शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

काव्यसुगंध कार्यक्रम

 काव्यसुगंध कार्यक्रम

शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथील काव्यसुगंध कार्यक्रम. 


#रयत_शिक्षण_संस्थेच्या शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिरगांव, ता . चिपळूण येथे दि. 12.01.2023 रोजी भेट देण्याचा योग आला. प्रयोजन होते तेथील विभागप्रमुख मा. श्री. रमेश बाजीराव शिंदे सरांच्या सेवा सदिच्छा सत्कार समारंभाचे. 

त्यासोबतच सुरु असलेल्या विज्ञान प्रदर्शन व सायंकाळी सुरू होणारे स्नेहसंमेलन यातूनही काव्यसुगंध या कवितांच्या कार्यक्रमाचे आवर्जून आयोजन करण्यात आले होते. कवितेसाठी केवढी ही धडपड ! खरंच, खूप कौतुक वाटले !










निमंत्रित कवी म्हणून माझ्यासोबत कवयित्री सौ. सुनेत्रा जोशी होत्या .‌ सौ. सुनेत्रा जोशी यांनीही सुंदर कवितांनी कार्यक्रमात रंगत आणली ! 



आमचा हा एकत्रित असा पहिलाच #कार्यक्रम आणि तिथेही आम्ही नवखेच होतो ! माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसमोर कोणत्या कविता म्हणायच्या वा गायच्या हा तसा प्रश्नच होता. पण मिळालेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतच गेला. ज्याच्या कारने आम्ही गेलो होतो तो मयूर घोसाळेही मध्येच कार्यक्रमात येऊन बसला होता , यावरून कार्यक्रमाच्या रंगण्याची कल्पना तुम्हांला येईलच. 


विविध कार्यक्रमांतूनही कवितांचा कार्यक्रम ठेवण्यावरून शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा अमाप उत्साह व कवितेप्रती असलेले प्रेम दिसून आले.‌



कवितांचा हा कार्यक्रम आमच्या अपेक्षेपेक्षा चांगला झाला ते आपुलकीने केलेले आदरातिथ्य व उत्तम प्रतिसादामुळे. शिक्षक शिक्षिकांची दाद तर मिळत होतीच , पण आठवी नववीतले विद्यार्थीही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत टाळ्या पिटून वारंवार योग्य ठिकाणी दाद देत होते . इतकेच नाही तर कार्यक्रम संपल्यानंतरही कविता आवडल्याचे विद्यार्थी - विद्यार्थीनींनी आम्हांला भेटून सांगितले, हे विशेष ! यामागे शिक्षकांचे संस्कारही दिसून आले ! शिक्षकवर्गाचा उत्साह खूपच होता. त्यांनी तर आम्ही कोणी सेलिब्रिटी असल्यासारखे आमचे खूप फोटो काढले. यात आघाडीवर होते ते रसायनशास्त्राचे श्री. पवार सर. त्यांनी आमच्यासोबत सेल्फीही काढले आणि नंतर आठवणपूर्वक ते सगळे फोटो आम्हांला  काही तासांतच पाठवलेही ! या सगळयांमागे मुख्याध्यापक श्री. रोकडे सर हे आधारस्तंभ भासत होते ! 



सेवानिवृत्त झालेले श्री. रमेश बाजीराव शिंदे सर तर सेवानिवृत्त झाले आहेत असे वाटतच नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या सौ. यांनी तर आपुलकी आणि आदरातिथ्य यात कसलीही उणीव ठेवली नाही ! खरा सत्कार त्यांचाच असूनही त्यांनीच अगदी आगत्याने शाल , श्रीफळ व मानधनही देऊन आमचा सत्कार सोहळा घडवून आणला ! अशी व्यक्तिमत्वे भेटणे हा फार मोठा दुर्मिळ योग म्हणावा लागेल !


या कार्यक्रमाशी आम्ही जोडले गेलो त्या मा. श्री. श्रीकृष्ण साबणे सरांशी माझे कालच फोनवरून बोलणे झाले तेव्हा ते म्हणाले होते की तिथे शिंदे सर आहेत ते तुम्हांला काही कमी पडू देणार नाहीत , ते अक्षरशः खरे निघाले ! 


या सर्व आपल्याच माणसांचे आभार मानणे म्हणजे त्यांच्या आमच्यावरच्या व कवितेवरच्याही प्रेमाला गालबोट लावण्यासारखे आहे. पण या सर्वांसाठी प्रेमाचा एक आदरपूर्वक नमस्कार तर क्रमप्राप्तच ठरतो ! खरंच, या सर्वांना नमस्कार ! कुणाचा उल्लेख राहून गेल्यास दिलगिरी व्यक्त करतो. तसेच , श्री. आर. बी. शिंदे सरांसह सर्वांनाच त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹 !


... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील.  

दि. 13.01.2023

सकाळ 08.20


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: