आम्ही इथे वाढदिवस साजरे करतो
वाढदिवस साधारणपणे आपण घरात किंवा अन्य बंदिस्त जागेत साजरे करतो. काही जण म्हणतात की वाढदिवस कशाला साजरे करायचे ? वाढदिवस म्हणजे खरं तर उलटी गणती सुरू असते. आयुष्यातले एक एक वर्षं किंवा दिवस कमी होत असतांनाच त्याला वाढदिवस तरी कसा म्हणता ? असा काहींचा प्रश्न असतो. तर काही जणांना आनंदासाठी काही ना काही निमित्त लागत असते. त्यांच्यासाठी तर वाढदिवस ही पर्वणीच ! काही जण मात्र इतरांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात आणि तेही वैशिष्ट्यपूर्ण जागेत ! निसर्गसंपन्न वातावरणात, मोकळ्या हवेत !
आमच्या गावातही अशी उत्साही तरूण मुलं आहेत ज्यांनी एका शेडचा उपयोग वाढदिवस साजरा करण्यासाठी केला आहे ! या मुलांच्या कलात्मक बुध्दीला नक्कीच दाद द्यावी लागेल !
हे वाढदिवस सर्वच स्नेही मंडळींचे साजरे केले जातात. विशेष म्हणजे वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरे करूनही कुठेही गडबड गोंगाट नसतो. खऱ्या अर्थाने हे तरूण असूनही अत्यंत विवेकाने व आनंदाला कुठलेच गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात ! म्हणूनच या मुलांचं खूप कौतुक करावं वाटतं. केवळ त्यांच्यासाठीच हा पोस्टप्रपंच !
....................
गालबोट लागलेच !
काही काळापूर्वी वरीलप्रमाणे पोस्टप्रपंच केला खरा ; पण परिस्थिती सतत बदलत असते. चांगल्याला दृष्ट लागली म्हणा किंवा कायम तीच स्थिती रहात नाही म्हणा...पण काही तरी घडल्याने हे वाढदिवस साजरे होणे वर्षभरानंतर बंद झाले. कुठे तरी माशी शिंकली खरी ! काहींना आसपास चांगले घडतेय याचेच दु:खं असते . अशा कोणी तरी मोडता घातला असावा किंवा तरूणाईचाच पाय घसरला असावा. काही असो , वाढदिवस साजरे होणे बंद झाले हे नक्की. शेवटी गालबोट लागलेच !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा