मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

अत्यंत खराब कालावधी

 

मागे - पुढे




गेल्या भागात तुम्ही वाचलात की ...


......मग मात्र विकीला गाडी घेऊन मुलाला आणलं पाहिजे. मी कालच विकीशी बोललोय.  काल रात्री मी मुलाशी हे बोललो . तोही समजुतीने बोलला. तो यायला तयार आहे म्हटल्यावर आम्ही अनेक महिन्यांनी आनंदीत झालो ......


.... आणि आता इथून पुढे....


01.08.2020 रात्रौ 11.00 वाजता विकी गाडी घेऊन पुण्याला रवाना झाला. त्यापूर्वी मुलाचा ई पास मी काढला आणि विकीचा ई पास उर्मीच्या मुलीने काढला. दुस-या दिवशी सकाळी सात वाजता विकी पुण्यात मांजरी बुद्रूकमधल्या मुलाच्या रूमवर गेला. तिकडे  मारूती निवासच्या कांबळे कुटुंबाने व राऊत कुटुंबाने खूप सहकार्य केले. त्यामुळे दि. 02.08.2020 रोजी दुपारी साडेबारा वाजता विकी व मुलगा तिकडून निघाले ते रात्री नऊ वाजता रत्नागिरीत दामले हायस्कूलला आले. तिथे मुलाला होम क्वारंटाईनचा शिक्का मारून ते दोघे दहा वाजता घरी आले. दोघांनी सामान उतरलं . भावाच्या घरात मुलानेच ते नेलं व तिथेच तो होम क्वारंटाईन झाला. आता प्रश्न असा आला आहे की 03.08.2020 पासून आमच्या भागात जोरदार पाऊस जोरदार पाऊस , वारा यामुळे वारंवार खंडीत होणारी वीज व इंटरनेटची कमी स्पीड यामुळे तो आणि आम्ही दोघंही त्रस्त आहोत ! आज 05.08.2020 आहे व पुढील 48 तास खूपच वादळी असणार आहेत , असं म्हणतात. समुद्राचे पाणी बंधारा फोडतेय . उंच लाटा उसळतायत. लोक जीव मुठीत घेऊन जगतायत . राम राम करतायत ! गेली साठ वर्षे दर पावसाळयात हीच कहाणी आहे ! आमच्या वरच्या बाजुला उत्तर दिशेला जंगलात काल रात्री झाडांच्या फांदया मोडल्याचे आवाज येत होते. रात्री साडेबारा वाजता मागे पुढे पाहण्याचा प्रयत्न केला पण काळोखात काही दिसेचना ! आवाज मात्र आले ! वारा, पाऊस यामुळे वीज जाते . मुलाचे काम ठप्प होते. आज मिल्याला इनव्हर्टरची चौकशी करायला सांगितली. त्याने भर पावसात शहरात जाऊन ती लगेच केलीही . किमान चाळीस हजार खर्च येईल. परत एक दोन महिन्यांनी मुलगा पुण्याला जाणार आणि मुंबईहून भाऊ वर्षातून एक दोन महिने रहायला इकडे येणार , बाकीचा वेळ इनव्हर्टर पडूनच राहणार ! काय करावे याचा विचार करीतच मागे पुढे फिरतोय... शेवटी इनव्हर्टरचा विषय मागेच पडला . 

इंटरनेटची मुलाची समस्या थोडी कमी झाली तरी गेले काही दिवस खूप त्रासाचे जात आहेत. पत्नीला दररोज काही ना काही बारीकसारीक आजार होत आहेत. गेली सव्वीस वर्षे सुरू असलेला खाज व रँशेश उठण्याचा आजार तर वाढला आहेच , पण शरीराच्या उजव्या बाजुला कमरेपासून ते पायापर्यंत कधीही फूट लागते आहे. परत मानेचा व मणक्याचा जुना आजार आहेच. हे कमी म्हणून की काय नवा आजार  काफल टनेल सिंड्रोम सुरू झाला आहे ! तिच्या हाताचे दोन्ही पंजे कधीही बधीर होतायत. मुंग्या येतायत. दिवसरात्र कधीही हे प्रकार सुरू असतात. गणपती आल्यादिवसापासून तर हया आजारांना जोरच चढलेला आहे. कित्येक रात्री झोप नाहीय. दिवसाही विश्रांती नाहीय. गणपतीविसर्जनही होऊन गेले पण अनेकदा साकडे घालूनही तसूभर परिस्थितीत फरक पडलेला नाही ! 


आज दि. 30.08.2020 रोजी दुपारी मुलगा तुम्हांला एक विषय बोलायचा आहे म्हणून सांगून शहरात गेला . दुपारनंतर आला तो भावाच्या घरात जाऊन झोपला. सहा वाजता उठला, पोट बरोबर नाही व नंतर बोलूया म्हणाला आणि परत झोपला. रात्री जेवायला आला तर त्याने काही विषयच काढला नाही. जिवाची घालमेल होत असतांनाही उभी रात्र पुढे असल्यामुळे मीही विचारण्याचे टाळले. मध्यरात्री माझी बेचैनी वाढली. नको ते विचार मनात येऊ लागले. त्यातच पत्नीचे आजारपण . तीन चारच्या सुमारास कधी तरी डोळा लागला. 


31.08.2020 : पहाटे  विचित्र स्वप्नं पडले. आज आमच्या जुन्या आँफीसात नार्वेकर बाई तिच्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेली आहे. बाजुला विभुते बाई आहे. समोर काटकोनात बादल आहे. मी त्याने दिलेले जीपीएफचे बील तपासत असतो. माझ्या लक्षात येते की, ते बील जीपीएफ बिलाच्या नमुन्याऐवजी आकस्मिक खर्चाच्या बिलांच्या नमुना क्र. 31 मध्ये केलेले आहे . मी बादलला हे सांगायचे ठरवतो , पण त्यापूर्वी जीपीएफ बिलांची फाईल घेऊनच बादलला दाखवावे , असा विचार करतो.  इथेच स्वप्नं संपते ! 

हे स्वप्नं विचित्र म्हणजे अनेक वर्षे न आलेली नार्वेकर बाई आँफीसात बसून आरामात गप्पा मारतांना दिसते. ती व विभुते त्यांच्याच पूर्वीच्या आस्थापना विभागात तर मी व बादल आमच्याच पूर्वीच्या लेखा विभागात बसलेलो दिसतो.  मी दीड वर्षापूर्वीच रिटायर्ड झालो तरीही मी तिथे कार्यरत व सहकारी बादलला मार्गदर्शन करतांना दिसतो. 

या स्वप्नाची प्रचिती लगेच आली ! या स्वप्नात संपूर्ण कार्यालयात फक्त चारच माणसे दिसली ! लक्षात घ्या . चार खांदे ! सकाळी 09.15 ला माजी विद्यार्थी व शेजारच्या पेडणेकरांचा जावई निखील शेटये याचा माजी अधिव्याख्याता जयंत नांदेडकर यांचे काल रात्री 11.00 वा. निधन झाल्याचा संदेश आला. दुसरा झटका बसला तो माझ्या मेहुण्याचे सासरे वारल्याचा फोन आला तेव्हा. 

चार खांदे म्हणजे बहुतेक कुणाच्या तरी मरणाच्या बातम्यांचा दिवस दिसतोय ! आतापर्यंत दोन पुरूषांच्या निधनाच्या बातम्या आल्या आहेत. स्वप्नात दोन पुरूष व दोन महिला दिसल्या होत्या. म्हणजे अजून दोन महिलांच्या बातम्या तर येणार नाहीत ना ?

सकाळी सहा वाजता जाग आलीच नाही. पावणेसात वाजता उठलो. आज सोमवार. नळाला आज पाणी येणार नसल्याने विहीरीवरून पाणी आणले. सकाळपासूनच पत्नीच्या अंगाला खाज येत होती. हे पित्त, शितपित्त , आम्लपित्त की आणखी काय ? तेच कळत नाही. तिची नेहमीची गोळीही परिणाम करीत नव्हती. संध्याकाळी हिने राजूला फोन करून त्याच्याकडची गोळी पाठवायला सांगितली. आजू ती घेऊन आला. पाठोपाठच राजूवहिनी व मुलगी धावत आलीत. तोपर्यंत ही अंग खाजवून रडकुंडीस आली होती. मग हिने गोळी घेतली. राजूवहिनीने हिच्या डोक्यावर तेल घातलं. अंगाला लावलं . तासाभरात हिला जरा बरं वाटलं, तश्या त्या दोघी घरी गेल्या. ही अंथरूणावर लवंडली . मी दूध गरम करायला गेलो. दूध तापून वर येतच होते तोच ही आँक आँक करीत बाथरूमकडे धावली आणि मी गँस बंद करून तिचे डोके दाबून धरायला धावलो. वांती काही नीट झालीच नाही. ही मात्र घुसमटली. कशीबशी तिला सावरली , उभी केली आणि बेडवर झोपवली. लगेच मागचा दरवाजा उघडला तो बीनाच अंगणात पाठमोरी उभी होती. मी तिला तिच्या आईला पटकन घेऊन ये म्हणून सांगितले. काकीला बरं नाहीय का म्हणून तिने विचारले. मी होय म्हणताच ती पळत तिच्या आईला बोलवायला गेली. दोनच मिनिटात मायलेकी आल्या. संत्या पण आला. मग ती तासभर बसलीत . जरा बरं वाटलं. मध्येच मुलगा येऊन जेवून त्याच्या कामाला गेला. काय वाटले तर बोलवा म्हणाला. मग पेडणेकर कंपनीही गेली. उरलो पुन्हा आम्ही दोघेच. त्यातही ही आजारी आणि शुश्रूषा करणारा मी एकटाच ! तिची शुश्रुषा करता करता रात्री तीन वाजले तेव्हा कुठे ती झोपली . मग मीही लवंडलो . नंतर कधी तरी मला झोप लागली  !


( क्रमश: )

...........


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: