सोमवार, २७ मे, २०२४

तीर पुन्हा चर्चेत...

तीर पुन्हा चर्चेत ....


#मराठीगझल हा विषय तसा आजकाल आपल्यासमोर अनेकदा येतो. #सुरेशभट , #भीमरावपांचाळे , #मभाचव्हाण ते #नितीनदेशमुख, #सतिशदराडे अशी अनेक नांवे मराठी गझलसंदर्भात घेतली जातात. आदरणीय सुरेश भट यांच्या हयातीत कोकणातील त्यांनी घडविलेले गझलकार म्हणून देवीदास हरिश्चंद्र पाटील यांचे नांव घेतले जाते. देवीदास पाटील यांनी रत्नागिरीत मराठी गझल पहिल्यांदा आणली. त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मित्र अजिज हसन मुक्री हेही त्यांच्याबरोबर मराठी गझल लिहू लागले व नावारूपास आले. 

देवीदास हरिश्चंद्र पाटील यांची तीर ही सुप्रसिध्द गझल आहे. तिचे दोन‌ शेर मराठी गझलसाठी जिवाचे रान करणारे गझलनवाज श्री.  भीमरावजी पांचाळे हे अनेकदा देशोविदेशातील मैफिलींमध्ये सुरूवातीलाच गाऊन मैफिलीचा माहौल तयार करतात व मैफील एका उंचीवर नेऊन ठेवतात . हे अनेक श्रोते ही सांगतात.

वाचकांनीही या शेरांबद्दल बोलक्या प्रतिक्रिया #फेसबूकवर दिल्या आहेत. त्या पोस्टचा फोटो खाली दिला आहे. तसेच, वरती " तीर पुन्हा चर्चेत " या शब्दांना क्लिक केल्यास आपल्याला ती पोस्टही प्रत्यक्ष पाहता येईल व कमेंट्स करता येतील. 

मराठी गझल


मंगळवार, ७ मे, २०२४

Yethe hasun Sara vaishakh sosala mi

 येथे हसून सारा वैशाख सोसला मी ...

डोळ्यातल्या घनांचा आषाढ रोखला मी !




Mi Veda hoto mhanuni

मी वेडा होतो म्हणुनी ...


मी वेडा होतो म्हणुनी ते सर्व शहाणे ठरले

ह्या वेड्याचे हे शहाणपण त्यांना कोठे कळले ?


ही अशी कशी बरे ह्या शब्दांची गफलत झाली ? 

मी गीत लिहाया बसलो ; गझलेचे शेरच लिहिले !


अंधार नशिबाचा मी असा मजेने पीत गेलो

पीता पीता माझे मीच अवघे नशीब उजळले !


मी अजून कोणाचा साधा निषेध केला नाही

खंजीर खुपसणारेही दिलगीर होऊन बसले !


मी लिहीत होतो ती केवळ एक कहाणी नव्हती

स्वप्नांनी मी आयुष्याचे पुस्तक नाही भरले ! 


... देवीदास हरिश्चंद्र पाटील 




शनिवार, ३० मार्च, २०२४

नारी शक्ती

 ०८ मार्च रोजीचा जागतिक महिला दिन जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायतीत दिमाखात साजरा . 


जागतिक महिला दिनी जगाच्या एका कोपऱ्यात वसलेला जाकीमिऱ्या हा छोटासा भूभाग. त्याच्या शेजारी असलेला भाटीमिऱ्या हा भागही छोटासाच. या दोन्ही भागांची ग्रूप ग्रामपंचायत म्हणजेच जाकीमिऱ्या - भाटीमिऱ्या ग्रूप ग्रामपंचायत. 

या ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा झाला. खूप सुंदर कार्यक्रमांमधून स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. स्त्रीयांचे अनेक प्रश्नं मांडण्यात आले. माध्यमे म्हणून पथनाट्य , नाच, गाणी इ. चा छान उपयोग करण्याची कल्पकता सर्व सहभागींनी व ग्रामपंचायत स्टाफने दाखवली. सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही खूप छान झाले. 

या कार्यक्रमांतून एक नंबर मिळालेल्या पथनाटयाचा यू ट्यूबवरील व्हिडीओ आपण आता पाहू या. 


जाकीमिऱ्यातील देऊळवाडी महिला मंडळाने या प्रथम क्रमांक मिळविलेल्या कार्यक्रमाबरोबरच नारी शक्तीचे एक सुंदर गीतही सादर केले. 


रविवार, २४ मार्च, २०२४

गझलेची प्रक्रिया व वृत्ताची अनाठायी भीती


मराठी गझलचे अंतरंग ...

काही वेळा हटकून पूर्ण गझल येतेच. त्यावेळी तुमची प्रतिभा तळमळून तीव्रतेने व्यक्त होते. मात्र  तुमची प्रतिभा कायम सर्वोच्च पातळीवर राहू शकत नाही. मग पुन्हा सुरूवातीच्या पातळीवर जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न हा सरावाचाच भाग असतो. 


खरे तर, पहिल्या ओळीतच गझल , गीत की कविता होणार हे ठरते. कवीने इथेच ठरवायचे असते. यालाच जमीन निश्चित करणे म्हणतात. लिहिण्याच्या ओघात आपण सजग राहणे कठीण असते. आपली तंद्री लागली की आपण भावनिक झाल्याने सजगता डळमळते. इथेच लक्ष ठेवावे लागते. एकदा लेखनाचे स्वरूप ठरवलात की पुढे जाण्यास प्रतिभेला वाव मिळतो. त्यामुळे आपले शब्द कोणते स्वरुप ( कविता, गीत , गझल इ. फॉर्मॅट) घेत आहेत , हे सुरूवातीलाच निश्चित करावे. 


तुमच्या स्वभावातच गझलेची तीव्र ओढ असेल तर तुमच्यात आपोआपच गझलियत असते. अशावेळी गझलियत किंवा गझलेची वृत्ती ही तुमच्या आतच असते. ती सरावाची वाट बघत बसत नाही. गझलेतच व्यक्त होते. गझलियत म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गझलेचे अंगभूत सौंदर्य असते. व्यक्त होण्यात सशक्तता असते. गझल म्हणूनच अधिक प्रभावी माध्यम बनते. त्यात जोरकसता असते. ठामपणा असतो. तरलताही तितकीच उत्कट असते. 


गझल ही शिकवण्याची गोष्ट नाही. ते गणित नाही. व्यवहारात येणारे अनुभव कवीच्या भावनाविश्वाला खोलवर छेडतात वा छेदतात तेथे प्रभावी गझलकाव्य निर्माण होते. क्वचित प्रसंगी निसर्गतः व काही वेळा सरावाने निर्माण होते . मात्र सराव म्हणजे केवळ वृत्तांचे गिरवणे नव्हे. यमकांची घोकंपट्टी नव्हे. सुरूवातीला हे ठीक आहे. मात्र त्यातच गुंतून राहिल्यास यमके सापडतील पण तुमची गझल तुम्हांला सापडणार नाही. तुमची गझल तुमच्यातच असते. म्हणूनच सुरेश भट नेहमी सांगायचे की स्वतःवर विश्वास ठेवून लिहा. 


नेहमी संपूर्ण गझल होत नसते हे अगदी बरोबर आहे. कारण आपण पहिल्यासारखी तल्लीनता टिकवू शकत नसतो. म्हणूनच गझल लिहिताना अस्वस्थपणा जाणवतो. पण पुढे लिहितांना सततचा आटापिटाही निरर्थक ठरतो. र ला ट जोडून गझल होत नसते. इथे सरावापेक्षाही तुमच्या प्रतिभेच्या पुन्हा पहिल्याच पातळीवर येऊन लिहावे लागते. ती पातळी पुन्हा मिळाली की एकसंध गझल कालांतराने पूर्ण होते. शेवटी हा प्रत्येक कवीच्या अंतर्गत भावविश्वाचा, ओढीचा,  सरावाचाही भाग असतो. हे सर्व मिळून गझल बनते.


वृत्तांची भीती अगदी निरर्थक असते. सराव केलात तर आपोआपच तुमची कल्पना योग्य त्या वृत्तात उतरतेच. गझल वृत्तात लिहिली जाते हे कळायच्या आधीच मी गझल लिहू लागलो होतो ते केवळ सुरेश भटांच्या गझलांतील शब्दक्रमाच्या लयीवर फिदा होऊन. जसे गीताच्या चालीवर दुसरे गीत सुचावे व लिहावे तसे. सुरेश भटांना मान्य झालेल्या काही गझलांनंतर मी पुस्तकातल्या वृत्तांकडे वळलो. पण तेव्हाही आणि आजही मी अमूक एका वृत्तात लिहायचे आहे असे ठरवून लिहीत नाही. *ओळ ओठांवर येते तेव्हा ती तिला योग्य त्याच वृत्तात येते. ही नैसर्गिक प्रक्रिया केवळ गझलच्या तीव्र  ओढीमुळे होत असते.* तीस पस्तीस वर्षे गझल लिहूनही ती ओढ टिकून आहे, हे गझलचे मोठेपण आहे. गझल हळुवारपणे तुमचा हात पकडते, पण पकडल्यावर ती सोडत नाही. प्रेयसीची बायको झाली तरी 😀😀.


#मराठी_गझल_कशी_लिहावी


.... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील

२४.०३.२०२४ सायं. ०६.००

.............

मराठी गझलचे सुलभीकरण 

मराठी गझलबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अगदी सुरेश भटांच्या हयातीतही ते होते . आजही आहेत. ते तसे असणारच. ते तसे असले तरी भटांनीच ठणकावून सांगितल्याप्रमाणे " दिवस अमुचा येत आहे , तो घरी बसणार नाही " असं म्हणत प्रत्येक नवा गझलकार गझल लिहितोच आहे. खुद्द मराठी गझलकारांमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. खरे तर, सुरेश भटांनी उभे आयुष्य वेचून मराठी गझलची रचना तयार केली. त्यांचा उर्दू, हिंदी व मराठी भाषांचा दांडगा अभ्यास, संगीताची उत्तम जाण आणि अलौकिक प्रतिभा पाहता त्यांनी शुध्द गझलचा आग्रह धरणे योग्यच आहे.‌ परंतु, त्यांच्या इतक्या तरल व प्रभावी गझला आजवर कोणालाही न जमल्याने अगदी नाईलाजास्तव मराठी गझलचे सुलभीकरण सुरू झाले. हे खरे तर भटांच्या कारकिर्दीतच सुरू झाले. भटांनी सांगितलेली वृत्तबध्दता काहींनी थोड्या वेगळ्या अंगाने घेतली. भटांनी अक्षर गणवृत्तात गझल हवी असे म्हटले. त्यातही त्यांचे एक वाक्य : " पहिल्या ओळीतील अक्षरक्रम शेवटच्या ओळीपर्यंत कायम हवा " हे सोयीने स्वीकारण्यात आले. म्हणजे , पुस्तकातली वृत्ते न घेता जशी पहिली ओळ सुचेल तसा अक्षरक्रम शेवटपर्यंंत ठेवून रचना लिहिण्यात आल्या. तशा आजही लिहिल्या जातात. खरे तर यामुळे नवनवीन वृत्ते तयार झाली असे म्हणता येईल.‌ मूळात पुस्तकी वृत्ते ही लयीसाठी व अनावश्यक शब्दांना लगाम घालण्यासाठी असतात. पण जर या दोन्ही गोष्टी पुस्तकबाह्य अक्षरक्रमाने साध्य होत असतील , ओघवतेपणाला बाधा येत नसेल, तर पुस्तकबाह्य वृत्ते तयार होण्यात अडचण नसावी, असा एक विचारही यामागे असावा.‌ काही असो, सुरेश भटांच्या हयातीतच हे घडू लागले होते . मराठी गझलच्या *सुलभीकरणाचा* हा *पहिला टप्पा* म्हणता येईल.

 (क्रमशः:)

#मराठी_गझल

... श्री. देवीदास हरिश्चंद्र पाटील 

२७.०३.२०२४

गुरुवार, २१ मार्च, २०२४

रत्नागिरीची गझलरत्ने

 मी नव्या खांद्यावरी... ( फेसबूकवरून साभार )

रत्नागिरी जिल्ह्याच्या #मराठी_गझल चा पस्तीस वर्षांंचा इतिहास व सद्याचे पंचवीस गझलकार अंतर्भूत असलेल्या रत्नागिरीची गझलरत्ने या पुस्तकाचे प्रकाशन. 


Marathi gazal in Ratnagiri

Marathi_gazal_in_ratnagiri


मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

Namsaptah 2023 part 2

नामसप्ताहाची सुरूवात : भाग २

मराठवाडीच्या पहिल्या पहाऱ्याची सुरूवात तर आपण पहिल्या भागातील  व्हिडिओत पाहिली. आता त्यानंतरच्या पहाऱ्याची म्हणजे देऊळवाडीच्या पहाऱ्याची काही भजने आपण पुढील व्हिडिओत पाहू. 

देऊळवाडी

व्हिडीओ पाहण्यापूर्वी देऊळवाडीतील थोडी माहिती घेऊ.‌ देऊळवाडी म्हणजे देवळापासून सुरू होऊन देवळाच्या मागे ३५-४० घरांचा पसरलेला अर्धवर्तुळाकार पसरलेला भूभाग . देऊळवाडीतील महिलाही मंदिरात नामसप्ताहाच्या पहाऱ्यात भजन करतात. इतकेच नव्हे तर एरव्हीही दर मंगळवारी त्या नवलाई पावणाई मंदिरात भजन करतात. फक्त हे भजन उभे राहून न करता बसून केले जाते. या महिलांच्या भजनाचा एक व्हिडिओच आता आपण पाहू : 


तर अशा देऊळवाडीचा पहारा हा आजकाल पुरूष आणि महिला असा मिश्रित स्वरूपाचा असतो. पुरूष वर्गामध्ये पूर्वापार पहारे करण्याची एक परंपरा आहे. प्रामुख्याने कै. नारायण भाटकर यांचे नांव यासंदर्भात आदर्श म्हणून घेतले जाते. त्यांच्याकडे तीन तास न थकता गायन करण्याचे सामर्थ्य होते. आजची कर्ती पिढी ही त्यावेळी बाल्यावस्थेत होती. या पिढीला साठ वर्षांची नामसप्ताहाची माहिती आहे. या पिढीला कै. नारायण भाटकर यांना भजन करतांना पाहण्याचे भाग्य लाभले आहे. कै. नारायण भाटकर यांचे त्यावेळचे सहकारी शिरधनकर , कीर , हातिसकर , पेडणेकर हेही या नामसप्ताहातील वैशिष्ट्यपूर्ण सहभागाबद्दल नावाजलेले होते. ही पिढी जबरदस्त शिस्तप्रिय होती व त्यांना पहारा सुरू असतांना कोणतेही वावगे कृत्य चालत नसे. इतकेच नव्हे ; तर कुठल्या मुलाचा ताल वा ठेका चुकला तर ते हातातला टाळ मारायलाही मागे पुढे बघत नसायचे. आजच्या कर्त्या पिढीने आजोबांच्या पिढीकडून असा मार कित्येक वेळा खाल्लेला आहे. 

मधली व्रात्य पिढी


खरं तर , नातवंडांच्या अंगात जो हूडपणा आला होता तो मूळातच मधल्या म्हणजे वडिलांच्या पिढीकडून आला होता. आजोबांना करडी शिस्त , भजनातील तल्लीनता अभिप्रेत होती खरी , पण त्यांच्याच तरूण , विवाहित मुलांनी हळूहळू ही शिस्त मोडीत काढायला सुरूवात केली होती . मात्र त्यांच्यामध्येही भजनातील आवड आणि तल्लीनता कायम होती. या व्रात्य पिढीत शंकर हातिसकर ,  मधूकर कीर ,  वामन पेडणेकर , अंकुश पेडणेकर , मुरारी हातिसकर ही नांवे आघाडीवर होती. हे सगळे चांगले गाणारे होते . यातले मधुकर कीर तर गवळण अतिशय गोड आवाजात व पूर्ण तादात्मतेने म्हणायचे. मात्र या पिढीने गाण्यातून एकमेकांना टोमणे मारण्याची कला खूपच विकसित केली होती. पण हे टोमणेही  ते खिलाडू वृत्तीने घ्यायचे , हे विशेष. त्यांच्या पुढील पिढीने मात्र टोमणे न मारता भजन करायला सुरूवात केली हेही विशेष ! या पिढीने हे पहारे करड्या शिस्तीला फाटा देत मोकळ्या वातावरणात , हसतखेळत होतील याकडे कटाक्षाने लक्ष दिले , हेही विशेष ! आज त्यांची मुले व नातवंडेही हाच कित्ता गिरवून नामसप्ताह आनंदाने पार पाडीत आहेत ! आज  पन्नाशी- साठीतल्या या पिढीत श्री. शैलेंद्र शंकर हातिसकर व श्री. दीपक मधुकर कीर हे भजनीबुवा देऊळवाडीचे आदर्श आहेत. त्यांच्या बरोबरीने श्री. सुनिल तुकाराम भाटकर , श्री. कमलाकर तुकाराम भाटकर, श्री. अजित वसंत भाटकर,  श्री. ययाती उदय हातिसकर ,  श्री. निलेश चंद्रकांत पेडणेकर, श्री. मंदार  महेंद्र लिंगायत हे सुंदर गायन करत आहेत. सुनिल व कमलाकर या भाटकर बंधूंनी तर थेट त्यांच्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे. ते न थकता बराच काळ सलग भजने म्हणतात ! अजित भाटकर हा त्यांचा चुलत भाऊही चांगला गातो . विशेषत: साईबाबांची भजने तो खूप तल्लीन होऊन गातो. 

एक हृद्य आठवण : 


अशीच एक हृद्य आठवण आहे ती एका हरहुन्नरी हसमुख कलाकाराची. भानुदास हातिसकर. जो गेल्या वर्षीच्या नामसप्ताहात उत्साहाने सहभागी होता ! पण यंदाच्या नामसप्ताहात त्याचे चैतन्यदायी व्यक्तिमत्व पाहण्याचे आमच्या भाग्यात नव्हते. त्याचे जाणे खऱ्या अर्थाने चटका लावून गेले ! भालचंद्र हा बाबा या टोपण नावाने सुपरिचित होता. 

गेल्या वर्षीच्या नामसप्ताहातील बाबाच्या आठवणी जागवणारे काही व्हिडीओ : 




बाबा स्वतःची रिक्षा चालवायचा. तो इतका प्रसिध्द होता की त्याच्या निधनानंतर शहरात काही ठिकाणी फ्लेक्स लागले होते. देऊळवाडीत तर त्याचे घरच आहे.‌ पण बरीच वर्षे ही हातिसकर मंडळी शहरात राहतात. तिथूनच बाबा नामसप्ताहाला यायचा. नुकतीच त्याची मुलगी यशश्री नवलाई पावणाई मंदिरातील नामसप्ताहात येऊन गेली. जिथे बाबा पेटी वाजवत असायचा त्याच जागेजवळ तिची भेट झाली आणि बाबाच्या आठवणी दाटून आल्या...

Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर नामसप्ताहाचे व्हिडीओ उपलब्ध...

नामसप्ताहाचे व्हिडीओ Devidas Patil Creation या यू ट्यूब चॅनेलवर उपलब्ध करण्यात येत आहेत.‌ त्यापैकी काही तुमच्यासाठी यू ट्यूब वरून इथे शेअर करीत आहोत. 







नामसप्ताहात संस्कृतीची देवाणघेवाण

जेव्हा संस्कृती विकसित होत असते तेव्हा तिचा इतर संस्कृतींशी संपर्क येतो. या नामसप्ताहाचेही असेच आहे. जाकीमिऱ्यात हा नामसप्ताह जसा जसा अन्य गावांतील भजनी कलाकारांना माहिती होत गेला , तसे तसे हे बाहेरगावचे कलाकार जाकीमिऱ्यामध्ये प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या नामसप्ताहात येऊ लागले. इथल्या लोकांनीही त्यांना नामसप्ताहात भजन सादर करण्यास आनंदाने मोकळीक दिली. संस्कृतींचे हे आदानप्रदान यावर्षीही दिसून आले . 

यावर्षी नारायणमळी गावचा मोर्या ग्रूप मंदिरात आला व त्यांनी अतिशय सुरेल अशी भजने सादर केली. त्यातल्या काही भजनांची झलक पुढील व्हिडीओमध्ये तुम्हांला आढळून येईल. त्यांच्या आणि इथल्या गायन व वादन पध्दतीतला फरकही आपल्या लक्षात येईल . चला तर आपण devidas patil creation या  यू टयूब चॅनेलवरून प्रत्यक्ष व्हिडीओच पाहू.‌


अशा प्रकारे , नामसप्ताह सुरू आहे. त्याचं वार्तांकनही सुरू राहीलच. पण तूर्तास इथेच थांबू ! तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा . 

गझल , तूम मेरी जिंदगी बन गयी हो ...

तेरा मतला मेरा काफिया 


जो न मौका मिला था कभी, वो मौका मिलने लगा 

बढ़ने लगी मुलाकाते ....  प्यार में रंग भरने लगा ...


चेहरे पे हंसी आ गयी, दिल में उमंग छा गयी

तिरछी नजर का इशारा अब समझने लगा


नींद ऐसी लगी... ख्वाब ऐसे आये के पूछो मत

किसी तालाब में चांद उतरकर थिरकने लगा


न जाने ये क्या हो गया, न जाने ये कैसे हो गया

तेरी आखो में मेरा खयाल अब झलकने लगा 

 

गझल, तुम मेरी जिंदगी बन गयी हो,  क्या कहूँ ? 

तेरा मतला मेरा काफिया इक दुजेमें ढलने लगा !


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०८.२०२३ दोपहर ०३.३०