नवीन यू ट्यूब चॅनेल : देवीदासाची डायरी
#diary
#devidasachi_diary
Devidasachi Diary
नमस्कार रसिकहो ! मी देवीदास हरिश्चंद्र पाटील आपलं स्वागत करतो देवीदासाची डायरी या माझ्या नव्या यू ट्यूब चॅनेल वर ! ही डायरी सुरू होते ती दि. १२ नोव्हेंबर २०१२ रोजी !
योगायोग असा की नेमके याच दिवशी मी माझे देवीदास पाटील हे पहिले वहिले यू ट्यूब चॅनेल निर्माण केले होते . नुकतेच त्याचे नांव मी देवीदास पाटील क्रियेशन असे ठेवले आहे. गेली दोन वर्षे आपण सर्वांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याने ते प्रगतीपथावर आहेच.
माझे आणखी एक मराठी चॅनेल आहे आणि एक इंग्रजी चॅनेल आहे. मग हे चौथे चॅनेल कशाला ? खरं सांगू ? गेली दोन वर्षं आपण मला जे प्रेम देत आहात , त्यामुळे तुमच्याशी माझे एक वेगळेच नाते जुळले आहे . आता मला तुमच्याशी अधिक जवळीक साधायची आहे. माझं अंतर्मन तुमच्याशी बोलू इच्छितय . निव्वळ याचसाठी ही देवीदासाची डायरी आहे !
डायरी सलग लिहिली जातेच असे नाही. माझेही डायरी लेखन सलग झालेले नाही. पण जे मी डायरीत लिहिले आहे ते तुम्हांला मी सांगणार आहे. ही डायरी आयुष्यातल्या घटनांचा जिवंत चित्रण आहे. अनेक प्रवाहांमधला तो प्रवास आहे.
या पहिल्या भागाला मी शिर्षक दिलंय :
माझ्या मना, तुला सलाम !
याला कारणही असंच आहे . ऐका म्हणजे नक्की कळेल बरं का....
माझ्या मना, गेल्या वर्षी मी डायरी लिहिण्याचा संकल्प सोडला होता. पण डायरीत एक अक्षर लिहिले असेन तर शप्पथ !
... आणि एक वर्षानंतर प्रत्यक्ष डायरी लेखनाला अशी सुरुवात केली आहे बघा ...:
माझ्या मना , एक वर्षानंतर आपण इथे भेटतोय ! तसे आपण खूप ठिकाणी सतत भेटत आलोय . आपण दोघे आहोतच कुठे ? आपण एकच तर आहोत. हे माझ्या मना , एक वर्ष आपण ह्या डायरीत भेटलोच नाही . पण आपलं स्वगत चालूच होतं !
अनेक प्रसंग या दरम्यान आले .बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले . आपण दोघांनी मिळून ते पहिले ! अनेक विसंगत बाबी आयुष्यात आल्या . आपणच त्या सुसंगत करीत गेलो ! अश्यावेळी तुझी साथ नसती तर ? माझे एकट्याचे काय झाले असते कोण जाणे !
पण तू सतत सोबत राहिलास ! अनेकदा मी नाउमेद झालो ! खचून गेलो ! डोळे भरून आले ! पण तू धीर दिलास ! समजावलेस ! खरेच मी तुझा किती आभारी आहे याची कदाचित तुलाही कल्पना नसेल !
शनीच्या साडेसातीतले ते कदाचित अखेरचे वर्ष असावे ! इतके भयंकर दिवस होते ते ! त्यातून सुटेनसे वाटलेच नव्हते ! सतत घायाळ , घायाळ आणि घायाळच होत होतो ! खूप खोल घाव झाले होते ! पण माझ्या बरोबरीने तू ते सारे सोसलेस !
तू माझा सखा झालास . तू माझा परमेश्वर झालास ! माझे प्रत्येक खचणारे पाऊल तू उचलून धरलेस ! कधीही तोल जाऊ दिला नाहीस ! हे माझ्या मना , केवळ तू होतास म्हणून मी तरलो !
तसे पाहिले तर ०१ ऑक्टोबर २००९ ते २१ ऑगस्ट २०१२ हा संपूर्ण कालावधीच जीवनातला काळोखाचा कालावधी होता . त्यातला गेल्या वर्षभरातला कालावधी तर अंत पाहणारा होता . पण तुझ्या सोबतीने हा सारा प्रवास थोडाफार सौम्य झाला ! आज १२ नोव्हेंबर २०१२ . दिवाळीच्या आदला दिवस . ह्या पवित्र दिवशी , माझ्या मना, माझा तुला सलाम !
#devidas_patil
..............
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा