांना जाहीर करून पुन्हा जाहीर आवाहन करावे लागले आहे.‌ बहुतेक तरूणवर्ग तालुक्यातील नुकत्याच झालेल्या निवडणुकांतील काही 'उद्योगा'त गुंतवला गेला असावा ! कोण म्हणतो युवक बेरोजगार आहेत म्हणून आणि त्यांना 'उद्योग' नाहीत म्हणून ? 

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील

११.०२.२०२१

................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: