विचित्र स्वप्नें - 1
स्वप्नांची दुनिया
स्वप्नांची दुनिया फार वेगळी असते ! पाहिलेली स्वप्नें आणि पडलेली स्वप्नें यात फरक आहेच. जागेपणी पाहिलेली स्वप्नें निराळी व झोपेत पडलेली स्वप्नें निराळी ! काही तारीखवार पडलेली स्वप्नें खाली दिली आहेत :
विचित्र स्वप्नें
तारीख नक्की आठवत नाही. पण स्वप्नं लक्षात राहण्यासारखेच आहे ! विषय कोरोनाचा आहे.
दुपारी वामकुक्षीच्यावेळी डोळयांवर एक हॉस्पिटल दिसले. रूम खूप मोठी आहे. मी मध्यावर उभा आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटस् , स्टाफ आहेत. स्टाफची कामे सुरू आहेत. माझ्या समोरच्या भिंतीला टेकून उजवीकडील काॅटवर झोपलेला एक उभटगोल चेह-याचा चाळीसपंचेचाळीशीतील मध्यमगौरवर्णीय पुरूष माझ्याकडे बघून हसतोय. त्याला बहुतेक डिस्चार्ज मिळणार असल्याचा भाव त्याच्या चेह-यावर आहे. अचानक त्याच्या शेजारी स्वामी समर्थ येवून काॅटवर बसतात. तेही माझ्याकडे बघून हसतात. त्यांच्या हातात जपमाळ असते. त्या हातानेच ते पुढे निर्देश करतात. मी तिकडे बघतो तर चक्क श्रीकृष्ण डाॅक्टरचा अॅप्रन घालून , स्टेथोस्कोप लावून, सलाईन स्टँड नीट लावत असतो ! त्याने काही तरी निश्चय केलेला त्याच्या ठाम चेह-यावर दिसत होता. अगदी तरूण वयातला हा श्रीकृष्ण आहे व तो आता कोरोनाच्या लढाईत डाॅक्टर बनून स्वत:च उतरतो आहे, असे मी मनात म्हणत असतानाच माझी लिंक तुटली. आता परमेश्वरच लढायला उतरला तर कोरोनावरचा विजय फार दूर नाही.
..........
11.06.2020.
आज माझ्या भाचीला - मीनलला मेसेज केला. आज माझ्या स्वप्नात तिचे वडील (ज्यांना आम्ही सारे भाऊ म्हणतो ) आले होते. त्यामुळे सकाळी उठल्यापासून मी बेचैन होतो. चहा घेतांना मी सौ. लाही सांगितलं. काल रात्री भाऊ माझ्या स्वप्नात आले होते. ते जयस्तंभाकडून राजीवडयात त्यांच्या मूळ घरी चालले होते व मी स्टेट बँकेकडून जयस्तंभाच्या दिशेने चाललो होतो. वेळ सकाळची असावी. संपूर्ण रस्ता निर्मनुष्य होता. एकही गाडी रस्त्यावर नव्हती. स्टेट बँकेसमोर आमची भेट होते. भाईंबद्दल ( त्यांचे अलिकडेच निधन पावलेले थोरले बंधू ) आमचे थोडे बोलणे झाले आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. इथे स्वप्नं संपले व मी जागा झालो. मीनलने माझा मेसेेज वाचून लगेच रिप्लाय दिला तो असा : सध्या भाऊंची तब्येत थोडी खराब होती आता बरे आहेत . म्हणजे स्वप्नं खरं होतं तर. मीनल व तिचे वडील तर सिंधुदुर्ग जिल्हयात स्थायिक झाले आहेत. पण स्वप्नात भाऊ मला रत्नागिरीत निर्मनुष्य रस्त्यावर भेटतात , त्या निर्मनुष्य रस्त्याचा अर्थ काय ? जयस्तंभ परिसर का दिसला ? निर्मनुष्य रस्त्याचा कोरोनाशी काही संबंध असेल का ? काय घडत आहे ? काय घडणार आहे ?
.........
14.06.2020 दोन स्वप्नें :
आज दोन स्वप्ने पडली. एकाच इमारतीशी संबंधित . एकाच वेळेशी संबंधित. माझ्या दोन माजी सहका-यांशी संबंधित .
पहिल्या स्वप्नात मी माझ्याच कार्यालयात एका टेबलाशेजारी उभा. माझ्या बाजूला कोणीतरी आहे. वेळ दुपारी दोनची आहे. टेबलाशी संबंधित व्यक्ती ( श्री. डोंगरे ) जेवून तोंड धुवून आली आहे व कोप-यातल्या फडक्याला हात पुसून टेबलकडे येत असते. माझ्या मागचा माणूस मला हातातला कागद द्यायला सांगतो. पण मी ती व्यक्ती खुर्चीत बसल्यावरच देतो म्हणून सांगतो. तेवढयात ती व्यक्ती खुर्चीत बसते व हसत हसत हात पुढे करते. त्याने पांढरा हाफ शर्ट परिधान केलेला असतो . तो पूर्वीचा माझाच सहकारी असतो. मी माझा अर्ज त्याच्या हातात देतो . तो स्वीकारून त्यावर बहुधा आवक क्रमांक टाकतो आणि पोच म्हणून माझ्याच अर्जाची दुसरी प्रत मला तो देतो. गंमत म्हणजे मी नोकरीत आहे की रिटायर्ड झाल्यानंतर मी कार्यालयात गेलो आहे , हे कळत नाही. दुसरे असे की समोरचा माणूसही प्रत्यक्षात माझ्या अगोदरच रिटायर्ड झालेला आहे !
दुसरे स्वप्नंही लंच अवरच्याच वेळेचे दिसले. मात्र यात मी नोकरीत असल्याचे दिसले. कार्यालयातील सद्याचे प्रबंधक व माझे सहकारी मित्र ( श्री. नार्वेकर ) कलेक्टर कार्यालयात कामानिमित्त गेलेले असतात. गंमत म्हणजे दुपारी दीड वाजता मी चक्क त्यांच्याच खुर्चीत बसून जेवत असतो. ते मध्येच येतात , माझ्याबरोबर हसतात आणि मी काही बोलायच्या आतच ते आपला डबा घेऊन सरळ कँटीनला निघून जातात ! ते दरवाजातून बाहेर पडतांना पाठमोरे दिसतात. त्यांनीही पांढरा हाफ शर्टच परिधान केलेला असतो. त्याचवेळी माझ्या ताटाकडे माझे लक्ष जाते व ताटात खूपच भात वाढलेला दिसतो. हे फार विचित्र आहे. काय घडणार आहे कोण जाणे !
.......... ( प्रत्यक्षात, हा दिवस फार विचित्र गेला , इतका की आयुष्यात काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली . )......
..............
24.06.2020
घराच्या मागील बाजूस दक्षिण दिशेला नळाजवळ मी उभा असतो. समोरच मुलगा दात घासत उभा असतो. उजव्या बाजूला सौ. स्वयंपाकघरात काही तरी करीत असते . माझे लक्ष मुलाच्या हातातील टूथब्रशकडे जाते. ते फाटलेले दिसते. मी त्याला सांगतो , अरे हे कसले ब्रश वापरतोस . घरात त्या डब्यात बघ नवीन ब्रश आहे. हे बोलतो तोच मला जाग येते. ( पाचव्या दिवशी मांडणीवरील एका डब्यात खरोखरच कधी तरी आणून ठेवलेले मुलाचे नवे टूथब्रश सापडले ! )
...........
25.06.2020
मी माझ्या शेजारी चुलत भाव बजरंगाकडे जातो. त्याला विचारतो की अरे तू त्याचे ( मी कोणाचे नांव घेतले ते आठवत नाही) पैसे का परत दिले नाहीस ? तर तो म्हणतो की माझे (म्हणजे त्याचे) दीडशे रूपये मिळाले नसते. मी ते उत्तर ऐकून बाहेर पडतो , तिथेच मला जाग आली.
............
28.06.2020
आज दुपारच्या झोपेत स्वप्नं पडलं . नवलाई मंदिराच्या प्रांगणात पाच सहा फूट पाणी आहे व त्यात मातीचा रंग मिसळलेला आहे. बहुधा खूपच पाऊस पडून गेला आहे. पाण्यात एक छोटी होडी असून त्या होडीत मी व माझी पत्नी आहोत. प्रांगणाच्या आयताकृती आकारात मी ती होडी वल्हवत फिरवतो आहे. उत्तरपूर्वेकडील कोप-यात होडी येते तेव्हा मात्र माझ्या हातातले वल्हे कुठे जाते ते कळत नाही व मी कठडयाचा आधार घेत घेत होडी पुढे ढकलतो आहे व त्याचवेळी मी पत्नीला काही तरी सांगत असतांनाच मला जाग आली. बहुधा साडेचारच्या सुमारास हे स्वप्नं पडत होते.
.........
29.06.2020
आज तीन स्वप्नें पडली. तीनही स्वप्नांत मी प्रवासातच होतो !
1.आज सकाळीच स्वप्नात चक्क अमेरिकेला काही लोकांना सोबत घेऊन गेलो होतो ! तिथल्या वर्तमानपत्र जगतातल्या विभुतीशी अस्खलीत इंग्रजीत दहा पंधरा मिनिटे बरीच चर्चा एकटयानेच केली. पण नेमके विचारायचे होते तोेच मुद्दा विचारायला विसरलो, असा विचार लगेच केलेल्या परतीच्या प्रवासात मी स्वत:शी बोलतो आणि तेवढयात जाग आली ! गंमत म्हणजे त्या अमेरिकन माणसाचा चेहरा मला सडामि-यामधील एका माणसाच्या चेह-याशी मिळताजुळता वाटतो !
2. दुस-या स्वप्नात मी कुठल्या तरी विस्तीर्ण मोकळया सडयावर आहे. बहुतेक तो हातखंब्याचा सडा असावा. कुठून तरी चालत मी मुख्य रस्त्यावर येतो. काही वाहने जातांना दिसतात. कोणी तरी मला सांगतो की ते विमानाचे भाग वाहून नेले जात आहेत. ती वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतात. त्याच वेळी तो माणूस पूर्वेच्या आकाशाकडे बोट दाखवतो. तिकडे एक चक्क काळया रंगाचे विमान पूर्वेकडून पश्चिमेकडेच येतांना दिसते. तो माणूस सांगतो की बंद पडलेल्या विमानाला ते वाहून आणत आहेत ! जमिनीवरून बंद पडलेल्या वाहनाला दुसरे वाहन ओढून नेते हे तसे नेहमीचेच. पण अधांतरी आकाशातून एक विमान चक्क दुस-या विमानाला ओढून नेते हे फारच विचित्र होते. एक तर त्या विमानाचा रंग काळा आणि ते एकच विमान मला दिसत होते. दुसरे कुठे होते ? वाहून कोण कोणाला नेत होते ? हे प्रश्न मनात यायच्या आतच माझे डोळे उघडले ! ( राफेलचा गुंता ? )
3. या स्वप्नातही मी कुठे तरी प्रवासालाच निघालेलो आहे. कुठल्या तरी भागात मी आलो आहे. तिथे एक खाजगी ट्रँव्हल्सची बस उभी आहे. केबीनमधून डोके बाहेर काढून ड्रायव्हर मला कुठे जायचेय असे विचारतो. मी त्याला उत्तर दिशेकडील कोणते तरी एक ठिकाण सांगतो. पण तो म्हणतो की आमची गाडी अमूक ठिकाणापर्यंतच जाते. तिथपर्यंत सोडतो. पुढचं मी काही सांगू शकत नाही . मी पुढे वाहन मिळेल की नाही , काय करायचे , असा विचार करीत जागेवरच उभा असतांना माझे डोळे उघडतात !
........
03.07.2020
गेले तीन दिवस तीन स्वप्नें पडली. पहिल्या दिवशी रंगाने सावळे असलेले माझे जुने सहकारी स्वप्नात दिसले. दुस-या दिवशी माझे जुने साहेब दिसले . तेही रंगाने सावळेच आहेत ! तिस-या दिवशी माझा पुण्याला असलेला मुलगा रत्नागिरीच्या कलेक्टर कचेरीसमोरच्या एका दुकानात दिसतो व रस्त्यावरून मी त्याला खाली स्टँडच्या दिशेने जाण्यासाठी खुणावतो.
............
11.07.2020
गोव्यात गेलेलो दिसलो. पण नक्की स्वप्नं आठवत नाही !
...........
17.07.2020
स्नप्नातही रात्र असते. हाँलमध्ये मी उजव्या कुशीवर झोपलो आहे. माझ्या मागे माझा मुलगा झोपलेला आहे. पत्नी कुठेच दिसत नाही. मात्र , माझ्या उशाला माझ्या डोक्याजवळ डोके ठेवून कोणी तरी पांढ-या शर्टातला तरूण झोपला आहे. तो माझी कळ काढू लागतो. डोक्याला हात लावतो. खांदयाला हात लावतो. मी मुलाला सांगतो हा बघ रे काय करतोय ... पण मुलगा काहीच बोलत नाही. मी त्या तरूणाचे दोन्ही हात पकडतो आणि त्याच्या मानेवर दाबून त्याला सांगतो की गप्प रहा, मी काहीही करू शकतो. असं म्हणत मी त्याच्या मानेवरचा दाब वाढवत नेतो. तो सुटकेचा प्रयत्न करीत असतो आणि तेवढयात मला जाग येते. त्रास देणारा तो तरूण म्हणजे कोरोनाचे प्रतिक तर नसेल ना ?
..........
20.07.2020
आज सकाळीच दोन स्वप्नें पडली. दोन्ही भयानकच ! सर्व घरात श्रावणाच्या स्वागतासाठी जोरदार स्वच्छता व शुध्दता केलेली आहे. या पार्श्वभूमीवर घरातच ही खतरनाक स्वप्नं पडावीत, हे काही चांगल्याचं लक्षण नाही. ती स्वप्नें पाहूया.
1. घराच्या अगदी काटकोनातील वायव्य कोप-यात एका स्टुलावरील गोलाकार भांडयात नुकतेच आणलेले मासे ठेवलेले आहेत. शेजारीच मी उभा आहे. माझ्या पुढयातच पिवळया रंगाचा बोका त्या भांडयातच उडी मारतो . माझी कल्पना अशी असते की तो एक मासा घेऊन बाहेर जावून तो खाईल. पण तो बाहेर न पडताच अधिक मासे खाऊ लागतो. त्याच्या खाण्याचा विचित्र आवाज येत असतो. मी त्याला फटके मारू लागतो, पण तो मुटकुळी करून भांडयालाच चिकटतो आणि त्याही स्थितीत मचमच आवाज करीत मासे खातच राहतो. माझ्या फटक्यांना तो जुमानत नाहीय हे माझ्या लक्षात येते आणि तिथेच जाग आली !
2. शेजारची साक्षी सद्या तिच्या माहेरी आहे. पण ती स्वप्नात आमच्या घरात लोळत पडलेली दिसतेय. मी तिला ढकलतोय, पण ती उठत नाहीय. चिवटपणे पडूनच राहते . ( दि. 07.08.2020 रोजी तिची सासू सांगून गेली की म्हणे ती आता सासरी येणारच नाहीय. )
........
04.08.2020
रात्रीची वेळ. स्वप्नात जुने घर दिसते. मागच्या पडवीतून वडील बाहेर दक्षिण दिशेला जातात. आई पडवीत ताठ सरळ उभी . मी माजघरातून आईच्या दिशेने जात असतांना आई मला वडील बघ बाहेर काय करतायत ते म्हणून सांगते . इथे स्वप्नाचा पहिला भाग संपतो व दुसरा लगेच सुरू होतो. दुस-या दिवशीची सकाळ दिसते. पुढच्या दारी उत्तरेला लाकडाच्या मोठया ओंडक्यावर मी , माझ्या उजवीकडे पांडवीन काकी व तिच्या उजवीकडे सुधरीन वहिनी हया दोघी विधवा असे पूर्व पश्चिम बसलेले असतो. अचानक माझा लक्ष घराच्या वायव्य कोप-याकडे जाते. बघतो तर माझे वडील केवळ लंगोटवर खाली वाकून जमिनीला तोंड लावतांना दिसतात. मी झटकन उठतो आणि त्या दिशेला जात असतानाच सुधरीन वहिनी मला अडवण्याचा प्रयत्न करते. मी तिचे हात झटकून वडिलांच्या दिशेने निघतो आणि इथेच मला जाग येते. वडील काही अंतरावर वाकलेल्या स्थितीतच असतात.
..........
05.08.2020
काल ते तसे विचित्र स्वप्नं पडले आणि आज... काल उत्तर दिशेला घटना घडत होत्या. आज दक्षिण दिशेला रस्त्याच्या कडेला असलेले गेट उघडून एक पाय रस्त्यावर टाकून मी गेटला धरून उभा आहे. समोर कोणी तरी आहे . बहुधा मी त्याच्याशी काही तरी बोलतो आहे. तेवढयात एक स्त्री मला डावीकडून चिकटते. तिची त्या जवळीकीची जाणीव होऊन मी उजवीकडे सरकतो आणि इथेच मला जाग येते.
.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा