गुरुवार, २५ जून, २०२०

मराठी गझलबाबत....

मराठी गझलबाबत थोडेसे ....

मराठी गझल हा आता अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. मी काही अधिकारी व्यक्ती नाही. प्रतिभावंतही नाही. काही नवोदित अजूनही मार्ग शोधतांना आढळतात . विशेषत: रत्नागिरीसारख्या ठिकाणी त्यांना अनेक अडचणी येतात. रत्नागिरीत नुकताच गझलमंथन नावाचा व्हॉट्सॲप ग्रूप स्थापन करण्यात आला आहे. आदरणीय सुरेश भटांनी दाखवलेला मार्ग अनुसरतांना नवोदितांसाठी चार साधे शब्द मराठी गझलबाबत लिहून त्यांचे ऋण थोडेफार फेडता आले तर पहावे , हाही हेतू आहेच. 

        हे सगळे मी माझ्या अल्प कुवतीनुसार लिहीत आहे. त्यात तुम्ही अधिक भर घालू शकता व मी काही विसरलो असेन किंवा माझे काही चुकले असेल तर तेही आवर्जून मोकळेपणाने सांगा . आपल्याला गझल सुंदर बनवायची आहे ! 

गझल लिहितांना ....

1. एखादी गोष्ट आपल्या मनात गेलेली असते. ( आपण कवी असल्यामुळे ) ती कधी तरी अचानक काव्यस्वरूपात आपल्या ओठांवर एका किंवा परस्परांशी संबंध असणा-या तसेच यमक वा अंत्ययमक वा दोन्हीही असणा-या दोन ओळीत व्यक्त होते. अशा पहिल्या दोन ओळी म्हणजेच गझलचा मतला असतो ! 

2. वरीलप्रमाणे मतल्यात संपूर्ण गझलची जमीन किंवा रचना बनते ! कधी कधी मात्र , दोनपैकी कुठल्या तरी एकाच  ओळीत यमक / आणि अंत्ययमक येतात. ( यमक व अंत्ययमक याबाबत वेळेअभावी आता लिहिणे शक्य नाही. लवकरच लिहीन ! ) हा सुटा शेर जन्मतो व त्यानुसार आपण मतला लिहिण्याचा प्रयत्न करतो. तुमची पूर्णत: तंद्री लागली असेल तर किमान पाच शेर एकामागोमाग सुचतील. नाही तर अधिक वाट पहावी लागेल. वाट पाहणेही फायद्याचे ठरते. 

3. गझल ही वृत्तातच लिहायची असते. वृत्ते आपल्याला शिस्तबध्द व लयीत लिहायला मदत करतात. मात्र ती आपल्या प्रतिभेची कसोटी पाहतात. सरावातून आवड निर्माण झाली तर  तुम्ही वृत्तातही सहज लिहून जाता.  मात्र , तुम्ही केवळ पुस्तकी वृत्तांतच जास्त काळ अडकून न पडता , तुमच्या येणा-या पहिल्या ओळीनुसार अक्षरांचा लघु गुरू क्रम शेवटच्या शेराच्या अखेरच्या ओळीपर्यंत कायम ठेवल्यास तुमची अशी वृत्ते तयार होतात ! तेव्हा पुस्तकी वृत्तांची भीती मनात असेल तर ती पहिली काढून टाका. 

4. सुरेश भटांनीच सांगितले आहे की गझल ही वृत्त नसून वृत्ती आहे. तिलाच गझलीयत म्हटले जाते. खरे तर, गझलीयत ही तुमची सहजशैली असते. ती कलंदर वृत्तीे किंवा लिहिण्याची नशा असते , उर्मी असते, जी तुमचा एकेक शेर व गझलही एका वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवते !

5. शेर म्हणजे एखाद्या गोष्टीवर केलेले नेमके व अर्थपूर्ण काव्यमय भाष्य. काही प्रसंगी अगदी वर्मावर ठेवलेले बोटही !  दोन ओळींचा शेर बनतो. यात पहिल्या ओळीत प्रस्तावना ( जमीन ) असते तर दुस-या ओळीत त्याच कल्पनेचा शेवट ( आकाश ) असतो .  जमीनीवर सुरू झालेली कल्पना पार आकाशी नेऊन भिडवायची असते ! कल्पनेची ही जी काव्यमय उंच भरारी घेता तीच तुमच्या शेरांची किंवा गझलांची उंची बनते ! कधी कधी काही जणांनी अगदी साध्यासुध्या शब्दातही फार मोठी उंची सहज गाठलेली दिसते . त्यावेळी ते सहज जुळून आलेले शब्द असतात. तो प्रतिभेचा आविष्कार असतो.  लिहितांना अनावश्यक शब्द टाळून वा कमी करून गझल नीटनेटकी व अधिक सुंदर बनवणे ही आपल्या हातांची व नजरेची सफाई असते . आपली आपण केलेली ही सुधारणा आपल्याला समाधान देऊन जाते .

6. स्वत:वर विश्वास ठेवा व लिहा. सरावाने व आवडीने अनेक गोष्टी शक्य होतात. गझल तर तुमच्यात आहेच ! 

           सर्वांना शुभेच्छा !

.......

05.07.2020

आपली प्रत्येक रचना गझलच झाली पाहिजे असे गझलची ओढ मनात असल्याने होतेच. 

मात्र , आपण मूळचे कवी असल्याने , कोणती रचना गझल होईल आणि कोणती रचना इतर काव्यप्रकारात पुढे जाईल , हे आपण बहुतेक पहिल्याच ओळीत ओळखू शकतो. 

 रचनेची पहिली ओळ काव्यप्रकाराचे स्वरूप घेऊनच येते. 

गझलेबाबत जे वरील भागात तुमचा गोंधळ उडतो आहे , तो अर्धा इथेच आहे.

   उरलेला भाग गझलेच्या रचनेचा आहे. खरे सांगायचे तर सुरेश भटांनी हे ओळखूनच गझलेची बाराखडी दिली आहे. 

    गझलेबाबत सर्वात महत्वाचे म्हणजे आपली काव्यप्रतिभा आटेल, रचनेत क्लिष्टता येईल , इतका आटापिटा कधीच करू नये ! यासाठीच , गझल थोडी मोकळीही सोडली पाहिजे. म्हणजेच, अक्षरगणात लिहितांना ओळीच्या दोन भागात यतीभंग होणार नाही , हेच पहावे. त्यापेक्षा अधिक तुकडे ( खंड ) पाडण्याची अजिबात आवश्यकता नाही. इथेच गुंता वाढतो ! शब्दांचे ओघवतेपण हे गझलेचे खरे सौंदर्य आहे. 

..........

टीप  :

 मराठी गझलबद्दलचा अशी शिका मराठी गझल हा लेखही अवश्य वाचा .  

...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: